आपल्याला स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्षे होत आहेत. खूप ढोलताशे वाजवून नुकताच आम्ही ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. पण स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडून पाहिला तर चित्र फारसे सुखावह नाही, असेच दिसते. देश म्हणून आपल्या उपलब्धींचा आपण उदो-उदो करू शकतो. आर्थिक पातळीवरही बऱ्यापैकी प्रगती दिसते. पण समाज म्हणून मात्र आमची फारशी प्रगती झालेली नाही.
सरंजामशाहीच्या काळात किंवा पारतंत्र्यात आपण प्रजा होतो, आता नागरिक झालो आहोत. मात्र, ह्या बदललेल्या भूमिकेमुळे आमच्यात जो गुणात्मक फरक व्हायला हवा होता, तो झालेला दिसत नाही. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मध्यरात्री युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकावणे किंवा माऊंटबॅटनच्या हातून सूत्रे काढून नेहरूंच्या हाती येणे, असे नव्हते.