मार्क्सची अर्थमीमांसा : भाग ३

निरनिराळ्या वस्तूंत जी अमूर्त वास्तवता शिल्लक राहते तिचा मार्क्सच्या विवेचनास अनुसरून एक अर्थ विशद करता येईल. तो असा :

वस्तूतील ही अमूर्त वास्तवता म्हणजे एकाच प्रकारच्या मानवी श्रमांचे, त्यांचा कोणत्या प्रकारे उपयोग केला जातो याचा विचार न करता जे शिल्लक राहते अशा निव्वळ श्रमांचे घन स्वरूप होय. या सर्व वस्तूंविषयी जे सामान्य तत्त्व मांडता येईल ते असे की, या सर्व वस्तूंच्या निर्मितीसाठी मानवी श्रमशक्ती खर्च झालेली असते. मानवी श्रमशक्तीचे त्या व्यक्त स्वरूप असतात. सारांश, सर्वांत समानतेने असणाऱ्या या सामाजिक गोष्टींची मूर्त स्वरूपे या दृष्टीने पाहता सर्व वस्तू मूल्ये असतात. ही अमूर्त वास्तवता म्हणजे वस्तू ह्या स्वरूपातील मूल्ये होय.

अशाप्रकारे वस्तूरूप ‘मूल्य’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करता येईल.

जेव्हा क्रयवस्तूंचा विनिमय होतो, तेव्हा त्यांच्यात समान असलेले तत्त्व अशा एका स्वरूपात प्रकट होते की, जे त्यांच्या उपयोगमूल्यांहून संपूर्णतया वेगळे असते. या विचाराशी आपला पूर्वपरिचय आहे.

क्रयवस्तूंचे उपयोगमूल्य आपण तिच्यापासून वेगळे केले असता जे शिल्लक राहते ते तिचे मूल्य होय. दुसऱ्या अर्थाने, क्रयवस्तूंचा विनिमय होत असताना त्यांच्यात जे समान तत्त्व आढळून येते ते त्याचे मूल्य होय. या विचारांतून निष्पन्न होणारी एक गोष्ट अशी की :

वस्तूंचे मूल्य केवळ विनिमयमूल्याच्या स्वरूपातच व्यक्त होते किंवा या स्वरूपातच व्यक्त करता येते.

परंतु क्रयवस्तूंच्या या स्वरूपापेक्षाही, म्हणजे विनिमयमूल्य या स्वरूपापेक्षाही स्वतंत्रपणे मूल्यांच्या मूळ प्रकृतीचा विचार करता येऊ शकेल.

हा विचार म्हणजे कार्ल मार्क्सची सुप्रसिद्ध ‘श्रममूल्याची उपपत्ती’ (Theory of labour-value) होय. तिचे विवेचन थोडक्यात पुढीलप्रमाणे : 

उपयोगमूल्याला आणि म्हणून उपयोगी वस्तूला मूल्य असते याचे एक आणि एकच कारण असते. हे कारण म्हणजे त्या वस्तूंमध्ये मानवी श्रम घातलेले असतात. वस्तू ह्या स्वरूपातील मूल्ये म्हणजे एकप्रकारची अमूर्त वास्तवता असते आणि ही अमूर्त वास्तवता म्हणजेच अमूर्त पातळीवरील अमूर्त मानवी श्रम असतात. या अर्थाने, अमूर्त मानवी श्रमच वस्तू ह्या स्वरूपातील मूल्यात मूर्त होतात.

आता, ह्या मूल्याचे मापन कसे करायचे? हा एक प्रश्न आहे.

याला मार्क्सने सुचविलेले उत्तर असे की त्या वस्तूंत मूल्य निर्माण करणारा पदार्थ, अर्थात श्रम जितके घातले गेले असतील त्याच्या परिमाणावरून मूल्याचे मापन करता येईल. मग श्रमाचे परिमाण, अर्थात वस्तूत किती श्रम घातले गेले याचे परिमाण कसे मोजायचे? याला संक्षिप्त उत्तर असे की, श्रम किती केले हे त्यांच्या कालमर्यादेवरून मोजले जाते आणि हा श्रम-काल आठवडे, दिवस अगर तास यांनी मोजला जातो.

सारांश, क्रयवस्तूचे मूल्य तिच्या निर्मितीसाठी खर्ची पडलेल्या श्रमपरिमाणावरून आणि म्हणून श्रम-कालावरून ठरते. (The value of a commodity is determined by the quantity of labour and therefore; by labour-time spent on it.)

आपल्या श्रममूल्य उपपत्तीविषयी, वस्तूंचे मूल्य तिच्या निर्मितीसाठी खर्ची पडलेल्या श्रम-कालावरून निर्धारित होते, या उपपत्तीविषयी काही गैरसमज होण्याची शक्यता मार्क्सने आधीच पूर्वसूचित केली होती.

मार्क्स लिहितो, “या उपपत्तीवरून काहींचा असा गैरसमज होईल की, वस्तूंचे मूल्य जर तिच्या निर्मितीसाठी खर्ची पडलेल्या श्रम-कालावरून ठरते तर श्रमिक जितका जास्त मंद किंवा जास्त अकुशल असेल तितके त्याने निर्माण केलेल्या वस्तूंतील मूल्य अधिक असेल; कारण ती वस्तू निर्माण करण्यास जास्त काळ लागलेला असेल. परंतु हे बरोबर नाही. कारण मूल्याचे सार असलेले श्रम हे एकाच जातीचे, एकजीनसी मानवी श्रम असतात. तो एका आणि सारख्याच प्रकारच्या श्रमशक्तीचा व्यय असतो. (The labour, however, that forms the substance of value, is homogeneous human labour, expenditure of one uniform labour power.) 

एखाद्या समाजाने निर्माण केलेल्या एकूण सर्व क्रयवस्तूंत सामावलेल्या एकंदर मूल्यांची बेरीज म्हणजे त्या समाजाची एकूण श्रमशक्ती होय. आणि ही श्रमशक्ती अनंत व्यक्तीगत श्रमांच्या घटकांची बनलेली असली तरीसुद्धा या ठिकाणी तिचे स्वरूप एकजीनसी मानवी श्रमाचा एकच समूह हे असते. हा समूह ज्या अनेक घटकांचा बनलेला असतो त्यातला प्रत्येक घटक हा दुसऱ्यासारखाच असतो, कारण त्याचे स्वरूप सरासरी मानवी श्रमशक्ती हे असते आणि त्याचा वापरही त्याच पद्धतीने होते. म्हणजेच याठिकाणी एखादी वस्तू निर्माण करण्यास सरासरीने लागेल त्यापेक्षा जास्त काळ लागत नाही, सरासरी सामायिक श्रम-कालापेक्षा जास्त श्रम-काल लागत नाही असे गृहीत धरलेले असते. एखादी वस्तू निर्माण करण्यास सर्वसाधारण उत्पादन परिस्थितीत आणि त्या काळात अस्तित्वात असलेल्या सर्वसाधारण कौशल्याने आणि सर्वसाधारण तीव्रतेने काम केल्यास जो वेळ लागेल तो वस्तूंच्या उत्पादनाचा सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम-काल होय. (The labour time socially necessary is that required to produce an article under the normal conditions of production,and with the average degree of skill and intensity prevalent at the time.) 

समजा की इंग्लंडमध्ये यांत्रिक माग उपयोगात येऊ लागल्यानंतर विशिष्ट वार लांबीचे कापड विणण्यास पूर्वीपेक्षा निम्मा वेळ लागू लागला आणि हातमागावर काम करणाऱ्या श्रमिकांना पूर्वीइतकाच वेळ लागत होता. याचा अर्थ असा की, हा बदल घडून आल्यानंतर हातमाग श्रमिकांचे एका तासाचे श्रम हे अर्ध्या तासाच्या सामाजिक श्रमाएवढे आहे आणि परिणामी त्याचे मूल्य पूर्वीपेक्षा निम्मे झाले. यावरून हे ध्यानात येईल की, कोणत्याही वस्तूचे मूल्य किती आहे हे ती वस्तू निर्माण करण्यास लागलेल्या सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमावरून, सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम-कालावरून ठरते. या संदर्भात प्रत्येक वस्तू म्हणजे त्या प्रकारच्या वस्तूचा सर्वसाधारण नमुना असेच समजले पाहिजे. तेव्हा ज्या वस्तूत सारखेच श्रम सामावलेले असतात किंवा ज्या वस्तू सारख्याच वेळात निर्माण करता येतात, त्यांचे मूल्य सारखेच असते. एक वस्तू निर्माण करण्यासाठी लागलेल्या आवश्यक श्रम-कालाचा दुसरी वस्तू निर्माण करण्यासाठी लागलेल्या आवश्यक श्रम-कालाशी जो संबंध असतो तोच त्या दोन वस्तूंच्या मूल्यांचा परस्परांशी संबंध असतो. मूल्य या नात्याने सर्व वस्तू म्हणजे ठराविक श्रम-कालाचे घन स्वरूपातील गोळेच होत.”

वस्तूनिर्मितीस लागणाऱ्या सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम-कालावर तिचे मूल्य अवलंबून असते, या सूत्राचा मार्क्सने पुढे आणखी विकास केला आहे.

सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम-कालाचे स्वरूप कसे आहे ह्यावर मूल्याचे स्वरूप अवलंबून राहील. एखादी वस्तू निर्माण करण्यास लागणारा श्रम-काल स्थिर राहिला तर त्या वस्तूचे मूल्यही पूर्वीइतकेच स्थिर राहील परंतु श्रमांच्या उत्पादकतेत होणाऱ्या बदलाबरोबर त्याच्याशी निगडीत वस्तूच्या श्रम-कालातही बदल होतो. आता ही श्रमाची उत्पादकता कशी निर्धारित होते? तर श्रमाची ही उत्पादकता श्रमिकाचे सर्वसाधारण कौशल्य, शास्त्राच्या प्रगतीची अवस्था, त्याचा प्रत्यक्ष उत्पादनात तंत्रज्ञान ह्या रूपाने होणारा उपयोग, उत्पादनाची सामाजिक रचना, उत्पादनाच्या साधनांचा प्रकार व त्यांची क्षमता, भौतिक परिस्थिती इत्यादी अनेक गोष्टींवरून निश्चित होते.

मार्क्स उदाहरण देतो, “पाऊसपाणी बरोबर नसेल तर ४ शेर धान्यात जेवढे श्रम अंतर्भूत असतील तेवढेच श्रम पाऊसपाणी चांगले असताना ८ शेर धान्यात समाविष्ट असतील. तेवढ्याच श्रमाने शुष्क खाणीतल्यापेक्षा संपन्न खाणीतून जास्त धातू काढली जाईल. पृथ्वीवरील हिरे फार दुर्मिळ असतात आणि म्हणून त्यांना शोधण्यास सर्वसाधारण फार मोठा श्रम-काल लागतो. परिणामी या लहान वस्तूत फार मोठा श्रम-काल अंतर्भूत असतो. सोन्याला त्याच्या संपूर्ण मूल्याएवढी किंमत कधीच मिळाली नसावी असे जॅकॉबचे म्हणणे आहे. हिऱ्याच्या बाबतीत ही वस्तुस्थिती फारच खरी आहे. एश्र्चवेजचे असे मत आहे की हिरे काढण्यास जास्त श्रम लागतात आणि म्हणून त्यांच्यात जास्त मूल्य अंतर्भूत असूनही ब्राझीलमध्ये १८२३ सालापर्यंत ८३ वर्षांत जेवढे हिरे निघाले त्यांना ब्राझीलमधील साखर आणि कॉफीच्या १ वर्षाच्या सर्वसाधारण उत्पादनाएवढीही किंमत आलेली नाही. हिऱ्यांच्या समृद्ध खाणी जर मिळाल्या तर तेवढ्याच श्रमात जास्त हिरे पैदा होतील आणि त्यांचे मूल्य कमी होईल. थोडे श्रम खर्च करून आपण जर कोळशापासून हिरे बनवू लागलो तर त्यांचे मूल्य विटकरीच्याही खाली उतरू शकेल.”

मार्क्सच्या उपर्युक्त विवेचनातून जे एक सामान्य सूत्र निष्पन्न करून घेता येईल, ते असे :

सर्वसाधारणपणे श्रमांची उत्पादकता जेवढी जास्त तेवढा एखादी वस्तू निर्माण करण्यास लागणारा श्रम-काल कमी म्हणजे त्या वस्तूत घनस्वरूपात असलेले श्रम कमी आणि त्या वस्तूचे मूल्यही कमी. याच्या उलट, श्रमाची उत्पादकता जेवढी कमी तेवढा एखाद्या वस्तू निर्माण करण्यास लागणारा श्रम-काल अधिक आणि त्या वस्तूचे मूल्यही अधिक. क्रयवस्तूचे मूल्य हे त्या वस्तूत अंतर्भूत असणाऱ्या श्रमाच्या, अर्थात श्रमपरिमाणाच्या समप्रमाणात आणि त्या श्रमाच्या उत्पादकतेच्या व्यस्त प्रमाणात बदलते. (In general, the greater the productiveness of labour ,the less is the labour time required for the production of an article, the less is the amount of labour crystallised in that article, and the less is its value; and vice versa, the less the productiveness of labour, the greater is the labour time required for the production of an article, and the greater is its value. The value of a commodity, therefore, varies directly as the quantity, and inversely as the productiveness,of the labour incorporated in it.”)
– Marx, Karl, Capital. Vol. I, Chapter 1 : Commodities, Section 1 : The two factors of a commodity : Use Value and Value – The substance of value and the magnitude of value, Page No. 30) 

श्रमाची उत्पादकता आणि क्रयवस्तूचे मूल्य यांत व्यस्त संबंध तर श्रम-काल आणि क्रयवस्तूचे मूल्य यांत समसंबंध असतो, या मार्क्सप्रणित सूत्राविषयी एक प्रश्न विचारता येईल:

अमुक एक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तेव्हा श्रमाची उत्पादकता अधिक असेल आणि अशा वस्तूच्या निर्मितीत अंतर्भूत असलेला श्रम-काल कमी असेल आणि म्हणून त्या वस्तूचे मूल्य कमी असेल. 

तसेच अमुक एक वस्तू दुर्मिळ आहे. तेव्हा श्रमाची उत्पादकता कमी असेल आणि त्या वस्तूत अंतर्भूत असलेला श्रम-काल अधिक असेल आणि म्हणून त्या वस्तूचे मूल्यही अधिक असेल. 

या मार्क्सप्रणित सूत्रात जर वस्तूची मुबलकता किंवा दुर्मिळता हेच जर श्रम उत्पादकता आणि म्हणून श्रम-कालाचे महत्त्वाचे निर्धारक घटक मानले, तर त्यांनाच क्रयवस्तूच्या मूल्याचे, विनिमयमूल्याचे निर्धारक घटक का समजू नये? (परिशिष्ट पहा.)

मार्क्सने मूल्याच्या, म्हणजे क्रयवस्तूंच्या विनिमयमूल्य या स्वरूपापेक्षा भिन्न अशा मूल्याच्या मूळ प्रकृतीचा आणखी एका अंगाने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा उपयोगमूल्याच्या स्वरूपाचा विचार आहे. तो थोडक्यात असा :

मूल्य नसतानाही एखाद्या वस्तूला फक्त उपयोगमूल्य असू शकते. अमुक एका वस्तूला ‘क्रयवस्तू’ हे रूप प्राप्त होते तेव्हा तिला मूल्य आहे असे म्हटले जाते. ‘मूल्य’ असण्याचा दुसरा अर्थ, विशेषतः मार्क्सला अभिप्रेत अर्थ असा की तिच्यावर मानवी श्रम खर्च झालेले असतात. जेव्हा एखादी वस्तू माणसाच्या उपयोगी पडण्यासाठी तिच्यावर मानवी श्रम खर्च झालेले नसतात, अशा परिस्थितीत अमुक एका वस्तूला मूल्य म्हणजे विनिमयमूल्य नसतानाही उपयोगमूल्य असणे शक्य आहे. हवा, सूर्यप्रकाश, मोकळी पडलेली जमीन, खुली राने ही अशा गोष्टींची उदाहरणे म्हणून देता येतील.

आता, मूल्य नसतानाही एखाद्या वस्तूला फक्त उपयोगमूल्य असू शकते, हे सूत्र खरे मानायचे असेल तर त्यासाठी काही अटींची पूर्तता झाली पाहिजे. अर्थात, ज्या वस्तूला मूल्य नाही तिला ज्या परिस्थितीत उपयोगमूल्य असणे शक्य आहे, ती परिस्थिती स्पष्ट केली पाहिजे :

एक, जेव्हा एखादी वस्तू माणसाच्या उपयोगी पडण्यासाठी तिच्यावर मानवी श्रम खर्ची झालेले नसतात तेव्हा अशी परिस्थिती असते. हवा, मोकळी पडलेली जमीन, सूर्यप्रकाश ,खुली राने ही अशा गोष्टींची उदाहरणे म्हणून देता येतील.

दोन, एखादी वस्तू माणसाच्या उपयोगी असेल, ती निर्माणही मानवी श्रमांनी झालेली असेल आणि तरीसुद्धा ती क्रयवस्तू नसणे शक्य आहे. जेव्हा एखादा माणूस आपल्याच श्रमाने निर्माण केलेल्या वस्तूंनी आपल्याच गरजा प्रत्यक्ष भागवितो तेव्हा तो उपयोगमूल्ये निर्माण करतो परंतु त्या क्रयवस्तू नसतात.

क्रयवस्तू निर्मितीची एक आवश्यक अट स्पष्ट करतांना मार्क्स लिहितो की क्रयवस्तू निर्माण करण्यासाठी माणसाने उपयोगमूल्ये निर्माण केली पाहिजेत; पण त्याचबरोबर त्याने दुसऱ्यासाठी उपयोगमूल्ये, सामाजिक उपयोगमूल्येही निर्माण केली पाहिजेत.

पण फक्त सामाजिक उपयोगमूल्ये निर्माण करणे हीच क्रयवस्तू निर्मितीची पुरेशी अट असू शकेल काय?

तर ही पुरेशी अट असू शकत नाही.

पुढे या अटीला मुरड घालत फ्रेडरिक एंगल्सने लिहिले आहे, “केवळ दुसऱ्यासाठी वस्तू निर्माण करूनही भागणार नाही. त्यापेक्षा काही जास्त असले पाहिजे. मध्ययुगातील शेतकरी मालकाला खंड रूपाने देण्यासाठी आणि पाद्र्याला दक्षिणा देण्यासाठीही धान्य निर्माण करीत असे. परंतु खंडाचे धान्य आणि दक्षिणेचे धान्य दुसऱ्यासाठी निर्माण केलेले होते, तरी ते क्रयवस्तू नव्हते. क्रयवस्तू बनवण्यासाठी दुसऱ्याला उपयोगी असणारी वस्तू त्याच्याकडे विनिमयाच्या मार्गाने गेली पाहिजे.”

सारांश, उपयोगी वस्तू ही क्रयवस्तू तेव्हा असते, ज्यावेळी ती विनिमयप्रक्रियेत समाविष्ट घटक असते आणि विनिमयाच्याच मार्गाने उत्पादकाकडून उपभोक्त्याकडे जाते, हा एंगल्सने अधोरेखित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. तो मार्क्सच्या दुसऱ्या अटीला मुरड घालून तिच्यातील न्यून पुरे करतो.

पण एंगल्स लिहितो, “ही भर मी मुद्दाम घातली आहे. कारण ती जर मी घातली नसती तर, कोणत्याही वस्तूला, म्हणजे जिचा उपभोग प्रत्यक्ष उत्पादनकर्ता न घेता दुसरा कुणीतरी घेतो अशा प्रत्येक वस्तूला मार्क्स क्रयवस्तू मानतो असा गैरसमज निर्माण झाला असता.” (चौथ्या जर्मन प्रतीतील टीप‌.)

आणि शेवटी कोणत्याही वस्तूने गरज भागत असल्याशिवाय त्या वस्तूला मूल्य असणार नाही. एखादी वस्तू जर निरूपयोगी असेल तर तिच्यात अंतर्भूत असलेले श्रमही निरूपयोगी असतात. खरेतर ते कष्टच म्हटले पाहिजेत. त्या कष्टाची श्रम म्हणून गणना होत नाही म्हणून त्यापासून मूल्य निर्माण होत नाही.

मार्क्सच्या या विवेचनात तीन प्रकारच्या वस्तूंचे वर्णन केले आहे :

१. मूल्य नसतानाही उपयोगमूल्य असलेल्या वस्तू.
२. मूल्य आणि उपयोगमूल्य दोन्ही असलेल्या वस्तू अर्थात क्रयवस्तू.
३. निरूपयोगी वस्तू.

१. अमुक एक वस्तू मूल्य नसतानाही उपयोगमूल्य असलेली वस्तू आहे हे म्हणण्यात खालील गोष्टी अभिप्रेत असतात : 
अ) अशी वस्तू जी उपयोगी पडण्यासाठी तिच्यावर मानवी श्रम खर्ची झालेले नसतात उदा., हवा, सूर्यप्रकाश, खुले रान, इत्यादी.
ब) अशी वस्तू जी उपयोगी आहे आणि मानवी श्रमांनी निर्माण झालेली आहे; पण तिचा उत्पादक स्वतःच्या गरजपूर्तीसाठी तिची निर्मिती करतो.
क) अशी वस्तू जी उपयोगी आहे, मानवी श्रमांनी निर्माण झालेली आहे आणि तिचा उत्पादक दुसऱ्यांच्या गरजपूर्तीसाठी तिची निर्मिती करतो म्हणजे दुसऱ्यासाठी सामाजिक उपयोगमूल्ये निर्माण करतो. पण हा विनिमय नसतो. ही वस्तू भेट, दान, दक्षिणा, भिक्षा इत्यादी रूपात दुसऱ्यांची गरज भागविते.

या परिस्थितीत मूल्य नसतानाही एखाद्या वस्तूला उपयोगमूल्ये असू शकतात.

२. एखादी वस्तू मूल्य आणि उपयोगमूल्य दोन्ही असलेली म्हणजेच क्रयवस्तू आहे म्हणण्यात खालील गोष्टी अभिप्रेत असतात :
अ) ती मानवी गरज भागविते, तिच्यात उपयोगिता असते म्हणजे तिला उपयोगमूल्य असते.
ब) ती मानवी श्रमांनी निर्माण झालेली असते.
क) इतकेच नव्हे तर त्या वस्तूच्या रूपाने जी दुसऱ्यांसाठी सामाजिक उपयोगमूल्ये निर्माण होतात, ते विनिमयाच्या मार्गाने त्यांच्याजवळ, म्हणजे उत्पादकाकडून उपभोक्त्याजवळ जात असतील, म्हणजेच त्यांना ‘विनिमयमूल्य’ असेल, तर आणि तरच ती वस्तू ही ‘क्रयवस्तू’ ठरते.

३. अमुक एक वस्तू ही निरूपयोगी वस्तू आहे हे म्हणण्यात खालील गोष्टी अभिप्रेत असतात :
अ) ती वस्तू कोणतीही गरज भागवत नाही.
ब) तिच्यात अंतर्भूत असलेले श्रमही निरूपयोगी असतात.
क) तिच्यापासून मूल्य निर्माण होत नाही.

अशाप्रकारे, निरूपयोगी वस्तू कोणतीही गरज भागवत नाही, तिच्या अंतर्भूत असलेले श्रम हे निव्वळ कष्टच असतात आणि म्हणून तिच्यापासून मूल्य निर्माण होत नाही.

तात्पर्य, क्रयवस्तूचे रहस्य शोधण्याच्या दोन दिशा मार्क्सने निवडल्या. त्यापैकी पहिली दिशा – क्रयवस्तूतील मूल्यांची. या दिशेला अनुसरून क्रयवस्तू ही उपयोगमूल्य आणि विनिमयमूल्य यांचे मिश्रण आहे, हे मार्क्सला आढळून आले. याचे विवेचन येथवर आपण केले आहे.

पण या विवेचनावरून मूल्य हे श्रममूल्य असते हे जेव्हा निष्पन्न होऊ लागले तेव्हा श्रमाचे स्वरूप नेमके कसे असते? हे स्पष्ट करणेही अनिवार्य झाले.

म्हणून मार्क्सने दुसरी दिशा निवडली. ती म्हणजे क्रयवस्तूंत अंतर्भूत असलेल्या श्रमाची.

मूल्याप्रमाणेच क्रयवस्तूत अंतर्भूत असलेल्या श्रमाचे स्वरूपसुद्धा असेच दुहेरी आहे, हे त्याला पुढे आढळून आले.

मार्क्स लिहितो, “क्रयवस्तूंत अंतर्भूत असणाऱ्या श्रमाचे दुहेरी स्वरूप (The two-fold character of the labour embodied in commodities) हीच अर्थशास्त्राचे स्वरूप स्पष्टपणे समजून घेण्याची गुरूकिल्ली आहे.” ‌ 

अर्थशास्त्राची ही गुरूकिल्ली मार्क्स कशी फिरवतो?

याचा विचार आपण पुढे करूयात.

(अपूर्ण…)

परिशिष्ट : 

मूल्यविरोधाभास (value paradox) 

पाण्याला अधिक उपयोगमूल्य असून, तसेच पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचे विनिमयमूल्य कमी असते; याउलट हिरा अत्यंत दुर्मिळ असून तसेच सापेक्षतः त्याचे उपयोगमूल्य कमी असूनही त्याचे विनिमयमूल्य अधिक असते. असे कशामुळे घडते? हा पेच फार पूर्वीच, जवळपास अडीचशे वर्षांपूर्वी, स्मिथला पडला होता. यालाच ‘हिरा-पाणी विरोधाभास’ (water-diamond paradox) किंवा ‘मूल्यविरोधाभास’ (Value paradox) असे म्हटले जाते.

हा विरोधाभास सोडविण्याचा अनेक अर्थतज्ज्ञांनी प्रयत्न केला.

मुख्यप्रवाही आधुनिक अर्थशास्त्राने या मूल्यविरोधाभासाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. तो असा: 

अमुक एका वस्तूचे मूल्य, विनिमयमूल्य कमी असेल की अधिक असेल हे सर्वस्वी ती वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे की दुर्मिळ आहे यावर म्हणजे तिच्या उपलब्धतेवर अवलंबून राहील. उपलब्धतेच्या या तत्त्वाची विपणीव्यवस्थेशी संगती साधून हेच तत्त्व वेगळ्या रूपात मांडता येईल :

अमुक एका वस्तूचे विनिमयमूल्य हे तिचा त्याकाळी असलेला पुरवठा आणि तिला असलेली मागणी यावरून निर्धारित होते. म्हणजेच वस्तूंचे मूल्य तिच्या मागणी-पुरवठ्यावरून निर्धारित होते.

पुरवठ्याच्या दृष्टीने हिरे दुर्मिळ असल्याने त्यांचा साठा (stock) कमी आणि म्हणून पुरवठा या रूपातील प्रवाह (flow) कमी आणि म्हणून त्यांचे विनिमयमूल्य अधिक असते; याउलट पाणी मुबलक असल्याने त्याचा पुरवठा अधिक आणि म्हणून त्यांचे विनिमयमूल्य कमी असते.

मागणीच्या बाजूने, मुबलक वस्तूंची सीमान्त उपयोगिता (marginal utility) ही दुर्मिळ वस्तूंच्या तुलनेत सापेक्षतः कमी असते किंबहुना, घटत्या (declining) स्वरूपाची असते आणि म्हणून पाण्याचे विनिमयमूल्य हे हिऱ्यांच्या तुलनेत कमी असते.

तरीही, मार्क्सच्या भूमिकेला अनुसरून हे विचारता येईल की, वस्तूंच्या उपलब्धतेवरून तिचे विनिमयमूल्य निश्चित होते, असे असेल; पण तरीही त्या क्रयवस्तूत अंतर्भूत असलेल्या श्रम-कालानुसार तिचे मूल्य ठरते, हे तत्त्वसुद्धा अबाधित राहते. ते असे : 

एखादी वस्तू दुर्मिळ आहे की मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे यावरून तिचा पुरवठा निश्चित होतो. कमी पुरवठा असेल तर मूल्य अधिक आणि अधिक पुरवठा असेल तर मूल्य कमी. परंतु हा पुरवठा ‘पुरवठा’ या रूपात येण्याआधी त्यांवर जे मानवी श्रम खर्ची पडतात तेही विचारात घेतले पाहिजे. ते विचारात घेतले असता असे दिसून येईल की, एखादी वस्तू जितकी अधिक दुर्मिळ तितका तिच्यात अंतर्भूत असलेला श्रम-काल अधिक आणि म्हणून तिचे विनिमयमूल्य अधिक तर एखादी वस्तू जितकी अधिक मुबलक तितका तिच्यात अंतर्भूत असलेला श्रम-काल कमी आणि म्हणून तिचे विनिमयमूल्य कमी. एखादी वस्तू निर्माण करण्यात जितका श्रम-काल अंतर्भूत असेल तितकेच तिचे मूल्य असेल. श्रम-काल अधिक तर मूल्य अधिक आणि श्रम-काल कमी तर मूल्य कमी असेल. तेव्हा मूल्यविरोधासाचा उलगडा श्रम-काल तत्त्वास अनुसरून करता येईल.

मार्क्सच्या उपर्युक्त भूमिकेच्या संदर्भात विचारता येईल की, श्रम हा एकमेव घटक वस्तूंचे मूल्य निर्धारण करण्यास कारणीभूत असतो काय की जे जे उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे घटक उत्पादनप्रक्रियेत सहभागी होतात त्यांच्यावरील उत्पादनखर्च मिळून हे मूल्य निर्धारित होत असते? मूल्यसिद्धांतातील हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे सर्वमान्य असे समाधानकारक उत्तर अर्थतज्ज्ञांनी दिलेले नाही.

पण मार्क्सचे उत्तर निश्चित आहे : 

मूल्य हे श्रममूल्यच असते. ते श्रम-कालाच्या समप्रमाणात आणि श्रम-उत्पादकतेच्या व्यस्तप्रमाणात ठरते.

अर्थात, या मार्क्सप्रणीत सूत्राची वैधता सार्वत्रिक रितीने प्रस्थापित करण्याचा काही एक मार्ग आहे काय? म्हणजे असा मार्ग उपलब्ध आहे की नाही याचा उलगडा आणखी व्हायचा आहे.

या लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.