बाजारपेठेला कायदा ‘साक्षी’
संस्कृतिसंघर्ष:
जातीपातींच्या श्रेणींच्या अन्याय्य चळतीने जखडलेला, पण तरीही सुसंगत स्थैर्य पावलेला, असा भारतीय समाज कसा घडला ते आपण पाहिले. सांस्कृतिक परंपरा, निसर्गाशी कसे वागावे याबद्दलच्या वहिवाटी आणि जाती आणि जातसमूहांची वीण, अश्या साऱ्या यंत्रणेतून समाजाचे ‘शासन’ होत असे. त्या मानाने राजे कमी महत्त्वाचे इंग्रज मात्र आले तेच औद्योगिक क्रांतीने आमूलाग्र बदललेली जीवनशैली सोबत घेऊन. त्यांच्या मायदेशातही जीवनशैलीतील बदल नुकतेच अंगवळणी पडू लागले होते. याला तीन मुख्य अंगे होती.
एक म्हणजे वस्तुव्यवहार वाढले होते. मूळच्या नैसर्गिक वस्तूंपासून अनेक नवनव्या वस्तू घडवता येऊ लागल्या होत्या.