नीतिशास्त्राचा आधुनिक परिचय – प्रस्तावना

‘आजचा सुधारक’चा ऑक्टोबर, २०२२ चा अंक नेहमीप्रमाणे अतिशय वाचनीय आणि चिंतनीय झाला आहे, हे निःशंक आहे. त्यासाठी मी लेखक आणि संपादक यांचे मनापासून अभिनंदन करतो. 

या अंकात तात्त्विक (Philosophical) अंगाने बरेच लेखन आढळते. विश्वविख्यात तत्त्ववेत्ता बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell, जन्म:१८ मे १८७२-०२ फेब्रुवारी १९७०) याच्या ‘A Philosophy for Our Time’ या लेखाच्या श्रीधर सुरोशे यांनी केलेल्या ‘आपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान’ या अनुवादापासून ‘दुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं…?’ या साहेबराव राठोड यांच्या पत्रलेखनापर्यंत बहुतेक लेख तात्त्विक स्वरूपाचे आहेत. चिंतनाला प्रवृत्त करणारे आहेत.

या सर्व लेखांमध्ये काही लेखांचा केंद्रबिंदू ‘नीती’ हा विषय आहे तर काहींच्या परीघावर ‘नीती’ चा उद्घोष आढळतो. ‘A Philosophy for Our Time’ या १९५३ मधील लेखाचे मराठी अनुवादाचे काम २०२२ मध्ये, म्हणजे ६९-७० वर्षांनी का होईना पण होते आहे, हेही काही कमी नाही. हा लेख १९५३ चा असला तरी ‘आपला काळ’ ही गोष्ट केवळ त्या काळापुरती म्हणजे १९५३ चे आधीचे किंवा नंतरचे दशक अथवा विसावे शतक असा नसून ज्या ज्या काळात तात्त्विक समस्या निर्माण होतील त्या काळाकरता आहे. जणू त्याचाच एक भाग असावा किंवा विस्तार असावा, या भूमिकेतून कळत-नकळत इतर सारे विषय या अंकात आले असावेत.

नीतीचा सर्वांगीण तार्किक व ज्ञानात्मक विचार करणारी मानवी ज्ञानाची शाखा म्हणजे नीतिशास्त्र (Ethics). “चांगले म्हणजे काय?” (What is Good?) ही नीतिशास्त्राची मूलभूत समस्या आहे. नीतिशास्त्राचे स्वरूप आणि प्रयोजन याविषयी तत्त्ववेत्त्यांमध्ये मूलभूत मतभेद असतात. अर्थात ‘कशाला’ चांगले म्हणावे आणि ज्या कशास ‘चांगले’ म्हंटले जाते त्याला ‘चांगले’ कां (?) म्हणावे; त्याहून ‘अन्य कशाला’ कां म्हणता येत नाही, किंवा म्हटलेच असेल चांगले, तर ज्याला चांगले म्हटले त्या मूळ गोष्टीचा चांगुलपणा ‘कमी’ तर होणार नाही ना? अशा वेळेस ‘दोन्हींनाही’ मग चांगले’च’ म्हणायची वेळ आलीच तर ‘चांगले’ ही जी काही गोष्ट आहे ती ‘दोन्हींनाही’ वापरता येईल इतकी मोठी, व्यापक आहे की नाही? की केवळ पहिल्याला‘च’ वापरण्याइतपत ‘चांगले’ ही गोष्ट स्वरूपाने व प्रमाणाने अल्पस्वल्प आहे? असे बरेच प्रश्न निर्माण होतात. हे सारे प्रश्न नीतीचे स्वरूप आणि तिचे प्रयोजन म्हणजे हेतू स्पष्ट करणारे आहेत.

नीती, नैतिकता, नीतिमत्ता या संकल्पना आणि नैतिकतेशी जोडल्या गेलेल्या इतरही अनेक संकल्पना माणसाच्या आयुष्यात अतिशय वादग्रस्त ठरत आल्या आहेत. जशा की कर्तव्य, जबाबदारी, बंधन, बांधिलकी, त्याग, न्याय, समता, निष्ठा, देशप्रेम, धर्म, धार्मिकता, प्रेम, मैत्री, करुणा इत्यादी. नीती हा केवळ आचरणाचा विषय नाही. तो ज्ञानाचाही विषय असतो, याचे भान जागे करणे, ते विकसित करणे, त्याबद्दल सातत्याने चिंतन करणे, हा समाजाच्या नैतिक विकासाचा पाया असतो. ही जाण ‘आजच्या सुधारक’ च्या ऑक्टोबर, २०२२ च्या अंकातील लेखांची शीर्षके वाचता अनुभवास येते. त्यात काही मूळ लेखन आहे, काही अनुवाद आहेत, तर एक कथाही आहे. ‘नीती’ या संकल्पनेची अपरिहार्य सांगड ज्या ज्या वर्तन व्यवहाराशी घालता येते त्यातील काही निवडक वर्तनव्यवहारांची प्रतिबिंबे या शीर्षकात, पर्यायाने त्या विषयात किंवा लेखात आढळतात.

न्याय, न्यायव्यवस्था, न्यायाचे दार, दुर्बलांसाठी न्याय, विवाह व विवाहबाह्य संबंध, संविधान, धार्मिकता, न्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज, नीतिविचार, बदलती नीती, नीतीचे मूळ, नीतिशास्त्राचे मूळ ह्या साऱ्या संज्ञा परस्परांशी केवळ निगडितच नाहीत तर त्यांचे अंतर्निहित नाते आहे. ते अधोरेखित केले पाहिजे. 

‘आजचा सुधारक’च्या उल्लेखित अंकात विवाहसंबंधी दोन लेख आहेत. ते नैतिक परिप्रेक्ष्यातून लिहिले गेले आहेत. ‘अनैतिक संबंध म्हणजे विवाहबाह्य संबंध’ अशी आवडती संकल्पना होती. ‘नीती केवळ विवाहातच असते आणि अनैतिकता केवळ विवाहबाह्य संबंधातच असते’ हा समज अजूनही आहेच. ‘विवाह आणि नीती’ ही मानवी जीवनातील गंभीर नैतिक समस्या असल्याचे जाणवल्यानेच तर बर्ट्रंड रसेलने ‘Marriage and Morals’ लिहिले. त्याचे ज्ञानात्मक गांभीर्य आणि उत्कटता दियंच्या जीवनसाथी आणि विवेकवादी विचारवंत प्रा. श्रीमती म. गं. नातू (जन्म: ११ नोव्हेंबर १९१९, मृत्यू: ०२ एप्रिल १९८८) यांना जाणवली. म्हणून तर त्यांनी त्याचे मराठी भाषांतर केले. 

पण नीतीला केवळ विवाहसंस्थेपुरते मर्यादित करणे योग्य नव्हे, हे तर उघडच आहे. जितके नीतीचे क्षेत्र व्यापक तितकेच अनीतिचेही क्षेत्र व्यापक असते. हजारो वर्षांपूर्वीच त्याचा शोध मानवाला लागलेला होता. अन्यथा भारतीय रामायण व महाभारत (इ.स.पूर्व १२०० ते १४००), चिनी महाकाव्य “यी-जिंग्” (The Yi-Jing: the Book of Changes इ. स. पूर्व १२००) आणि ग्रीक कवी होमर ( Homer इ. स. पूर्व अंदाजे ९०० ते ८००) चे “इलियड” (The ILIAD) आणि “ओडिसी” (The ODYSSEY) या दोन प्रदीर्घ काव्यकथा व हेसिऑड ( Hesiod इ. स. पू. ७५०- ६५०) चे मुख्यतः ‘थिऑगनी’ (The Theogony– देवांची वंशावळ आणि Cosmogony विश्वनिर्मिती), या तीन हजार वर्षापूर्वींच्या महाकाव्यांमध्ये नैतिकतेचे धडे, त्याची परिष्कृत सखोल गंभीर चर्चा आली नसती. 

उदाहरणार्थ पाहा: होमरच्या नावाचा ग्रीक उच्चार ‘होमेरोस’ किंवा ‘होमेरॉस’ (Homeros) असा होतो. ‘Homeros’ अर्थ ‘ओलिस’, ‘ओलिस ठेवलेला माणूस’ किंवा ‘तारण म्हणून दिलेली वस्तू’ वा ‘सुरक्षा’ असा होतो. तो जन्मांध आणि निरक्षर असावा असेही म्हटले जाते. असे नाव का ठेवले गेले असेल बरे? याचा अर्थ ओलीस ठेवणे हा राजकीय किंवा सत्ता राबविण्याचा मार्ग असावा, अशी समाजव्यवस्था असेल का? मग ते नैतिक की अनैतिक समजले जात होते? 

नीतीचे क्षेत्र केवळ विवाह नसून ते सर्वव्यापी आहे. सुधारकच्या याच अंकातील ‘नीतीचे मूळ’ आणि ‘नीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत?’ हे लेख माणसाच्या नैतिक वर्तनाच्या उगमाचा शोध घेणारे आहेत. ‘नीतीचे मूळ’ या लेखात लेखक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ‘चार लाख वर्षांपूर्वी’ नीतीचा उगम झाल्याचा दाखला दिला आहे. 

सामाजिकदृष्ट्या साधारणतः नीतीचा उगम ‘माझ्याशिवाय दुसरा अस्तित्वात आला, माझा सहसोबती झाला’ की निर्माण होतो. मी इतरांशी कसे वागावे? ही नीतीची मूलभूत समस्या असते. पण येथे आणखी एक प्रश्न आहे. “मी माझ्याशी कसे वागावे?” ही नैतिक समस्या असू शकते का? मी माझ्याशीच नैतिक वागू शकतो का? ‘मी नैतिकच वागतो’, किंवा ‘मी सगळं बरोबरच करतो’ ही श्रद्धा आहे की पुरेसा पुरावा असणारा विश्वास आहे? ‘मी माझ्या प्रकृतीची काळजी न घेता मरमर काम करत असेन तर ते माझे माझ्याशी वागणे नैतिक की अनैतिक?’ किंवा उदाहरणार्थ ‘मी असाध्य आजाराचा बळी असताना दयामरणाची इच्छा करावी का?’ ‘मी कोणत्याही कारणाने आत्महत्या करावी का?’ कामुच्या मते तर ‘जीवनात केवळ एकच खरा तत्त्वज्ञानात्मक प्रश्न आहे आणि तो म्हणजे आत्महत्या’ (There is but one truly serious philosophical problem, and that is suicide: The Myth of Sisyphus). आता, ‘सल्लेखना’ आत्महत्या आहे का? स्थितप्रज्ञता ही नैतिक भूमिका आहे का? निर्वाण, मोक्ष, मुक्ती, कयामत ही पूर्ण खासगी की व्यक्तिगत नीती आहे? खासगी आणि व्यक्तिगत (private or personal) यात कोणता फरक आहे? हे व असे सारे प्रश्न नैतिक आहेत की असावेत की नाहीत आणि नसावेत? 

मोहनदास करमचंद गांधी हा नैतिकतेचा मानदंड मानला जातो का? त्याला न पाहिलेला माणूसही जणू त्याला रोज भेटल्यासारखा का बोलतो? ‘मला भेटलेले गांधी’ असे का व्यक्त व्हावेसे वाटते? पण तोच गांधी जगातून नाहीसाच करण्याइतका भीतिदायक का वाटावा? हा माणूस नाहीसा होऊनही त्याची भीती वाटावी इतकी भीती काहीजणांना का वाटते? अहिंसेची भीती वाटावी, अशा सुप्त भीतीचे रहस्य कोणते आहे? भीती ही नैतिकतेची प्रेरणा असते की हिंसेची? ‘धर्म’ जर नैतिकतेचा आविष्कार असेल तर ‘धर्माचे मूळ भयात आहे’ असे का म्हटले जाते? ईश्वराचा आणि नैतिकतेचा संबंध कोणता असतो? “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी I कर कटावरी ठेवोनिया” हे वर्णन अहिंसक, नैतिक का वाटते? हे व असे कितीतरी प्रश्न नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करतात. ज्या ज्या क्षेत्रात कायदा, वैद्यक-औषध निर्माण, शिक्षण, प्रशासन, लष्कर, युद्ध, धरणे, स्थलांतर, कुटुंब, राज्य, देश, आंतर्देशीय संबंध, संपूर्ण जग किंवा मानवी जीवनातील विविध सामाजिक-राजकीय विज्ञाने इत्यादी प्रत्येक क्षेत्रातील नीतीची परिभाषा एकमेकींहून भिन्न आहे, नीतीचे स्वरूप त्यानुसार बदलत राहाते. तेथील नैतिक समस्या सोडविण्यासाठी केवळ नीतितज्ञ पुरेसा नसतो तर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचीही गरज असते. 

माणसाचे कल्याण आणि माणसाची कर्तव्ये यांच्यातील परस्परसंबंधाचे ज्ञान करून देणे, हा नीतिशास्त्राचा हेतू आहे, असे पाश्चात्त्य परंपरेत मानले जाते. परिणामी नीतीचा विकास हा ‘ज्ञान’ या क्षेत्राच्याही विकासाचा पाया असतो. मानवी कल्याण आणि कर्तव्ये यांच्या अंतर्निहित नात्याचे ज्ञान करून देणे, याचा अर्थ ‘एखाद्या विशिष्ट माणसाने विशिष्ट प्रसंगी काय करावे याविषयीचा सल्ला देणे, उपदेश करणे हे नीतिशास्त्रज्ञाचे काम असते’, असा नाही; तर या प्रकारचे निर्णय ज्या मूलभूत सामान्य तत्त्वांना अनुसरून घेतले पाहिजे, ती सामान्य तत्त्वे स्पष्ट करणे आणि त्यांचे प्रामाण्य सिद्ध करणे, हे नीतिशास्त्राचे कार्य आहे, असा अर्थ आहे. 

भारतात  एकेकाळी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, लिंगभेद नैतिकच मानले जात होते. त्यात कुणाला आक्षेपार्ह वाटू नये, अशी मनोरचनाव्यवस्था, विचारव्यवस्था हजारो वर्षे होती. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ही आश्रमव्यवस्था आणि धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही पुरुषार्थव्यवस्था यांच्या माध्यमातून ‘कुणालाही आक्षेपार्ह वाटू नये’ याची काळजी घेतली गेली. ही ‘पद्धतिशास्त्रीय साधने’ (methodological instruments) सहजतेने वापरली गेली. पण बुद्धापासून तिला आव्हान दिले जाऊनही ती टिकण्याची कारणे केवळ राजकीय वा सामाजिक होती की नीति-अनीतीच्या संकल्पनांमध्येही होती? मग अचानक तिच्याविरुद्ध एकोणिसाव्या-विसाव्या शतकात बंड का झाले? त्यासाठी कोणते ‘नैतिक मानदंड’ उपलब्ध झाले? 

एखादा नीतिमान प्रेषित किंवा प्रतिभावंत कवी, माणसाच्या नैतिक समस्यांचे मर्म उघड करणारा दृष्टिकोन प्रभावी रीतीने मांडताना अनेकदा आढळतो. पण प्रेषित, कवी आणि नीतिशास्त्रज्ञ यांच्या कार्यात फरक आहे. नीतिशास्त्रज्ञ नैतिक तत्त्वांची व्यवस्था लावण्यासाठी पद्धतशीर तार्किक युक्तिवाद करतो. प्रेषित किंवा कवी असे युक्तिवाद करीत नाहीत. या फरकामुळे ‘प्रेषिताचा संदेश’ किंवा ‘कवीची नैतिक शिकवण’ यापेक्षा ‘तात्त्विक नीतिशास्त्रा’चे (Philosophical Ethics) स्वरूप वेगळे ठरते.

‘तात्त्विक नीतिशास्त्र’ म्हणजे तत्त्वज्ञानाची अथवा तत्त्वचिंतनाची सारी उपकरणे उपयोजनात आणून रचलेले नीतिशास्त्र. ती तत्त्वज्ञानात्मक चिंतनाची (Philosophical Contemplation) प्रक्रिया असते. या चिंतनात सकृतदर्शनी साध्या दिसणाऱ्या संज्ञांचे अर्थ काटेकोर आणि अचूक होतात. ते अर्थ एकतर वाचक-लेखकाला माहीत नसतात किंवा संज्ञांच्या तांत्रिक अंगांकडे दुर्लक्ष झालेले अथवा केलेले असते. या संज्ञा जशा सामान्य चर्चाविश्वातील वापरात ज्या सहजतेने झिरपतात तसे त्यांचे काटेकोर तांत्रिक अर्थ आणि त्याविषयीची जाणिव मात्र त्याच उत्कटतेने झिरपत नाहीत. मग निर्माण होतो तो एक अर्थचकवा. या ‘अर्थचकव्या’च्या निर्मितिप्रक्रियेत कोणाचीही फारशी चूक नसते. पण जाणकाराने चकव्याची जाणीव विकसित करणे, हे त्याच्या बौद्धिक व वैचारिक सुरक्षिततेसाठी आवश्यक ठरते. 

‘आजचा सुधारक’चे कर्ते प्रा. दि.य.देशपांडे (जन्म: २४ जुलै १९१७, मृत्यू: ३१ डिसेंबर २००५) यांनी पहिल्या अंकापासून ‘आसु’च्या वाचकांना ‘विवेकवाद’ (एप्रिल १९९०) आणि ‘नीतिशास्त्राचे प्रश्न’ या लेखमालिकांमधून अशा प्रकारचे चिंतन करण्याचे पाठ दिले होते. तथापि या घटनेला आता तीस वर्षे झाली. दरम्यानच्या काळात तत्त्वज्ञानाच्या जगात आणि एकूण वैचारिक विश्वात जागतिक पातळीवर बरेच बदल झाले आहेत. परिवर्तन हा जगाचा नियमच आहे, यातही शंका नाही. साहजिकच तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तात्त्विक चिंतनपद्धतीमध्ये भाषा, परिभाषा, मांडणी, रचना, तर्कशास्त्र, ज्ञानाची उपकरणे, मूल्यात्मक परिवर्तन असे अनेक पातळ्यांवर बदल झाले. सामाजिक विज्ञान, निसर्गविज्ञान आणि मानव्यविज्ञान यात प्रगती झाली. शिवाय गेल्या दशकात ‘मुक्त शिक्षण पद्धती’ (Liberal Arts) ही मध्ययुगीन शिक्षणपद्धती नव्याने, नव्या रूपात रुजू झाली. पारंपरिक विद्यापीठीय पठडीतून ‘तत्त्वज्ञान’ हा विषय बाहेर फेकला जात असला किंवा दुर्लक्षित केला जात असला तरी या नव्या ‘मुक्त शिक्षणपद्धती’मध्ये नव्या नैतिक समस्यांना जागा देणे तेथील शिक्षणतज्ञांना अपरिहार्य झाले. एकूणातच वैज्ञानिक, मानव्य आणि सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रात ते अपरिहार्य झाले आहे. याचाच अर्थ नीतीच्या; अनुषंगाने तात्त्विक चिंतनाच्या क्षेत्रात विविध तऱ्हांच्या आणि प्रकारांच्या चिंतनपद्धतींचे उपयोजन केले जात आहे. नैतिक प्रश्न उग्र होत आहेत. त्याचेच अल्पसे प्रतिबिंब ‘आसु’च्या ऑक्टोबर २०२२ च्या अंकात दिसून येते. ‘नीती’ची ही उपयोजितता (applicability) अधोरेखित करता आता नीतिशास्त्राचा  नव्याने परिचय करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. हा परिचय नव्या परिभाषेत करून देणे, नव्या संदर्भात व नव्या संदर्भासह देणे ही काळाची गरज आहे. असे सातत्याने घडणार आहे. नव्या परिचयाची गरज नेहमीच भासत असते. हा परिचय लेखमालिकेच्या रूपात या लेखापासून देत आहे. प्रस्तुतचा लेख “प्रस्तावना लेख” आहे.

तथापि या परिचयाचे स्वरूप ‘प्रत्येक क्षेत्रातील नैतिक समस्यांचा परिचय’ या स्वरूपाचे नाही. हा परिचय ‘नीतिशास्त्र’ या विषयाच्या स्वरूपाचा परिचय आहे. नीतीचा विचार करताना ज्या नव्या शाखा-उपशाखा निर्माण होत गेल्या, त्यांचे स्वरूप कसे आहे, याचा हा परिचय असेल. त्यांचे उपयोजन करून कोणत्याही विचारकर्त्याला त्या त्या क्षेत्रातील नैतिक समस्यांचा विचार करता येईल. तत्त्वज्ञानाचा अध्यापक आणि अभ्यासक या भूमिकेतून मी हा परिचय ‘विषयाचा परिचय’ या अर्थाने देत आहे. उदाहरणार्थ ‘वैद्यकीय नीती’चा परिचय मी एकट्याने करून देणे उचित होणार नाही, त्याकरिता त्या क्षेत्रातील तज्ञाची मदत गरजेची आहे. पण प्रारंभ या स्वरूपात ‘वैद्यकीय नीती’ चा विचार कसा करता येईल, याची तात्त्विक मांडणी करता येणे मात्र शक्य आहे. 

प्रस्तुत अंकातील या ‘प्रस्तावना लेखा’पासून हा परिचय देत आहे. हाही परिचय वरील नियमानुसार म्हणजे ‘नवा परिचय नव्या परिभाषेत करून देणे, नव्या संदर्भात व नव्या संदर्भासह देणे ही काळाची गरज आहे. असे सातत्याने घडणार आहे….’ या नियमानुसार जुना झाला की तेव्हा त्या भावी काळातील कुणीतरी आस्थेवाईक तज्ज्ञ पुन्हा नवा परिचय देईलच. त्याच्या स्वागताची तयारी आतापासून केली पाहिजे.

लेखक तत्त्ववेत्ते, व्यावसायिक समुपदेशक-सल्लागार, अनुवादक आहेत. 
मोबाईल क्र. 915 865 8066

अभिप्राय 3

  • प्रस्तावनेने फार मोठ्या अपेक्षा मनात निर्माण झाल्या आहेत. हा गंभीर विषय सोप्या भाषेत समजून घेताना माझा आली. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहोत.

  • मी एक एमपीएससी करणार विद्यार्थी आहे आम्हाला जीएस वर म्हणून नीतीशास्त्र हा विषय आहे त्या संदर्भात आपल्याकडं काही मदत होईल का त्या कुठले पुस्तक वाचावे याबद्दल माहिती हवी आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.