कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी सृजनात्मकतेसमोरील आव्हाने

होमो सेपियन म्हणून आपण स्वतःला आजपर्यंत मिरवले. गर्व बाळगला की या पृथ्वीवर आपणच तितके बुद्धिमान. “What a Piece of Work is Man!” हे हॅम्लेटमधील शेक्सपिअरचे वाक्य आणि त्यानंतर त्याने तुलना करून मानवाचे केलेले वर्णन आपल्याला सांगून जाते की आपल्याला ‘माणूस’ असण्याचा किती गर्व आहे..! विसाव्या शतकापर्यंत या गर्वाला नख लावणारे असे काही घडले नाही किंवा घडलेही असेल तर ते तात्पुरतेच. लक्षातही न राहण्यासारखे. उलट मानवाने बुद्धीच्या आणि कल्पनेच्या जोरावर प्रगतीच केली. थक्क करणारी. विमाने काय बनवली, पाणबुडी, वेगाने धावणारी वाहने…. जमीन असो, आकाश असो की पाणी, आपणच सर्वश्रेष्ठ ठरलो. आपल्यातील सृजनाने केलेल्या करामती आणि त्यांची मालिका अविरत चालूच असणार आहे हे वेगळे सांगायची गरज नाहीच. हबल, जेम्स वेबसारख्या दुर्बिणी, चांद्रयान, मंगळयान, अपोलोसारखी अचंबित करणारी अवकाशयाने; चंद्रावर उतरणे, मंगळावर पोहोचणे, आकाशात प्रयोगशाळा, स्पेस स्टेशन आणि कृत्रिम उपग्रह…. आणि असे बरेच काही. मानवाच्या बुद्धीच्या क्षमतेने मानवालाच थक्क केले आहे. सृजन, जिज्ञासा आणि नाविन्य या त्रिसुत्रीवर आपण अकल्पित प्रगती करत आहोत; पुढेही करत राहू. मात्र एक भलीमोठी समस्या, किंबहुना आव्हान आपल्यासमोर उभे आहे. मानवी बुद्धीने तयार केलेली एक अचंबित करणारी गोष्ट : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’. आतापर्यंतच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा सर्वश्रेष्ठ बिंदू. अजूनतरी ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या बाबतीत आपण खूप सकारात्मक आहोत. त्यापासून स्पष्ट असा धोका वाटत नाही पण धोका नसण्याची संभाव्यता अजिबात नाहीच असे नाही. 

२००७ पासून जागतिक पातळीवर नावारुपाला आलेला ‘वर्ल्ड फोटोग्राफी ऑर्गनिझेशन’चा २०२३चा जागतिक पुरस्कार एका जर्मन छायाचित्रकाराला मिळाला. त्याचे नाव बोरिस एल्डगसेन. ज्या छायाचित्रासाठी त्याला पुरस्कार मिळाला त्या चित्राचे नाव होते ’इलेक्ट्रिशियन’. १९४०च्या काळातील कृष्णधवल शैलीतील त्याच्या या छायाचित्रात एक स्त्री दुसऱ्या एका स्त्रीच्या पाठीमागे उभी आहे. तिचे हात समोर उभ्या असलेल्या स्त्रीच्या खांद्यावर आहेत. जणू ती त्या स्त्रीची वस्त्रे नीट करते आहे. दोघींचे डोळे मात्र कॅमेराच्या लेन्सकडे बघायचे टाळत असल्याचे दिसते. या छायाचित्राला उत्कृष्ट पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र बोरिसने तो नाकारला! त्याने लगेच पुरस्कार देणाऱ्या संघटनेला कळवले, की ते छायाचित्र त्याने काढलेले नसून संगणकाद्वारे (कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून) तयार केलेले आहे. त्याचे असे कबूल करणे नैतिकदृष्ट्या योग्य होते. सर्वांना आश्चर्य वाटणारच. तीस देशातील चार लाख पंधरा हजार छायाचित्रातून निवड केलेल्या उत्कृष्ट चित्रांपैकी एक चित्र ‘ए.आय.’ निर्मित आहे हे मुळात कुणाला ओळखू आलेच नव्हते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या DALL-E सारख्या ईमेज जनरेटर सॉफ्टवेअरकडून तयार करून घेतले आहे. जेंव्हा वरील गोष्ट लक्षात आली तेव्हा त्याचे चित्र ‘बाद’ ठरवण्यात आले. आपल्या संकेतस्थळावरून सुद्धा ते चित्र संघटनेने हटवले. 

महत्त्वाचा मुद्दा हा की, या छायाचित्राला ‘कलात्मकतेचा नमुना’ म्हणायचे का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ इतके सरळ आणि सोपे नाही. कलेला नव्याने परिभाषित करावे लागेल इतके ते गुंतागुंतीचे झाले आहे.

त्याचे वर उल्लेखलेले छायाचित्र आणि अजून इतर छायाचित्रे असलेली एक मालिका त्याने केली. त्या मालिकेला त्याने ‘स्युडो-म्नेशिया’ असे शीर्षक दिले. ज्याचा ढोबळमानाने अर्थ होतो ‘खोट्या आठवणी’. म्हणजे अशा आठवणी ज्या ‘आठवणी’ असल्याचा भ्रम निर्माण करतात. सत्य आणि असत्याच्या सीमारेषेवर असलेल्या आठवणी. वरील चित्र त्याचे उत्तम उदाहरण आहे. वर दाखवलेल्या छायाचित्रातील काहीच, म्हणजे व्यक्ती आणि अर्थातच घटनासुद्धा प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हती. शून्य वास्तव. मात्र १९४० साली वास्तवात जसे असेल त्याचा भास या छायाचित्राने निर्माण केला. जे कुणीच कॅमेऱ्यामध्ये कैद केले नाही ते वास्तव अशाप्रकारे त्याने निर्माण केले. हे छायाचित्र असल्याने (चित्रकला नाही) त्याने भूतकाळातील अस्तित्वात नसलेला क्षण टिपला. म्हणून ते एकाचवेळी खरेही आहे आणि तितकेच खोटेही आहे असे आपण म्हणू शकतो. 

बोरिस स्वतःच्या या छायाचित्राला ‘फोटोग्राफी’ न म्हणता ‘प्रॉम्प्टोग्राफी’ म्हणतो. हवे तसे छायाचित्र मिळवण्यासाठी त्याला अनेकदा ईमेज जनरेटर सॉफ्टवेअरला विशिष्ट, अतिसूक्ष्म आणि मुद्देसूद माहिती पुरवावी लागली असेल. संगणकाला पुनःपुन्हा त्या माहितीतील तपशिलात सुधारणा करून द्याव्या लागल्या असतील. अशी माहिती देणे म्हणजेच ‘प्रॉम्प्ट’ करणे होय. या मानवी प्रॉम्प्टिंगच्या आधारे तयार केलेले छायाचित्र म्हणजे ‘प्रॉम्प्टोग्राफी’. 

अशा प्रकारची ही ‘प्रॉम्प्टोग्राफी’ मानवी कलेच्या सदरात मोडाते की तंत्रज्ञानाच्या सदरात? स्वतः बोरिस म्हणतो की ‘कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत काम करणे म्हणजे मला सह-निर्मिती केल्यासारखे वाटते, ज्याचा सूत्रधार मीच असतो’. याचा अर्थ काय; छायाचित्र जरी संगणकाने निर्माण केले तरी त्याला तसे निर्देश देणारा हा माणूसच आहे. म्हणजे ती मानवनिर्मित कलाच आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा फक्त साधन म्हणून उपयोग केला आहे. 

चर्चेसाठी वरील गोष्ट आपण मान्य करूया की कृत्रिम बुद्धिमत्तेचा साधन म्हणून उपयोग केला आणि कलेची निर्मिती केली. अगदी तसेच जसे ‘ॲनिमेशन’ तंत्रज्ञानाला साधन म्हणून वापरते. मग पुढचा प्रश्न तयार होतो तो हा की समजा एखादा चित्रकार – ज्याला रंगाचे ज्ञान आहे, आकार समजतात – त्याने चित्रकलेचे तंत्र शिकण्यात कितीतरी वर्षे घालवली, कौशल्य मिळवले – त्याने काढलेले चित्र या त्याच्या कौशल्याचा, रंगाच्या ज्ञानाचा, ब्रशचे फटकारे मारण्याच्या लयीचा, तरबेज बोटांचा वगैरे-वगैरे इत्यादी गोष्टींचा एकत्रित परिणाम असतो. एकाअर्थी ही त्याची साधनेच आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता या साधनांना पर्याय निर्माण झाला आहे. हे काहीही न वापरता मी माझ्या मनात आलेल्या चित्राच्या कल्पनेला शब्दरूपात ‘प्रॉम्प्ट’ करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर निर्माण केले तर त्याला ‘चित्रकला’ म्हणाल का? 

याचे उत्तर ‘हो’ असेल तर चित्रकार किंवा कोणताही कलाकार होण्यासाठी लागणारी साधना महत्त्वाची नाही असा त्याचा अर्थ होतो. उत्तर ‘नाही’ असेल तर साध्यापेक्षा ‘साधन’ महत्त्वाचे ठरते. म्हणजे या संदर्भात मूळ चित्र कितीही सुरेख असले तरी ते काढण्यासाठी वापरलेली साधने वेगळी आहेत म्हणून ती कला नाही असे होईल. म्हणजेच कला ही साधनकेंद्री होऊन बसते. 

दुसरे एखादे उदाहरण घेऊ. मी एक लेखक आहे. चित्रपटासाठी मी पटकथा लिहितो. अनेक वर्षांच्या अभ्यासामुळे, अनुभवामुळे आणि भाषेवरील चिंतनामुळे मी उत्कृष्ट पटकथा लिहू शकतो. मात्र जर मी कृत्रिम बुद्धिमत्तेला योग्यप्रकारे ’सूचना’ देऊन पटकथा लिहून घेतली तर ती पटकथा माझी निर्मिती असेल का?

याचाच अर्थ असा होईल की ‘प्रॉम्प्टिंग’चे कौशल्य असणारा प्रत्येकजण उत्कृष्ट कलाकृती निर्माण करू शकेल. चित्रकार होण्यासाठी आता हातात ब्रश घ्यायची गरज नाही. संगीतकार होण्यासाठी वाद्य घेऊन बसण्याची गरज नाही, लेखक होण्यासाठी वाचनाची आणि जीवनानुभव घेण्याची आवश्यकता नाही इत्यादी. तुम्ही फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेला योग्य प्रकारच्या सूचना देऊ शकलात तसेच ‘प्रॉम्प्टिंग’च्या माध्यमातून तुमच्या सृजनशक्तीला त्याच्यापर्यंत पोहचवू शकलात तरी तुम्ही कलाकृती निर्माण करण्यास सक्षम असणार आहात. माझी स्वतःची चित्रकार होण्याची इच्छा होती. मात्र मला रंगसंगती समजत नाही. ब्रशने फटकारे मारायचे वळण हाताला नाही. असे असले तरी माझ्या मेंदूत उत्तमोत्तम चित्र काढण्याच्या कल्पना येतात. चित्रकलेचे ज्ञान नसल्यामुळे मी ते कॅनव्हासवर चितारू शकत नाही. आता मात्र मी कृत्रिम बुद्धिमत्तेला सूचना देऊन तशी चित्रे निर्माण करेन. आता प्रश्न फक्त इतकाच उरतो की असे असल्यावरही तुम्ही मला “चित्रकार” म्हणाल का?

रॉबर्ट ब्राऊनिंग या आंग्ल कवीची ‘अँड्रिया डेल सार्टो’ नावाची एका चित्राकारावरील कविता आहे. त्यातील चित्रकार हा तंत्राच्या दृष्टीने अचूक असतो. इतका अचूक की राफेल, मायकल अँजेलो किंवा लिओनार्डो दा विंचीपेक्षाही अचूक. असे असले तरी तो श्रेष्ठ चित्रकार होऊ शकला नाही. त्याचे कारण देताना म्हटले जाते की तांत्रिकदृष्ट्या तो अचूक होता मात्र त्याच्या चित्रात एक कमतरता होती. कुठली? तर इतर चित्रकारांसारखा तो आपल्या चित्रामध्ये ‘आत्मा’ ओतू शकला नाही. फक्त बिनचूक रेषा ओढणे, योग्य प्रकारची रंगसंगती करणे म्हणजे चित्र नाही. एकूणच ती कला नाही. त्या कलेमध्ये आत्म्याची अभिव्यक्ती असायला हवी. मानवी सृजन म्हणजे ती अभिव्यक्ती असते. मानवी निर्मितीत एक अनाहताची जादुगिरी असते. लौकिकतेच्या सीमा ओलांडण्याची जादुगिरी! सर्व कलाकार, ते लेखक असो, चित्रकार, संगीतकार, कवी, छायाचित्रकार, नट, नर्तक किंवा आणखी कुठलाही कलाकार; त्याचे वेगळेपण हेच की त्याचे सृजन हे इतरांपेक्षा भिन्न असते, ते ‘इन्स्पायर्ड’ असते… आणि मला नेमके हेच म्हणायचे आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेतून निर्मित कला ही ’इन्स्पायर्ड’ असेल का? तीत आत्मा ओतल्या जाईल का? ते मानवी सृजनाच्या कक्षेत कितपत बसेल? आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे. उद्या कदाचित या प्रश्नावर ठळक उत्तरे आपल्याकडे असतीलही. मात्र एक गट आहे जो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या सर्व आयामांना सकारात्मकतेने घेतोय, स्वीकारतोय. त्याची तार्किक आणि तात्त्विक कारणेसुद्धा त्यांच्याकडे आहेत. जसे की आता ‘कला’ ही पारंपरिक शैलीतील न राहता तिने वेगळे वळण घेतले आहे. कलेच्या फॉर्म, स्टाईल आणि दृश्यमान अभिव्यक्तीपेक्षा तिच्यामागची कल्पना जास्त महत्त्वाची झाली आहे. ‘आयडिया इज द आर्ट’. त्यामुळे ज्यांच्याकडे नवकल्पना आहे ते फक्त कौशल्य नाही म्हणून व्यक्त होण्याचे थांबणार नाहीत. 

कुणीही उत्कृष्ट कल्पना असलेली व्यक्ती कलाकृतीची निर्मिती करू शकेल. यामुळे कलाक्षेत्रातील मक्तेदारी मोडीत निघेल. कलेचे असे ’लोकशाहीकरण’ कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य आहे असा त्यांचा विश्वास आहे. मात्र यातही एक अडचण आहे. ज्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध असेल त्यांची नवी मक्तेदारी स्थापन होण्याची संभाव्यता दुर्लक्षून चालणार नाही. 

मे महिन्याच्या दोन तारखेपासून अमेरिकेत ‘हॉलिवूड’मधील लेखकांचा संप अजूनही संपलेला नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी सृजनावर ओढवलेले अरिष्ट त्या लेखकांना स्पष्ट दिसतंय हे त्यांच्या संपातून आपल्याला जाणवू शकते. हव्या त्या सूर, ताल, लयीमध्ये गाण्यांना चाली देणारी, संगीत देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सॉफ्टवेअर्स आज बाजारात येत आहेत. थ्री-डी प्रिंटिंग बाजारात नुकतेच आलेले आहे आणि मूर्तिकलेसाठी त्याचा उपयोगही सुरू झाला आहे. कलाकार आता अत्यंत कमी वेळात प्रतिकृती आणि मूर्ती तयार करून देऊ लागले आहेत. नृत्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स, कदाचित मायकल जॅक्सनपेक्षाही नाविन्यपूर्ण स्टेप्स कोरिओग्राफ करायला कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम होतेच आहे. थोडक्यात लेखक, गीतकार, संगीतकार, चित्रकार, नर्तक, मूर्तिकार आणि इतरही सर्व कलाकार हे येणाऱ्या काही वर्षांतच एक ‘मध्ययुगातील’ बाब वाटायला लागतील. 

शेवटी, ही चर्चा अनेक बाजूने पुढे नेता येईल. विस्तारभय असल्याने थांबतो. प्रकर्षाने जी गोष्ट मांडायची होती ती मांडून झाली. नव्या जमान्यात, नवी कला आणि त्यासाठीचे नवे तत्त्वज्ञान येईलच. कलेच्या इतिहासातील नव्या युगाची नांदी झालीय. कलेला नव्याने परिभाषित करण्याची गरज लवकरच येणार आहे. 

पूर्वप्रसिद्धी: दैनिक महाराष्ट्र टाईम्स, ३१ ऑगस्ट २०२३

मोबाईल: ९०११७७१८११

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.