भग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… !

खालील संवाद शहरातल्या एका तलावाकाठी घडतो आहे. आत्ताआत्तापर्यंत हे लहानसे तळे अनेक नैसर्गिक घटकांचे घर होते. त्याच्या पाणलोट क्षेत्रातील जंगल अनेक पशुपक्ष्यांचा आसरा होते. नॅचरल रिक्रिएशनल साईट म्हणून ह्या जागेची उपयुक्तता लोकांना फार आधीपासून माहीत होती/आहे. आता मात्र गरज नसलेल्या विकासकामासाठी हा तलाव वापरला जातो आहे; तलावामध्ये संगितावर नृत्य करणारे एक कारंजे बसविण्याचे घाटते आहे व प्रेक्षकांसाठी मोठी गॅलरी बांधणे सुरूआहे. तलावाच्या परिसरात सुरूअसलेल्या व भविष्यात वाढणाऱ्या वर्दळीमुळे तेथील नैसर्गिक पाणथळ व वन परिसंस्थांचा ह्रास होऊन तलाव मृत होण्याची पूर्ण शक्यता आहे. ह्याबाबत चर्चा करीत आहेत जलपरिसंस्था हे घर असलेला एक बगळा (Little Egret) व वृक्ष परिसंस्था हे घर असलेला एक कवडा (Laughing Dove) हे दोन अतिसामान्य निवासी (Resident) पक्षी. 

वास्तविक पाहता कवडा हा निर्बुद्धतेकडे झुकणारा तसेच घरटं बांधणे, पिलांचा नीट सांभाळ करणे ही साधी जीवनकौशल्ये देखील सुमार दर्जाची असणारा पक्षी आहे. त्यामुळे त्याच्या पिल्लांचा मृत्युदर जास्त असतो. त्याची नैसर्गिक भरपाई म्हणून त्यांचे प्रजनन वर्षभर चालू असते. 

घरट्यासाठी एखादा जुजबी आडोसा आणि केवळ सात आठ काड्या एवढ्या कमी संसाधनांची गरज असणाऱ्या कवड्याला शहराने अतिक्रमण केलेल्या एका तलावावर राहणे आता असुरक्षित वाटू लागले आहे. कारण त्या तलावावर विकासकांची नजर पडली आहे. आत्ता आत्तापर्यंत लेकुरवाळं असणारं तळं काही राजकारण्यांच्या निर्बुद्ध महत्त्वाकांक्षेला बळी पडतं आहे. 

सुमार बुद्धी आणि समज असलेल्या कवड्यालादेखील ज्या गोष्टी कळायला सुरुवात झालेली आहे त्या बुद्धिमान म्हणविणाऱ्या निसर्गाच्या सर्वश्रेष्ठ पुत्राला का कळत नसाव्यात ..?  

(बगळा पाण्यात एका पायावर उभा आहे. मागे जेसीबीच्या विकासकामांचा खडखडाट सुरू आहे. तिकडून एक कवडा येतो. बगळा त्याला पाहून पाण्याबाहेर येतो.)

बगळा: काय रे भाऊ..कुठे निघाला एवढ्या घाईत.. ? (कवड्याला खडखडाटात ऐकू जात नाही. तेव्हा हातवारे करून पुन्हा) भाऊ, काय खबर बात..?

कवडा: माही खबरबात पुसुन राहिला का बे?

बगळा: दुसरा आहे का कोणी इथे ?

कवडा: (मागेपुढे पाहतो ) बापा… घरवाली कुठे गेली माही…

बगळा: होती का इथे ?

कवडा: नाही त काय … घर शोधायला निघालो ना …

बगळा: शोधायला? म्हंजे ?

कवडा: म्हंजे रेडिमेट… आयतं … तय्यार …वनबेडरूमहॉलकिचन  काय ?

बगळा: कां रे बाबा …ही काय नवीनच टूम … आपलं आपलं बांधत नाही का औंदा साली ?

कवडा: बांधलो ना गेल्या सालापर्यंत ….काडी काडी करून बांधलो .. …थट्टी यर्स का एक्सपेरेन्स है ना बावा…  तरी पण चुकलंच तेव्हा काहीतरी … ही म्हणलीच की मागल्या सालपेक्षा जास्तच डगडगून राहिलं घरटं म्हणून..  झोल पण खाल्ला होता  सेंटरला… एकदा तर बोळवलंच होतं अंडं जणू  …

बगळा: अरे बापरे …

कवडा: मग…! अवकाळी पाऊस आला होता ना… मग हे– झुले घरटं …. सुटया सुट्या झाल्या काड्या नुसत्या.. पण वाचलो. 

बगळा: एवढं बेकार का बांधलं मग? तुझे बापजादे तर बरं बांधे घरबिर … 

कवडा: शिकशण रे भाऊ ..

.बगळा: …..? 

कवडा: शिक्शण … शी..क…श…ण ..

बगळा: असं असं … पण कोणाचं ?

कवडा: आमचंच न बे …आता आमचे आजे पणजे .. गेले का शाळेत ते .. नाही ना ? पण अडलं का काई ? घरं  बांधता आली … दाणापाणी आणता आला घरी … (डोळे मिचकावून ) अन आजीपंजीच्या  डोळ्यातली बुकं वाचता आलीच की त्यांना…संसार झाला…  मुलं बाळं नातवंडं पतवंडं झाली…

बगळा: पण तू तर बरी भाषा बोलून राहीला… आता थोडी धेडगुजरी वाटते खरी… पण मग तुझं काय बिनसलं शिकून ..?

कवडा: सगळंच की.. शिक्शण शिकलो न कामाचं सगळं विसरलो ना ….

बगळा: “पण घरटं बांधायचं स्कील तर रक्तात असायला पाहिजे ना …” 

कवडा: “(इकडे तिकडे पाहत) खरं सांगू बापू तुला…ते आमच्या जीन्स मध्येच नाही…  तो बघ महा बाप … तो…  खिदळत बसला तिकडे … तो … घर्ट बिर्ट तो पण नीट नाही बांधे कधी … माही माय हट्ट करे म्हणून धा बारा काड्या आणून दे तिला कधी … चार आडव्या चार उभ्या ठेऊन करे बिचारी काहीतरी … मीच त कितीदा वाचलो घरट्यातून पडता पडता …पण माझे बरेच भाऊबंद मात्र त्यांनी बोळवले (डोळे पुसतो)… किती कोण जाणे… तर काय सांगत होतो … आधीच मी डोक्याने मठ्ठ … त्यात शिकलो … मी झालो तेव्हा शाळेचं फ्याड आलं होतं ना … माझा आजा म्हणे ती जीवन शाळा की काय … ती सोडून मॉडन शाळेत टाकलं मायनं मला…  आणि तिथल्या शिक्शणाने ‘मेरेको कहीका नही रख्खा’…. काय ?” 

बगळा: “असं कसं होईल..? तुझ्या भाऊबंदांपेक्षा तुझी समज जास्तच वाटते मला….”

कवडा: “तसं नाही ना बे पण … सब कुछ सिखा हम्ने पण न होशियारी … सचै दुनियावालो हम हय अनाडी..” 

बगळा: “ गाणंबिणं म्हणतो…हिंदी शिकला वाटते …!”

कवडा: “इंग्रजी पण… मात्र मास्टर ऑफ नन जॅक फॉर ऑल … उडता येईना अंगण वाकडे … बुकं वाचता आली पण साधी बाईल पटवता येईना … हे लाईफ स्कील शाळेत शिकवलं का कोणी?….  उ हूँ!!”

बगळा: “मग वहिनी कशी आली… ?”

कवडा: “ती शाळेत नाही गेली न …ब्याकवर्ड होतं तिचं बापघर… प्रतिगामी म्हणतात ना तसं … तिला येत होतं हे जीवन कौशल्य …(अरे वा… जमलं म्हणायला … कौश्यल्य.. कउशल्य … टंगट्विस्टरच आहे … अरेच्या हे पण जमलं की म्हणायला … टंग… टंग … जाऊदे.).  तर….. मुलीला पटवायचं असेल तर आमच्यात घुमतात … ते नाही का गाणं …  ‘पारवा घुमतोय कसा गं बाई बाई …’ आणि जोडीला घशातून गुड गुड गुड असा आवाज काढायचा. मी पडलो शिकलेला … शिक्शित … हे करायची मला वाटो लाज..”.  

बगळा: “मग…. मनातलं व्यक्त कसं केलं?”

कवडा: “मी कुठं काय… तुह्या वहिनीनी पटवलं मला… !!”

बगळा: “हम्म … !”

कवडा: “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इम्पॉर्टन्स मी शिकलो होतो नागरिकशास्त्रात पण तुझ्या वहिनीसमोर श्रींक झालो…… म्हणजे आखडलो  रे … जिभेची तर गुंडाळीच झाली जणू माझ्या… पण तुझी वहिनी अभिव्यक्त झाली …  म्हणाली .. ‘महा जीव जडला तुह्यावर…’ मी गार … पण मानेचा फुगा झाला आपोआप आणि आपसूकच घशातून आवाज निघाला गुड गुड गुड … शिक्शणाने कोंडलेले न्याचरल इन्स्टिंक्ट मोकाट झाले.  मग मी पण संधी नाय सोडली अन ठरवून जीव जडवला तिच्यावर…” 

बगळा: “मस्तच की…”

कवडा: “मग काय… मस्त घुमायचं आणि घशातून गुड गुड गुड … घुमायचं आणि गुड गुड गुड … ह्या फांदीवरून त्या फांदीवर … ह्या झाडावरून त्या झाडावर …(चुकचुकत) तेव्हा झाडंही खूप होती न बा…”

बगळा: “एवढी डिटेलमध्ये लव्हस्टोरी सांगितली राव तुम्ही … पण ते घराचं काय ..?”

कवडा: “हा…  ते… तर शिक्शणाने घरटं बांधायचं उरलंसुरलं स्किल पण गेलं. असलं काम करायची लाज वाटायला लागली ना राव …  मग ठरवलं ‘लेट्स हायर द प्रोफेशनल …’ पण मिळेना कोणी … माझ्या पिढीचे सगळे माह्यासारखेच शाळा शिकलेले बिनकामाचे… मागल्या पिढीचे आजेकाकेमामे त्यांची घरं बांधण्यात गुंतलेले….. मग ठरवलं की आता शहरातच जायचं राहायला… तिथल्या एखाद्या वनबीएचकेच्या वळचणीला किंवा माळ्यावर ठेवायच्या चार काड्या आणि चालवायचा संसार न काय ..” 

बगळा: “अरे, मग एखाद्या चांगल्या वस्तीत जा की… लो एम इज ए क्राईम.”

कवडा: “तू पण शाळेत गेला होता का बे? इंग्रजी म्हणी म्हणून राहिला…”

बगळा: “ बगळा आहे ना मी… पाण्यात उभा असतो ध्यान लावून एका पायावर… तेव्हा ऐकतो माणसांचं बोलणं … लिहिता वाचता येत नाही पण बोललेलं कळायला लागतं सरावानं…”

कवडा: “हम्म… पण माहित्ये का, आपल्याला ‘लो एमच’ बरं… तिथं निदान राहू तरी देतात … उच्चभ्रू (जमलं उच्चारायला … ) लोकांना तर आपण नकोच असतो न…. भाऊ सांगत होता माझा एकदा ..  तो चार काड्या ठेवून बाहेर जाऊन येतो तोच भानामती झाल्यासारख्या आधीच्या काड्या गायब… तरी नेटाने काम चालू ठेवले तर आत जाण्याचा रस्ताच बंद झाला… त्याची बाय अडकली न आत… अन तिथलं मांजर… घातली झडप तिच्यावर… हा बघत होता बाहेरून… काही नाही करू शकला… आता एकटाच घुमतो… आपण साधे पक्षी…  ओव्हर अँबिशन नकोच …”

बगळा: “अरे साधेपणी तरी राहू देतात का आपल्याला?”

कवडा: “कां नाही ?”

बगळा: “गावातले सगळे तलाव कोरडे पाडून विकायला काढलेत ह्या माणसांनी…. सगळीकडून विस्थापित होऊन ह्या तळ्यावर आलो तर विकासाचे खिळे ठोकायची कामं सुरू इथेही ह्यांची.. … कुणाला जिव्हारी लागलं कीआयुष्याचं नुकसान झालं…  की कुणाचे जीव गेले त्यापायी …कळतं कुणाला कधी..?”

कवडा: “येवढा विचारच नाही केला बा ..”

बगळा: “बरं… तू एक सांग… तू का सोडून जातो आहेस ही सुंदर जागा…?” 

कवडा: “म्हंजे काय… शेफ्टी इज मस्ट…. केव्हडं काय काय सुरू आहे इथे… आणि लिहून ठेवलं आहे ना सगळीकडे ‘वर्क इन प्रोग्रेस … अपनी सुरक्षा खुद करें‘ …. उकरून आणि भादरून ठेवलंय जिथंतिथं ”

बगळा: “अरे, सौंदर्यीकरण म्हणतात त्याला… पण कुणाच्या दृष्टीने सौंदर्य कोण जाणे .. एवढं सुंदर तळं… पण रसातळाला चाललंय..!”

कवडा: (विचार करत) “काय रे, आपले हिवाळी पाहुणे आले नाही का बे ह्यावेळी ?”

बगळा: “ते तर कमी कमीच होत गेले आहेत गेल्या काही वर्षांपासून… छोटंसं सुंदर तळं होतं हे कोणे एके काळी…खूप पक्षी असायचे … मागच्या जंगलात मोर, कोकीळ, राघू, फुलचोखे,  शिंपी, मुनिया, खाटीक, पावश्या, वेगवेगळ्या साळुंक्या आणि काय काय ….  पाण्यावर इग्रेट्स, हेरॉन्स, पांढराकाळा आणि रंगीत खंड्या, लहान मोठे परीट, टिटव्या….. आणि हिवाळी पाहुणे पण खूप यायचे तेव्हा… वेडे राघू, थिरथिरे, जकाना (की जसाना), कूट, पोचार्ड्स … पावसाळ्यात चातक यायचे…. माझा बा सांगतो…मलाही थोडं थोडं आठवतंय …… पावसात मागच्या जंगलातील ओढ्यांनी तळं पार भरून जायचे … भरलेलं तळं मग सांडायचं खालच्या बाजुला…  तिकडे वाहणारे झरे आणि त्यावर नेहमी असणारे थ्रश, नाचण, कोतवाल, हळदण,  सुभग, धनेश, स्वर्गीय नर्तक आणि काय काय …”

कवडा: “बापरे , जवळपास सगळ्यांनाच ओळखतो की तू …पण आता गेलेत कुठे सगळे ?”

बगळा: “काहींनी पाठ फिरवली… काही दूर निघून गेलेत… नेटाने जे उरलेत त्यांचे रंग उडालेत … बांधकामाच्या धुळीच्या रंगाचे झाले आहेत झाडं, पक्षी सगळे… पाणकावळा देखील काळा नाही तर भुरकट दिसतो इथला … वटवाघळं यायची संध्याकाळी पाण्यावर… ती ही दिसत नाहीत फारशी…”

कवडा: “पण असं करून काय राहिलीत ही माणसं ?”

बगळा: “करमणूक करून घ्यायची आहे त्यांना स्वतःची… आपण एवढी वर्षं राखलेलं तळं आता त्यांना त्यांच्या दिमतीला पाहिजे आहे ना !”

कवडा: “अरे पण केव्हढासा जीव ह्या तळ्याचा … ते कसं काय बुवा रिझवणार एवढ्या सगळ्यांना ? आधीच एवढी वर्षं मूर्ती विसर्जनाच्या नावावर तलावाची वाट लागली आहे आणि आता तर केवढी तोडफोड चालवली आहे… कुठे वर्मावर घाव बसला आणि तुटफूट झाली तर झिरपून झिरपून मरून जाईल ना ते बिचारं तळं… (कळवळतो) मग काय तळ्याच्या कलेवरावर करमणूक बसवणार आहेत का?”

बगळा: “कारंजं का काय ते लावणार आहेत म्हणे इथे …म्युझिकल का कसलं ते …”

कवडा: “हम्म.. मी पाहिलंय तसंच छोटं एक… घर शोधत गेलो होतो तेव्हा…बिनम्युझिकल…”

बगळा: “पण हे मोठठं असणार आहे….. मोठमोठ्या लोकांच्या संगीतावर नाचणार आहे पाणी …”

कवडा: “हं….. पाणी नाचवणार आहे भविष्यात आपल्याला, हे साधं ह्या ‘बुद्धिवंत द्रष्ट्यांना’ कळत नाही…?” 

बगळा: “भाऊ, सिरियस झाला की एकदम नागर बोलायला लागतो की तू…! पण द्रष्टे कोणी राहिले का आता…?” 

कवडा: “ज्या धोरणकर्त्यांनी दूरदृष्टी बाळगणे अपेक्षित आहे त्यांनीच आपल्या मनाचा संकोच केल्यावर दुसरे काय होणार…? दूरचा नंबर द्या रे कोणी ह्यांना… !” 

बगळा: “पण कारंजं बिघडवेल कां रे खूप काही…?” 

कवडा: “माणसाचं नाही पण आपलं बिघडवेल ना… ते एकदा रिझवेल माणसाला …एकाच माणसाची परत परत करमणूक कशी करणार ते …अन मी म्हणतो माणसाला  एवढा वेळ असतोच कसा? असे कोण येतील बघायला?”

बगळा: “आता तुझ्या माझ्यासारखे हातावर पोट असलेले कमी येतील बघायला पण रिकामा वेळ असणारे खूप आहेत.”

कवडा: “अरे पण करमणूक …ती ही दुसऱ्याच्या जीवावर ?”

बगळा: “पण हे तर काहीच नाही….. ही माणसं जेवढी कृत्रिम ऊर्जा निर्माण करतात त्यातली ८०-९० टक्के म्हणे त्यांच्या करमणुकीवर खर्च होते. आणि करमणूक नाही….. ‘रिक्रिएशनल अ‍ॅक्टिव्हिटी‘ म्हणायचं बरं त्याला…”

कवडा:  “ह्या करमणुकीचा कंटाळा आला की मग काय करायचं?”

बगळा: “दुसरी करमणूक शोधायची ….”

कवडा: “तिचाही कंटाळा आला तर … आणि येणारच… अरे कंटाळा यायला वेळ खूप आहे न ह्या माणसांकडे…”

बगळा: “मग तिसरी .. मग चौथी..”

कवडा: “अन ह्या थिल्लर करमणुकीसाठी जे पणाला लागतंय … खरं तर वाट लागतेय .. ह्रास होतोय…. त्याचं काय?” 

बगळा: “काय त्याचं.. ?”

कवडा: “अरे बगुला भगत… तुझ्यामाझ्या ह्या पण तलावाची वाट लागून राहिली आहे न भाऊ अन तू एवढा साधू संत कसा?”

बगळा: “पण आपण करायचं काय? माणसांच्या निषेध सभा झालेल्या बघितल्यात मी ह्याच तलावाच्या पाळीवर… पण आपण साधे पक्षी…आपल्याला कुठे निषेध करता येतो …  ह्याआधी मी आणि माझ्यासारखे कितीतरी एका दुसऱ्या तलावाकाठी राहात होतो. तिथून हुसकावून लावलं आम्हाला…..रस्ता करायचा होता तेव्हा त्यांना ….. पुनर्वसन करून मागितलं आम्ही… नाही केलं त्यांनी.. काही बोललो आम्ही ..? नाही… गप गुमान निघून आलो. नाहीतर जीव गेला असता ना…. झाडं तोडली त्यांनी, आमची घरटी पडली, कच्च्याबच्च्यांचं काय झालं… जगली की मेली…  काही माहीत नाही. बरेच जण त्या धक्क्यातून सावरले नाहीत अजून…”

कवडा: “मी शिकत होतो ना तेव्हा नागरिकशास्त्रात एक लोकशाही नावाचा शब्द होता… काय बरं वर्णन लिहिलेलं होतं ?..हं..  लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य…..”

बगळा: “शिक्षणाने भाषा फारच बदलली रे तुझी … अन काय मठ्ठ्बिठ्ठ नाहीआहेस तू …” 

कवडा: “तर ह्या लोकशाहीत म्हणे सामान्य माणसालादेखील मत असतं, अधिकार असतात… तसंच मत आणि अधिकार आपल्याला पण पाहिजे… माणूस जसा ह्या पर्यावरणाचा एक जैविक घटक आहे, तसेच आणि त्याच तोडीचे जैविक घटक आपणही आहोत…. आपण सगळे… क्काय…?तू, मी, खंड्या, राघु…..  पक्षी, प्राणी, जलचर, कीटक, झाडे सगळे सगळे…! ह्या पर्यावरणाचा तोल राखण्यात आपला पण सहभाग आहे. आपण आपल्या हयातीत आपापल्या परीने निसर्गसंवर्धनाला हातभारच लावतो. गरजेपुरतेच घेतो. किंबहुना, गरजेपुरतेच घेता येते आपल्याला….”

बगळा: ( विस्मयचकित ) “शिक्षणाने ‘कही का नही रख्खा’ म्ह्नणत होतास ना…..?”

कवडा: “पण माझ्या मते घटनेमधील लोकशाहीचा अर्थ व्यापक करण्याची वेळ आता आली आहे…केवळ मेंदू मोठा आहे आणि दोन पायावर चालतो (दोन पायावर तर मी पण चालतो) म्हणून माणूस मानवेतरांसाठी त्यांच्या वतीने निर्णय घेऊ शकत नाही. मेंदू मोठा असणे बुद्धिमत्तेचे लक्षण असू शकते विवेकाचे असेलच असे नाही. मानवेतरांना म्हणजेच आम्हाला आमचे भले समजते; किंवा आमचे भले होईल एवढीच बुद्धी आम्हाला मिळाली आहे.  त्यामुळे आम्हाला गृहीत न धरता आमचे मत मांडण्याची संधी द्यावी, हक्क द्यावा…”

बगळा: “बाबा रे काय बिनसले तुझं … गाडी कुठे चालली तुझी ?”

कवडा: “अरे भारत नावाच्या देशात राहतो आपण… तिथले शासन लोकशाही पद्धतीने चालते…असं लिहिलं आहे न पुस्तकात …”

बगळा: “अरे पुस्तकातली वांगी/ वानगी पुस्तकात….. 

कवडा: पुराणातली वानगी असतात ती… पुराण पण ऐकतो का तू भाऊ …? 

बगळा: पुराण नाही पण आधी जिथे होतो तिथल्या एका शाळेतल्या मुलांना पुस्तकातली प्रतिज्ञा म्हणताना ऐकलं आहे मी एकदा…पण ती पाळण्यासाठी कुठे असते?

कवडा: ती प्रतिज्ञा पण अपुरी आहे……त्यात माणसं फक्त माणसांबद्दल बोलतात…त्यांचा आदर, सौजन्य, निष्ठा फक्त माणसापुरत्या मर्यादित आहेत. त्यात ते देश ह्या अजैविक घटकाशी निष्ठा राखण्याबद्दल बोलतात पण देश म्हणजे नक्की काय ह्याबद्दल त्यांना संभ्रम आहे असं दिसतं. 

बगळा: (संभ्रमात )“…….”

 कवडा: (तावात आलाआहे) “पर्यावरणातल्या डोंगर, दऱ्या, तलाव, नद्या ह्या अजैविक घटकांनादेखील अभिव्यक्त होण्याचा हक्क असला पाहिजे… ह्या तळ्याला…. हो… ह्या तळ्यालादेखील विरोध करण्याचा हक्क मिळाला पाहिजे… मला खात्री आहे ह्या तळ्याला ते कारंजं नकोय…त्याला कोणाहीसाठी अशा निर्बुद्ध करमणूकीचं साधन होण्याची इच्छा नाही. त्यापेक्षा ते नैसर्गिक पद्धतीनं जिवंत राहीलं तर खऱ्या, अकृत्रिम आनंदाचं प्रसारण होईल. तेथील नैसर्गिक वैविध्यातून निर्माण होणाऱ्या विस्मयशक्यतांमुळे नित्यनूतन अनुभूती येण्याची खात्री राहील; आणि तसेही जैवविविधता संवर्धनात जलपरिसंस्थांच्या पासंगालाही कोणी पुरत नाही…..अशा ह्या तळ्याच्या अमर्याद नैसर्गिक अंगभूत क्षमतांना डावलून, खच्ची करून ह्या करमणूकीच्या भलत्याच कामाला जुंपले आहे त्याला ..? व्हेरी सॅड …!”

बगळा: “भाऊ अनाकलनीय का काय म्हणतात तसा होतोय तू… !!”  

कवडा: (आश्चर्याने) “त्यात अनाकलनीय असं काय आहे?” 

बगळा: “…. आणि लोक पाहताहेत आपल्याकडे …!”

कवडा: (सगळ्यांना उद्देशून) “पहा लोकहो, तुमच्यापैकी अनेकांना हे कारंजं नकोय पण तरीही ते तुमच्यावर लादलं जात आहे. बघा… तुमच्या लोकशाहीचा कसा संकोच झाला आहे ते …  तिला विस्तृत करण्याची आणि तिची नवीन व्याख्या करण्याची वेळ आता आली आहे. … तुम्ही करत नसाल तर मी करतो… ‘लोकांनी लोकांसाठी आणि पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांचा, शाश्वत आणि समग्र विकास करण्यासाठी, त्यांच्या संतुलित परस्पर संबंधांना समजून घेत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही… !’ हं ही नवीन व्याख्या बरोबर आहे. ’(घुमतो) गुड गुड गुड… आता नवीन प्रतिज्ञासुद्धा लिहिली पाहिजे ….. !”(पुन्हा घुमतो) गुड गुड गुड…

बगळा: “आता वहिनींना शोधून आणतो….ह्याचं काहीं खरं दिसत नाही.” (जातो)

कवडा: (छाती काढून ताठ उभा राहतो) “भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत…..गुड गुड गुड…(खड खड खड मागे जेसीबीचा आवाज) त्याबरोबरच सगळे पशुपक्षीकिटकजलचरडोंगरझाडेदऱ्यानद्याओढेनाले हे पण माझे आप्त आहेत. माझ्या जैविक व अजैविक देशावर माझे प्रेम आहे…… गुड गुड गुड…(मागे खड खड वाढलेली) माझ्या देशातील वैविध्यपूर्ण भूभागामुळे समृद्ध झालेल्या आणि विविधतेने नटलेल्या निसर्गाचा तसेच परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक  ……. (आता धाड धाड धाड असा प्रचंड आवाज कवड्याच्या आवाजाला दाबून टाकतो आहे. त्या पार्श्वभूमीवर कवड्याचा नुसता अविर्भाव आणि शाळकरी हातवारे दिसत राहतात.)

नागपुर

अभिप्राय 7

 • खूप छान , वेगळा प्रयत्न , वाचताना मजा आली आणि अंतर्मुखदेखील झाले.
  कवडा आणि बगळा ……खूप वेगळा प्रयत्न….
  विकासाच्या सर्वसमावेशक व्याख्येची गरज आहे ….

 • खूसखूशीत ..मस्तच जमलाय संवाद.पाठ्यपुस्तकात असावा असा.

 • लोकांनी लोकांसाठी आणि पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांचा, शाश्वत आणि समग्र विकास करण्यासाठी, त्यांच्या संतुलित परस्पर संबंधांना समजून घेत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही…

  लोकशाहीची नवीन परिभाषा आवडली👍🏼

 • फार सुंदर लिहिलय

 • रूपकात्मक अशी ही छान गोष्ट वाचल्यावर माझ्या मनात जे विचार आले ते मांडतो आहे. निसर्गाचे संरक्षण आणि विकास या विषयावरची विविध मते आपणा सर्वाना माहित आहेत. त्यातील काही अशी: (१) निसर्गाला जवळ करून चंगळवादी समाजव्यवस्थेऐवजी वेगळी समाजव्यवस्था निर्माण करणे शक्य आहे. (२) आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने चालणारे लोकांच्यासाठी झटणारं, कल्याणकारी राज्य उभं करण्यासाठी एक चळवळ उभी केली पाहिजे.((3) प्रदूषण कमी करणे, रोजगार वाढवणे आणि कामातला आनंद वाढवणे हा आणि हाच उद्देश समोर ठेवून उद्योगांचे आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे नियोजन करणे त्यात निर्माण होणाऱ्या वेस्टचा निचरा योग्य तऱ्हेने करणं अशा तऱ्हेच्या पर्यायी विकासनीतीसाठी आपण एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे. 
  माझ्या मते सद्य परिस्थितीत वरील सर्व गोष्टी करणे जरुरीचे वाटले तरी ही मते आदर्शवादी वाटतात. मला येथे आग्रहाने सांगावयाचे आहे की व्यावहारिक  विचार न करत कोणतेच आर्थिक धोरण आणि  विकासाच्या संकल्पना राबवता येणार नाहीत. 

 • दोन पक्षांच्या संभाषणातून विकासाच्या नांवानें पर्यावरणाच्या ह्रासा विषयी खूपच छान विश्लेशण केलेले आहे. भौतिक विकासासाठी धरणं बांधली, पण धरणांमुळे विस्थापित झालेल्या गरीब आदीवासिंचे पुर्नवसन करण्यात टाळाटाळ केली, हे सत्यच आहे. औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणाय्रा विजेसाठी थर्मल पाँवरप्लांट प्रस्थापित केले. पण त्यासाठी आवश्यक असलेल्या कोळशासाठी जंगलं उध्वस्त करून पर्यावणाचा ह्रास केला. मानवाचिच नाही, तर पशु-पक्षांची निवास स्थानं उध्वस्त केली. आपला देश विषुवव्रुत्तीय प्रदेशात आहे. जवळ जवळ बारा महिने भरपूर उन असते. कच्छचे रणही अस्तित्वात आहे. पण स्वातंत्र्य प्रप्तीनंतर पांच,सहा दशकं सत्तेवर असलेल्या सरकारच्या मनात सौर उर्जेची कल्पना आली नाही. थर्मल पाँवरमुळे ग्लोबल वाँर्मिंग होऊन आपल्या देशातील पर्जंन्यमानावर विपरित परिणाम झालेला आहे. पावसाळा अनियमित झाल्यामुळे नद्यांच्या पुरांमुळे मनुष्य आणि वित्त हानी होत असते. पत आता विद्यमान बीजेपी सरकारने कच्छच्या रणात मोठ्या प्रमाणात सौर उर्जा प्रकल्पाचा पाया घतला आहे. २००९ साली दिवंगत पंतप्रधान बाजपेयिंनी प्रस्तावित केलेला,पण काँग्रेसी सरकारच्या काळात गुंडिळलेला नदी जोड प्रकल्प कार्यंन्वित होत आहे. ज्यामुळे वाँटरवेज् निर्माण होऊन रस्त्यावरील वहातुकीला पर्याय निर्माण होऊन कार्बनमोनाक्साईडचे प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. पण सत्ता गमवून बसलेले लोक मोदिंच्या नांवाने बोंबाबोंब करत आहेत. पण आता भारतीय जनता सुजाण झाल्यामुळे खरी लोकशाही प्रस्थापित झाली आहे. तरीही तथाकथित विचारवंत लोकशाहीचा ह्रास होत अहल्याची ओरड करताना दिसत आहेत. कालाय तस्मै नमः

  वा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.