मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २

निसर्ग ही भौतिक पदार्थांची एक व्यवस्था होय, असे निसर्गाविषयीचे मत मान्य केल्यास, निसर्गाकडे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा उत्पादनाचा स्त्रोत म्हणून पाहता येईल, अशी अनेक अर्थशास्त्रज्ञांची निसर्गाविषयीची भूमिका असते. मार्क्सही याला अपवाद नाही. 

मानव निसर्गात, निसर्गाच्या साह्याने जगणारा प्राणी आहे म्हणजे तो निसर्गावर जगणारा प्राणी आहे, असे म्हणण्यात हे अभिप्रेत असते की ज्या भौतिक पदार्थांची एक व्यवस्था निसर्ग असतो त्या भौतिक पदार्थांमध्ये – त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे – मानवाची गरजपूर्ती करण्याची शक्ती असते. या शक्तीला पदार्थांतील ‘उपयोगिता’ असे म्हणता येईल. पदार्थांतील उपयोगितेमुळे म्हणजेच त्यांच्या अंगी असलेल्या मूलभूत गुणधर्मांमुळे पदार्थांना जे मूल्य प्राप्त होते, त्यांना अर्थशास्त्रज्ञ ‘उपयोगमूल्ये’ असे म्हणतात.

आता, भौतिक पदार्थ हे उपयोगमूल्यांचे धारक असतात. आणि या उपयोगमूल्यांवर आधारलेली व त्यांची मिळून बनलेली भौतिक पदार्थांची जी व्यवस्था निसर्ग असते, तिच्यावर मानव अवलंबून असतो. या अर्थानेच मानव निसर्गावर जगणारा प्राणी आहे, असे म्हणता येईल.

मानवासाठी निसर्गात काही मूल्यवान असेल तर ती म्हणजे त्यातील भौतिक पदार्थांची उपयोगमूल्ये हीच होत. अर्थात, ही अर्थतज्ज्ञांच्या प्रतिकृत आर्थिक मानवाची – होमो इकोनोमिकसची – दृष्टी झाली.

मार्क्स लिहितो, “कोणत्याही पदार्थाच्या उपयोगितेमुळे त्या पदार्थाला उपयोगमूल्य प्राप्त होते. परंतु उपयोगिता ही काल्पनिक गोष्ट नाही.” 

उपयोगिता ही काल्पनिक गोष्ट नाही असे मार्क्सला का नमूद करावे लागेल? असे विचारता येईल.

आता, भौतिक पदार्थांनाच आणि म्हणून जडद्रव्यालाच खरेखुरे अस्तित्व असते, ही जडवादी भूमिका झाली. वस्तू आणि उपयोगिता ह्यांतील संबंधांचे जे स्वरूप आहे ते मूळत: ‘भौतिक’ असते. तेव्हा, जडवादी भूमिकेला अनुसरून उपयोगिता ही एक भौतिक गोष्ट आहे – काल्पनिक नाही – असे मार्क्सने नमूद केले असले पाहिजे.

परंतु, समजा मार्क्सची भूमिका अशी असलीच तर उपयोगितेच्या ‘भौतिक’ स्वरूपाविषयीचा मार्क्सचा हा दावा टिकणारा नाही, असे म्हणता येईल.

आपल्या ‘इकॉनॉमिक फिलॉसॉफी’, ‘आर्थिक तत्त्वज्ञान’ या ग्रंथात श्रीमती जोन रॉबिन्सन बाईंनी अर्थतज्ज्ञांच्या या मांडणीविरूद्ध मत प्रकट केले आहे. त्या म्हणतात, “मूल्य आणि उपयोगिता ह्या अर्थशास्त्रात प्रविष्ठ झालेल्या ‘अतिभौतिक’ (metaphysical) संकल्पना आहेत. आणि आपण अशा अतिभौतिकीची निर्मिती करीत आहोत, ह्याबाबत अर्थतज्ज्ञ बहुधा अबोधच असतात.”

परंतु मार्क्सला ‘अबोध’ हे विशेषण लावता येणार नाही. त्याने जाणीवपूर्वक आपल्या अतिभौतिक भूमिकेची घडण केली असली पाहिजे. कारण, आपले गुरू हेगेल यांच्याकडून आत्मसात केलेली अतिभौतिक दृष्टी मार्क्सच्या मूल्यविचारात प्रकट झालेली दिसते.

हेगेलच्या द्वंद्ववादी अतिभौतिकी दर्शनाचे ऋण व्यक्त करताना मार्क्स अत्यंत हृद्य टिप्पण करत लिहितो, “… मी उघडपणे त्या महान विचारवंताचा (हेगेलचा) शिष्य असल्याचे जाहीर केले आणि मूल्यसिद्धांताच्या प्रकरणात अधूनमधून त्याचे खास शब्दप्रयोग वापरून त्याच्यावरील माझ्या प्रेमाचे प्रदर्शन केले आहे. हेगेलने द्वंद्ववादाला गूढ स्वरूप दिले असले तरी त्यानेच प्रथम द्वंद्ववादाचा सर्वसाधारण वापर कसा करावयाचा याची समग्रपणे आणि जाणीवपूर्वक मांडणी केली ही वस्तुस्थिती नष्ट होत नाही. त्याच्या हाती तो उलटा डोक्यावर उभा आहे. या गूढ आवरणाच्या आतील विवेकपूर्ण सारतत्त्वाचा शोध लावायचा असेल तर त्याला योग्य प्रकारे पायावर उभे करणे जरूर आहे.”
(मार्क्स, कार्ल, ‘दुसऱ्या जर्मन आवृत्तीचा उपसंहार’, ‘कॅपिटल’ : खंड १, पृष्ठ क्रमांक १४-१५, १८६७)

आता, ‘मूल्यसिद्धांताच्या प्रकरणात अधूनमधून त्याचे खास शब्दप्रयोग वापरून त्याच्यावरील माझ्या प्रेमाचे प्रदर्शन केले.’ या मार्क्सच्या विधानावरून हे स्पष्ट होते की हेगेलप्रणित अतिभौतिकीय दृष्टी मार्क्सने पुरेपूर आत्मसात केलेली तर होतीच, पण या दृष्टीला अनुसरून एक कार्यक्रमही त्याने स्वीकारला होता. तो म्हणजे हेगेलच्या द्वंद्ववादी अतिभौतिक दार्शनिक दृष्टीला ‘योग्य प्रकारे पायावर उभे करणे’ हा होय. या दिशेनेच त्याची पुढील वाटचाल झालेली दिसते. 

हेगेलच्या द्वंद्ववादी तत्त्वमीमांसेला पायावर उभे करण्यासाठी मार्क्सने राजकीय अर्थशास्त्राची ऐहिक भूमी निवडली. या भूमीत हेगेलची द्वंद्ववादी तत्त्वमीमांसा घट्ट पाय रोवू शकली आणि पुढे तीच मार्क्सच्या जडवादी अतिभौतिकीत परिणत झाली.

प्रा.मे.पुं. रेगे ह्यांच्या शब्दात सांगायचे तर असे म्हणता येईल की, “आध्यात्मिक दृष्टिकोणाचे ऐहिक दृष्टिकोणात परिवर्तन होऊ शकते. हेगेल डोक्यावर उभा होता. मार्क्सच्या मताप्रमाणे त्याला मार्क्सने नीट पायावर उभे केले त्याप्रमाणे.”

प्रा.रेग्यांच्या मतांचा अनुवाद करत असे म्हणता येईल की, हेगेलच्या आध्यात्मिक तत्त्वमीमांसेचे ऐहिक रूप म्हणजेच मार्क्सचे ऐहिक तत्त्वज्ञान होय. मार्क्सची ऐहिकता आध्यात्मिकतेला आत्मसात केलेली ऐहिकता आहे. याच अर्थाने मार्क्स ‘हेगेलचा शिष्य’ आहे.

एकूणच, मार्क्सची अर्थमीमांसा अतिभौतिकीपासून मुक्त नाही; मग ती आध्यात्मिक दृष्टी आत्मसात केलेली जडवादी अतिभौतिकी का असेना!

मार्क्सची ऐहिकता हेगेलची तत्त्वमीमांसा आत्मसात करूनच सुस्थिर होऊ शकली.

अशाप्रकारे मार्क्स ‘ऐहिकतेचा तत्त्वज्ञ’, worldly philosopher झाला.

म्हणूनच “मार्क्सने आपले तत्त्वज्ञान बाजूला सारून ‘भांडवल’ हा ग्रंथराज लिहावयास घेतला.”, अशी, प्रा.शुंपिटर ह्यांनी घेतली तशी भूमिका आपल्याला घेता येणार नाही. तिच्या मर्यादा उघड आहेत.

परंतु मार्क्सच्या अर्थमीमांसेची ही अत्यंत महत्त्वाची बाजू झाली. अर्थात, तिचे इतरही पैलू आहेत. मार्क्सच्या अन्वेषणारीतीची दखल जेव्हा आपण घेतो, तेव्हा १९व्या शतकाच्या, तत्कालीन वैज्ञानिक रीतीने जी एक आदर्श, वैज्ञानिक ज्ञानाची, पद्धतशास्त्राची प्रतिमाने निर्माण केली होती, त्यांचा प्रभाव मार्क्सच्या विवेचनावर पडल्यावाचून राहिला नाही. किंबहुना आपल्या समाजवादाला ‘शास्त्रीय’ अधिष्ठान देण्याकरिता मार्क्सला तत्कालीन जीवशास्त्र, शरीरशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकी यांतून आविष्कृत झालेल्या वैज्ञानिक रीतींची दखल घेणे क्रमप्राप्त तसेच सोयीचेही होते.

मार्क्सच्या निवडक परिच्छेदांतून त्याच्यावर तत्कालीन विज्ञानांचा प्रभाव किती जास्त होता हे अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल. मार्क्स लिहितो,

 ” ..प्रारंभ नेहमीच अवघड असतो हे म्हणणे सर्वच शास्त्रांच्या बाबतीत खरे आहे. म्हणून या (भांडवल) ग्रंथातील पहिले प्रकरण, विशेषत: त्यातील क्रय-वस्तूचे विवेचन, समजण्यास अवघड वाटेल…”

“…एकंदर मानवी देहाचा, इंद्रियांचा समुच्चय म्हणून विचार करणे त्याच्या प्रत्येक जीवपेशीचा अभ्यास करण्याच्या मानाने कितीतरी जास्त सोपे असते. शिवाय आर्थिक स्वरूपांचे विवेचन करताना सूक्ष्मदर्शक यंत्राचा किंवा रासायनिक प्रक्रिया घडवून आणणाऱ्या द्रव्याचा काहीच उपयोग होण्यासारखा नसतो. या दोन्हींऐवजी अमूर्त तत्त्वचिंतन करण्याची शक्ती हवी असते. भांडवलदारी समाजपद्धतीत श्रमउत्पादित वस्तूचे क्रय-वस्तू हे स्वरूप किंवा क्रयवस्तूचे मूल्यस्वरूप ही त्या समाजाची ‘अर्थपेशी’ असते. वरवर पाहणाऱ्याला असे वाटेल की या स्वरूपाचे विवेचन करणे म्हणजे उगीचच सूक्ष्म गोष्टींचा काथ्याकूट करणे आहे. या गोष्टी सूक्ष्म आहेत हे खरे; परंतु शरीरशास्त्रात ज्यांचा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने शोध घेतला जातो त्या प्रकारच्या या सूक्ष्म गोष्टी आहेत. मूल्यस्वरूपासंबंधीचा भाग वगळता या ग्रंथावर समजण्यास कठीण असल्याचा आरोप करता येणे शक्य नाही….”

“.. पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ भौतिक घटनांचे अशा अवस्थेत निरीक्षण करतो की ज्या अवस्थेत त्यांचे स्वरूप एक तर प्रातिनिधिक असते आणि विक्षेप आणणाऱ्या प्रभावांपासून त्या मुक्त असतात किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा तो अशा वातावरणात प्रयोग करतो की ज्या वातावरणात ती घटना स्वाभाविकरीत्या घडून येण्याची शक्यता असते. अशाप्रकारे या (ग्रंथाच्या) खंडात मला भांडवलदारी उत्पादनपद्धती आणि या पद्धतीशी सुसंगत असणारी उत्पादनाची आणि विनिमयाची परिस्थिती यांचे विश्लेषण करावयाचे होते….”

“… आधुनिक समाजाच्या गतीचे आर्थिक नियम वा सिद्धांत स्पष्ट करणे हाच या (भांडवल) ग्रंथाचा अंतिम उद्देश आहे..”

“… या ठिकाणी व्यक्ति केवळ आर्थिक श्रेणींचे मूर्त स्वरूप आहेत, विशिष्ट वर्गसंबंध आणि वर्गहित यांचे त्या प्रतिकचिन्ह आहेत, आणि या दृष्टीनेच व्यक्तींचा विचार केला आहे. उत्क्रांत होणाऱ्या समाजाच्या आर्थिक रचनेकडे, नैसर्गिक इतिहासाचीच एक प्रक्रिया म्हणून पाहण्याचा माझा दृष्टिकोन आहे…”

“… समाजरचना ही एखाद्या स्फटिकाप्रमाणे अपरिवर्तनीय नसते, तर ती बदल होऊ शकणारी आणि बदल होत असणारी ‘सजीव रचना’ असते…”
(मार्क्स, कार्ल, ‘पहिल्या जर्मन आवृत्तीची प्रस्तावना’, ‘कॅपिटल : खंड १’, पृष्ठ क्रमांक ६-७, १८६७)

अशाप्रकारे तत्कालीन वैज्ञानिक ज्ञानाने निर्माण केलेल्या विश्वाच्या स्वरूपाविषयीच्या चित्राला, वैज्ञानिक अन्वेषणा रीतीला (किंवा रीतींना) अंगीकृत करत मार्क्सची विवेचनपद्धती विकसित झालेली दिसते. वैज्ञानिक नियततत्त्व आणि सहेतुकतातत्त्व या दोन्हीची सांगड कशी घालायची? हा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला असला पाहिजे आणि त्याचवेळी जिथे जिथे ही ‘शास्त्रीय’रीती अपुरी किंवा अडचणीची वाटली असेल त्यावेळी ‘अमूर्त तत्त्वचिंतन’ करण्याची आवश्यकता त्याला भासली असावी. एकूणच, मार्क्सच्या अर्थमीमांसेची घडण अतिभौतिकी आणि विज्ञान ह्या दोन्हींच्या प्रेरणेतून झालेली आहे, असे म्हणता येईल ‌.

आता, अतिभौतिकी आणि विज्ञान यांत समन्वय साधणारे काही एक तत्त्व मार्क्सला गवसले होते काय? हा प्रश्न विचारता येईल.

पण, यासारख्या प्रश्नांचा विचार करायचा म्हणजे तो स्वतंत्रपणे ‘मार्क्सचा विचारव्यूह’ समजून घेताना केला पाहिजे. सध्या, त्याकडे केवळ निर्देश करणे पुरेसे आहे.

तेव्हा, मार्क्सच्या अर्थविचाराकडे परत वळूयात. एक अर्थतज्ज्ञ म्हणून मार्क्सचा विशेष अभ्यास केला जाणे, त्याची गांभीर्याने दखल घेणे आणि त्याच मापदंडातून मार्क्सविचारांची – निदान त्याच्या आर्थिक विचारांची – चिकित्सा करणे, त्या विचारांची समीक्षा करणे, असा दृष्टिकोण अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी बाळगणे अभिप्रेत आहे. त्यामुळे प्रस्तुत अर्थमीमांसेतून मार्क्सच्या ‘आर्थिक’ विवेचनावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या ‘अर्थशास्त्रीय दृष्टी’चा वेध घेण्याचा प्रयत्न आहे, हे मत पूर्वीच नोंदविले आहे.

समग्र मार्क्सविचार अर्थात मार्क्सचे तत्त्वज्ञान, इतिहास आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोण ह्यांची मिळून मार्क्सच्या विचारव्यूहाची घडण झालेली आहे. पण, प्रस्तुत अर्थमीमांसेचा दृष्टिकोन ‘विवक्षित’ आहे. निवडक आहे. हीच याची मर्यादाही आहे. तरीही, मार्क्सच्या युक्तिवादातील ‘विवक्षित’ दृष्टीला समजून घ्यायचे असल्यास ते समष्टीच्या संदर्भातच समजून घेणे उचित ठरते. पण यावर असेही म्हणता येईल की, ज्या विवक्षित दृष्टीला समजून घ्यायचे, तिचे सर्वांगीण व तपशीलवार अध्ययन हेही उपयुक्त ठरू शकेल. तसेच, या अर्थमीमांसेतून ज्या ‘विवक्षित’ मतांची चर्चा केली जाईल, त्यांना मार्क्स विचारातील ‘समष्टीय’ दृष्टीच्या विकासाच्या अंगाने अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे आढळून येईल. विवक्षिताची सामान्यतत्त्वे आणि सामान्याची विवक्षित रूपे समजून घेण्यातूनच आपल्या अभ्यासविषयाचा विकास करता येईल.

तेव्हा, पुन्हा उपयोगिता विश्लेषणापासून सुरूवात करूयात. मार्क्सच्या दृष्टिकोणातून उपयोगिता ही काल्पनिक गोष्ट नसून भौतिक पदार्थाइतकीच वास्तव असते. मार्क्सचा उपयोगिताविचार आणि त्याचे समकालीन असलेल्या आणि पुढे मार्क्सनंतर विकसित झालेल्या उपयोगितावादी पंथाचा उपयोगिताविचार यांत भेद आहेत. आधुनिक अर्थशास्त्रीय चिंतनाचा विचार केला तर असे आढळून येईल की मार्क्सने केला त्यापेक्षा अगदी भिन्न अर्थाने ‘उपयोगिता’ या संकल्पनेचा विचार अर्थशास्त्राच्या मुळप्रवाहात रूढ होऊ लागला आहे. प्रा.अमर्त्य सेन यांनी ‘उपयोगिता’ ही संकल्पना कशाप्रकारे आपले स्वरूप बदलत आजपर्यंत विकसित झाली आणि आपला मूळ अर्थच गमावून निःसत्व बनली याचे विवेचन केले आहे. 

प्रा.सेन लिहितात, “आर्थिक विश्लेषणामध्ये वैविध्य व बहुजिनसीपणा टाळण्याची आणि व्यक्तीचे कल्याण वा हित आणि त्याची परिपूर्ती ह्यांचे अतिसरलीकृत मोजमाप करण्याची एक प्रभावी परंपरा आहे. उपयोगिता हा तिच्या मापनाचा मापदंड होय.

उपयोगितेच्या प्राथमिक अर्थाची व्याख्या उपयोगितावाद्यांनी केलेली आहे. एजवर्थ, मार्शल, पिगू, रॅम्से आणि रॉबर्टसन ह्यांच्यासारख्या उपयोगितावादी अर्थतज्ज्ञांनी अत्यंत शास्त्रीय काटेकोरपणे तिचा वापर केला आहे. ह्या अर्थानुसार, उपयोगिता म्हणजे समाधान, आनंद किंवा सुख होय. हा सनातनवादी उपयोगितावाद्यांना अभिप्रेत असलेला अर्थ होय. आणि आधुनिक उपयोगितावाद्यांनुसार, उपयोगिता म्हणजे इच्छेची परिपूर्ती वा इच्छापूर्ती – desire fulfillment होय. परंतु आधुनिक अर्थशास्त्रात ‘उपयोगिता’ ह्या संकल्पनेचा अनेकविध प्रकारे वापर करण्यात आलेला आहे. त्यानुसार, व्यक्तीला ज्या गोष्टीचे महत्तमीकरण करायचे आहे किंवा जिचे महत्तमीकरण करता येणे शक्य आहे अशी गोष्ट म्हणजे उपयोगिता होय. (आधुनिक अर्थशास्त्रात ‘ उपयोगिता महत्तमीकरण’ हे उपभोक्त्यांचे व ‘नफा महत्तमीकरण’ हे उत्पादकांचे उद्दिष्ट मानले गेले आहे.) किंवा मग सरळसरळ, व्यक्तीचे कल्याण वा हित – मग त्या कल्याणाचे मापन कसे केले जाते हे प्रसंगी दुर्लक्षून मांडली गेलेली एक संकल्पना – म्हणजे उपयोगिता असते. इतक्या सैल अर्थांनी ‘उपयोगिता’ ही संकल्पना प्रतिपादन करण्यात आलेली आहे. म्हणून आर्थिक विश्लेषणावर तिचा जो प्रभाव पडला त्यातून अनेक वैचारिक घोटाळेच निष्पन्न झाले आहेत. त्यावरही विसंगती ही की एकीकडे ही संकल्पना सूत्रबद्ध गणितीय नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर दुसरीकडे आशयात्मकदृष्ट्या तिच्यात ठळक अपुरेपण दृष्टीस पडते.”
(सेन, अमर्त्य, ‘commodities and capabilities’, पृष्ठ क्रमांक १व २, १९८७) 

प्रा.सेन ह्यांनी उपयोगितेच्या अर्थाचा विकास ज्याप्रकारे झाला, त्याचा येथे संक्षिप्त आढावा घेतला आहे. स्वत: प्रा.सेन यांनी सुद्धा क्रयवस्तूंच्या विश्लेषणात तिच्या उपयोगमूल्यांवर अधिक भर दिलेला आहे आणि त्यातून पुढे त्यांनी आपला ‘क्षमता दृष्टिकोण’ विकसित केला आहे.

पण हे सर्व मार्क्सला अभिप्रेत असलेल्या ‘उपयोगिता’ या संज्ञेपेक्षा अगदीच भिन्न, प्रसंगी विरूद्ध स्वरूपाचे आहे. प्रा.सेन मार्क्सप्रमाणे उपयोगमूल्यांना गौण समजत नाहीत, उलट क्रयवस्तूंच्या उपयोगमूल्यांचे स्वरूप काय? हा प्रश्न उपस्थित करून आपले विवेचन करतात.

या पार्श्वभूमीवर मार्क्सचा उपयोगिताविचार समजून घेणे इष्ट ठरेल.

वस्तू आणि तिची उपयोगिता यांतील आंतरसंबंधाचे स्वरूप मार्क्सने विषद केले आहे. त्याविषयीची मार्क्सची भूमिका सांगता येईल. ती अशी :

प्रथमतः वस्तू आणि तिची उपयोगिता ह्या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत, त्यांत केवळ भेद करता येईल. ज्या अर्थाने त्या अलग करता येणार नाहीत, त्या अर्थानेच असे म्हणता येईल की वस्तूची उपयोगिता ही तिच्यामध्ये असणाऱ्या अंगभूत भौतिक गुणधर्मांनी मर्यादित असते. उपयोगिता म्हणजे जर अंगभूत भौतिक गुणधर्मांचे अस्तित्व मानले; तर उपयोगितेला वस्तूपासून अलग असे अस्तित्व असू शकत नाही. वस्तूला भौतिक अस्तित्व असण्यात तिला उपयोगिता असणे अनुस्यूतच आहे. अर्थात, उपयोगितेचे अस्तित्व वस्तूच्या अस्तित्वावर अवलंबून आहे.

वस्तूचे भौतिक अस्तित्व ही उपयोगितेची पूर्वअट आहे. लोखंड, धान्य, हिरे इत्यादी क्रयवस्तूंना भौतिक अस्तित्व आहे म्हणून त्यांना उपयोगमूल्य आहे, त्यांचा काही तरी उपयोग आहे. आता, अशा उपयोगी वस्तूंवर श्रमाचे संस्कार होतात याचा अर्थ इतकाच राहील की उपयोगी गुणांचा उपभोग घेता यावा यासाठी त्या पदार्थाला श्रमामुळे केवळ आकारित/संस्कारित केले जाते. त्या पदार्थाला क्रयवस्तू म्हणून मूर्तरूप दिले जाते. पण त्या पदार्थावर किती श्रम खर्ची झालेले आहेत, याच्याशी पदार्थातील अंगभूत गुणांचा काही संबंध नसतो. श्रमामुळे पदार्थाला उपयोगिता प्राप्त होत नाही, तर उपयोगिता असणे हे भौतिक पदार्थ अस्तित्वात असण्यातच व्यंजित (implied) असल्याने ती पदार्थांचा अंगभूत घटक असते. म्हणजे उपयोगमूल्य निर्माण करता येत नाही. वस्तूतील उपयोगमूल्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सदर वस्तूचा वापर करावा लागतो किंवा उपभोग घ्यावा लागतो. संपत्तीचे सामाजिक स्वरूप काहीही असले तरी सर्व संपत्तीचा गाभा उपयोगमूल्यच असतो. पण आपण भांडवली समाजव्यवस्थेचा विचार करतो, तेव्हा तिच्यात उपयोगमूल्य हा विनिमयमूल्याचा साठाही असतो. उपयोगमूल्याशिवाय विनिमयमूल्य उद्भवूच शकत नाही. म्हणजेच उपयोगमूल्य विनिमयमूल्याचा आधार आहे. आणि म्हणूनच यावरून उपयोगशून्य पदार्थ वा वस्तूला विनिमयमूल्य असणे का शक्य नाही, याचे स्पष्टीकरण होते.

आता, उपयोगमूल्य आणि विनिमयमूल्य यांत आंतरसंबंध आहे हे उघड आहे. तरीही त्याचे अधिक स्पष्टीकरण करूयात. प्रथमदर्शनी, विनिमयमूल्य हे एक संख्यात्मक संबंध या स्वरूपात एका प्रकारच्या उपयोगमूल्याचा दुसऱ्या प्रकारच्या उपयोगमूल्यांशी ज्या प्रमाणात विनिमय होतो, ते संख्यात्मक प्रमाण या स्वरूपात, स्थळकाळानुसार सतत बदलत जाणारा संबंध म्हणून दृष्टीस पडते. हा संबंध कसा असतो? यासंदर्भात मार्क्सने ट्रॉस्ने ह्यांचे मत उधृत केले आहे. ते असे :

 “एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थाबरोबर, एका उत्पादित वस्तूचा दुसऱ्या उत्पादित वस्तूबरोबर विनिमय होण्याचे जे प्रमाण, त्यावरून मूल्य ठरते.”
(ल.ट्रॉस्ने, ‘सामाजिक हित’, फिजीओक्रॅट्स डेअरी प्रत, पॅरिस १८४६, पृष्ठ क्रमांक ८८९)

म्हणून विनिमयमूल्य हे आकस्मिक आणि केवळ सापेक्ष असावे असे वाटते आणि परिणामी इतर वस्तूंशी अतूट संबंध असलेले आणि तरीही वस्तूत अंगभूत असलेले विनिमयमूल्य हेच वस्तूचे स्वाभाविकमूल्य असते, हे विधान परस्परविरोधी आहे, अशी मार्क्सची भूमिका आहे. कारण, एकाचवेळी विनिमयमूल्य सापेक्ष आणि निरपेक्ष कसे असू शकेल? असा प्रश्न त्यातून उपस्थित होतो. याचा अधिक खुलासा केला पाहिजे.

वस्तुविनिमयात एका वस्तूची (किंवा वस्तूंची) दुसऱ्या वस्तूबरोबर (किंवा निरनिराळ्या परिमाणांच्या अनेक वस्तूंबरोबर) देवघेव होते. विनिमय होतो. याला स्थूलमानाने ‘वस्तुविनिमय’ असे म्हणता येईल.

वस्तुविनिमय या संज्ञेचा दुसरा अर्थ असा :

समजा ‘अ’ या वस्तूचा इतर वस्तूंशी विनिमय होतो, असे म्हणण्यात त्या इतर वस्तूंमध्ये अंतर्भूत असलेली मूल्ये ही ‘अ’मध्ये सुद्धा अंतर्भूत असतात म्हणजेच ‘अ’ या वस्तूला एकाऐवजी अनेक मूल्ये असतात, असे अनुस्यूत आहे.

समजा, ‘ब’, ‘क’, ‘ड’ या तीन इतर वस्तूंना स्वत:ची मूल्ये आहेत. आता, ‘अ चा ‘ब’, ‘क’, ‘ड’ या वस्तूंशी विनिमय होण्याचा अर्थ असा राहील की, ह्या तीनही वस्तूंची मूल्ये ‘अ’च्या विनिमयमूल्याइतकी किंवा त्याबरोबर असतात. म्हणजेच, ‘अ’, ‘ब’, ‘क’, आणि ‘ड’ ह्या सर्व वस्तूंना मूल्य या नात्याने एकमेकांच्या स्थानांची अदलाबदल करता आली पाहिजे किंवा ते सर्व एकमेकांएवढे तरी असले पाहिजेत.

उपर्युक्त विवेचनावरून दोन महत्त्वाचे निष्कर्ष निघतात :

१. कोणत्याही क्रयवस्तूचे विनिमयमूल्य हे कोणत्यातरी समान गोष्टीची अभिव्यक्ती असते.

२. सर्वसाधारणपणे क्रयवस्तूत असलेल्या आणि तरीसुद्धा तिच्यापासून वेगळेपणाने दाखविता येईल अशा गोष्टीचे अस्तित्व व्यक्त करण्याची पद्धत किंवा त्या गोष्टीचे स्वरूप म्हणजे विनिमयमूल्य होय.

याचे उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण मार्क्सच्याच भाषेत करायचे झाले तर ते असे करता येईल :

“आपण गहू आणि लोखंड अशा दोन वस्तू उदाहरणादाखल घेऊ. या दोहोंची एकमेकांत देवघेव होण्याचे, विनिमय होण्याचे जे प्रमाण असेल, ते प्रमाण काहीही असले तरी अशा एका समीकरणाच्या स्वरूपात मांडता येईल की ज्यात गव्हाचे विशिष्ट परिमाण, लोखंडाच्या विशिष्ट परिमाणाबरोबर असेल. उदाहरणार्थ, १ क्विंटल गहू = १ हंड्रेडवेट लोखंड. यांत तिसरी एक गोष्ट सारखी आणि समप्रमाणात आहे. म्हणून या दोन्ही वस्तू तिसऱ्या एका गोष्टीएवढ्या असल्या पाहिजेत. ही तिसरी गोष्ट पहिल्या आणि दुसऱ्या वस्तूपेक्षा वेगळी असली पाहिजे आणि तरीही विनिमयमूल्य या नात्याने या दोन्ही वस्तू तिसरीच्या पातळीवर आणणे शक्य झाले पाहिजे.”

तिसऱ्या गोष्टींशी समान असलेल्या दोन गोष्टी एकमेकांशी समान असतात, ह्या युक्लिडीय प्रमेयाचा पुनरूच्चार येथे केलेला दिसतो.

भूमितीचे उदाहरण देऊन हीच गोष्ट स्पष्ट करता येईल. भूमितीमध्ये आपल्याला दोन चौकोनी आकृतींचे क्षेत्रफळ काढायचे असल्यास आणि त्यांची तुलना करावयाची असल्यास प्रथमतः चौकोनांची त्रिकोणात विभागणी केली जाते. या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाया × उंची यांच्या निम्म्याएवढे – १/२×पाया×उंची – असते, म्हणजे क्षेत्रफळ सांगण्याची ही जी पद्धत आहे ती त्रिकोणाच्या प्रत्यक्ष आकृतीपेक्षा अगदी वेगळीच असते. याच रीतीने निरनिराळ्या क्रयवस्तूंची विनिमयमूल्ये अशा एका तिसऱ्या पदार्थाच्या स्वरूपात व्यक्त करता आली पाहिजेत की, जो पदार्थ इतर सर्व वस्तूंत समानत्वाने असेल आणि इतर सर्व वस्तू त्याचा लहान-मोठा भाग असतील.

आता, सर्वांत समानतेने असणारा हा पदार्थ भूमितीविषयक किंवा रासायनिक असू शकणार नाही. त्याचप्रमाणे तो वस्तूंतील एखादा नैसर्गिक गुणधर्मही असू शकणार नाही. आता, वस्तूंचा उपयोग हा वस्तूंतील अंगभूत गुणधर्मांचा परिपाक असतो, त्यामुळे त्यांना उपयोगमूल्य प्राप्त होते आणि म्हणूनच हे गुणधर्म आपले लक्ष वेधून घेतात. हे उघड आहे की, क्रयवस्तूंचा विनिमय अशी क्रिया आहे की ज्यात उपयोगमूल्य पूर्णपणे बाजूला ठेवलेले असते, ते विचारातच घेतले जात नाही. कोणतेही उपयोगमूल्य पुरेशा प्रमाणात अस्तित्वात असले म्हणजे मग ते इतर उपयोगमूल्यांसारखेच असते. किंवा निकोलस बारबॉनने म्हटल्याप्रमाणे, “दोन वस्तूंचे विनिमयमूल्य जर सारखे असेल तर एक दुसरीच्या इतकीच चांगली असते. समान मूल्य असणाऱ्या वस्तूंत काही फरक नसतो. काही वेगळेपणा नसतो. शंभर पौंड किंमत असलेले शिसे किंवा लोखंड यांचे मूल्य शंभर पौंड किमतीच्या चांदी किंवा सोन्याच्या मूल्याएवढेच असते. उपयोगमूल्ये या नात्याने वस्तू मुख्यत: निरनिराळ्या गुणधर्माच्या असतात. परंतु विनिमयमूल्य म्हणून त्यांतील फरक केवळ संख्यात्मक असतो आणि म्हणून या संबंधात त्यांच्यात कणभरही उपयोगमूल्य नसते.”

यावरून, मार्क्सने बारबॉनच्या मतांचाच अनुवाद केला हे उघड आहे. अर्थात, असा अनुवाद करणे, त्याच्या एकूण भूमिकेला धरूनच आहे. मार्क्सने यावरून जो निष्कर्ष काढला तो वैशिष्ट्यपूर्ण आहे, तो असा :

भिन्न भौतिक वस्तूंमधील उपयोगमूल्ये भिन्न असतात. परंतु या उपयोगमूल्यांचा विचार आपण बाजूला ठेवला म्हणजे त्या सर्व ‘भिन्न’ वस्तूंत ‘एकच समान गोष्ट’ असल्याचे आपल्याला आढळून येईल. ती समान गोष्ट म्हणजे त्या सर्व ज्यापासून निर्माण झालेल्या असतात ते मानवी श्रम! अर्थात त्या सर्व वस्तू मानवी श्रमाने निर्माण झालेल्या असतात, ही गोष्ट सर्व वस्तूंबाबत समान असते. परंतु आता या अवस्थेत श्रमनिर्मित वस्तूंतही बदल घडून येतो. आपण श्रमनिर्मित वस्तू तिच्या उपयोगमूल्यापासून वेगळी करतो तेव्हा ज्या भौतिक पदार्थामुळे व ज्या आकारामुळे त्या वस्तूला उपयोगमूल्य प्राप्त होते त्यांच्यापासूनही ती अलग राहते. तिच्याकडे आता आपण टेबल, घर, सूत किंवा कोणतीही एखादी उपयोगी वस्तू म्हणून पाहत नाही. भौतिक वस्तू म्हणून तिचे अस्तित्व दृष्टीआड केले जाते. तसेच या अवस्थेत तिचा विचार फिटरच्या, गवंड्यांच्या, विणकराच्या किंवा दुसऱ्या कोणत्या निश्चित प्रकारच्या उपयुक्त श्रमाची निर्मिती या दृष्टिनेही केला जात नाही. वस्तूंतील उपयोगी पडण्याचा गुण (उपयोगिता) दृष्टीआड करण्याबरोबरच आपण निरनिराळ्या वस्तूंत अंतर्भूत निरनिराळ्या प्रकारच्या श्रमांची उपयोगिता आणि त्या श्रमांचे दृश्यस्वरूप हेही दृष्टीआड करतो. त्या सर्वांत जी समान गोष्ट असते तीच फक्त आता शिल्लक राहते. सर्व एका आणि समान श्रमाच्या पातळीवर, अमूर्त श्रमाच्या पातळीवर येऊन बसतात.”
(मार्क्स, कार्ल, ‘कॅपिटल : खंड १’, प्रकरण १. क्रयवस्तू, पृष्ठ क्रमांक २७-२८, १८६७)

इथपर्यंत विवेचन करून मार्क्स विचारतो, “या निरनिराळ्या वस्तूंत आता शिल्लक काय राहिले?” आणि स्वत:च तात्काळ उत्तरतो, “शिल्लक राहिली प्रत्येक वस्तूत असणारी अमूर्त वास्तवता!”

ही मार्क्सची इथपर्यंतची भूमिका आहे.

‘अमूर्त वास्तवता’ हा त्याचा शब्दप्रयोग हेगेलची आठवण करून देतो. अशाप्रकारे, मार्क्सची अर्थमीमांसा अगदी प्रारंभीच हेगेलेच्या तत्त्वमीमांसेत शिरते. आणि क्रयवस्तूचे रहस्य हे एक गुह्य आहे – जिच्यात एक अमूर्त वास्तवता असते अशा क्रयवस्तूचे ते गूढ आहे – या भूमिकेपर्यंत मार्क्स आलेला आपल्याला दिसतो.

जडवादी मार्क्स आपला चैतन्यवादी गुरु हेगेल यांच्या बराच पुढे गेला होता, असे जेव्हा मार्क्सविषयी म्हटले जाते, तेव्हा त्याचे ‘हे जे पुढे जाणे आहे’ ते हेगेलचा चैतन्यवाद आत्मसात करून पुढे जाणे, या स्वरूपाचे असते.

याच अर्थाने हेगेलशिष्य मार्क्सने क्रयवस्तूंना आणि मानवी श्रमालाही ‘अमूर्त’ आणि म्हणून ‘अतिभौतिक’ पातळीवर आणून ठेवले आहे.

मार्क्सची अर्थमीमांसाच एका विशिष्ट पातळीनंतर तत्त्वमीमांसेत परिणत झालेली दिसते.

तेव्हा, मार्क्सने आपल्या या अतिभौतिकीचा पुढे जो तार्किक विकास केला, तो करताना जे युक्तिवाद केले त्यांचा आणि त्याच्या या युक्तिवादांवर कोणते संभाव्य आक्षेप घेण्यात आले आणि घेता येऊ शकतील, याचा विचार आपण प्रस्तुत लेखमालिकेतून पुढे करणार आहोतच.

पण, शेवटी एक प्रश्न विचारता येईल.

मार्क्सच्या अर्थमीमांसेला तत्त्वमीमांसेचे अधिष्ठान आहे, हे आता स्फटिकाप्रमाणे स्पष्ट झाले आहे. तत्त्वमीमांसा म्हणजे विज्ञान नव्हे, हेही सर्वश्रुत आहे. तेंव्हा, आपली अर्थमीमांसा, आपले अर्थशास्त्र ‘शास्त्रीय’ आहे आणि म्हणून त्यावर अधिष्ठित असलेला समाजवाद ‘शास्त्रीय’ आहे, असा मार्क्सचा जो दावा आहे, त्यासंदर्भात ‘शास्त्रीय’ या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय? 

 (अपूर्ण…)

पारिभाषिक संज्ञा :

  • उपयोगमूल्य = value-in-use, use value
  • विनिमयमूल्य= value-in-exchange, exchange value
  • जडद्रव्य = matter
  • जडवाद,भौतिकवाद = materialism
  • तत्त्वमीमांसा, अतिभौतिकी, सद्वस्तूमीमांसा = metaphysics
  • द्वंद्ववाद = dialectics
  • चैतन्यवाद, भाववाद = Idealism
  • मूल्यसिद्धांत = Theory of value
  • शरीरशास्त्र, शरीररचनाशास्त्र = anatomy
  • अर्थपेशी स्वरूप = economic cell-form
  • गतीचे आर्थिक नियम = economic laws of motion
  • सजीव रचना = organism
  • नियततत्त्व = deterministic principle
  • सहेतुकतातत्त्व = teleological principle 
  • महत्तमीकरण = maximization
  • उपयोगिता महत्तमीकरण = utility maximization
  • नफा महत्तमीकरण = profit maximization
  • क्षमता दृष्टिकोन = capability approach
  • स्वाभाविकमूल्य = natural value

एम.ए., अर्थशास्त्र

या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अभिप्राय 7

  • नमस्कार श्रीधरदादा,

    मी आत्तापर्यंत मार्क्स वाचला नव्हता पण तुमच्या या लेख मालिकेतून थोडासा परिचय झाला. अत्यंत सोप्या शब्दात आणि प्रवाही भाषेत तुम्ही खूपच सुंदर समजावलेले आहे.

    तसं माझा “हा(अर्थशास्त्र )विषय नाही .पण स्वतःला( चैतन्य )समजण्याच्या अर्थाने आणि एकंदरीतच सार्थक जीवन म्हणजे काय हा माझा जो शोध सुरू आहे, त्या दृष्टीने जे तत्त्वज्ञान वाचले आणि ज्याचा मी आता अभ्यास करतो आहे त्यामध्ये हा संबंध खूप छान समजवलाय असे मला वाटते.

    ज्या दर्शनाचा मी आता अभ्यास करतोय त्याचे नाव आहे ” मध्यस्थ दर्शन” ज्याला “सह अस्तित्ववाद” पण म्हणतात. आणि त्यामध्ये एक ग्रंथ आहे “आवर्तनशील अर्थशास्त्र”. हे खूपच नवीन दर्शन आहे आणि याचा हळूहळू परिचय होत आहे. याचे दार्शनिक श्री नागराज(१९२०-२०१६) हे आहेत.

    यामध्ये उपयोगिता मूल्य श्रम मूल्य आधारित विनिमय या संकल्पनेचा एकंदरीतच परिवार मूलक ग्रामस्वराजव्यवस्था आणि त्यावर आधारित पूर्ण सार्वभौम व्यवस्था ज्यामध्ये मानवी समाजाचा अखंडत्वाने विचार केलेला आहे.

    तुम्हाला हे वाचण्यात रस असेल तर माझ्याशी अवश्य संपर्क करा.

    पुन्हा एकदा एक अत्यंत ओघवत्या प्रवाही आणि सोप्या शब्दात तुम्ही मार्क्स चे विचार समजून सांगतात त्याबद्दल धन्यवाद पुढची ही लेखमाला अवश्य वाचीनच.

    धन्यवाद

    • श्री.हेमंत, आपल्या विनम्र अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      ‘ आवर्तनशील अर्थशास्त्र’ व ‘ मध्यस्थ दर्शन’ या विषयावरील चर्चा उपयुक्त ठरू शकेल.

      कळावे.

  • आपल्या देशाचा अर्थसंकल्प budget हे तुटीचे deficit आहे. ते शिलकीचे surplus करण्यासाठी वरील मार्क्सच्या मांडणीचा काही उपयोग आहे का? असल्यास कसे? ते नसल्यास मार्कस चा उपयोग काय? फुकाची बडबड!

  • ‘ मार्क्सची अर्थमिमांसा’ ही लेखमाला सुरू करण्यामागे एक प्रेरणा आहे,जी ‘भाग १’ च्या उपोद्धातात सांगितली आहे.ती पुन्हा एकदा अधोरेखित करावी लागेल :
    “या लेखमालेतून कार्ल मार्क्सच्या अर्थशास्त्राची अन्वेषणा करण्याचे येथे योजले आहे. ही अन्वेषणा मुख्यत: मार्क्सच्या अर्थशास्त्रीय दृष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न करते.
    मार्क्सला स्वीकारण्या अथवा नाकारण्याऐवजी त्याला समजून घेण्यात ज्यांना रस आहे, केवळ अशा व्यक्तींच्या दृष्टीनेच ह्या लेखमालेस काही मूल्य असू शकेल.
    प्रस्तुत लेखनाचा हेतू हा मार्क्सच्या अर्थशास्त्रीय विश्लेषणाची विद्यमान अर्थशास्त्राशी तुलना करणे आणि मार्क्सच्या अर्थविचारांवर भाष्य करणे, असा आहे. मार्क्सविचारातील क्षमतास्थळे व कमकुवत स्थळे कोणती याची जाणीव करून घेत, अर्थशास्त्राच्या आधुनिक वैचारिक परंपरेच्या प्रकाशात मार्क्सविचाराचा वेध घेणे, हा या लेखनाचा उद्देश आहे.”
    ह्या लेखमालिकेचे मूल्यमापन व्हायचे असेल तर आपले उद्दिष्ट साध्य करण्यात तिच्यावर कुठे मर्यादा पडली आहे, विवेचनात काही तार्किक प्रमाद अथवा चुका आहेत काय हे दाखवून देऊनच करता येईल..असे झाले तर त्या मूल्यमापनाचे मी स्वागतच करीन…
    ‘मार्क्सची वर्तमानकालीन प्रस्तुतता काय?’ हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
    आता, ऐतिहासिक व्यक्तीचे अध्ययन दोन प्रकारे केले जाऊ शकतो :एकतर त्या व्यक्तीच्या काळाच्या संदर्भात किंवा आजच्या समकालीन वर्तमान प्रस्तुततेच्या संदर्भात..
    मार्क्सचा विचार त्यांच्या काळाच्या संदर्भात तर या लेखमालेतून केला जाईलच म्हणजे आर्थिक विचारांच्या इतिहास त्याचे स्थान नेमके कुठे आहे? यावर विचार केला जाईल पण त्याबरोबर आधुनिक अर्थशास्त्रीय चिंतनाच्या प्रकाशात मार्क्सविचारांवर भाष्य केले जाईल. मार्क्सच्या विचारांचा एकूणात मागणी, तेजी-मंदीची व्यापारचक्रे, राष्ट्रीय उत्पन्नाची घडण,विभाजन व वितरण ,त्याचे सामाजिक अभिसरण, अपूर्ण स्पर्धा,बाजारअपयश, बेरोजगारीची मीमांसा, आर्थिक विषमता, दारिद्रय आणि कल्याणकारी अर्थशास्त्र यांसारख्या विषयांवरील पडलेल्या प्रभावाचे व त्यांच्या योगदानाचे सविस्तर विश्लेषण करण्याबरोबरच मार्क्सच्या वैचारिक मर्यादांवरही भाष्य करणे,असा दुहेरी उद्देश ह्या लेखमालेचा आहे….ही लेखमाला दीर्घ असल्यामुळे या सर्वांची मांडणी करण्यासाठी काहीसा वेळ लागेल पण तोपर्यंत आवश्यक ‘संयम’ असणारा वाचक मी गृहीत धरला आहे….इतरजणांना ही ‘फुकाची बडबड’ वाटली, तरीही माझी काही हरकत नाही!

    ( टीप : ‘सार्वजनिक आयव्यय'( public finance) या विषयात तुटीचा अर्थभरणा कसा करावा? अर्थसंकल्प शिलकीचा वा संतुलित कसा करावा? यासंदर्भात भांडवली, मिश्र अर्थव्यवस्था व मार्क्सवादी किंवा समाजवादी पध्दतीचे विवेचन उपलब्ध आहे.
    केनेथ आरो,बाऊमोल,जेम्स बुचनान,डाल्टन,फिशर,एजवर्थ,पिगू,सेलिग्मन,स्टिगलित्झ,फिलिप टेलर यांसारख्या अधिकारी तज्ञांनी यांचे सखोल चिंतन व लेखन केले आहे.
    एच.एल.आहुजा आणि मुसग्रेव्ह या विद्वानांनीही यावर प्रदीर्घ लिहिले आहे… शिक्षक बीए.ए.अर्थशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याच पुस्तकांची शिफारस करतात… जेणेकरून त्यांनी पुढे चालून ‘ तुटीचा अर्थभरणा कसा करावा?’ असे अगदीच प्राथमिक प्रश्न विचारू नये! पण समजा ज्यांना असे प्रश्न पडत असतीलच तर वरील लेखकांच्या ग्रंथाचा संदर्भ बघावा.त्यांना आपल्या प्रश्र्नांची समाधानकारक उत्तरे मिळू शकतात,असे वाटते.आणि त्यातूनच अर्थतज्ञांच्या विचारांची ‘प्रस्तुतता’सुध्दा समजू शकेल.)

  • नमस्कार श्रीधर दादा,

    आपण “मध्यस्थ दर्शन -सहअस्तित्ववाद” विषयी या ठिकाणी चर्चा करू शकतो असे सुचवले.

    या ठिकाणी अर्थातच पूर्ण चर्चा करणे शक्यही नाही आणि योग्यही नाही ,कारण एका दर्शनाची व्याप्ती समजायला एकत्र बसून त्या विषयावर वेगळी चर्चा करणे योग्य, असे मला वाटते.

    तरीही थोडक्यात या विषयाच्या संदर्भात काही सूत्र मांडण्याचा प्रयत्न करतो. (हा माझा दर्शनाचा विद्यार्थी म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्यामुळे याचा स्रोत दर्शन आहे, त्याने माझ्याकडून काही त्रुटी होऊ शकते. ज्यांना दर्शनामध्ये रुची आहे त्यांनी माझ्याशी वेगळा संपर्क साधावा: फोन ९५६१०८५९७७)

    १. माणूस हा ही अस्तित्वाचा / निसर्गाचा एक घटक असल्यामुळे त्याची कुठल्याही तत्वाला आणि विषयाला समजण्याची व्याप्ती, त्याच्या तोपर्यंत असलेल्या शिक्षणावर आणि विचारांवर आधारित असते, त्यामुळे ती सापेक्षच राहील.

    २. त्यामुळे सर्वप्रथम मानवी मूल्य आणि मानवाची उपयोगिता पहिले समजून त्या मूल्याला म्हणजे मौलिकेला स्वतःमध्ये प्रतिष्ठित केल्याशिवाय माणसाला संपूर्ण अस्तित्वाकडे बघण्याची पूर्ण दृष्टी येणार नाही, त्यामुळेच तत्व आणि तर्क आणि व्यवहार यामध्ये आपल्याला अंतर विरोध जाणवतो.

    ३. मध्यस्थ दर्शन अनुसार मानव हा जड आणि चैतन्याची संयुक्त साकार अभिव्यक्ती आहे. यातील सद्यस्थितीत असलेली मानवातील चेतना हे अजूनही जेवढे पोटेन्शिअल आहे तेवढी रिअलाइज झालेली नाही. किंबहुना सर्व मानवाचा प्रवास हा या अर्थाने या चेतनेला किंवा मौलिकतेला प्राप्त करण्याचा आहे ज्याला आध्यात्मिक भाषेत “अनुभव” म्हणतात. सामान्य भाषेत त्याला स्व चा शोध किंवा सुखाचा शोध असेही काही लोक म्हणतात.

    ४. तर मानवातील उपयोगीता मूल्य हेच आहे की त्याने स्वतःला जाणावे, मानवेतर अस्तित्वाला जाणावे आणि त्याप्रमाणे जगावे. या क्रमामध्येच भौतिक वस्तूतील उपयोगिता मूल्य त्याला निश्चित समजू शकते आणि मग या भौतिक वस्तूवर मानवी श्रम पूर्वक केलेले मानव उपयोगी मूल्यवर्धनाला एक नियंत्रण येते. यावर आधारित वस्तूचे मूल्यांकन श्रममूल्य आधारित करून, ते विनिमयाचे साधन ठरते, त्यातून मानवातील समानतेचा धागा मिळतो, आणि श्रमाच्या आधारे जी सध्या असमानता निर्माण झाली आहे त्यावर हे समाधान भावते.

    ५.सध्या आपण जो विकासाच्या नावाखाली विनाश आणि प्रकृतीचे शोषण चालू आहे त्याची उत्पत्ती स्वतःला न समजण्यातूनच होते असे हे दर्शन प्रतिपादित करते.

    ६. त्यामुळे जी अमूर्तता आहे त्याला या दर्शनामध्ये बऱ्यापैकी स्पष्ट पद्धतीने मांडले आहे असे मला वाटते. आणि मुख्य म्हणजे यातून तत्व तर्क आणि व्यवहार याच्यामध्ये एकसूत्रता नि:सृत होते.

    ७. अखिल अस्तित्वाचा उद्देश “सह अस्तित्व” आहे किंबहुना “अस्तित्वच सह अस्तित्वस्वरूप आहे” हे सूत्र दर्शन प्रतिपादित करते ,आणि या अस्तित्वाच्या रहस्याला समजणे आणि त्यानुसार मानव समाजातील व्यवस्थाही “अखंड मानव समाज आणि सार्वभौम व्यवस्था” ,असे मानवाचे प्रयोजन निश्चित करते.

    ८. वरील आणि अन्य काही तत्त्वांना स्पष्ट करण्यासाठी श्री नागराज यांनी दर्शन, वाद आणि शास्त्र असे दहा ग्रंथ लिहिले आहेत आणि वरील मानवी प्रयोजनाच्या आधारावर एका सार्वभौम व्यवस्थेचे स्वरूप कसे असेल आणि त्यासाठी “मानवीय संविधान” जे की पूर्ण पृथ्वीला लागू होऊ शकेल ज्यामध्ये प्रत्येक माणूस आपल्या मौलिकतेला प्राप्त करून सुखी कसा होऊ शकेल याचे एक स्केलेबल व्यावहारिक डिझाइन आहे.

    असो ,जसे मी म्हंटले, अभिप्रायामध्ये फक्त थोडासा परिचय होऊ शकतो. बाकी यावर चर्चा करण्यास मी कधीही तयार आहे. इच्छुक लोकांनी अवश्य संपर्क साधावा.

    यानिमित्त मला काही मुद्दे मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल “सुधारक “चे धन्यवाद.

  • प्रिय हेमंत,

    तुमचे विचार तुम्ही येथे बऱ्याच विस्ताराने आणि अभ्यासपूर्ण शैलीने मांडले आहेत. ह्या विषयावर तुम्हाला अधिक काही लिहायचे असल्यास आपण श्रीधर ह्यांच्या लेखावरील प्रतिसाद म्हणून एका स्वतंत्र लेखाच्या स्वरूपातही घेऊ शकतो. त्यातून वाचकांपर्यंत काही अधिक मौलिक विचार पोहोचतील आणि संवादाचा एक मोठा अवकाश येथे खुला होईल असे वाटते.

    तुमचे मनःपूर्वक स्वागत आणि तुमच्याकडून यापुढील सहयोगाची अपेक्षा राहील.

    – आजचा सुधारक टीम

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.