दर्जात्मक शिक्षणाची चळवळ – जमिनीवरील आव्हाने

दर्जात्मक शिक्षणासाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. अनेक ठिकाणी यावर काम होत आहे, पैसे खर्च होत आहेत, पण अपेक्षित दिशेने प्रगती मात्र झालेली दिसत नाही. दर्जात्मक शिक्षण कसे असावे हे अनेकांनी आपापल्या परीनं समजून घेण्याचा प्रयत्नदेखील झालेला दिसतो. परंतु तरी, शिक्षणाला सर्वसमावेशक बनवण्याचे किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे काम प्रत्यक्षात उतरवणे आपल्याला इतके आव्हानात्मक का वाटते आहे? शिकण्याच्या वेगवेगळ्या जागा निर्माण करून मुलांना शैक्षणिक संधी देऊ इच्छिणाऱ्या एका सेवाभावी संस्थेतील आपले चार मित्र त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेही शाळा हे शिक्षणाचे एकमेव ठिकाण नसते. मुले निरीक्षणातून आणि अनुभवातून ज्या गोष्टी शिकतात, त्या कुठल्याही पाठ्यक्रमात नसतात. 

या संकल्पनेवर विश्वास असणारी ‘लर्निंग कंपॅनिअन्स’ ही आमची संस्था नागपूर जिल्ह्यामध्ये काम करते. मुलांसाठी शाळा आणि वर्ग अधिक समावेशक, आनंददायी आणि प्रभावी कसे बनतील यावर आम्ही काम करीत आहोत. विशेषतः नागपूर शहराभोवती वसलेल्या, वर्षातील अर्धा काळ भटकंती करणाऱ्या भरवाड समुदायातील मुलांचे नाव शाळेच्या पटावर यावे आणि त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या दिशेने आमचे प्रयत्न चालू आहेत. नव्याने शिकून बाहेर पडलेल्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये रस असलेल्या युवकांना फेलोशिपच्या माध्यमातून  ‘मुलांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण आणि त्याभोवतीची व्यवस्था’ याविषयी प्रशिक्षण देणे आणि ह्या युवकांमधूनच शिक्षणक्षेत्रातील नवे नेतृत्व तयार व्हावे असे प्रयत्न करणे ह्या उद्दिष्टांवर लर्निंग कंपॅनिअन्सचे काम चालते. हे युवक आठवड्यातील ५ दिवस प्रत्यक्ष भरवाड वस्त्यांमध्ये राहून मुले आणि पालक तसेच स्थानीय प्रशासन आणि शाळा या सर्वांना एकत्र आणून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करतात. https://www.learningcompanions.in/ या वेबसाईटवर लर्निंग कंपॅनिअन्सविषयी अधिक विस्ताराने समजून घेता येईल. 

प्रत्यक्ष भरवाड वस्त्यांमध्ये राहून काम करणाऱ्या आपल्या ह्या मित्रांकडून त्यांचे काही अनुभव ऐकूया. याची दोन प्रकारांनी विभागणी करता येईल.

१. असा कृतीकार्यक्रम जो दर्जात्मक शिक्षणाला हातभार लावेल असे त्यांना वाटते. तसेच, त्यांच्या कार्यक्षेत्रात ते तो अंमलात आणू शकले आहेत. हे कसे शक्य झाले त्याविषयी ते येथे बोलतील. 

२. एक असा कृतीकार्यक्रम, जो होणे त्यांना गरजेचे तर वाटते पण तो प्रत्यक्ष अंमलात आणणे त्यांना कठीण जाते आहे. या त्यांच्या प्रयत्नांमध्ये नेमके कोणते अडथळे येत आहेत याविषयीही ते येथे बोलतील. 

प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात अनुभवाला येणाऱ्या ह्या दोन्ही बाजू बघताना आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहचतो आहोत का? किंवा नेमके कुठे आणि किती कमी पडतो आहोत याची कल्पना आपणा सर्वांना येऊ शकेल. 

मी राहुल रहांगडाले

मी लर्निंग कंपॅनिअन्स या ग्रुपसोबत प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करतो. वर्गामधील शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल करून शिक्षणाची प्रक्रिया सर्वसमावेशक, अधिक प्रभावी आणि आनंददायी व्हावी यासाठी आम्ही कामे करत आहोत. 

शिक्षणामध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी केवळ शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षणकार्यशाळा पुरेश्या नाहीत असे माझ्या अनुभवांवरून मी ठामपणे म्हणू शकतो. प्रत्यक्ष काम करत असताना आम्हांला येणारे अनुभव, तसेच मुलांचे, त्यांच्या पालकांचे आणि आमच्या सहकार्यांचे अभिप्राय समजून घेत घेत स्वतःतील कौशल्यांचा विकास करणे हे सुरुवातीच्या काळातले सगळ्यात मोठे आव्हान असते. म्हणूनच ह्या सुरुवातीच्या काळात असे अभिप्राय आणि तज्ज्ञांची मदत सातत्याने मिळत राहायला हवी.  मी आज प्रत्यक्षात हे करू शकत आहे कारण, 

  • प्रशिक्षणाच्या काळात मला स्वतःला याचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने समजावले गेले.
  • लर्निंग कंपॅनिअन्सच्या कामाची रचनाच अश्या पद्धतीची आहे, की १५ दिवसातून एकदा प्रत्येकाला एकमेकांसोबत संवाद करावा लागतो. यात सर्व सहकारी युवक आणि त्यांचा प्रोग्राम मॅनेजर सहभागी असतात. मागील १५ दिवसांत त्यांनी स्वत:साठी नवे काय शिकायचे होते आणि कोणती कामे करायची ह्याविषयी कोणती ध्येये ठरवली होती, त्यातली कोणती पूर्ण होऊ शकली, जी अपूर्ण राहिली त्यात काय अडचणी होत्या यावर चर्चा होतात. पुढील १५ दिवसात काय ध्येय असावे हेही तेव्हा ठरते.

आमचे जवळपास १००% सहकारी सांगतात की ही प्रक्रिया त्यांच्यासाठी खूप उपयोगी असुन त्यांना फार आवडते. आमची सहकारी वर्षा म्हणते, “मला इथे खूप बोलायला आणि शेअर करायला मिळतं आणि इथे मदतही मिळत असते. अनेक समस्या, मी स्वतःहून करू इच्छिणाऱ्या काही गोष्टी माझ्या प्रोग्राम मॅनेजरला सांगता येतात आणि अपेक्षित ते सहकार्यही मिळत.” दुसरा सहकारी वृषभ म्हणतो, “इथे खूप नवीन कल्पना मिळतात अणि पुढील उद्दिष्टांवर काम करायला इतर सहकाऱ्यांकडून स्पष्ट आणि ठाम असा प्रतिसाद मिळतो.” आणखी एक सहकारी दामिनी म्हणते, “आप ऐसी कोई चीज बोल देते हो, जो मुझे सोचने में मदद करती है”. 

दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजे, स्वयंप्रेरणेने शिक्षक झालेली व्यक्तीच आपले काम खूप चांगल्या प्रकारे करू शकते. दुर्दैवाने, आपल्या शाळांमध्ये अशा शिक्षकांचे प्रमाण जास्त आहे जे अपघाताने किंवा इतर काही पर्याय नव्हता म्हणून शिक्षक बनले आहेत. परंतु ह्या मुद्द्यावर काम करण्यात अनेक मर्यादा जाणवतात. शासकीय व्यवस्थेवर माझे नियंत्रण नाही. त्यामुळे हे साध्य करावेसे वाटले तरी यश मिळेलच याची खात्री वाटत नाही.

मी विशाल तिमांडे

लर्निंग कंपॅनिअन्स या ग्रुपसोबत मी प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करतो. पालकांचा सहभाग हा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे मला वाटते. मी आमच्या एका केंद्रावर हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. आमच्या असोला गवळीटोला नावाच्या केंद्रावर ३ मुले आहेत जी सातत्याने नियमित अभ्यास, गृहपाठ करत आहेत व वर्गामध्ये चांगली प्रगती करत आहेत. हे असे का असावे याचा विचार केला असता ह्या तिघांचे पालक सर्वाधिक सजग असून मुलांकडे विशेष लक्ष देणारे आहेत असे दिसले. त्यामुळे मला वाटते की पालकांची शिक्षणाबाबतीतली समज वाढवण्यावर आपले खूप औंध लक्ष असायला हवे. मला माझ्या सध्याच्या भूमिकेत हे करायलादेखील मिळते आहे. मला हे शक्य झाले कारण, 

  • संस्थेच्या कामाचा एक खूप मोठा भाग ह्या समूहासोबतची गुंतवणूक हा आहे. अर्थात, जोपर्यंत तुम्ही या समूहाचे एक घटक नसता, तोपर्यंत त्यांचा विश्वास प्राप्त करणं अवघड असतं. त्यामुळे इथे फक्त मुलांसाठी वेळ देणे एवढेच काम नसून संपूर्ण समूहासाठी वेळ देणे, नाती जोडणे येथवर प्रवास करावा लागतो. यामध्ये पालकांसोबत सातत्याने संवाद साधणे, मुलांच्या प्रगतीचा आढावा देणे, पालकांना शाळेच्या कामांमध्ये सहभागी करून घेणे, पालकसभा या गोष्टींचा समावेश होतो. 
  • प्रत्यक्ष समूहाच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याचे पुरेसे स्वातंत्र्य लर्निंग कंपॅनिअन्सच्या सहकाऱ्यांना आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या आकलनानुसार काही गोष्टींमध्ये पुढाकार घेता येतो. 

दुसरे महत्त्वाचे म्हणजे शिकण्या-शिकवण्यासाठी कल्पक/प्रभावी प्रकल्प, खेळ यांची निर्मिती करणे. मी याबद्दल फार जास्त काम करू शकलो नाही. कारण संस्थेतील इतर अनेक कामे सांभाळत हे करण्यासाठी वेगळा वेळ मला काढता आला नाही. कामाच्या माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रत्यक्षपणे हा भाग नसला तरी हे करावे असे मनापासून वाटत होते. त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये शिकण्यासाठी वेळ काढणेदेखील मला शक्य झाले नाही याचा खेद मनात राहील. 

मी मीना मसराम

मी लर्निंग कंपॅनिअन्समध्ये प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करते. मला वाटतं की ३-६ वयोगटातील मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘आकार’ पाठ्यक्रम खूप चांगला आहे. हा पाठ्यक्रम अंगणवाडींमध्ये चांगल्या पद्धतीने राबवला गेला तर मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. पण दुर्दैवाने, अंगणवाडी शिक्षिकांना सरकारने शाळेच्या कामांव्यतिरिक्त इतर अनेक कामांमध्ये इतके गुंतवले असते की त्यांना हे काम करायला वेळच मिळत नाही. शिवाय याबद्दल कुठल्याच स्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जात नाही तसेच हवी ती मदत मिळत नाही. मी फेलो असताना मला स्वतःला मात्र एका अंगणवाडीत हे काम खूप चांगल्या प्रकारे करता आले. कारण माझ्या संस्थेच्या वेळापत्रकात पाठाच्या तयारीसाठी वेगळा वेळ दिलेला आहे. आम्ही हे कशा प्रकारे करत आहोत याबद्दल सातत्याने पाठपुरावा केला जातो आणि मदत आम्हाला मिळते.

मला खूप महत्त्वाची वाटणारी दुसरी गोष्ट म्हणजे ‘आकार’चे उपक्रम राबवणे आणि त्यासाठी पूर्वतयारी करणे याबद्दल अंगणवाडी शिक्षिकांचे पुरेसे प्रशिक्षण झाले पाहिजे. मी जिथे काम करत होते तेथील अंगणवाडी शिक्षिका स्वतः आमच्याकडून हे प्रशिक्षण घ्यायला तयार होत्या. मात्र त्यासाठी शासकीय यंत्रणांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ असल्यामुळे मी हे करू शकले नाही.

मी ऐश्वर्या कायंदे

मी लर्निंग कंपॅनिअन्समध्ये प्रोग्राम लीड म्हणून काम करते. खूप वेळा शिक्षकांची अपुरी कौशल्ये आणि ज्ञान यापेक्षाही त्यांची मानसिकता/दृष्टिकोन प्रभावी शिक्षणप्रक्रियेतील मोठे अडथळे असतात. उदाहरणार्थ, विशिष्ट घरातून आलेली मुले शिक्षणाविषयी उदासीनच असतात आणि त्यांचे काही होऊ शकत नाही असा एखाद्या शिक्षकाचा दृष्टिकोन असेल तर त्या मुलासाठी वेगळ्याने मेहनत घ्यायची त्या शिक्षकाची तयारीच नसते. अशा मुलांसोबत कसे वागावे, त्यांना कशा प्रकारे मदत करावी याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाचे सर्वसमावेशकतेकडेही एकप्रकारचे दुर्लक्ष होते. त्यामुळे मला शिक्षकांचे वेगवेगळे पूरक/अपूरक दृष्टिकोन समजून घेणे आणि त्यावर काम करणे खूप महत्त्वाचे वाटते. मला माझ्या सध्याच्या भूमिकेत काही प्रमाणात हे करता आले आहे. कारण, 

  • मी स्वतः या विषयावर भरपूर वाचन आणि अभ्यास केलेला आहे, त्यामुळे ‘शिक्षक मानसिकता’ म्हणजे काय आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत ही संकल्पना किती महत्त्वाची आहे याबद्दल माझी एक समज निर्माण झालेली आहे.
  • शिक्षकांच्या दृष्टिकोनावर/ मानसिकतेवर काम करणे हा संस्थेच्या धोरणाचाच एक प्रमुख भाग आहे आणि कामाच्या वेळापत्रकात यासाठी वेगळा वेळ दिलेला आहे. 

दुसरी, मला महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे सहकाऱ्यांचे अनुभव, त्यांची समज आणि कौशल्ये ही साधारणपणे समान पातळीवर असतील तर उपक्रम खूप प्रभावीपणे राबवता येतात. मागील एक वर्षात मला माझ्या टीमसोबत हे पुरेसं जमलं नाही. त्याची दोन-तीन कारणे आहेत. फेलोशिपच्या खूप आव्हानात्मक स्वरूपामुळे काही फेलोज् मध्येच हे काम सोडून गेले आणि त्यांच्यासोबत महिनाभराचे जे प्रारंभिक प्रशिक्षण झाले होते ते नवीन आलेल्या फेलोज् साठी पुन्हा नव्याने करणे, तेदेखील इतर अनेक गोष्टी सुरू असताना, शक्य झाले नाही. फेलोशिप ही मर्यादित काळाची, दोन वर्षांची, असते आणि त्या काळात वास्तव आणि परिस्थिती खूप वेगाने बदलत जाते. अशा बदलत्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीसोबत हवा तितका वेळ घालवता आला नाही.

थोडक्यात

या सर्व उदाहरणांवरून प्रभावीपणे काम करताना येणाऱ्या अडचणींच्या मुळाशी असणारी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, कोणताही प्रश्न सोडवत असताना ज्या परिस्थितीत आपण त्यावरचे उपाय शोधत असतो ती परिस्थिती मुळात गतिमान आणि वैविध्यपूर्ण असते.. कितीही मॉडेल्स बनवले, शोध घेतला किंवा याद्या केल्या तरी प्रत्येक नव्या परिस्थितीत काय नवीन घडेल याचा अंदाज लावता येतच नाही. अश्यावेळी प्रत्यक्ष काम करत असताना अंदाज घेत घेत आपले धोरण, नियोजन आणि कृती विकसित कराव्या लागतात. मात्र नियमनाच्या आग्रहापोटी निर्णयप्रक्रियेचे जास्तीत जास्त केंद्रीकरण, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील परिस्थितीचे पुरेसे आकलन नसताना केलेल्या अव्यावहारिक अपेक्षा, प्रत्यक्ष काम करणारी संस्था आणि व्यक्ती यांच्यावर निकाल आणि परिणाम दाखवण्यासाठी  सातत्याने येणारा दबाव आणि अपुऱ्या माहितीमुळे चुकलेली धोरणे या सगळ्यामुळे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे काम करणाऱ्या व्यक्ती बऱ्याच वेळेला खरेखुरे प्रश्न सोडवण्याऐवजी सोयीचे, सुरक्षित प्रश्न आपल्या मर्यादित माहितीच्या आधारावर सोडवण्याच्या जाळ्यात अडकू शकतात. हा मुद्दा समजून घेऊन सर्व पातळ्यांवर आपण सामाजिक बदलाच्या प्रक्रियेविषयी अधिक समतोल दृष्टिकोन आणि अपेक्षा ठेऊ शकलो तर अधिक सकारात्मक आणि अर्थपूर्ण बदल प्रत्यक्षात येऊ शकतील.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.