मानवी ज्ञानाच्या मर्यादा

सर्वसामान्यपणे एखाद्या विषयाची प्राथमिक ओळख करून देताना त्या विषयाशी संबंधित बोधकथा विषय समजावून घ्यायला मदत करतात. मीही या लेखात अशा कथांची मदत घेणार आहे. पण या कथा एकाच वेळी अनेक पातळीवर वावरत असतात. त्यामुळे त्या निरनिराळ्या वाचकांना निरनिराळे बोध देण्याची शक्यता असते. यासाठी, मला काय म्हणायचे आहे ते प्रथम सूत्ररूपाने पाहूया आणि त्यानंतर आपण स्पष्टीकरणाकडे वळूया. 

मला म्हणायचे आहे ते असे:

१. त्रिकालाबाधित, संदर्भरहित सत्य नावाची गोष्ट नसते आणि असली तरी ती तशी आहे हे सिद्ध करणे शक्य नसते. 
२. ज्याला आपण सत्य म्हणतो ते प्रत्यक्षात गृहीतक किंवा त्यातून काढलेले निष्कर्ष असतात. (क्रमांक १ वरील विधानही त्याला अपवाद नाही.) 
३. ज्या माहितीवर आणि ज्या तर्कावर हे गृहीतक उभे असते ती माहिती आणि तो तर्क सत्यतेची केवळ शक्यता दर्शवितात, हमी देऊ शकत नाहीत.
४. ज्या भाषेत आपण माहिती गोळा करतो, तर्क करतो, गृहीतके मांडतो ती भाषा स्वभावतः ढोबळ (rough) आणि अस्पष्ट ( fuzzy) असते. 
५. ज्या उद्गामी (inductive) तर्काचा उपयोग करून आपण नियम तयार करतो त्याचा पाया उदाहरणे असतात. उदाहरणे सत्याची हमी देऊ शकत नाहीत. 
६. ज्या निगामी (deductive) तर्काचा उपयोग करून आपण निष्कर्ष काढतो तो उद्गामी तर्काच्या ठिसूळ पायावर उभा असतो. 
७. सामाजिक क्षेत्रातील गृहीतके बहुमताने ठरतात; याला विज्ञानही अपवाद नाही.

(मॅक्स प्लॅन्क म्हणतो “[a] new scientific truth does not triumph by convincing its opponents and making them see the light, but rather because its opponents eventually die, and a new generation grows up that is familiar with it.”)

यासाठी शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रसिद्ध करावा की नाही हे तज्ज्ञांच्या बहुमताने ठरते. दुसऱ्या भाषेत आपण ज्याला वस्तुनिष्ठ सत्य म्हणतो ते बहुसंख्येने स्वीकारलेले व्यक्तिनिष्ठ सत्य असते. 

यासाठीच न्यायालयात सत्य शोधण्यासाठी एकाहून जास्त न्यायाधीशांचे खंडपीठ नेमावे लागते. त्यात बहुमताने ठरेल ते सत्य मानून ते स्वीकारले जाते. त्या खंडपीठाच्या निर्णयावर पुनर्विचार करायचा असेल तर पूर्वीपेक्षा मोठे खंडपीठ नेमावे लागते.

८. आजची ‘मेजॉरिटी’ उद्या ‘मायनॉरिटी’ होऊ शकते. त्यामुळे तथाकथित वस्तुनिष्ठ सत्य (=गृहीतक) बदलू शकते. 
९. सत्य सुसंगत असते (अर्थात हेही गृहीतकच आहे.) त्यामुळे गृहीतक जास्तीत जास्त सुसंगत असावे एव्हढीच अपेक्षा असते. 

पण याची हमी, निदान गणितासारख्या द्विमूल्य तर्कशास्त्रात तरी, देता येत नाही. असे कुर्त गोडेलचा Incompleteness Theorem सांगतो. याचाच अर्थ 

१०. पुरेसे गुंतागुंतीचे गृहीतक सुसंगत आहे हे सिद्ध करता येणे शक्य नसते. त्यात विसंगती आढळली की ती दूर करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्या गृहीतकाचा त्याग करून त्या जागी नवीन गृहीतक स्वीकारणे एव्हढेच आपण करू शकतो. पण त्याने मूळ प्रश्न सुटत नाही; तो तसाच राहतो. 

संगणकातील सॉफ्टवेअर बग संबंधीही असा अनुभव येतो. ‘बग’ नाही याची हमी देता येत नाही. तो आढळला तर घालवण्याचा प्रयत्न करता येतो इतकेच. 

येशू ख्रिस्तांना देहान्त शासन देणारा जेरुसलेमचा गव्हर्नर पाँटीस पायलट / पिलात (Pontius Pilate) याची एक गोष्ट संगतात. जीझस म्हणत असत की मी तुम्हाला खऱ्या देवाचा, सत्यधर्माचा उपदेश करतो. पण रोमन अनेक देव मानत असत. जीझसबरोबरच बाराब्बास नावाच्या एका गुन्हेगारालाही देहान्ताची शिक्षा होणार होती. ज्यादिवशी शिक्षा अमलात आणायची होती तो दिवस रोमन सम्राटाचा वाढदिवस किंवा त्यासारखा काहीतरी उत्सवाचा दिवस होता आणि त्यानिमित्त एका गुन्हेगाराला शिक्षा माफ होणार होती. पिलातने जीझसपुढे प्रस्ताव ठेवला: जीझसचा देव खरा मानला जाईल. पण रोमनांचे देवही खरेच आहेत हे जीझसने मान्य करावे. जिझसने ते अमान्य केले. तिथे जमलेले लोक जीझसच्या मृत्युदंडाची मागणी करू लागले. पिलातने बाराब्बासची शिक्षा माफ केली. रोमनांचे देव खरे मानणे ही जिझसच्या दृष्टिकोनातून सत्याशी प्रतारणा होती. रोमनांच्या दृष्टीने जीझसची कृती राजद्रोहाची, समाजद्रोहाची होती. कृती एकच; पण गृहीतक बदलले की, ‘सत्य’ बदलते. असे म्हणतात की, ‘माझाच देव सत्य आहे’ असे जिझसने म्हटल्यावर पिलातने प्रश्न केला, “सत्य म्हणजे काय?” आणि तो उत्तरासाठी थांबलाही नाही. 

काहीसा असाच प्रसंग सोळाशे वर्षांनी पुन्हा रोममध्ये घडल्याचे आढळेल. फक्त, यावेळी, शिक्षा फरमावणारे स्वतःला जिझसचे अनुयायी म्हणवून घेत होते. म्हणजे स्वतः अनुभव घेतल्याने लोक शहाणे होतात असेही नाही. 

गृहीतकांचा हा संघर्ष धर्माच्याच बाबतीत निर्माण होतो असे नाही. धर्म, राजकारण, समाजकारण, किंबहुना विज्ञान आणि गणित यांसारख्या तथाकथित अकाट्य तर्काधिष्ठित ज्ञानशाखेतही यापेक्षा वेगळे घडत नसते. (वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) एकच उदाहरण देतो. 

पुढे एका व्यक्तीने त्याच्या कारअपघाताचे केलेले वर्णन आहे:

“परवा माझ्या कारवर एक झाड येऊन आदळलं. म्हणजे झालं काय; मी कार सुरू केली. लवकरच रस्ता नव्वद किलोमीटर वेगानं मागं सरकू लागला. दोन्ही बाजूची झाडंही त्याच वेगानं मागं पळत होती. पण अचानक उजव्या बाजूच्या झाडाला काय वाटलं कोणास ठाऊक. ते बाजू सोडून माझ्या कारकडं धावत आलं. आणि धडाम!”

हे वर्णन एखाद्या गूढकथेतले नाही. हे वर्णन एका मानसिक विकृतीने ग्रासलेल्या व्यक्तीने केले असावे असे म्हणण्यापूर्वी लक्षात ठेवा की असा मूर्खपणा आपण नेहमीच करत आलो आहोत. हे वर्णन आपल्या गृहीतकाचा तर्कशुद्ध निष्कर्ष आहे. गृहीतक समजायला सोपे आहे. आपण स्थिर असताना जे स्थिर दिसते ते स्थिर आणि गतिमान दिसते ते गतिमान. कारमध्ये मी स्थिर होतो. कारमधील माझे मित्रही माझ्याप्रमाणेच स्थिर होते. गती बाहेर झाडाना दिसत होती. तेव्हा झाड कारवर आदळले म्हणणे योग्यच आहे. हे गृहीतक आपण हजारो, नव्हे, लाखो वर्षे सत्य म्हणून स्वीकारत आलो होतो. हे गृहीतक न स्वीकारणाऱ्यांना आपण मृत्युदंड ठोठावत होतो. आपण स्थिर असताना पृथ्वी स्थिर दिसते. सूर्य फिरताना दिसतो. हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. त्यामुळे पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपण मानत होतो. कार हे पृथ्वीचे अति छोटे रूप. कारमध्ये चार माणसे असतात. पृथ्वीरूपी कार खूपच मोठी आहे. तिच्यात अब्जावधी माणसे असतात. पण तेव्हढ्याने गृहीतकाचे निष्कर्ष बदलायचे कारण नाही. 

पण गतीला जर दोन वस्तूंमधील नाते मानले, तर कार आणि झाड एकाच पातळीवर येतात. पृथ्वी आणि सूर्य यांचा तात्त्विकदृष्ट्या दर्जा समान होतो. मग कुणाला स्थिर मानायचे आणि कुणाला गतिमान याची निवड आपणच करणार असतो. अजूनही आपण कारच स्थिर आहे असे मानू शकतो. पण दुसरा पर्याय आपल्याला अधिक सुसंगत वाटतो. (अर्थात कारच्या आणि पृथ्वीच्या फिरण्यात फरक आहे. पण त्यामुळे विवेचनाला कोठे बाधा येत नाही.) 

म्हणजे आता प्रश्न गृहीतकाच्या निवडीचा आला. जे अधिक सुसंगत वाटते ते गृहीतक आपण स्वीकारले. पण सुसंगतीही सत्याची हमी देण्यास पुरेशी नसते. सत्य सुसंगत असते. (हेही एक गृहीतकच) पण हुशार वकील असत्यही सुसंगतपणे मांडतो. न्यायाधीश सत्य ठरवत नाहीत. ते सुसंगती पाहतात. यासाठी अनेक न्यायाधीशांचे ‘बेंच’ नेमावे लागते. बेंचही सुसंगती बहुमताने ठरवते. सत्य जाणण्याची याहून अधिक विश्वासार्ह कसोटी आपल्याकडे नसते. 

ही सुसंगती, विशेषतः भौतिक क्षेत्रात, केवळ वकिलाच्या हुशारीवरच अवलंबून असू शकत नाही, तर ती उपलब्ध माहितीवर अवलंबून असते. नवीन माहिती मिळाल्यास केस ‘रिओपन’ करावी लागते. पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे हे गृहीतक मानूनही केतू सूर्याला केव्हा गिळतो आणि केव्हा सोडतो ते नेमके सांगता येते. अमावस्या, पौर्णिमा केव्हा येणार हे नेमके कळते. त्यासाठी कोपर्निकसची गरज नाही. कोपर्निकसला स्वीकारण्याचे कारण गॅलिलिओला सापडलेली दुर्बीण आहे; जिच्यामधून त्याने शुक्राच्या कला पाहिल्या. टॉलेमीचे गृहीतक शुक्राच्या कलांचे स्पष्टीकरण देऊ शकत नव्हते. ते गॅलिलिओची दुर्बीणच देऊ शकत होती. गॅलिलिओला दुर्बिणीतून आकाशाकडे पाहण्याची बुद्धी झाली नसती तर टोलेमीला सत्य मानण्यात कोणताही प्रत्यवाय नव्हता. आणि मग कोपर्निकसची ओळख ग्रहगोलांच्या मार्गांचे गणित करण्याची आणखी एक रीत शोधून काढणारा एव्हढीच राहिली असती. पण याचा दुसरा अर्थ असा होतो की, भविष्यात आणखी नवी साधने उपलब्ध झाली, नवी माहिती मिळाली तर सध्याची गृहीतकेही मोडीत काढावी लागणे शक्य आहे. 

मग गृहीतक आपण मानावेच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. याचे एकमेव उत्तर कोणत्याही गोष्टीचे ज्ञान करून घेण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही एव्हढेच आहे. एखादे विशिष्ट गृहीतक मानण्याची गरज नसेल तर ते गृहीतक मानू नये, हे ठीक. पण कोणतेच गृहीतक मानत नाही अशी स्थिती असू शकत नाही. काही-ना-काही सत्य आहे असे गृहीत धरल्याशिवाय आपला विचार पुढे जाऊच शकत नाही. ही आपल्या ज्ञानाची मर्यादा आहे. असे का होते हे समजण्यासाठी आपल्या ज्ञानाचे स्वरूप समजून घ्यावे लागेल. 

आपण ज्ञान कसे मिळवतो :

ज्ञानसंपादनात तीन घटक काम करत असतात: निरीक्षण, तर्क आणि भाषा. यापैकी एकही घटक पूर्णपणे विश्वासार्ह नसतो. 

अ) आपले निरीक्षण संदर्भशून्य असू शकत नाही. ते तुलनेने ठरते :

 आपल्याला स्वप्न पडते हा आपला अनुभव आहे. स्वप्नात असताना हे स्वप्न आहे याची जाणीव नसते. पाहणाऱ्यासाठी त्यावेळी ते सत्यच असते. क्षणभर तुम्ही स्वत:लाच विचारा : या क्षणी, तुम्ही हा जो लेख वाचत आहात तो स्वप्नात वाचत आहात की, वास्तवाच्या जगात? असा प्रश्न कोणी विचारला की, सर्वसामान्यपणे, “चिमटा काढून बघ!” असे सुचवले जाते. पण त्याने प्रश्न सुटत नाही. चिमटा काढल्यानंतर खालीलपैकी एक स्थिती शक्य आहे. 

स्थिती १: तुम्ही चिमटा काढला आणि तुम्ही लेख वाचत आहात असेच तुम्हाला आढळले.

समजा तुम्ही चिमटा काढला आणि तरीही तुम्ही लेख वाचत असल्याचे तुम्हाला आढळले. त्यामुळे तुम्ही निष्कर्ष काढला की तुम्ही स्वप्नात नव्हता आणि नाही. पण कदाचित असेही की, हा लेख तुम्ही वाचत आहात हेच स्वप्न आहे. चिमटा काढा असे सुचवणारा मित्रही स्वप्नातला आहे आणि चिमटा काढण्याची कृतीही स्वप्नाचा भाग आहे. तुम्ही स्वप्नातून बाहेर आलाच नाही. चिमटा काढण्यापूर्वीही तुम्ही वास्तव जगात नव्हता आणि आत्ताही नाही. 

स्थिती २: तुम्ही चिमटा काढला आणि तुम्ही बिछान्यात असल्याचे आढळले.

समजा तुम्ही चिमटा काढला आणि तुम्ही पुस्तक वाचत नसून बिछान्यात आहात असे आढळले. काही क्षण तरी तुम्हाला दोन्ही स्थितींची जाणीव आहे त्यावरून तुम्ही निष्कर्ष काढला की, लेख तुम्ही स्वप्नात वाचत होता. आता तुम्ही जागृत अवस्थेत आहात. 

पण असेही असू शकेल की, वास्तवात लेख वाचता वाचता तुमचा डोळा लागला आणि तुम्हाला स्वप्न पडले: मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे की, तुम्ही लेख स्वप्नात वाचत आहात की, वास्तवात. स्वप्नातल्या मित्राने तुम्हाला चिमटा काढायचा सल्ला दिला. स्वप्नात चिमटा काढल्याबरोबर तुम्ही बिछान्यात असल्याचे तुम्हाला आढळले. तेही स्वप्नातच. तुम्ही स्वप्नाच्या बाहेरच आला नाही. वास्तव पूर्वी होते. आत्ता स्वप्न आहे. 

स्वप्न आणि सत्य एकाच वेळी स्मृतीपटलावर असतील तरच तुलना शक्य असते आणि दोन्हीपैकी कशाला सत्य म्हणायचे आपणच ठरवायचे असते. एक स्थिती स्वप्न मानली तर दुसरी सत्य होते. दुसऱ्या भाषेत ज्याला आपण ‘वास्तव’ म्हणतो तेच दुसऱ्या कशावर तरी अवलंबून आहे. ‘वास्तवाच्या जगात’ या संकल्पनेची जाणीव ‘स्वप्नाच्या जगात’ ही अवस्था अनुभवल्याशिवाय होत नाही. आणि त्यापैकी कोणती अवस्था सत्य आणि कोणती असत्य हेही आपणच ठरवायचे असते. सद्यस्थिती सत्य आहे असे समजूनच आपण निर्णय घेत असतो. 

समजा मी असे विधान केले की, या जगात सर्व पदार्थांची लांबी, रुंदी व उंची दररोज दुप्पट होते. माझे म्हणणे खरे आहे की खोटे? तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टी आहे. तुम्ही प्रत्यक्ष मोजपट्टीने मोजून पाहाल. विधान खोटे असेल तर मोजमापात फरक पडणार नाही, हे उघड आहे. पण मोजमापात फरक पडला नाही, तर माझे म्हणणे खोटे आहे असे खात्रीपूर्वक म्हणू शकता का? कारण ज्या मोजपट्टीने तुम्ही मापे घेतली तिलाही माझे विधान लागू आहेच. तिचीही लांबी-रुंदी-उंची दुप्पट झाली आहे. पट्टीवरील आजची एक फूट लांबी कालच्या दोन फुटाबरोबर असेल. त्यामुळे त्या मोजपट्टीने मोजल्यास तुम्हाला फरक आढळणारच नाही. तुम्हाला कालचीच मापे पुन्हा दिसतील. माझे विधान खरे असले तरी ते मोजपट्टीवर दिसणार नाही. म्हणजे विधान खरे आहे की, खोटे याबद्दल खात्रीने काहीच सांगता येत नाही. माझा आक्षेप तुम्ही कोणत्या विधानाला सत्य समजता याला नाही. माझा प्रश्न तुमच्या म्हणण्याला तुमच्याकडे काही पुरावा आहे का, हा आहे. आणि तुमच्याजवळ असा कोणताही बिनतोड पुरावा नाही. 

नैसर्गिक रीतीने विकसित होणाऱ्या भाषेत शब्दांचे अर्थ तुलनेनेच निश्चित होत असतात. शब्दांची व्याख्या करून आपण ते वापरत नसतो. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास अतिव्याप्तीच्या किवा अव्याप्तीच्या दोषाला सामोरे जावे लागते. आणि हे अगदी नेहमीच्या वापरातील शब्दांनाही लागू असते. ‘पक्षी’ म्हणजे काय हे सर्वांना माहीत आहे. पण क्षणभर विचार करूया, आपल्यासमोर एक ‘पक्षी’ आहे. पण ही वस्तू ‘पक्षी’च आहे हे आपण कसे ठरविले? किंवा यंत्रमानवाला पक्षी ओळखायला कसे शिकवणार? प्लेटो या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेल्या आदर्श जगाची (ideal) कल्पना निर्माण करतो. अर्थात तेथेही तो तुलनाच करत असतो. आपण पूर्णपणे इहवादी विचार करूया. पक्षी आकाशात उडतो. प्रस्तुत वस्तू आकाशात उडते म्हणून ती पक्षी आहे. (उडाला तर पक्षी; बुडाला तर दगड!) पण ही काही सत्य ठरवण्याची निर्दोष कसोटी नाही हे आपल्याला ठाऊक आहे. कारण विमान आकाशात उडते आणि आपण त्याला पक्षी म्हणत नाही. पक्षी सजीव असतो विमान सजीव नाही. म्हणजे सजीवता हा आणखी एक निकष लावला. आता उडणारा सजीव म्हणजे पक्षी अशी व्याख्या होईल. पण ही व्याख्याही अपुरीच होते. डास सजीव आहे, तो उडतोही; पण तो पक्षी नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक निकष लावू या. उदाहरणार्थ पक्षी या सजीवाचे वजन पन्नास ग्राम अथवा अधिक असणे आवश्यक आहे. ठीक! मग वटवाघुळाचे काय? तो पन्नास ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा सजीव आहे. पण तो पक्षी नाही, कारण तो सस्तन प्राणी आहे. मग आपण आणखी एक अट घातली, सस्तन नसण्याची. अशाप्रकारे आपले निकष वाढवत, शब्दाचा अर्थ अधिकाधिक नेमका करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण तो बर्‍याच वेळा प्रयत्नच असतो. आपल्याला निरपवाद सत्य (absolute truth) मिळेलच याची खात्री देता येत नाही. उदाहरणार्थ वरील वर्णनातून पेंग्विन सुटतो. कारण पेंग्विन हवेत कधीच उडत नाही! म्हणजे ‘पक्षी’ या साध्या शब्दाची ही अवस्था! तेव्हा भाषेच्या माध्यमातून संक्रमित होणारे ज्ञान ढोबळ मानानेच स्वीकारावे लागते हे मान्य व्हावे. 

वरील प्रश्न केवळ फावल्या वेळात चर्चा करण्याचा किंवा तत्त्वज्ञाचा नाही. याचा विचार करण्यासाठी ‘पॅटर्न रेकग्निशन’ ही संगणकीय शाखा आणि गणितातील “रफ सेट थेअरी” निर्माण झाली आहे. 

पंचज्ञानेंद्रियांमार्फत जे ‘इनपुट’ मिळतात ते तुलनेनेच ठरतात. तिखट पदार्थ खाऊन चहा घेतल्यास तो गोड लागतो. तोच चहा चमचाभर साखर खाऊन प्याल्यास सपक वाटतो; कारण जीभ चहाच्या गोडीची तुलना पूर्वी जिभेवर असलेल्या गोडीशी करत असते. दुपारच्या झगझगीत सूर्यप्रकाशातून घरातल्या कमी प्रकाशात आल्यावर काही काळ आपल्याला दिसत नाही याचे कारण तेच आहे. अशाप्रकारे ज्ञानेन्द्रियांद्वारे जे ग्रहण केले जाते (जे input मिळतात) ते वास्तवाचेच वर्णन असते अशी खात्री देता येत नाही. गरम पाण्यात बेडूक टाकला तर तो टुणकन् उडी मारून बाहेर येतो. पण त्याला जर थंड पाण्यात टाकून पाणी हळूहळू गरम केले तर, पाणी कितीही तापवले तरी, तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. तापमानातील सूक्ष्म फरक त्याला जाणवत नाही. आणि तो मरून जातो. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपली स्थिती अशी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

विल्यम बेट्स ( William H. Bates) हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील नेत्राविशारद तर म्हणतो, “आपल्या पाहण्याच्या क्रियेत डोळ्याचा सहभाग थोडा आणि मनाचा सहभाग जास्त असतो. दृष्टी ही डोळ्याच्या पडद्यावर पडलेल्या प्रतिमेचा अर्थ लावण्यावर अवलंबून असते. आपण जे पाहतो ती डोळ्याच्या पडद्यावर पडलेली प्रतिमा नसते तर त्या प्रतिमेचा आपल्या मेंदूने लावलेला अर्थ!” (We see very largely through mind, and only partially with the eyes. The phenomena of vision depend upon the mind’s interpretation of impression upon the retina. What we see is not that impression, but our own interpretation of it.) 

जे डोळ्याचे तेच इतर ज्ञानेंद्रियांचे. याचा अर्थ असा होतो की ज्ञानेंद्रिये एकाच गोष्टीसंबंधी निरनिराळ्या व्यक्तींच्या मेंदूला एकाच वेळी आणि एकाच व्यक्तीच्या मेंदूला निरनिराळ्या वेळी निरनिराळे ‘इनपुट’ देऊ शकतात. 

विल्यम बेट्स जे दृष्टीबाबत म्हणतो ते थोड्या-बहुत फरकाने अन्य ज्ञानेंद्रियाबाबतही खरे आहे. म्हणजे दोन व्यक्तींच्या डोळ्यासमोर एकच दृश्य असते पण त्यांना ते सारखेच दिसत नसते. एकच गाणे त्यांच्या कानावर पडत असते पण ते एकच गाणे ऐकत नसतात. एकच अन्नपदार्थ ते खात असतात. पण त्यांना ते सारख्याच चवीचे लागलेले नसतात. म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानही एका मर्यादेपर्यंत अनुभवच असतो! ते वस्तुस्थितीचे केवळ / यथार्थ चित्रण नसते. आणि अनुभव एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही. 

यावर उपाय म्हणजे अनेक व्यक्तींचे अनेक प्रसंगीचे अनुभव गोळा करून निष्कर्ष काढणे. पण येथेही फसगत शक्य असते. 

आ) ज्ञानेंद्रिये एकाच वेळी सर्वांना चुकीचे ‘इनपुट’ देऊ शकतात. 

पृथ्वी स्थिर आहे आणि आकाशस्थ ग्रहगोल पृथ्वीभोवती फिरतात हे आपण रोज पाहतो. हे निरीक्षण वस्तुस्थितीचे निदर्शक आहे असे आपण सतराव्या शतकापर्यंत मानत होतो. आपली गणिते बिनचूक होती. आपण चंद्र-सूर्याच्या उदयास्ताच्या वेळा बरोबर सांगत होतो. ते राहू-केतूच्या तावडीत केव्हा सापडणार (आणि पर्वकाळात आपण केलेल्या प्रार्थनेमुळे) त्यांची केव्हा सुटका होणार यांची नेमकी वेळ सांगत होतो. आज ते चुकीचे आहे हे सिद्ध झाले आहे. (असे आपण मानतो). पण हे अपवादात्मक नाही. विज्ञानामध्ये अशी अनेक निरीक्षणे आहेत ज्यांच्या संबंधीच्या समजुती आपल्याला बदलाव्या लागल्या. पृथ्वी तबकडीप्रमाणे सपाट आहे असे आपण लाखो वर्षे ‘अनुभवत’ होतो. विजेचा चकचकाट आणि ढगांचा गडगडाट यांचे उगमस्थान एक आहे, ते एकाच घटनेचे परिणाम आहेत, हे कळायला आपल्याला प्रकाश आणि ध्वनी यांच्या लहरी असतात, त्यांना वेग असतो, तो वेग भिन्न असतो इत्यादी गोष्टींचे ज्ञान होईपर्यंत थांबावे लागले. मग आजच्या समजुती उद्या ‘खोट्या’ ठरणार नाहीत कशावरून? आपल्याकडे याचे कोणतेही बिनतोड उत्तर नाही. 

इ ) भाषेची संदिग्धता 

गेल्या शतकातील एक अग्रगण्य विचारवंत आणि गणितज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी इ. स. १९२६ साली ऑस्ट्रेलियन मॅथेमॅटिकल सोसायटीसमोर केलेल्या भाषणात एक प्रश्न उपस्थित केला होता. ते भाषेच्या अंगभूत संदिग्धतेवर बोलत होते. 

पन्नास वर्षांचे एक गृहस्थ आहेत. आज त्यांना पूर्ण टक्कल आहे. जेव्हा ते ऐन पंचविशीत होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर भरपूर केस होते. काही काळानंतर केस गळू लागले. सर्व केस काही एकदम गळत नाहीत आणि एक केस गळला म्हणून काही लगेच टक्कल पडत नाही. पहिला केस गळला तेव्हा टक्कल नव्हते. मग दुसरा केस गळला; टक्कल नव्हते. मग तिसरा… जर एक केस कमी झाल्याने टक्कल पडत नसेल तर मग नेमका कितवा केस गळल्यावर त्याला टक्कल पडले? तो केस कोणता, जो गळण्यापूर्वी टक्कल नव्हते आणि जो गळताच टक्कल पडले? दुसऱ्या शब्दात, टक्कल असणे आणि नसणे यात केवळ एका केसाचाच फरक आहे काय?

याचाच जुळा भाऊ छोट्या ढिगाचा विरोधाभास! वाळूच्या छोट्या ढिगात आणखी एक वाळूचा कण टाकला म्हणून काही लगेच छोटा ढीग मोठा होत नाही. सर्वात छोटा ढीग एका कणाचा. त्यात आपण एकेक कण वाढवत गेलो. मग आणखी एक कण टाकला. मग आणखी एक……पण एका कणाने छोटा ढीग मोठा होत नाही. मग एकेक करून कितीही कण ढिगात टाकता येतील आणि मग सर्वच ढिगांना छोटे म्हणावे लागेल. 

बर्ट्रांड रसेल यांना नैसर्गिक भाषेची मर्यादा सांगायची होती. पण भाषेतील संदिग्धता हा केवळ विद्वानांनी तात्त्विक विचार करण्याचा प्रश्न नाही. आपण जरा गंभीर प्रश्न घेऊ. आपल्या देशात गरीबी हा मोठा प्रश्न आहे. पण गरीब नेमके कोणाला म्हणायचे? गेल्या सार्वजनिक निवडणुकीच्या काळात आपल्या एका प्रमुख पक्षाच्या नेत्याने सांगितले, “ज्याचे मासिक उत्पन्न ६००० रुपये किंवा त्याहून कमी आहे त्याला गरीब समजावे.” यातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण इत्यादींचा विचार बाजूला ठेऊ आणि केवळ भाषेच्या अचूकतेचा प्रश्न पाहू. समजा रामूला दर महिन्याला ६००० रु. मिळतात. नियमाप्रमाणे रामू गरीब आहे. त्याचा भाऊ लक्ष्मण महिन्याला ६००१ रु. मिळवतो. त्याला गरीब म्हणायचे की नाही? सरकारी नियमाप्रमाणे लक्ष्मणाची मिळकत महिना ६००० रु. पेक्षा जास्त असल्याने तो गरीब नाही. पण हा काही शाळेच्या वादविवाद स्पर्धेचा विषय नाही. या प्रश्नाच्या उत्तरावर लक्ष्मणाच्या मुलाचे शिक्षण अवलंबून आहे. त्याला घरकुल योजनेत फ्लॅट मिळणार की नाही हे ठरणार आहे. आणि हे सारे महिन्याला एक रुपाया मिळण्या-न-मिळण्यावर अवलंबून आहे. आजकाल रस्त्यावरचा भिकारीसुद्धा एक रुपया स्वीकारत नाही. समजा निर्णय घेणारा सरकारी अधिकारी सहृदय आणि शहाणा आहे. तो लक्ष्मणाचा एक रुपया ‘माफ’ करायचे ठरवतो. निश्चितच अशी सवलत एकाच व्यक्तीला दिली तर तो गैरव्यवहार होतो. म्हणून सदर अधिकारी नियम करवून घेतो की, दोन व्यक्तीच्या मिळकतीत महिन्याला एक रुपया किंवा त्याहून कमी फरक असेल तर त्या दोन व्यक्तींची आर्थिक स्थिती समान समजण्यात येईल. रामू आणि लक्ष्मण दोघांच्या प्राप्तीत एकच रुपयाचा फरक असल्याने या नियमाप्रमाणे दोघांची आर्थिक स्थिती सामान होते. आणि लक्ष्मण गरीब मानला जातो. लक्ष्मणाचा प्रश्न सुटतो. पण, एक नवीनच प्रश्न निर्माण होतो. लक्ष्मणाचा मित्र कृष्णा महिन्याला ६००२ रु. मिळवतो. सुधारित नियमाप्रमाणे कृष्णाची आणि लक्ष्मणाची आर्थिक स्थिती सारखीच झाली, कारण दोघांच्या मिळकतीत एकाच रुपयाचा फरक आहे. त्यामुळे कृष्णाला गरीब मानावे लागेल. मग कृष्णाचा भाऊ बलराम तो महिन्याला ६००३ रुपये मिळवतो. आता त्यालाही गरीब मानावे लागेल. समजा हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी एक समिती गठीत केली. तिने महिन्याला ६००० रुपये किंवा त्याहून जास्त मिळकत असणाऱ्या भारतातील सर्व नागरिकांची यादी तयार केली. समजा पहिल्या ९४००१ क्रमांकापर्यंत प्रत्येकाचे उत्पन्न मागच्या क्रमांकाच्या व्यक्तीपेक्षा एका रुपयाने जास्त आहे. असे झाले तर ९४००१ क्रमांकाच्या व्यक्तीचे उत्पन्न ९४००० + ६००० म्हणजे महिन्याला एक लाख रुपये होईल. चर्चेच्या सोयीसाठी त्याला अनिल म्हणू. अनिलचे मासिक उत्पन्न एक लाख असेल आणि रामूचे ६०००. पण एक रुपया ‘कंडोन’ करण्याच्या नियमानुसार या यादीतील रामूपासून अनिलपर्यंतच्या सर्व व्यक्तींची आर्थिक स्थिती समान मानावी लागेल, कारण यादीतील कोणत्याही दोन सलग व्यक्तींच्या मासिक मिळकतीत केवळ एका रुपयाचा फरक आहे. आता रामू गरीब असल्याने अनिललाही गरीब मानावे लागेल. पण महिना एक लाख रुपये मिळवणाऱ्या अनिलला गरीब मानणे योग्य होईल काय? याचा अर्थ गरीब कोणाला म्हणावे ही साधी गोष्टसुद्धा नेमक्या शब्दात बसवता येत नाही. 

भाषेची ही मर्यादा सार्वत्रिक आहे. ‘अवजड’ वाहने ‘हळू’ चालवावीत. ‘हलक्या’ विमानांना ‘कमी’ इंधन लागते. उंच, बुटका, लहान, मोठा, विद्वान, मूर्ख, थंड, आह्लाददायक, सुंदर, कुरूप इत्यादी विशेषणे संदिग्ध असतात. रसेल आपल्या ‘लॉजिक अँड मिस्टिसिझम’ या ग्रंथात म्हणतात, भाषेतील नेमकेपणा हा कृत्रिम असतो; सक्तीने आणला तरच तो येतो. आणि अशा सक्तीने काय होते हे वरील उदाहरणात आपण पहिलेच. या प्रकारचे प्रश्न कंट्रोल इंजीनियरनाही सोडवावे लागतात. ही संदिग्धता गणिताच्या नेमकेपणात बसवण्यासाठी Fuzzy logic ही गणिताची एक नवीन शाखा विकसित होत आहे. चालकविरहित वाहने, तोंडी सूचना स्वीकारणारे यंत्रमानव, ऑडिओ रायटर, इत्यादी त्यातूनच निर्माण झाले आहेत. पण हे सर्व प्रयत्नही गोल छिद्रात चौकोनी खुंटी बसवण्याचे आहेत. त्यात काही फटी राहतातच. फझी तर्कशास्त्राचा जनक लुत्फी झाडे (Lotfi Zadeh) म्हणतो, “वास्तवता शब्दांत पकडायचा प्रयत्न केला असता एक स्थिती अशी येते की नेमक्या शब्दांत सांगितलेले वर्णन उपयोगी नसते आणि उपयोगी वर्णन नेमके नसते.” हाही केवळ तात्त्विक चर्चेचा प्रश्न नाही. Fuzzy Logic ही गणिताची शाखा याचा विचार करते. त्याचाच परिणाम म्हणून आता चालकविरहित वाहने, ऑडिओ रायटर आणि तोंडी आज्ञा स्वीकारणारी यंत्रे शक्य झाली आहेत. 

या परिस्थितीत गणित कृत्रिम भाषा तयार करून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करते. पण त्यातही काय घडू शकते याची चुणूक गोडेलने दाखवलीच आहे. 

ई ) उद्गामी तर्क पांगळा आहे.

एकाच प्रकारच्या घटनांचे वारंवार निरीक्षण करून त्यात काही कार्यकारणभाव, काही नियमबद्धता सापडते का, हे पाहिले जाते. याला आपण उद्गामी तर्कशास्त्र म्हणतो. नियम अधिकाधिक निर्दोष व्हावा यासाठी निरीक्षणांची संख्या वाढवली जाते. जेथे शक्य असते तेथे कृत्रिम रीतींनी प्रयोग करून नियम तपासले जातात. अशा तऱ्हेने आपले नियम पुनःपुन्हा पारखून घेऊन ते चुकण्याची शक्यता कमी करू शकतो. पण ते अचूक असल्याची आपण खात्री देऊ शकतो काय? 

१ हा अंक १० अब्ज या अंकापेक्षा लहान आहे. २ हा अंक १० अब्ज या अंकापेक्षा लहान आहे. ३ हा अंक १० अब्ज या अंकापेक्षा लहान आहे. .. अशी अब्जावधी उदाहरणे आपल्याजवळ आहेत. उदाहरणावरून जर नियम सिद्ध झाले असते तर “सर्व अंक १० अब्जाहून लहान असतात” हे विधान सत्य म्हणून स्वीकारता आले असते. पण नियम असे सिद्ध होत नसतात. 

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हाही असाच पुनःपुन्हा पारखून घेतलेलाच नियम होता. 

आचार्य प्र.के. अत्र्यांचा किस्सा आहे. त्यांचा एक मित्र आजारी होता. ९० वर्षे झाली होती वयाला. या वयात आजारी पडले की, माणसाला समोर मृत्यू दिसू लागतो. अत्र्यांना याची जाणीव होती. ते मित्राच्या समाचाराला गेले. त्याला धीर देण्यासाठी आपल्या नेहमीच्या मिश्किल पद्धतीने म्हणाले, “अरे तुला काय झालंय? तू ठणठणीत बरा होणार. गेल्या ९० वर्षांत कितीतरी वेळा आजारी पडलास. झालास ना बरा? ९० वर्षांत मेला नाहीस आताच कसा बरं मरशील? काही काळजी करू नकोस. पूर्वीप्रमाणे याही आजारातून तू बरा होशील!” उद्गामी तर्काची विश्वासार्हता ती इतकीच असते. 

पण नियम शोधण्याचा दुसरा मार्ग आपल्याला उपलब्ध नाही. 

ई) निगामी तर्क आंधळा असतो.

असलेल्या माहितीवरून नियम तयार करणे ही ज्ञानाची पहिली पायरी. उद्गामी तर्कशास्त्राचा उपयोग करूनच नियम बनवले जातात. पुढची पायरी नियमाचा वापर करून निष्कर्ष काढण्याची. यासाठी आपण निगामी तर्कशास्त्र वापरतो. यथानियम निगामी तर्क विश्वासार्ह असतो. पण त्यात दुसरी अडचण असते. कोणती ते पाहू.

उद्गामी तर्कशास्त्र वापरून आपण असा नियम काढला की, “यत्र यत्र धूम:, तत्र तत्र वह्नि:।” जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी असतो. आपण धूर पहिला आणि निष्कर्ष काढला की, येथे अग्नी आहे. पण यात एक व्यावहारिक अडचण अशी की, आपण पाहिला तो धूरच आहे हे कशावरून? ती पाण्याची वाफही असू शकेल. धुरासारखे दिसणारे धुके असू शकेल. आपण पाहिलेला धूर असण्याचीच खात्री नसेल तर मग त्यासन्निध अग्नी असण्याची खात्री कशी देता येणार? मग कोणी म्हणेल की, तो धूरच आहे, त्यात कार्बनमोनॉक्साइड आहे. पण याने प्रश्न सुटत नाही; फक्त तो दुसऱ्या कोर्टात जातो. कारण मग प्रश्न निर्माण होतो की, तो कार्बनमोनॉक्साइड आहे हे कशावरून? अशा तऱ्हेने प्रश्नांची मालिका तयार होते. ही मालिका जर मर्यादित राहिली तर आपण दुष्टचक्रात सापडतो आणि पुन्हा पूर्वीच्या जागी येतो. जसे,

“राम कोण?”
“ लक्ष्मणाचा भाऊ”.

“लक्ष्मण कोण?”
“रामाचा भाऊ.”

या तऱ्हेच्या ‘वर्तुळाकृती’ संवादात राम व लक्ष्मण भाऊ आहेत यापलीकडे विशेष माहिती मिळत नाही. ‘क’ चे कारण ‘ख’, ‘ख’ चे कारण ‘ग’, ‘ग’ चे कारण ‘घ’ आणि ‘घ’चे कारण पुन्हा ‘क’ अशा कार्यकारणाच्या वर्तुळात सापडल्यावर बाहेर येण्याला मार्ग नाही. याचा तर्कशास्त्रीय अर्थ क, ख, ग, घ, हे समतुल्य आहेत, एव्हढाच होतो. एखाद्या संकल्पनेची व्याख्या देताना हाच तर्क वापरला जातो. “दोन बिंदूना जोडणाऱ्या कमीत कमी अंतराला रेषाखंड म्हणतात.” या व्याख्येचा अर्थ एव्हढाच की, “दोन बिंदू कमीत कमी अंतराने जोडलेले आहेत” आणि “एक रेषाखंड आहे.” ही समतुल्य विधाने आहेत. पण, काही प्रसंगी कार्यकारणाची ही मालिका संपतच नाही. 

बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक कथा आहे. एकदा जनकाने राजसूय यज्ञ केला आणि विद्वद्सभा बोलावली. विद्वानांत चर्चा होऊन त्यात जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला एक हजार सुवर्णालंकृत गायी दान केल्या जाणार होत्या. यात एक पेच होता. जो स्वतःला ज्ञानी म्हणवून घेतो त्याला ज्ञानी कसे म्हणायचे? विद्वद्सभेला याज्ञवल्क्य ऋषीही आले होते. त्यांचा अधिकार मोठा होता. त्यांच्याबरोबर त्यांचे एक हजार शिष्य होते. त्यांनी शिष्यांना सांगितले, “गायी उन्हात उभ्या आहेत त्यांना आश्रमात घेऊन जा. नाहीतरी मीच सर्वात ज्ञानी आहे. तेव्हा सर्व गोधन मलाच मिळायला हवे.” गर्ग वंशातील महर्षी वचक्नु. त्यांची मुलगी ‘वाचकन्वी गार्गी’, जी स्वतः विदुषी होती, तिने याज्ञवल्क्याला अडवले आणि विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी प्रश्न विचारले. तो गार्गी-याज्ञवल्क्य संवाद प्रसिद्ध आहे. हा संवाद निगामी तर्काची मर्यादा स्पष्ट करतो.

गार्गीने याज्ञवल्क्याला प्रश्न विचारला.

“याज्ञवल्क्या, जर हे सर्व जग पाण्यानं व्यापलं आहे, तर पाण्याला कुणी व्यापलंयं?”
“वायूनं”, याज्ञवल्क्याने उत्तर दिले.

“वायूला कुणी व्यापलंय?” गार्गीचा प्रश्न.
“आकाशानं”, याज्ञवल्क्य. 

“आकाशाला?”
“गंधर्वलोकानं”

“गंधर्वलोकाला?”
“सूर्यलोकानं”

“सूर्यलोकाला?”
“चंद्रलोकानं”

“चंद्रलोकाला?”
“तारकालोकानं”

“तारकालोकाला?”
“देवलोकानं”

“देवलोकाला?”
“इंद्रलोकानं “

“इंद्रलोकाला?”
“प्रजापतीच्या लोकानं”

“आणि प्रजापतीच्या लोकाला ?”
“हिरण्यगर्भानं”

“हिरण्यगर्भाला?” गार्गीनं याज्ञवल्क्याला विचारलं.

गार्गीचे काम सोपे होते. याज्ञवल्क्याचे काम अवघड होते. Any fool can ask a question which even the wisest in the world cannot answer. गार्गी निगामी तर्काच्या मर्यादाच याज्ञवल्क्याला दाखवून देत होती. हिरण्यगर्भापर्यंत आल्यावर याज्ञवल्क्याने ‘ट्रॅक’ बदलला. तो म्हणाला, “ गार्गेयी, तू फार प्रश्न विचारते आहेस. यापुढं जर प्रश्न विचारलेस तर तुझं डोकं धडावरून खाली येईल.”

याज्ञवल्क्याने गार्गीला धमकी दिली होती की, तो अलंकारिक भाषेत बोलत होता? पुरोगामी याला पुरुषप्रधान व्यवस्थेने केलेली स्त्रियांची मुस्कटदाबी म्हणतील. “सर्वच काही शब्दश: घ्यायचे नसते”, असे म्हणत प्रतिगामी याज्ञवल्क्याला सावरून घेतील. पण निगामी तर्काने मागे विचार करत कार्यकारणभाव शोधू लागलो की आपले डोके धडावर आहे काय असा स्वत:लाच प्रश्न पडावा अशी स्थिती एके क्षणी निश्चित येऊ शकते. ‘यत्र वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह।’ त्याच्यापुढे वाणी थांबते.

यावर उपाय काय?

जेव्हा निगामी तर्काची साखळी मर्यादित असते तेव्हा आपला नाईलाज असतो. त्यातील सर्वच संकल्पना तुल्यबळ असल्याने त्यापैकी जी सोईस्कर असते ती वापरता येते. पण त्यातून साध्याच्या दिशेत प्रगती अशी काहीच होत नाही. निगामी तर्कसाखळी अमर्याद लांबीची होते असे लक्षात येताच ती कुठेतरी तोडून त्यानंतर सुरुवात करावी लागते. याज्ञवल्क्य-गार्गी संवादात याज्ञवल्क्याने तेच केले. “हिरण्यगर्भाने प्रजापतीच्या लोकाला व्यापले” या विधानापाशी आल्यावर त्याने ही अमर्याद असलेली साखळी तोडली. आणि “हिरण्यगर्भाने प्रजापतीच्या लोकाला व्यापले” हे विधान सत्य म्हणून स्वीकारले. कार्यकारणाची अमर्याद साखळी ज्या विधानाशी तोडली जाते त्या विधानाला तर्कशास्त्री axiom किंवा गृहीतक म्हणतात. “हिरण्यगर्भाने प्रजापतीच्या लोकाला व्यापले” हे येथे गृहीतक किंवा axiom आहे. उद्गामी तर्क उदाहरणाच्या कुबड्या घेऊन उभा असतो. निगामी तर्क आंधळेपणाने त्याच्यावर विसंबून राहतो. मग ज्ञान मिळवण्यासाठी तडजोड म्हणून हे आंधळे पांगळे एकत्र येतात. “हिरण्यगर्भाने प्रजापतीच्या लोकाला व्यापले” इथे थांबणे ही तडजोड आहे. विश्वाची उत्पत्ती ‘बिग-बँग’ ने – एका बिंदूत साठवलेल्या उर्जेच्या प्रचंड स्फोटाने – झाली. त्या बिंदूत ऊर्जा कुठून आली? हा प्रश्न विचारायचा नाही. कारण कोठेतरी थांबावे लागते. आपण बिगबँगपाशी थांबलो. ‘यत्र यत्र धूम:, तत्र तत्र वह्नि:’ या नियमानुसार कोठे धूर दिसल्यास तिथे अग्नी आहे हे निगामी तर्काने झालेले ज्ञान विश्वासार्ह आहे. पण “दिसलेला धूर आहे” हे येथे गृहीतक आहे. अर्थात हे गृहीतक बरोबर आहे काय हा प्रश्न उपस्थित करता येईल. आणि त्यासाठी तेथे कार्बनमोनॉक्साइड आहे हे विधान पुरावा म्हणून देता येईल. पण असे म्हणताच “हा धूर आहे” हे गृहीतक राहत नाही. तर तो निष्कर्ष होतो. आणि “येथे कार्बनमोनोक्साइड आहे” हे गृहीतक होते. गृहीतक आपण उद्गामी तर्कानेच मिळवलेले असते. 

गृहीतकापासून मर्त्य मानवाची सुटका नाही. कोणत्याही ज्ञानाची सुरवात अशीच होते. दृष्टान्त, साक्षात्कार, आप्तवाक्य, आतला आवाज, वेदवाक्य, First Cause, हायपोथेसिस, श्रद्धा, परमेश्वराची आज्ञा, या सर्वांचा अर्थ एकच की हे वाक्य गृहीतक आहे. जिथे बुद्धी थकते तिथे श्रद्धा सुरू होते. श्रद्धा-विधान तर्काने सिद्ध करता येत नाही. आपण कोणते गृहीतक स्वीकारतो यावर ज्ञानाचे स्वरूप ठरते. पण त्या नंतरच्या गोष्टी आहेत. हे जग परमेश्वराने सहा दिवसात निर्माण केले, प्रकाशाचा वेग बदलत नाही, All men are created equal, दोन बिंदूतून एकच एक सरळ रेषा काढता येते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते (किंवा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो.) ही सारी विधाने गृहीतके आहेत. ती सिद्ध करता येत नाहीत. ज्या क्षणी ती सिद्ध अथवा असिद्ध करणे शक्य होते त्या क्षणी ती गृहीतके राहत नाहीत. पण तेव्हा आपण त्या जागी दुसरे काही गृहीतक मानलेले असते. 

ज्या कारणासाठी गृहीतक मानावे लागते त्याच कारणांसाठी प्राथमिक संज्ञा (Primitive terms) मानाव्या लागतात. सर्व शब्दांच्या व्याख्या करता येत नाहीत. जर रेषेची व्याख्या “रुंदी नसलेली लांबी” अशी केली, तर लांबीची व्याख्या काय असा प्रश्न निर्माण होतो आणि अशा तऱ्हेने “मग त्याची व्याख्या काय?” या प्रश्नाची न संपणारी साखळी सुरू होते. परमेश्वराने जग निर्माण केले हे गृहीतक झाले. परमेश्वर ही प्राथमिक संज्ञा झाली. परमेश्वर म्हणजे काय हे तेथे विचारायचे नाही. कारण त्याची नेमकी व्याख्या देता येत नसते. All men are created equal हे गृहीतक झाले; equal ही प्राथमिक संज्ञा झाली. “Equal” या शब्दाची नेमकी व्याख्या नाही. अशाप्रकारे ज्या शब्दाची नेमकी व्याख्या नाही असा शब्द वापरून तयार केलेल्या वाक्याना नेमका अर्थ लाभत नाही, त्यामुळे अशा वाक्याच्या खऱ्या-खोट्याची ग्वाही देता येत नाही. परंतु, आपण आपल्या ज्ञानाची इमारत अशा वाक्यापासून सुरुवात करून उभारलेली असते. माणसाच्या ज्ञानाची ही मर्यादा आहे.

असे असूनही आपण बरेच ज्ञान संपादन केले आहे हे एक मोठेच आश्चर्य आहे. (की, आपण जे संपादन केले आहे ते ज्ञान आहे हेही एक गृहीतकच?)

गृहीतकाची निवड

गृहीतक हे ज्ञान मिळवण्यासाठी इतके मूलभूत आहे की, आपण त्याचे अस्तित्वच बहुतेक प्रसंगी विसरून जातो. विश्वास हे गृहीतकाचे व्यावहारिक भाषेतील नाव आहे. विश्वास पूर्वानुभवातून म्हणजेच उद्गामी पद्धतीने उत्पन्न होतो. आपण ज्याच्याशी व्यवहार करत आहोत तो माणूस प्रामाणिक आहे (किंवा प्रामाणिक नाही.) हे गृहीतकच असते. अमुक कंपनीचा माल चांगला असतो हे गृहीतक असते. आपल्याला तसा अनेकदा अनुभव आलेला असतो, म्हणून ते आपण स्वीकारलेले असते. विश्वासार्हता म्हणजे अनेक वेळा, अनेक प्रकारे, अनेक व्यक्तींनी उद्गामी तर्कावर पारखून घेतलेले गृहीतक. धार्मिक संज्ञावलीत गृहीतकाला आपण श्रद्धा म्हणतो. अर्थात श्रद्धा सामान्य गृहीतक नसते. गृहीतकापासून चुकीचे निष्कर्ष मिळू लागले तर सर्वसामान्यपणे त्याचा त्याग केला जातो. चांगल्या समजल्या गेलेल्या कंपनीचा माल वरचेवर वाईट निघत गेला तर आपला कंपनीवरचा विश्वास उडतो. आणि आपण कंपनी बदलतो. श्रद्धेचा त्याग इतका सहज होत नाही. अमुक देव नवसाला पावतो. असे जेव्हा एखादा माणूस म्हणतो तेव्हा ते त्याचे गृहीतकच असते. आणि जेव्हा ‘मला त्याची प्रचीती आली आहे’ असे तो म्हणत असतो तेव्हा तो उद्गामी तर्कशास्त्र वापरत असतो. जेव्हा अनेकांच्या नवसाला पावलेला देव एखाद्याला पावत नाही तेव्हा तो त्याचा दोष देवाला देत नाही. आपले काही तरी चुकले असेल म्हणून देव पावला नाही असे मानतो. किंवा आपली श्रद्धा कमी पडली असे मानून अधिक श्रद्धाळूपणे भक्ती करतो. “जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण” हे श्रद्धावंतांचे गृहीतक असते.

गृहीतकासंबंधी आणखी एक गोष्ट अधोरेखित करणे गरजेचे आहे. ती गोष्ट अप्रत्यक्षरीतीने चर्चिली गेली आहे. पण आपल्या दृष्टीने ती इतकी मूलभूत आणि महत्त्वाची आहे की, तिचा पुनरुच्चार करणे चुकीचे ठरणार नाही. ज्ञानाच्या स्वरूपासंबंधीची सर्व चर्चा केवळ वास्तव गोष्टींच्याच नव्हे तर अस्तित्वात नसलेल्या (काल्पनिक?) गोष्टींच्या ज्ञानालाही तितकीच लागू आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे ज्ञान हा काहींना वदतोव्याघात वाटण्याची शक्यता आहे. म्हणून उदाहरणाने काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे. भूमितीतील सर्व ज्ञान हे अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचे ज्ञान आहे. तरीही ते उपयुक्त आहे, याचे श्रेय मानवी प्रतिभेला द्यावे लगेल. रुंदी नसलेल्या लांबीला रेषा म्हणतात. पण या जगात अशी एकही गोष्ट नाही जिला लांबी आहे, पण, रुंदी नाही. म्हणजे रेषा वास्तव जगतात अस्तित्वात नाही. तरीही एकाच प्रतलातील दोन असमांतर सरळ रेषा एकमेकींना एकाच बिंदूत छेदतात असे बेधडक विधान आपण करतो. सर्व भूमितीची निर्मिती अशा अस्तित्वात नसलेल्या गोष्टी गृहीत धरून आपण केली आहे आणि तिचा उपयोग करून मोठमोठ्या उत्तुंग इमारती बांधल्या आहेत. परमेश्वर आहे की नाही हे कुणी पाहिले नसले तरीही तो मी म्हणतो तसाच आहे हे ठरवण्यासाठी मोठमोठी युद्धे होतात. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींवरील विश्वासातून या जगात माणसांनी अनेक भव्य गोष्टी निर्माण केल्या आणि तितकाच भव्य गोष्टींचा विध्वंस केला आहे. 

एकाच गोष्टीसंबंधी अनेक गृहीतके अस्तित्वात असू शकतात. प्रत्येक व्यक्तीने आपले गृहीतक आपण ठरवायचे असते. ते गृहीतक आणि त्यापासून काढलेले निष्कर्ष त्या व्यक्तीसाठी सत्य असतात. गृहीतक बदलले की सत्य बदलते. सामान्य माणूस, अर्थातच, स्वतःच्या मेंदूला फारसा त्रास देऊ इच्छित नाही, तो बहुमताबरोबर जातो. पण विचारी माणूस किंवा तज्ज्ञ आपले गृहीतक निवडताना खालील पथ्ये सांभाळतो:

१. गृहीतकात कमीतकमी प्राथमिक संज्ञा असाव्यात. 
२. गृहीतकात कमीतकमी विधाने असावीत. 
३. गृहीतकाने जास्तीतजास्त प्रश्नांची उत्तरे द्यावीत. 
४. गृहीतकाने भूतकाळातील घटनांचे स्पष्टीकरण व्हावेच, त्याचबरोबर त्या गृहीतकाचा उपयोग भविष्यात काय घडणार आहे ते समजण्यासाठीही करता आला पाहिजे. (या कसोटीवरच स्टीफन हॉकिंग देवाच्या गृहीतकाला सदोष मानतो.)
५. जे गृहीतक भविष्यकाळ समजण्यासाठी जास्त उपयुक्त ते जास्त चांगले.
६. जो सिद्धांत कमीतकमी गृहीतके वापरतो तो अधिक चांगला.

सारांश

आपण पंचज्ञानेंद्रियांमार्फत निरीक्षण करतो. हे तुलनात्मक असते. निरीक्षण करून आपल्याला जे वाटते ते आपण भाषेतून व्यक्त करत असतो. पण ती भाषा ढोबळ (rough) आणि संदिग्ध (fuzzy) असते. अशा भाषेतून आणि अशा निरीक्षणातून आपण उद्गामी तर्कशास्त्राचा उपयोग करून नियम बनवतो. उद्गामी तर्कशास्त्र पूर्णपणे विश्वासार्ह नाही. तरीही आपल्याला जे कळले ते सत्यच आहे असे गृहीत धरणे अपरिहार्य असते. ज्या निगामी तर्कशास्त्राचा उपयोग करून आपण ज्ञान मिळवतो, निष्कर्ष काढतो, त्या आपल्या ज्ञानाचा पाया इतकाच बळकट असू शकतो. यापेक्षा अधिक काही करणे आपल्याला शक्यही नाही. ही आपल्या ज्ञानाची मर्यादा आहे. 

____________________________________

४०३, पूर्वरंग अपार्टमेन्ट, राजारामपुरी १३ वी गल्ली, कोल्हापूर , ४१६ ००८
मोबाईल ९८३४३३६५४७ e-mail: hvk_maths@yahoo.co.in

अभिप्राय 2

  • हा अंक प्रकाशित होऊन दीड महिना झाला, पण या लेखावर एकही प्रतिक्रिया आलेली नाही. यावरुनच हा लेख किती अगम्य आहे; हे दिसून येते. गेली हजारो किंवा लाखो वर्ष मानव जात कालक्रमण करत आहे. पण कुंभोजजरांनी उपस्थित कलेले तर्कशास्त्र मानवाच्या प्रगतीच्या आड आल्याचे जाणवले नाही. मग हा उपद्व्याप करण्याचे कारण काय? लेखकाला काय सुचवयचे आहे काही कळत नाही.

  • उत्तम लेख. आपल्याला विचार करायला लावतो, आपल्या गृहितकांना आव्हान देतो. त्यातून सुलभ निष्कर्ष मिळत नाहीत, पण त्यामुळेच पुढच्या विचारांना दिशा मिळते. हा ज्ञानमार्गावरचा प्रवास अखंड आहे. ज्यांना साधी सोपी उत्तरे हवीत, त्यांना तो कदाचित आवडणार किंवा पटणार नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.