श्रीमती कल्पना कोठारे यांनी डिसेंबर ९७ च्या आजचा सुधारक मध्ये एक चांगला लेख लिहून माझ्या लेखातील वैगुण्ये दाखवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.
पण ब्रेन-ड्रेन किंवा काही भारतीयांची पाश्चात्त्य देशांत होणारी कुतरओढ हा माझ्या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा नव्हताच. माझ्या मुंबईत राहणार्याो मराठीभाषक भावाची दोन मुले अनुक्रमे सातवी व नववीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांना प्रादेशिक भाषा म्हणून ‘मराठी हा विषयही शिकावा लागतो. या मुलांना सोमवार, मंगळवार, मराठी आकडे, वगैरे नेहमीच्या वापरातील मराठी शब्दांचे अर्थ समजत नाहीत, मराठी वृत्तपत्र नीट वाचता येत नाही.