अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अपेक्षेप्रमाणे अजूनही वादळी चर्चा आणि घमासान धुमश्चक्री चालू आहे. ते स्वाभाविक आहे. कारण ‘अर्थकारण’ हे राजकारणाचाच अविभाज्य भाग असते. त्या दृष्टिकोनातून अर्थकारण म्हणजे सत्ताकारणही असते. सत्तेत असलेला वर्ग आपल्या प्रस्थापित वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी इतर (म्हणजे गरीब व मध्यम वर्ग) सामाजिक स्तरांना चुचकारण्याचा प्रयत्न करतो.
त्या दृष्टिकोनातून ते सत्ताकारण म्हणजे ‘वर्गकारण’ही असते. अर्थसंकल्पातून ध्वनित होत असतो तो ‘पडद्यामागे’ सुरू असलेला वर्गसंघर्ष. म्हणूनच तो त्या अर्थाने ‘वर्गसंकल्प’ही असतो. म्हणूनच अर्थसंकल्पाचा ‘अर्थ’ लावताना समाजातील वर्गसंबंधांचा वेध घ्यावा लागतो.
‘केस तर केस – भीमजयंतीला वाजणार २४ बेस’
१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो. पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. आपल्या लोकांच्या काय भावना आहेत, हे कळावे, म्हणून तो फोटो पाठवला.’
दुपारीच याचा प्रत्यय आला. कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज जवळ येत गेला तसा अधिकच असह्य होऊ लागला.
जमिनीची किंमत ‘मोजणार’ कशी?
भूसंपादन वटहुकमाच्या बाजूने ‘औद्योगिक विकास’, तर त्याच्या विरोधात ‘अन्नसुरक्षेला धोका’ असे मुद्दे घेऊन राजकीय प्रचार केला जात असताना एका कळीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते आहे. ‘जमिनीच्या किमतीचे मापन कशा प्रकारे केले असता जमीनधारकाचे आर्थिक समाधान होईल किंवा शेतकऱ्याला त्याच भागात पर्यायी जमीन घेता येईल?’ हा तो प्रश्न. आपल्या देशातील मुद्दा किमतीच्या मापनापेक्षाही जमिनीची ‘खरी किंमत शोधण्याचा’ आहे आणि इथे शेतकऱ्यांना पुढाकार घेऊ देणे, हा तज्ज्ञांनी सुचवलेला उपाय किमान चार वर्षे राजकीय चर्चेत आलेलाच नाही..
जमीन अधिग्रहण विधेयकावरील पंतप्रधानांचे भाषण (मन की बात) हा राजकीय संवादकौशल्याचा एक उत्तम नमुना होता.
धोरणशून्य ‘स्मार्ट’पणा काय कामाचा?
जगातील लोकसंख्येच्या जडणघडणीने २००८मध्ये कूस बदलली. निम्म्याहून अधिक जग त्या वर्षात ‘शहरी’ बनले. शहरांची निर्मिती आणि विस्तार व सर्वसाधारण आर्थिक विकास यांचा संबंध जैविक स्वरूपाचा आहे. किंबहुना, ‘विकासाची इंजिने’ असेच शहरांना संबोधले जाते. १९५०मध्ये जगाच्या तत्कालीन एकंदर लोकसंख्येपैकी सरासरीने ३० टक्के लोकसंख्या शहरी होती. आता, २०५०मध्ये शहरीकरणाची हीच सरासरी पातळी ६६ टक्क्यांवर पोचेल, असा अंदाज वर्तविण्यात येतो आहे. येत्या ३५ वर्षांचा विचार केला तर जगातील शहरी लोकसंख्येमध्ये सुमारे २५० कोटींची भर पडेल, असे चित्र मांडले जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यातील शहरी लोकसंख्येच्या या अंदाजित वाढीपैकी जवळपास ९० टक्के वाढ आशिया आणि आफ्रिका या केवळ दोनच खंडांत कोंदटलेली असेल.
स्वप्रतिमेच्या प्रेमात काही थोर भारतीय
नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्या अलीकडील भेटीत नरेंद्र मोदींनी घातलेल्या पोषाखाची चर्चा बरीच गाजली. त्यांनी जो सूट परिधान केला होता, त्यावर त्यांच्या नावाच्या नक्षीचे पट्टे होते. त्यावरील टीका अप्रस्तुत नव्हती. त्यांच्या पोषाखात दिखाऊपणा, भोंगळपणा तर होताच; तरीही मोदींचे त्यांच्या पेहरावातून दिसणारे स्वयंप्रेम हे आपल्याकडील किती तरी ताकदवान आणि यशस्वी भारतीय पुरुषांच्या सामाजिक वर्तणुकीचे अनुकरण होते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
याचे पहिले उदाहरण भारताच्या सुप्रसिद्ध आणि अनेक सन्मानांनी अलंकृत शास्त्रज्ञ सी.एन.आर.राव यांचे देता येईल. ते जगातील एका प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थेचे सदस्य (फेलो) आहेत आणि आपल्या देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना अलीकडेच मिळाला आहे.
अंधश्रद्धेचं जोखड उतरवायचं हाय!
कर्मकांड, बुवाबाजी, देवदेवस्कीच्या अंधश्रद्धांत सर्वाधिक बळी जाते ती स्त्री. मात्र समाज व्यवस्थेने-कुटुंबाने लादलेलं परंपरेचं जोखड स्त्रिया आता झुगारून देत आहेत. सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक पेचामध्ये अडकलेल्या अनेकजणी अंधश्रद्धेची ही पाचर मोकळी करू पाहत आहेत… बदलाची नांदी सुरू झालीय!
‘बयो हाती घे आता शब्दविचारांची पाटी,
सवाष्णेसंग आता भर एकल्या सखीचीबी ओटी…’
चंद्रपूरच्या ताराबाई आपल्या पहाडी आवाजात नवरा गेलेल्या बाईलाही मान द्यायला सांगतात. भाकरी थापणाऱ्या हातामध्ये पाटी-पुस्तक-अक्षर घ्या, असं मधाळपणे समजावतात. तेव्हा समोर जमलेल्या वस्त्यांमधल्या, पाड्यांमधल्या बायांमध्ये दबकी खुसफूस होते. पोरी-बाया एकमेकींना कोपरानं ढोसतात.
अस्वस्थ नाट्यकर्मीचे प्रगल्भ चिंतन
अतुल पेठे हे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, संयोजक अशा विविध अंगाने तीस वर्षांहून अधिक काळ नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. एक गंभीर, प्रयोगशील रंगकर्मी असा त्यांचा सार्थ लौकीक आहे. ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, भाषणे आणि त्यांच्या मुलाखती यांचे संकलन आहे. एका विचारी रंगकर्मीच्या धारणा, चिंतन, त्याच्या प्रवासात या सगळ्यात होत गेलेले बदल, त्याला आलेले अनुभव, यावर पुस्तकातून स्पष्ट प्रकाश पडतो. वेगळ्या वाटेवरच्या नाटकाचे अर्थकारण काय याची कल्पना येते आणि अनपेक्षिपणे ग्रामीण दारिद्र्यायाबाबत चटका लावणारे वाचायला मिळते. हा लेख अतिशय अस्वस्थ करणारा आहे, त्याविषयी पुढे.
जुने ते सोने (?)
पुराणमित्येव न साधु सर्वम् (जुने ते सर्वच चांगले असते असे नाही.) असे कविकुलगुरु कालिदास दोन हजार वर्षांपूर्वी सांगून गेला आहे. परंतु आमच्या पुराणप्रिय समाजाच्या काही ते पचनी पडले नाही. उलट एखादी गोष्ट जितकी जुनी तितकी ह्या समाजाला जास्त प्रिय असते. काळाची पुटे चढून ती जेवढी अंधुक होईल तेवढी ती आम्हाला अधिक आकर्षक वाटते. निराधार परंपरांवर डोळे मिटन विश्वास ठेवलण्यात आम्हाला अतिशय आनंद वाटतो. प्राचीन काळापासून रूढ झालेली गृहीतके हे आमचे आवडते विचारधन आहे. कुठलीही प्रायोगिक सिद्धता न लाभलेल्या गूढ, गहन, अनाकलनीय, धूसर अशा गोष्टींचे विलक्षण आकर्षण आमच्या समाजाला असते .सुबोधतेपेक्षा
अराजकतेचे व्याकरण
‘केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गाना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठय़ा प्रमाणात केले जात होते.
इहवादः मानवी प्रतिष्ठेचा महाप्रकल्प
पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक माणसाचं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन म्हणजे इहजीवन. एकेका माणसाचं जीवन इथं संपतं, पण अशा संपण्यानं मानवी जीवनाचा प्रवाह संपत नाही. जीवनाची शृंखला कोणत्याच कडीला शेवटची कडी मानत नाही. सतत नवनव्या कड्या उगवत राहतात. त्यामुळं ऐहिक मानवी जीवन कधी विझून जात नाही. जीवनाची वाहिनी कधी आटूनही जात नाही.
माणसाचं इहजीवन हाच इहवादाचा एकमेव विषय आहे. इहजीवनाची उज्ज्वलता हाच त्याचा ध्यास आहे. माणूस हाच जीवनाचा नायक आहे. भोवतीचं मानवी जीवन त्यानंच निर्माण केलं आणि ही अधिकाधिक उज्ज्वल मानवी जीवन निर्माण करण्याची प्रक्रियाही खंडित होणं त्यानं मान्य केलं नाही.