अध्यात्म आणि विज्ञान (पूर्वार्ध)

अध्यात्म आणि विज्ञान यांचे परस्परांशी संबंध काय आहेत ? या प्रश्नाला अनेक उत्तरे दिली गेली आहेत. एक उत्तर आहे : ती मूलतःच परस्परविरुद्ध आहेत; दुसरे उत्तर आहेः ती स्वतंत्र आहेत, आणि म्हणून त्यांच्यात कसलाही संबंध नाही; आणि तिसरे आहेः ती स्वतंत्र आहेत, पण ती परस्परपूरक आहेत. या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते ? पण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अध्यात्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हे पाहिले पाहिजे.

अध्यात्म आणि विज्ञान यांपैकी विज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर बरेच निश्चित आहे, आणि म्हणून ते देणे सोपे आहे. परंतु अध्यात्म म्हणजे काय हे सांगणे मात्र बरेच कठीण आहे.

‘विज्ञान’ हे एका अतिशय विशाल अशा ज्ञानसंग्रहाचे नाव आहे. हे ज्ञान मानवाला प्राप्य असणारे सर्वांत विश्वसनीय असे ज्ञान आहे. ते ज्ञान मिळविण्याची विज्ञानाची एक विशिष्ट पद्धत आहे, आणि त्या ज्ञानाची मांडणीही एका विशिष्ट पद्धतीने केली जाते.

विज्ञानाची ज्ञान मिळविण्याची पद्धत म्हणजे जिला वैज्ञानिक पद्धती (scientific method) म्हणतात ती. ही पद्धत इंद्रियानुभवानुसारी असून तिच्यात इंद्रियानुभव हा ज्ञानाचा अंतिम निकष मानला जातो. या पद्धतीत इंद्रियांनी मिळणाऱ्या एकवचनी (singular) विशिष्ट माहितीवरून सामान्य (general) किंवा सार्विक (universal) विधानांची प्रस्थापना केली जाते. आणि त्या विधानांची मांडणी जिला व्यवस्थित (systematic) म्हणतात त्या पद्धतीने केली जाते. व्यवस्थित म्हणजे अशी की जिच्यात काही मोजक्या विधानांवरून अन्य सर्व विधाने निष्पन्न होतात; म्हणजे ती मोजकी विधाने खरी असतील तर त्यावरून निष्पन्न होणारी विधाने खोटी असू शकत नाहीत.
विश्वाचे ज्ञान मिळविण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे.

आता ‘अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी. आत्मविषयक, अध्यात्म म्हणजे आत्मविचार. विज्ञान जर जगाचे, विश्वाचे ज्ञान मिळवावयास निघाले असेल, तर अध्यात्म आत्म्याविषयीचे ज्ञान मिळविण्याकरिता निघालेले असते. म्हणजे या दोन अभ्यासांचे विषय भिन्न आहेत. विश्वाचे ज्ञान ज्याला होते त्या ज्ञात्याचा, आत्म्याचा विचार विज्ञान करीत नाही. पण त्याचाही विचार करावा लागतोच. तो विचार म्हणजे अध्यात्म.

आता आत्म्याचा अभ्यास विज्ञानात केला जात नाही हे म्हणणे पूर्णपणे खरे नव्हे. कारण विश्वात आपल्या आत्म्यांचाही समावेश होतो, आणि म्हणून विश्वाच्या ज्ञानात आत्मज्ञानाचाही समावेश होतो. परंतु विज्ञानाच्या कार्यपद्धतीनुसार त्यात आत्म्याच्या आपल्या अनुभवाला येणाऱ्या अंगाचाच विचार येतो. म्हणजे आत्म्याचे ज्ञाता म्हणून नव्हे, तर ज्ञेय म्हणून ज्ञान मिळविले जाते. हे काम मानसशास्त्रात केले जाते. परंतु आत्म्याच्या ज्ञातृरूपाचे ज्ञान मिळवायचे झाल्यास त्याची पद्धती वैज्ञानिक पद्धतीहून भिन्न असावी लागेल. ते काम करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र.

परंतु अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान असे जरी असले तरी जे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होते त्यातून, किंवा ज्या उपायांनी, ज्या पद्धतीने ते प्राप्त होते त्या उपायांनी विश्वाविषयीही ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला जातो, आणि म्हणून अध्यात्मशास्त्रात केवळ आत्म्याचेच नव्हे तर अनात्म्याचेही (म्हणजे आत्म्याहून भिन्न अशा जड विश्वाचेही), आणि परमात्म्याचेही ज्ञान मिळते असे मानतात, आणि त्यामुळे सबंध विश्व, त्याचा उत्पत्तिकर्ता, आत्मा आणि परमात्मा यांचा परस्पर संबंध, इत्यादी गोष्टींचीही चर्चा अध्यात्मात होते. म्हणजे ज्याला तत्त्वज्ञान (philosophy) म्हणतात त्याच्या बऱ्याच समस्यांची चर्चा अध्यात्मातही होते. पण तरी ‘अध्यात्म’ आणि ‘तत्त्वज्ञान हे शब्द समानार्थी नव्हेत. अध्यात्मशास्त्रात प्रमुख स्थान आत्म्याला आहे, आणि त्यात प्रामुख्याने आत्म्याचा स्वरूपाविषयी, त्याच्या परमात्म्याशी असणाऱ्या संबंधाविषयी, आणि विश्वातील मानवाच्या स्थानाविषयी विचार असतो. परंतु ‘तत्त्वज्ञान’ या शब्दाने असा अर्थ व्यक्त होत नाही. एखादे तत्त्वज्ञान अनात्मवादीही असू शकेल; तसेच ते परमात्मा (ईश्वर) न मानणारे, निरीश्वरवादीही असू शकेल; आणि त्याचप्रमाणे ते मनुष्याचे विश्वातील स्थान अतिशय क्षुद्र, उपेक्षणीय आहे असे मानणारेही असू शकेल. पण अध्यात्मात मात्र या विचारांना थारा मिळणार नाही.

वैज्ञानिक ज्ञानाहून वेगळे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न मनुष्य का करतो? याचे कारण समजावून घेण्याकरिता आपल्याला अध्यात्माची मूळप्रेरणा काय आहे ते पाहिले पाहिजे. मनुष्य जेव्हा या अफाट, अनंत स्थलकालात विस्तारलेल्या विश्वाकडे पाहतो, तेव्हा त्याला आपले दौर्बल्य; क्षुद्रत्व फार प्रकर्षाने जाणवते. आपण किती अल्पजीवी, आपली शक्ती किती तोकडी, आपले ज्ञान किती तुटपुंजे यांचे दर्शन घडल्यावर तो भयभीत होतो. सर्वस्वी प्रतिकूल, आपल्या इच्छा-आकांक्षांविषयी सर्वथा उदासीन असणाऱ्या विश्वात आपण कोठून तरी अज्ञानातून येतो, आणि क्षणमात्र येथे राहून कोठेतरी अज्ञानात निघून जातो, या कल्पनेने मनुष्य अतिशय बेचैन होतो. आपण महाप्रयासाने उभे केलेले इमले क्षणार्धात कोसळू शकतात, नव्हे ते केव्हातरी कोसळणारच आहेत, एखाद्या लहानशा आकाशस्थ अपघाताने आपली पृथ्वी केव्हाही बेचिराख होऊ शकते, या जाणिवेने तो चिंताग्रस्त होतो. आणि मग या भयावह परिस्थितीवर उपाय आहे काय याचा शोध तो करू लागतो. विज्ञानाकडून या प्रश्नाला मिळणारे उत्तर ‘नाही’ असेच आहे. कारण विज्ञानाची क्षितिजे जसजशी विस्तारत जातात तसतसे आपले क्षुद्रत्व मनुष्याला अधिकच जाणवू लागते. म्हणून मग अध्यात्माचा जन्म होतो. अध्यात्माची प्रेरणा मनुष्याला दिलासा, आश्वासन देण्याची आहे. आणि म्हणून अध्यात्मविचारातून जे निष्कर्ष निष्पन्न होतात ते मानवाला आश्वासक असेच असतात यात आश्चर्य नाही.

अध्यात्माची कार्यपद्धती कोणती याचा विचार करू लागल्याबरोबर आपल्या लक्षात येते की आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक पद्धतीने देता येत नाहीत. ती जर वैज्ञानिक पद्धतीने देता येण्यासारखी असती तर ते प्रश्न विज्ञानाचे प्रश्न झाले असते, आणि त्यांची उत्तरे विज्ञानात समाविष्ट झाली असती. अध्यात्माचे प्रश्न काय आहेत हे पाहिले की हे स्पष्ट होते. आपल्याआत्म्याचे खरे स्वरूप काय आहे? आत्माअमर आहे की नाही? त्याला जन्मपूर्व आणि मरणोत्तर अस्तित्व असते की नाही? या जगाचा निर्माता कोण आहे? त्याचा नियंता कोण आहे? त्याचे आणि आपल्या आत्म्याचे नाते कोणते? जगाचे खरे स्वरूप काय आहे? दिक्कालातीत काही आहे काय? असल्यास त्याचे स्वरूप काय आहे ? इत्यादी. यांपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही हे उघड आहे. उदा. विश्वाच्या उत्पत्तीविषयी ते काहीही सांग शकत नाही. पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली असेल हे ते सांग शकेल; किंवा आपल्या सूर्यमालेची उत्पत्ती केव्हा झाली असेल याचे उत्तर ते देऊ शकेल. पण विश्वाची उत्पत्ती कधी झाली हे ते सांगू शकत नाही. कारण अमुक क्षणी विश्व उत्पन्न झाले असे मानल्याबरोबर त्याच्या पूर्वीच्या क्षणी काय होते? हा प्रश्न उद्भवतो. त्याच्यापूर्वी शून्य होते काय? आणि शून्यातून विश्व उद्भवले काय? ह्या प्रश्नांची उत्तरे देणे अशक्य आहे. तेव्हा समग्र विश्वाविषयीचे प्रश्न विज्ञानाच्या आटोक्यातील नाहीत. तसेच ईश्वरविषयक प्रश्नही विज्ञान सोडवू शकत नाही. आत्म्याच्या अमरत्वाविषयीही त्याला मूकच राहावे लागते. तेव्हा आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिक पद्धतीने देता येत नाहीत हे उघड आहे. त्यामुळे मग अध्यात्माची पद्धती कोणती? हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.

आध्यात्मिक ज्ञान मिळविण्याची साधने मुख्यतः दोन आहेत : (१) शब्द किंवा आप्तवचन, आणि (२) साक्षात्कार. आप्तवचन म्हणजे ज्ञात्याचे शब्द. आप्त म्हणजे ज्याला ज्ञान झाले आहे आणि जो यथार्थवक्ता आहे, म्हणजे जो खोटे बोलत नाही. आता एका अर्थी शब्द हे ज्ञानसाधन लौकिक व्यवहारात तर आपण वापरतोच, पण ते विज्ञानालाही मान्य करावे लागते. विज्ञानाचे सिद्धांत सामान्य लोक आणि वैज्ञानिकही श्रद्धेने स्वीकारतात, त्यात त्यांची काही चूक आहे असे आपण समजत नाही. याचे कारण विज्ञानात सिद्धांतरूप पावलेली विधाने अनेक अधिकारी वैज्ञानिकांनी वारंवार तपासून ती खरी असल्याची खातरजमा केलेली असते. आणि ती तशी आहेत की नाहीत याची शहानिशा करण्याला कोणालाही मोकळीक असते. विज्ञानाचा ग्रंथ उघडा असतो. त्यात श्रद्धेला आवाहन नसते. त्यातील प्रमेयांची सिद्धी कोणीही तपासू शकतो, त्यांची शहानिशा करण्याला कोणालाही मज्जाव नसतो. फक्त ती शहानिशा करण्याचे सामर्थ्य आपल्याजवळ असले म्हणजे झाले. आणि ते सर्वमान्य उपाय आहेत. त्यामुळे सामान्य लोक आणि बऱ्याच वेळा वैज्ञानिकही प्रस्थापित विज्ञानावर विश्वास ठेवतात, स्वतः न तपासता ते स्वीकारतात हे खरे आहे, आणि याचे वर्णन ‘शब्दप्रमाण मानणे असे आपण करू शकतो. परंतु शब्दप्रमाणाचा दुसराही एक अर्थ आहे. या दुसऱ्या अर्थीच अध्यात्मात शब्दप्रमाण अभिप्रेत असते. अध्यात्मशास्त्रातील शब्दाप्रमाणे स्वरूप असे असल्याचे सांगितले जाते की काही शब्द अलौकिक असतात आणि ते खरेच असतात, खोटे असू शकत नाहीत. उदा. वेदांतील वचने. ही खरी कशावरून असा प्रश्न विचारणे गैर आहे असे मानले जाते. ती खरीच असतात, ती खोटी असू शकत नाहीत, याचे कारण असे सांगण्यात येते की ती ईश्वराची निःश्वसिते, ईश्वराचे शब्द आहेत, आणि म्हणून ती आपण श्रद्धेने स्वीकारली पाहिजेत. हीच कल्पना आविष्कृत (revealed) धर्माचे मूलग्रंथ, अवतारांचे आणि प्रेषितांचे शब्द यांच्याविषयीही आहे.

आध्यात्मिक ज्ञानाचा दुसरा उपाय साक्षात्कार. हा अनुभवाचा एक अलौकिक प्रकार समजला जातो. या अनुभवात एखादी अलौकिक गोष्ट उघड होते, तिचे साक्षात् दर्शन घडते. हातच्या काकणाला आरसा कशाला असे आपण विचारतो तेव्हा आपल्याला असे अभिप्रेत असते की जी गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर ढळढळीतपणे उपस्थित आहे तिच्याविषयी संशयाला जागा नसते. तीच गोष्ट आध्यात्मिक साक्षात्कारासंबंधी खरी आहे असा दावा केला जातो. फरक एवढाच आहे की स्थूल डोळ्यांनी दर्शन घडणे हा लौकिक साक्षात्कार आहे, तर ज्याला अध्यात्म्यात साक्षात्कार म्हणतात तो अतींद्रिय ज्ञान करून देणारा असल्यामुळे अलौकिक आहे असे समजतात. तो इंद्रियातीत, अनुमानातीत असतो. आध्यात्मिक गोष्टीचे ज्ञान या प्रकारचे असते. उदा. भक्ताला परमेश्वराचे दर्शन घडते तेव्हा तो साक्षात्कारच असतो, किंवा साधकाला जेव्हा ‘अहं ब्रह्मास्मि असा अनुभव येतो तेव्हा तोही साक्षात्कारच असतो. युक्तिवादाने किंवा शब्दाने ‘अहं ब्रह्मास्मि’ हे बौद्धिक ज्ञान होणे आणि त्याचा साक्षात्कार होणे यांत भेद आहे. आपण ब्रह्म आहोत हे खरे असले पाहिजे असे युक्तिवादाने, तर्काने पटणे वेगळे, आणि तशी अनुभूती येणे वेगळे.

या दोन उपायांखेरीज आणखी एक उपाय अध्यात्मात वापरला जातो. तो म्हणजे तार्किक युक्तिवादाचा. हा उपाय भारतीय अध्यात्मात आणि पाश्चात्य अध्यात्मात भिन्न प्रकारांनी, भिन्न हेतूंनी वापरला जातो. भारतीयांचा भर मुख्यतः शब्द आणि साक्षात्कार यांवर असतो हे वर सांगितले. पण भारतीय तत्त्वज्ञानात युक्तिवादही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो. मात्र त्याचे प्रयोजन पाश्चात्य तत्त्वज्ञानातील त्याच्या प्रयोजनाहून भिन्न असते. भारतीय तत्त्वज्ञानात तर्काचा, युक्तिवादाचा वापर शब्दाप्रमाणे स्वीकारलेल्या सिद्धांतात काही अंतर्विरोध नाहीत हे दाखवून आपल्या अध्यात्मावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना उत्तरे देण्याकरिता, आणि अन्य अध्यात्मांच्या (कारण अध्यात्मव्यवस्था अनेक आहेत) खंडनार्थ केला जातो. परंतु पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची गोष्ट वेगळी आहे. भारतीय अध्यात्माची मूलप्रेरणा मुमुक्षा असून त्याचा मूलाधार श्रुती (शब्द) आहेत हे आपण पाहिले. तीच गोष्ट पाश्चात्त्यांच्या ख्रिस्ती धर्माधिष्ठित तत्त्वज्ञानाची (Theology) आहे असे म्हणता येईल. परंतु त्यांचे बाकीचे जे तत्त्वज्ञान आहे त्याची भिस्त श्रुतीवर, आविष्कृत शब्दावर नसते, ती असते शुद्ध तोवर. निदान तशी त्याची प्रतिज्ञा आणि प्रयत्नही असतो.

याप्रमाणे अध्यात्मविद्या प्रामुख्याने शब्द आणि साक्षात्कार याच्या साह्याने मिळते, आणि तिला तर्काचीही जोड दिली जाते. आता या उपायांनी प्राप्त होणारे निष्कर्ष काय आहेत ते थोडक्यात पाहू.

अध्यात्माच्या निष्कर्षांचा सारांश सांगण्याच्या मार्गात एक दुर्लंघ्य अडचण आहे. ती अशी की अध्यात्माच्या अनेक, अक्षरशः शेकडो, व्यवस्था आहेत. त्या सर्व परस्परांहून कमी अधिक भिन्न आहेत. परंतु प्रत्येक अध्यात्मव्यवस्था आपणच बरोबर आणि इतर सर्व चूक असा आग्रह धरताना आढळते त्यामुळे कोणते अध्यात्म बरोबर आणि कोणते चूक याचा निर्णय करणे अशक्य होते. या बाबतीत आध्यात्माची तुलना विज्ञानाशी करण्यासारखी आहे. कोणत्याही एका काळी विज्ञान काय आहे, म्हणजे विज्ञानाचे प्रस्थापित निष्कर्ष काय आहेत ते निश्चितपणे सांगता येते. विज्ञानात बदल होतो हे खरे; म्हणजे काल प्रस्थापित असलेला सिद्धांत आज चुकीचा किंवा अपुरा असल्याचे सिद्ध होते आणि त्याचा त्याग केला जातो. परंतु वैज्ञानिक क्षेत्रात घडणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेचे हे वर्णन दिशाभूल करणारे आहे. एकाकाळी प्रस्थापित झालेला सिद्धांत मागे पडतो याचा अर्थ तो त्याहून व्यापक अशा सिद्धांतात समाविष्ट केला जातो, किंवा त्यात किंचित त्रुटी दिसून आल्याने त्यात बदल करण्यात येतो. पण हा बदल सर्वमान्य असतो. तशी स्थिती अध्यात्माची नाही. या क्षेत्रात एका आध्यात्मिक सिद्धांताचे उणेपण लक्षात येऊन तो मागे टाकला गेला आणि दुसरा त्याच्या जागी आला असे होत नाही. आध्यात्मिक सिद्धांताचे खंडण कधीच निर्णायक होत नाही, आणि त्यामुळे शेकडो आध्यात्मिक सिद्धांत परस्परविरुद्ध असूनही अध्यात्माच्या रिंगणात कायम असतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक धर्माचे, प्रत्येक समाजाचे अध्यात्म वेगळे असते. याही बाबतीत विज्ञान आणि अध्यात्म यांत भेद आहे. विज्ञान इथूनतिथून एक आहे, त्यात भारतीय विज्ञान आणि पाश्चात्त्य विज्ञान, किंवा हिंदू विज्ञान आणि ख्रिस्ती विज्ञान असा भेद आढळत नाही. परंतु अध्यात्मांत मात्र भारतीय अध्यात्म आणि पाश्चात्य अध्यात्म, किंवा हिंदू अध्यात्म आणि ख्रिस्ती अध्यात्म असा भेद आढळतो.

परंतु असे असले तरी भिन्न अध्यात्मव्यवस्थांत थोडेबहुत समान असणारे अनेक सिद्धांत आहेत. त्यांपैकी अनेक सिद्धांत म्हणजे एकाच सिद्धांताची अनेक थोडीफार वेगळी पाठांतरे (versions) असतात. त्यामुळे अध्यात्माच्या प्रमुख निष्कर्षांचा सारांश देणे शक्य आहे.
हे निष्कर्ष भारतीय अध्यात्मात दोन प्रकारचे आहेत. (१) एक तर ईश्वरवादी. म्हणजे ईश्वरकल्पना प्रधान मानून तिच्या अनुरोधाने विचार करणारे, आणि (२) ईश्वरकल्पनेचा उपयोग न करता, परंतु आत्म्याला या विश्वात प्राधान्य देऊन विचार करणारे. यांपैकी ईश्वरवादी विचारात ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वगुणसंपन्न असा, विश्वाचा निर्माता आणि नियंता आहे असे मानले जाते. ईश्वर आणि मनुष्य यांच्या संबंधाविषयी अनेक मते असली तरी ती सर्व बहुधा एकाच मताची पाठांतरे आहेत. ते म्हणजे ईश्वर भक्तीने प्रसन्न होतो. प्रार्थनेने तो ओलावतो, त्याला अनन्यभावाने शरण गेल्याने तो आपली ईप्सिते पुरी करतो, आणि शेवटी भक्ताला आपल्यात सामावून घेतो. ईश्वरात लीन होणे ही मनुष्यजीवनाची परमावधी आहे. त्याहून मोठे सुख नाही, कृतार्थता नाही.

दुसरा (ज्ञानमार्गीयांचा) अध्यात्मविचार काहीसा भिन्न आहे. याही विचारात अध्यात्माचे अंतिम उद्दिष्ट आत्म्याची मुक्ती हेच आहे. पण ही मुक्ती ईश्वरभक्तीने मिळत नसून ती एक प्रकारच्या ज्ञानाने मिळते असे मानले जाते. हे ज्ञान प्रामुख्याने आत्मज्ञान असते. म्हणजे आपल्या खऱ्या, पारमार्थिक स्वरूपाचे ज्ञान झाल्याने आपण मुक्त होतो असा हा सिद्धांत आहे. ज्ञानानेच मोक्ष मिळतो, ‘ज्ञानादेव हि कैवल्यम्’ ही कल्पना नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे.

भारतीय तत्त्वज्ञानात तत्त्वज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट मोक्ष किंवा मुक्ती हेच मानलेले आहे. मनुष्य विविध प्रकारच्या दुःखांनी पीडित असतो, आणि त्यामुळे या दुःखांचा नाश करण्याच्या उपायांचा शोध सुरू होतो. हा दुःखनाश औषधादी आधिभौतिक उपायांनी किंवा यज्ञयागादी आधिदैविक उपायांनी साध्य होत नाही, कारण या उपायांनी होणारा दुःखनाश निश्चित आणि कायमचा नसतो. असा कायम आणि समूळ दुःखोच्छेद करण्याचा उपाय शोधण्याकरिता आध्यात्मिक मार्गाकडे वळावे लागते. येथे एक गोष्ट नमूद करणे अवश्य आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार मानवी जन्मच मुळी दुःखमय आहे, आणि म्हणून जन्मापासून सुटका हा दुःखनाशाचा खरा आणि एकमेव उपाय आहे. यावर कोणी म्हणेल की मग तो उपाय मृत्यू हा आहे. पण तसे मानणे चूक होईल, कारण मृत्यूनंतर पुनर्जन्म यांचा पुरावा म्हणून जो युक्तिवाद करण्यात येतो तो कर्मसिद्धांताच्या आधाराने. कर्मसिद्धांताचे प्रतिपादन असे आहे की मनुष्याला आपल्या कर्माची फळे चाखावीच लागतात, एवढेच नव्हे तर त्याला येणारे सर्व सुखदुःखात्मक अनुभव त्याच्या स्वतःच्याच कृतकर्मांची, त्याने स्वतः अर्जित केलेली फळे असतात. या सिद्धांताचे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे उपसिद्धांत आहेत. पुनर्जन्म मानावा लागतो कारण नाहीतर ‘कृतस्य हानम्’ (म्हणजे कृतकर्मांचा नाश किंवा कृतकर्मे निष्फळ होणे) हा दोष पदरी येतो, कारण आपल्या कित्येक सत्कर्माची मधुर फळे आणि दुष्कर्मांची कटू फळे आपल्याला या जन्मात मिळताना दिसत नाहीत. आणि पूर्वजन्म मानावा लागतो, कारण नाही तर ‘अकृतस्य अभ्यागमः’ (म्हणजे न अर्जिलेली फळे चाखणे) हा दोष स्वीकारावा लागतो. कारण कर्मे करू लागण्यापूर्वीच जन्मतःच जी सुखदुःखे आपण अनुभवतो ती या जन्मात केलेल्या कर्मांची फळे अर्थात नसतात. याप्रमाणे पूर्वजन्म व पुनर्जन्म जर अटळ असतील तर त्यातून जन्मांची एक अनादी आणि अनंत परंपरा निष्पन्न होते. पण हे खरे असेल, आणि जन्म म्हणजे दुःख हेही खरे असेल तर अनंत काळपर्यंत दुःखयोग हेच जीवाचे भविष्य दिसते. मग यातून सुटका कशी होणार ? यावर भारतीय तत्त्वज्ञांचे उत्तर आहे, ज्ञानाने आत्मज्ञानाने. पण हे म्हणणे चमत्कारिक दिसते. कारण केवळ ज्ञानाने कोणतेही बंधन नाहीसे होत नाही. ज्ञानाने एखादे बंधन नाहीसे करण्याचा उपाय कोणता ते कळेल; पण त्या उपायाचा अवलंब करावाच लागेल, म्हणजे ज्ञान मिळाल्यावर काही तरी कर्म करावे लागेल. पण आपले बंधनच जर सामान्य बंधनाहून वेगळे असले तर? आणि ते तसे आहे असे भारतीय तत्त्वज्ञांचे म्हणणे आहे. आपले जे बंधन आहे-म्हणजे जन्ममृत्यूला संसार-ते अज्ञानजन्य, भ्रामक आहे असे ते प्रतिपादतात. खरे स्वरूप सुखरूप किंवा मुक्त असेच वस्तुतः आहे. म्हणून वस्तुतः आपण बद्ध, पीडित नसतोच. आत्मस्वरूपाविषयीच्या अज्ञानाने, अविवेकाने आपल्याला तसा भ्रम झालेला असतो. आणि भ्रम घालविण्याकरिता ज्ञान अगदी पुरे असते.

पाश्चात्य तत्त्वज्ञान श्रुतींचा (म्हणजे शब्दप्रमाणाचा) आधार न घेता केवळ तर्काने, युक्तिवादाने आपल्या सिद्धांतांची प्रस्थापना करते. निदान तशी त्याची प्रतिज्ञा आणि प्रयत्नही असतो, असे वर म्हटले आहे. असे जरी असले तरी त्याचीही मूलप्रेरणा तत्त्वतः भारतीय अध्यात्माच्या मूलप्रेरणेसारखीच आहे. ही प्रेरणा म्हणजे या अफाट विश्वातील मानवाची असहायता, एकाकीपणा, त्याचे अपघातात्मक अस्तित्व, आणि एकूणच अनिश्चित भवितव्य यांतून निर्माण झालेली विश्वाचे खरे स्वरूप शोधण्याची जिज्ञासा. या जिज्ञासेतून तत्त्वज्ञान उद्भवले. परंतु ती जिज्ञासा शुद्ध, निरपेक्ष जिज्ञासा नाही. विश्वाचे स्वरूप बाह्यतः किंवा सकृद्दर्शनी जरी मानवाला प्रतिकूल आहे असे दिसले तरी वस्तुतः ते त्याला अनुकूल आहे असेच उत्तर या जिज्ञासेला हवे आहे. आणि बहुतेक तत्त्वज्ञाने याच इच्छेने प्रभावित झालेली आहेत. विज्ञानाने उभे केलेले विश्वाचे आणि त्यातील मनुष्याच्या शून्यप्राय स्थानाचे चित्र पूर्णतः किंवा वस्तुतः खरे नव्हे असे दाखविण्याकरिता प्रामुख्याने तत्त्वज्ञानाचा अवलंब केला जातो, आणि त्यातून मानवाला दिलासा देणारी, त्याचे माहात्म्य प्रतिपादणारी तत्त्वज्ञाने उद्भवली आहेत. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणेच पाश्चात्य तत्त्वज्ञानही प्रामुख्याने मानवकेंद्रित, मानवेच्छापूरक स्वरूपाचे झालेले आहे. फरक एवढाच आहे की त्यात सर्व गोष्टी युक्तिवादाने सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. कोणती गोष्ट केवळ श्रुतिप्रणीत म्हणून स्वीकारण्याचे टाळण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

अध्यात्मवादी तत्त्वज्ञानात वापरल्या जाणाऱ्या ज्या तीन पद्धती आहेत, म्हणजे शब्द, साक्षात्कार आणि युक्तिवाद, त्यांच्याविषयी थोडे लिहिणे उचित होईल. शब्द आणि साक्षात्कार या दोन ज्ञानसाधनांच्या प्रामाण्यविषयी काय लिहावे? एका शब्दात सांगायचे तर त्यांच्या समर्थनार्थ काहीही सांगता येण्यासारखे नाही. लौकिक शब्द (उदा. वैज्ञानिकाचे शब्द) आपण प्रमाण म्हणून स्वीकारतो हे खरे. पण त्यांचे प्रामाण्य स्वतंत्र नाही; ते इंद्रियानुभव आणि अनुमान या अन्य ज्ञानसाधनांवर अवलंबून असते हे आपण पाहिले. पण शब्दाचे किंवा श्रुतीचे प्रामाण्य मात्र तिचे स्वतःचे, स्वतंत्र असते असे प्रतिपादले जाते. निदान त्याला अन्य कोणत्याही प्रमाणाचा आधार दिला जात नाही. ते प्रमाण अन्य सर्व प्रमाणांच्या वरचे, त्यांहून श्रेष्ठ आहे असे मानले जाते. एवढेच नव्हे तर अंतिम सताचे ज्ञान देणारे त्याच्याखेरीज अन्य प्रमाण नाही असे प्रतिपादले जाते. पण हे खरे मानण्याला कसलेही कारण दिसत नाही. शब्दप्रमाण अतिभौतिकीय, अतींद्रिय अशा गोष्टींबद्दल माहिती देत असल्यामुळे ती माहिती खरी आहे की नाही हे पडताळून पाहण्याचे कोणतेही साधन आपल्याजवळ नाही. परंतु श्रुती प्रमाण मानण्याला बाधक अशा दोन गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.

(१) श्रुतींमध्ये अतिभौतिकीय गोष्टींबद्दल माहिती असते हे खरे मानले तरी त्यांतील बरीच वचने लौकिक, इंद्रियगोचर सृष्टीविषयीही असतात, आणि ही वचने खरी आहेत की नाहीत हे आपण वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करू शकतो. उदा. सप्तसागर आहेत की नाहीत हे आपण वैज्ञानिक पद्धतीने निश्चित करू शकतो. उदा. सप्तसागर आणि सप्तलोकांचे जे. वर्णन श्रुतीत आढळते ते निखालस खोटे असल्याचे विज्ञानाने सिद्ध केले आहे. किंवा बायबलातील प्रतिपादनानुसार जगाची उत्पत्ती इ. स. पूर्वी ४००४ या वर्षी झाली हेही म्हणणे पूर्णपणे खोटे आहे. तेव्हा लौकिक बाबतीत अविश्वसनीय असणारे हे प्रमाण अलौकिक बाबतीत मात्र पूर्णपणे विश्वसनीय असेल हा संभव फारच कमी होतो.

(२) दुसरी गोष्ट श्रुती अनेक आहेत. प्रत्येक धर्माची श्रुती वेगळी आहे आणि प्रत्येक श्रुती पारमार्थिक जगाचे वर्णन वेगळे देते. आता श्रुती प्रमाण मानायची तर सर्वच श्रुतींचा तो अधिकार आहे. परंतु सत्य, पारमार्थिक सत्यही, एकच असले पाहिजे, त्याचे स्वरूप परस्परविरुद्ध असू शकत नाही. हिंदूंचे वेद, ख्रिस्त्यांचे बायबल, मुस्लिमांचे कुराण, पारशांचे झेंद अवेस्ता आणि इतर अनेक धर्मग्रंथ अतिशय भिन्न, परस्परविरुद्ध गोष्टी सांगतात. त्या सर्वच खऱ्या असू शकत नाहीत; पण त्यांपैकी कोणत्या खऱ्या आणि कोणत्या खोट्या हे ठरविण्याचे कोणतेही श्रौत साधन नाही. आणि अन्य साधन श्रुतीला मान्य होण्यासारखे नाही. या दोन कारणांस्तव शब्दप्रमाण ज्ञानसाधन म्हणून विश्वसनीय मानता येत नाही.

शब्दाच्या समर्थनार्थ असे म्हटले जाऊ शकेल की त्यात सांगितलेल्या सत्यांचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो, आणि या प्रमाणे साक्षात्काराच्या साह्याने शब्दप्रमाणाचे समर्थन होऊ शकते. परंतु प्रामाण्याच्या बाबतीत जी अवस्था श्रुतीची आहे तीच अवस्था साक्षात्काराचीही आहे. साक्षात्काराला स्वतंत्र प्रामाण्य असेल तर त्याचे साह्य शब्दाला देता येईल, पण साक्षात्कार प्रमाण कशावरून मानायचे? ते भ्रामक नसतील कशावरून? निदान काही साक्षात्कार भ्रामक असले पाहिजेत हे साक्षात्कारांच्या विविधतेवरून सिद्ध होते. प्रत्येक आध्यात्मिक मताच्या अनुयायांना त्या मताच्या आशयाचा साक्षात्कार होतो, आणि आध्यात्मिक मते अनेक असल्यामुळे साक्षात्कारही अनेक आहेत. उदा. अद्वैत वेदांत्याला अहं ब्रह्मास्मि’ असा सच्चिदानंदात्मक साक्षात्कार होतो, तर विशिष्टाद्वैत्याला आपण ईश्वराचे अंश आहोत असा साक्षात्कार होतो, आणि सांख्याला सुखदुःखराहित्याचा कैवल्यात्मक साक्षात्कार होतो परंतु हे सर्वच साक्षात्कार यथार्थ असू शकत नाहीत. पण प्रत्येक साक्षात्काराचा दावा आपण यथार्थ आहोत असाच असतो. त्यामुळे कोणता साक्षात्कार प्रमाण आणि कोणता अप्रमाण हे ठरविणे अशक्य आहे. साक्षात्कारासंबधी दुसरीही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. साक्षात्कार होण्यापूर्वी साधकाला दीर्घ साधना करावी लागते. या साधनेचे स्वरूप आत्मसंमोहनाचे आहे असे म्हणणे भाग आहे, ‘अहं ब्रह्मास्मि’ किंवा ‘तत्त्वमसि’ किंवा ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ या महावाक्यांचा जप जर आपण दिवसचे दिवस, नव्हे महिनेच्या महिने आणि वर्षेच्या वर्षे करीत राहिलो तर शेवटी आपल्याला तशी अनुभूती येणे स्वाभाविक आहे असे म्हणावे लागेल. आपण ज्या प्रकारचे ध्यान करू त्या प्रकारचा साक्षात्कार होतो. म्हणून साक्षात्काराने श्रुतिवचनाचे समर्थन होऊ शकत नाही. उलट श्रुतिवचन श्रद्धेने स्वीकारून त्याचे सतत चिंतन केल्याने त्याचा साक्षात्कार होतो. एका प्रमाणाला दुसऱ्या प्रमाणाचे साह्य होण्याकरिता दुसऱ्याला स्वतःचे स्वतंत्र प्रामाण्य हवे. परंतु येथे शब्द आणि साक्षात्कार या दोहोंनाही स्वतःचे प्रामाण्य नसल्यामुळे त्यांनी परस्परांना साह्य करणे यात अन्योन्याश्रयाचा दोष मात्र होतो.

अध्यात्मवादी तत्त्वज्ञानाची मूलप्रेरणा मानवाला या अफाट, प्रतिकूल जगात दिलासा देणे ही असल्यामुळे ते मानवाला अनुकूल, मानवाचा मोठेपणा प्रतिपादणारे निष्कर्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असते. परंतु त्याचमुळे अध्यात्माची युक्तिवाद-पद्धती पूर्वग्रहदूषित होते. अमुक प्रकारचेच निष्कर्ष प्रस्थापित करायचे असे एकदा ठरले की त्या निष्कर्षाला पोषक अशा गोष्टींवरच लक्ष केंद्रित होणे, आणि त्याला प्रतिकूल अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होणे अपरिहार्य आहे. हे जाणूनबुजून केले नाही, तरी ते होणे स्वाभाविक आहे. तसेच युक्तिवादांत दिला जाणारा पुरावा संशयातीत आहे की नाही याकडे दुर्लक्ष होऊन सापडेल त्या पुराव्यावरून निष्कर्ष काढण्याची प्रवृत्ती वाढीला लागते, आणि त्याचप्रमाणे दिलेल्या पुराव्यावरून नेमके काय सिद्ध होते याचेही भान न राहून आपल्याला इष्ट असे मोठ्या आशयाचे निष्कर्ष सिद्ध होतात असे समजण्याची वृत्ती बळावते. उदा. मानवाचे अल्पजीवित्व, त्याची अत्यल्प शक्ती, त्याचा अटळ मृत्यू, आणि त्याचे विश्वातील अतिक्षुद्र, शून्यप्राय स्थान – या सर्व गोष्टी त्याला फार अप्रिय आहेत, म्हणून त्या खऱ्या नाहीत, केवळ भ्रामक आहेत असे दाखविले पाहिजे. हे दाखविण्याकरिता वापरण्यात येणारे युक्तिवाद अतिशय फसवे, शब्दच्छल करणारे, बुचकळ्यात टाकणारे, आणि एकंदरीत अनिर्णायक असतात. त्यात आपल्या युक्तिवादाने नेमके काय सिद्ध होते आहे याची स्पष्ट जाणीव नसते. उलट थोड्याशा पुराव्याने पुष्कळ सिद्ध झाले असे मानण्याची, सुताने स्वर्गाला जाण्याची प्रवृत्ती व्यक्त होते. भाबडेपणा, भोळेपणा, श्रद्धालुत्व यांचा प्रभावही त्यांवर पडलेला असतो. सारांश, अध्यात्मात वापरण्यात येणाऱ्या युक्तिवादांनी इष्ट निष्कर्ष सिद्ध होत नाहीत असेच म्हणावे लागते.

अध्यात्मातील युक्तिवादाचे जे मूल्यन येथे केले आहे त्याच्या पुष्ट्यर्थ भारतीय आणि पाश्चात्त्य अध्यात्मातील काही प्रसिद्ध युक्तिवादांचे परीक्षण उदाहरणादाखल संक्षेपाने देतो.

(अपूर्ण)

अभिप्राय 4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.