अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ म्हणतात.
तसं म्हटलं तर, मानवाच्या बाबतीत लग्न म्हणजे फक्त शरीरसंबंध असा अर्थ असू नये. कारण तसे संबंध प्राचीन काळापासून विवाहाशिवायच होत होते आणि आजही होऊ शकतात.