मानवाची शहरनिर्मितीची प्रक्रिया किमान आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून ह्या प्रक्रियेच्या उगमाचा, विस्ताराचा शोध घेण्याची सुरुवात झाली. आज जगभरात प्राचीन-ऐतिहासिक शहरांचे अवशेष नवनवीन ठिकाणी सापडत आहेत. ही प्रक्रिया कशी, कुठे, केव्हा-केव्हा सुरू झाली, त्यामागच्या मानवी प्रेरणा काय होत्या, ह्याचा शोध अजूनही चालू आहे. शहरांनी त्यांच्या प्रदेशातील संस्कृतींमध्ये काय योगदान दिले? मानवी उत्क्रांतीमध्ये त्यांचे महत्त्व काय? शहरे भरभराटीला येऊन नष्ट का झाली? आधी शहरे निर्माण झाली आणि नंतर खेडी की आधी खेडी, आणि मग शहरे असा क्रम होता? शहरांमधील समाज एकमेकांशी संपर्कात होते का? असल्यास कसे? तसेच शहरांचे स्थानिक, प्रादेशिक आणि दूरवर परिणाम होत होते का? शहरांचे निसर्गाशी नाते कसे होते? असे अनेक प्रश्न घेऊन पुरातत्वशास्त्रज्ञ माहिती जमा करीत आहेत. अनेक तथ्य , सिद्धान्त मांडत आहेत.
गेल्या काही शतकांमध्ये जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढली, स्थलांतर वाढले, जगभरातील शहरांची संख्या झपाट्याने वाढली. वेगवेगळे लोकसमूह शहरांमध्ये येऊ लागले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक ताणतणाव वाढले. शहरे बकाल झाली. जागतिक पर्यावरणावर तीव्र परिणाम दिसायला लागले. एकेकाळी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे निसर्गामध्ये सामावून जाणाऱ्या शहराचे स्वरूप अलीकडच्या दोन दशकांमध्ये पूर्ण बदलले आहे. शहरांनी निसर्गावर वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमण केले आहे. लोकांचा निसर्गाशी असलेला संबंधच क्षीण झाला आहे.
सतत प्रवाही असणारी निसर्गाची गुंतागुंतीची रचना लाखो वर्षांपासून घडत-बिघडत आली आहे. त्यामध्ये काही जीवजाती नष्ट झाल्या आहेत तर काही उत्क्रांतीच्या निसर्गनिवडीच्या प्रक्रियेतही तगून राहिल्या आहेत. पृथ्वीवर अवतरलेली मानवजात त्यामानाने नवीन आहे. बाल्यावस्थेत आहे. निसर्गनिवडीची प्रक्रिया आत्मसात करत काही हजार वर्षांमध्ये तगून राहिली आहे. अलीकडच्या काही शतकांमध्ये संख्येने खूप वाढली आहे. मेंदू, तर्कबुद्धी, भावना आणि शरीराची उत्क्रांती होत मानवजात पृथ्वीवर यशस्वी होऊन वाढली आहे. निसर्गातील भटक्या जीवनसंस्कृतीपासून देवाणघेवाण, सहकार्य करीत, शेती आणि आता शहर संस्कृतीमध्ये मानवाने प्रवेश केला आहे. शेती आणि शहरांनी मानवी समाजाला वेगळे परिमाण दिल्यामुळे आज मानव यशस्वी झाल्याचे दिसते आहे. पण हे यश चिरस्थायी आहे का, हा प्रश्न मनाला भेडसावूं लागला आहे. काही हजार वर्षे घडत आलेली शहरे आज संकटात सापडत आहेत. निसर्ग आणि मानवी समाजांच्या व्यवस्था गुंतागुंतीच्या आहेत. कधी पूरक तर कधी एकमेकांसाठी घातक ठरल्या आहेत. सध्या दोन्हींमध्ये उलथापालथ सुरू आहे. त्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण होऊन धोक्याच्या घंटा वाजत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर शहरे आणि निसर्ग ह्यांच्यातील नातेसंबंधांचा वेध ह्या लेखामध्ये घेतला आहे.
निसर्गातील शहरे
काही महिन्यांपूर्वी मी इजिप्तला गेले होते. जुन्या इजिप्तशियन संस्कृतीचे, शहरांचे, भव्य पिरॅमिड्स, देवळे, आणि चित्र आणि शिल्पकला अशा सर्व संचिताचे अनुभव घेण्याची इच्छा तर होतीच. परंतु त्याहीपेक्षा नाईल नदीच्या काठी भरभराटीला आलेल्या ह्या प्राचीन संस्कृतीच्या सभोवतालचा वाळवंटी प्रदेश, नाईल नदी, आणि मानवाने तेथे निर्माण केलेली लक्झॉर, मेम्फिस, कैरो, अलेक्झांड्रिया अशी शहरेही बघायची होती. पाच वर्षांपूर्वी मेक्सिको इजिप्तपासून हजारो मैल दूर, समुद्राच्या पार दक्षिण अमेरिकेच्या वाळवंटी प्रदेशातील शेकडो पिरॅमिड उभारणारी संस्कृती अनुभवली होती. तेथील तिऊतिआन ह्या प्राचीन राजधानीच्या शहरात अनेक लहान-मोठी, उंचावर मोठी सपाट गच्ची असलेली पिरॅमिड्स बघितली. मोठ्या तलावाच्या मध्यावर, एका बेटावर वसलेले मेक्सिको शहर बघितले. चिचेन ईतझा ह्या प्रसिद्ध जुन्या शहरातील खगोलदर्शनासाठी आणि अभ्यासासाठी बांधलेले पिरॅमिड बघितले. अलीकडेच लायडर तंत्रज्ञानाच्या मदतीने दक्षिण अमेरिकेतील दाट जंगलांच्या प्रदेशात मानवनिर्मित पिरॅमिडची आणि वास्तूंची माहिती जमा केली जात आहे. दहा वर्षांपूर्वी पेरू देशात तेथील डोंगराच्या माथ्यवर वसलेले आणि गेल्या शतकातच संशोधकांना सापडलेले माचूपिचू शहर बघितले होते. कुस्को हे चारीबाजूने डोंगरांनी वेढलेल्या दरीमधील शहर बघायला मिळाले होते. गेल्या दोन शतकात आधुनिक शहरांच्या निर्मितीबरोबरच प्राचीन शहरांचा शोध घेणारे पुरातत्व संशोधन, शहरे आणि नागरीकरण ह्या विषयांना महत्त्व आले आहे. प्राचीन शहरे निर्माण होऊन पुढे नष्ट का होत, ह्याचा शोध आज शाश्वत शहरनियोजनाच्या अंगाने महत्त्वाचा झाला आहे.
निसर्गातील भारतीय शहरे
भारतामध्ये भौगोलिक विविधता असलेल्या सर्वच प्रदेशांमधील लहानमोठी शहरे काही हजार वर्षांपासून वसविली जात होती. सिंधू संस्कृतीच्या काळात, पहिल्या शहरीकरणाच्या पर्वामध्ये उत्तर भारतामध्ये भरभराटीला आलेली अनेक शहरे काळाच्या ओघात पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामानाने दक्षिण भारतामधील नागरीकरण आणि नागर संस्कृती सुरक्षित आणि स्थिर असाव्यात. भारतामधील पुरातत्वशास्त्रज्ञ भारतामधील नागरीकरणाच्या ह्या प्रक्रियेचा शोध घेत आहेत.
बुद्ध धर्माच्या प्रसाराच्या शहरीकरणाच्या दुसऱ्या पर्वामध्ये (इस.पूर्व ६ ते इ.सन ४) निर्माण झालेल्या अनेक व्यापारी मार्गांवरील शहरांचा शोध अजूनही अपुरा आहे. सांची, नालंदा, ह्या ठिकाणी संशोधन झाले असले तरी, ओरिसामध्ये अलीकडेच शोध घेतलेल्या रत्नागिरी, उदयगिरी, ललितगिरी ह्या इ.सन १ ते १३ मध्ये भरभराटीला आलेल्या नागरीकरणाचा शोध अजून बाल्यावस्थेत आहे. दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी, विशेषतः तामिळनाडूमध्ये कीझाड़ी येथे अलीकडच्या काळात उत्खनन झाले आहे. भारताच्या इतिहासात नागरी शहरांच्या निर्मिती व विस्ताराची तसेच शहरांच्या ऱ्हासाची अनेक उदाहरणे आहेत, त्यामागची विविध कारणे अजून अज्ञात असली तरी येथील नागरीकरणाच्या प्रक्रियेत चढ-उताराचे सातत्य दिसते. भारतखंडामधील शहरे एकमेकांशी आणि ग्रामीण संस्कृतीशी विविध प्रकारे जोडलेली असत. एकमेकांवर अवलंबून असत. त्यांच्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित साधनसंपत्तीची, संकल्पना आणि विचारांची, ज्ञान आणि बांधकाम आणि इतर उत्पादन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असे. त्यासाठी जमीन आणि जलमार्गांचा विकास आणि विस्तार सातत्याने होत असे.
भारतामध्ये सर्व प्रदेशांमध्ये, काही हजार वर्षांपासून शहरांची निर्मिती होत असताना भूगोल, निसर्गातील साधनसंपत्ती आणि विशेषतः मान्सूनच्या पावसाचे भान ठेवून शहरे वसविली जात. त्या सर्वांसाठी पाणीव्यवस्थापन हे मूलभूत महत्त्वाचे होते. समुद्र, लहान-मोठ्या नद्यांच्या काठावर वसलेली, सह्याद्रीच्या, हिमालयाच्या, सातपुड्याच्या, निलगिरीच्या डोंगरांवर आणि दऱ्याखोऱ्यात वसलेली, लडाखच्या वाळवंटात आणि काश्मीरच्या निसर्गरम्य परिसरात, राजस्थानातील वाळवंटातात, पठारांवरील जंगलामध्ये वसलेली लहान-मोठी शहरे पाण्याच्या व्यवस्थापनेच्या आधारे वसवलेली दिसतात. प्रत्येक शहराच्या भोवतीचा निसर्ग वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक प्रदेशात मानवी जीवनासाठी आवश्यक अशा साधनसंपत्ती आहेत, तशाच काही त्रुटी होत्या आणि आजही आहेत. प्रत्येक ठिकाणी निसर्गातील उपलब्ध साधने वापरून आणि कमतरतांवर मात करून शहरांच्या रचना केल्या आहेत. त्यांना नैसर्गिक (organic) शहरे म्हणता येईल. तेथील नगररचना, वास्तुरचना, शिल्पकला-हस्तकला ह्यांमध्ये सहजस्फूर्तता दिसते. अशी शहरे जलमार्गांनी, जमिनीवरील मार्गांनी एकमेकांना जोडून विविध प्रकारच्या साधनसामुग्री आणि मानवनिर्मित वस्तूंची देवाणघेवाण करून एकमेकांच्या कमतरता दूर करीत. त्याचबरोबर माहिती, मानवी संकल्पना, तंत्रे आणि भाषांची देवाणघेवाणही अशा व्यापारातून होत असे. शहरांच्या आजूबाजूला पसरलेल्या ग्रामीण भागातील अन्नधान्य साठवणे, त्यांची देवाणघेवाण करण्याचे महत्त्वाचे काम अशा शहरांच्या बाजारांमधून होत असे. त्यासाठी गोदामे असत, आर्थिक व्यवस्था असे. विविध प्रकारच्या संपत्ती-संचयाची ठिकाणे म्हणून शहरांना महत्त्व असे.
बहुतेक शहरे प्रादेशिक आणि सामाजिक व्यवस्थापनेची, धर्मप्रसाराची महत्त्वाची केंद्रे असत. राजे, सरंजामदार तेथे एकत्रित येत. तसेच संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारीही अशा शहरांवर असल्याने त्यासाठी तटबंदी असे. सैन्य तैनात केले जाई. ज्ञान आणि तंत्रज्ञान निर्मितीची, नवनिर्माणाची, शिक्षणाची महत्त्वाची केंद्रे असत. दूरदूरच्या प्रदेशांमधील लोकही त्याकडे आकृष्ट होत. नालंदासारखे शहर आद्य विद्यापीठासाठी जगात प्रसिद्ध होते ते त्यामुळेच. एकंदर बघता भारतीय उपखंड हा विविध प्रकारच्या शहरांच्या निर्मितीमध्ये अग्रेसर होता. युरोप आणि मध्यपूर्वेतील देशांशी, आफ्रिका खंडातील देशांशी तसेच पूर्वेकडील चीन, मलेशिया, इंडोनेशिया अशा प्रदेशांशी भारतामधील पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरच्या बंदरांच्या लहान-मोठ्या शहरांतून मोठा व्यापार चालत असे. शांततापर्वांमध्ये शहरांना बरकत येत असे. मात्र राजकीय कारणांनी किंवा नैसर्गिक संकटांमुळे व्यापारावर विपरीत परिणाम झाले तर त्यात खंड पडत असे. भूकंप, वादळे, पूर, दुष्काळ, हवामानातील बदल आणि अनेक प्रकारच्या रोगराईचे फेरे शहरांमध्ये येत.
ह्या नैसर्गिक संकटांच्या जोडीनेच मानवी समाजांमधील, शहरांमधील अंतर्गत राजकीय स्पर्धा, असूया ,आणि कलह, ह्यांमुळे शहरे अशांत होत. अंतर्गत आणि बाह्य प्रदेशातील टोळ्या, राज्यसत्तांचे आक्रमण ह्यांचाही धोका कायमच असे. शांतता आणि अशांतता पर्वाचे फेरे अशा सर्व शहरांना अनुभवाला येत. त्यात काही शहरे नष्ट होत, तर काही शहरे कालांतराने पुन्हा उभी राहून भरभराटीला येत. शांततेच्या काळात संधी मिळताच नवीन शहरेही वसवली जात.
ह्या आधुनिकपूर्व काळातील शहरांचे एक वैशिष्ट्य मात्र समान होते. ते म्हणजे ही सर्व शहरे निसर्गाच्या सहवासात, त्याच्या साधनसंपत्तीच्या आणि संकटांच्या सान्निध्यात असत. निसर्ग ह्या प्रत्येक शहरात पायाभूत मानला जात असे. त्यामुळे निसर्गाचा आदर केला जात असे, तसेच त्याचा एकप्रकारचा धाक वाटत असे. निसर्गाचे चक्र अभ्यासून त्यानुसार मानवी जीवनाचे व्यवहार घडत असत. नैसर्गिक हवामान, ऋतू, आकाशातील ग्रह-तारे, दिशा, जमिनीचे चढ-उतार, भौगोलिक रचना ह्या सर्वांचे भान शहरांचे व्यवहार नियंत्रित करीत असे. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याला, निसर्गाच्या लहरी जाणून घेण्याला महत्त्व असे. वास्तू बांधण्यापूर्वी, जमिनीवर काही खोदकाम करण्यापूर्वी नैसर्गिक शक्तींना आवाहन केले जात असे. त्यांचे सहकार्य, संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना केली जात असे. त्यातून काही अंधश्रद्धाही निर्माण होत असत. परंतु काही महत्त्वाच्या नैसर्गिक ठिकाणांचे मानवी हस्तक्षेपापासून संरक्षण होत असे. विशेषतः जंगले, डोंगर, पाण्याच्या स्रोतांच्या संबंधातील मानवी वर्तन नियंत्रित करायला पावित्र्याच्या कल्पना मदत करीत. मात्र अशी सर्व शहरे ही केवळ राज्यकर्त्या अभिजन वर्गातील लोकांसाठी असत. त्यांच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी, आरोग्यासाठी, करमणुकीसाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था असत. सेवक, गुलाम, मजूर तैनातीसाठी असत.
(युरोपमध्ये ग्रीस, रोम, अशी भव्य परंतु स्वतंत्र अशी नगरराज्ये म्हणून अस्तित्वात आलेली होती. तेथे अंतर्गत व्यवहारात अभिजनांची लोकशाही असे. मात्र भारतातील शहरांची निर्मिती विस्तृत साम्राज्यांच्या प्रदेशांमध्ये सम्राटांच्या अधिपत्याखाली विकसित होत असत. त्यामुळे भारतामधील शहरांचे व्यवस्थापन दूरस्थ सत्ताधीशांच्या हातात असे. आधुनिक नागरीकरणाच्या प्रक्रियेत वसाहतकाळानंतर अजूनही बदल करता आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची राज्यकर्त्यांच्या मर्जीवर अवलंबून राहण्याची पारंपरिक मानसिकता अजूनही मोठ्या प्रमाणात टिकून आहे. भारताच्या आणि पाश्चिमात्य नागरीकरणाच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच असलेला हा फरक आजच्या शहरांच्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये आहे. आजच्या लोकशाही व्यवस्थेमधील ही घटननात्मक त्रुटी आजच्या आपल्या शहरांच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यापुढील सर्वांत मोठा अडथळा आहे.)
प्राचीन, शेतीप्रधान काळात सामाजिक-आर्थिक व्यवहारांमध्ये खेडी आणि शहरे ह्यांची विभागणी स्पष्ट असे. शहरांसाठी तटबंदी बांधून संरक्षणाची व्यवस्था असे. खेड्यांसाठी त्याची जरुरी नसे. मात्र निसर्गाचे वर्चस्व दोन्ही ठिकाणी मान्य असे. तेव्हाच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये, सामाजिक-सांस्कृतिक जीवनात निसर्गाला महत्त्वाचे स्थान होते. ऐतिहासीक, प्राचीन शहरे आणि खेडी निसर्गाशी जुळवून घेत, दाटीवाटीने रचली जात. ह्यामुळे त्यांचे बांधकाम सहसा नियोजन न करता होत असे. श्रमप्रधान तंत्रांमुळे ते दीर्घ काळ चालत असे. म्हणूनच ती निसर्गातील शहरे होती.
जंगलांमध्ये वास्तव्य करणारा आदिवासी समाजही निसर्ग जाणून घेई. त्यांच्या वस्त्यांनी आणि संस्कृतीने निसर्गरक्षणाचे महत्त्वाचे काम भारतामध्ये केले होते. भारतामधील साम्राज्यांचे राज्यकर्ते त्यात काही हस्तक्षेप करीत नसत. त्यांच्या अधिवासांवर आणि लोकसमूहांवर बळजबरी करीत नसत. त्यामुळेच आदिवासी संस्कृती वसाहतवादाच्या काळापर्यंत सुरक्षित राहिल्या असाव्यात.
शहरांमधील निसर्ग
सम्राटांनी शहरे वसविण्याची परंपरा भारतामध्ये आणि जगभरात प्राचीन काळापासून आहे. नद्यांना, ओढ्यांना बांध घालून, कालवे खोदून आणि बांधून, तलाव, विहिरी खणून त्याभोवती वृक्षराजी राखण्याची वृत्ती सहजपणे सर्व समाजांच्या मानसिकतेमध्ये आहे. बौद्ध धर्म प्रसाराच्या काळात (इ.स.पूर्व ५६३ ते ४८३ ह्या काळातील उद्याने आणि बगिच्यांच्या बाबत माहिती उपलब्ध आहे) भगवान बुद्धाचा जन्म वृक्षराजी असलेल्या बगिच्यामध्ये झाला होता. सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण साम्राज्यात उद्याने आणि वृक्षलागवड करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले होते. प्राचीन सियालकोट शहरात राजा मानन्दर ह्याने मोठ्या प्रमाणावर उद्याने निर्माण केली होती. तेथे तलाव आणि रस्त्यांना सावली देणाऱ्या वृक्षांची रचना केलेली होती. नंतरच्या काळात लिहिलेल्या कालिदासाच्या साहित्यामध्ये विविध प्रकारचे कमळाचे तलाव, बगिचे ह्यांचे हृद्य वर्णन आहे. गुजराथमधील अहमदाबाद शहरात सोळंकी राजांनी बांधलेल्या (इ.स.९ वे शतक) तलाव आणि वृक्षराजींची माहिती उपलब्ध आहे. दक्षिण भारतामध्ये चोला राजांनी निर्माण केलेल्या शहरांमध्ये (इ.सन १०-११वे शतक) खास ‘नंदनवने’ राखली जात.
परंतु निसर्गाला शहरांमध्ये मध्यवर्ती स्थान देण्याची संकल्पना मुख्यतः सुरुवातीच्या मुस्लिम आणि नंतरच्या मुघल राज्यकर्त्यांच्या काळात सुरू झाली. नैसर्गिक उपलब्ध साधने आणि वास्तुकला ह्यांचा एकात्मिक विचार करून त्यांनी नियोजनपूर्वक शहरे वसवली. आरामदायी आणि सौंदर्यपूर्ण परिसर केवळ करमणुकीसाठी निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश असे. त्यांच्यावर पर्शिया आणि मध्य आशियामधील शैलीचा प्रभाव होता. ह्या काळातीळ उद्याने भूमितीय रचना, पाण्याचे कालवे, कारंजी, भोवतालचे पदपथ, हारीने लावलेले निवडक वृक्ष ह्यासाठी प्रसिद्ध होती. राजवाडे, दर्गे, कबरी, मदरसे, मशिदी, सराया आणि सुफी संतांच्या वसाहतीच्या भोवती विस्तृत बगिचे राखलेले असत. दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या आत आणि बाहेर वसवलेल्या शहाजहानबाद ह्या शहरात बाजारांच्या बरोबरीनेच उद्यान कलेला अनन्यसाधारण महत्त्व दिले होते. वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, फळझाडे ह्यांचे खास बगिचे असत. शहाजहानच्या काळात त्या शहराची निर्मिती करण्यात बेगम जहानआरा हिने विशेष मेहनत घेतलेली होती. काश्मीरमधील मोगल गार्डन्स आजही सुप्रसिद्ध आहेत. आग्रा, लाहोर, फत्तेपूरसिक्री ही शहरे त्यासाठी प्रसिद्ध आहेत.
निसर्गातील शहरांचा ऱ्हास
वसाहतवादाच्या विस्ताराच्या काळात भारतामधील निसर्गातील शहरांना आणि शहरांमधील निसर्गालाही मोठ्या प्रमाणात धक्के बसायला लागले. (हे केवळ भारतातच नाही तर युरोपमध्येही झाले तरी त्यांचे स्वरूप वेगळे होते.) वसाहतीमधील व्यापार, यंत्र आणि रेल्वे युगाच्या परिणामी ग्रामीण भागातून झालेल्या स्थलांतरितांमुळे युरोपमधील शहरांची लोकसंख्या, बकाली अतोनात वाढली होती. त्याआधीची राज्यकर्ते आणि अभिजनांची वसवलेली देखणी शहरे रोगग्रस्त झाली. भारतामध्ये निसर्गाची आणि मानवाची सांस्कृतिक समृद्धी असलेले भव्य शहनाबाद आणि उत्तरेकडील भव्य महानगरे १८५७ साली ब्रिटिशांनी लुटून, तोफगोळे टाकून पूर्णपणे उध्वस्त केली. सुरतसारख्या भारताच्या किनाऱ्यांवरील अनेक शहरांची स्पर्धेमुळे व्यापारातील अधोगती सुरू झालेली होती. मात्र ती उध्वस्त झालेली नव्हती. परंतु तेव्हापासूनच भारतामधील निसर्गातील शहरांची परंपरा खंडित होऊन विस्मृतीमध्ये गेली.
वसाहतकाळात भारतामध्ये पाश्चिमात्य प्रकारच्या चेन्नई, कलकत्ता, मुंबई अशा नवीन शहरांची निर्मिती करून नव्या नागरीपर्वाला सुरुवात केली होती. वसाहतवादी काळात वाढत्या शहरांमध्ये जाणीवपूर्वक उद्यानांची निर्मिती केली जात होती. बोटॅनिकल गार्डन राखून विविध प्रकारच्या वनस्पती आणि वृक्षांचे जतन सुरू केले होते. तेव्हा निसर्गअभ्यासाला, वनस्पती आणि सजीवांचे वर्गीकरण करण्याला विशेष महत्त्व आले होते. प्राणिसंग्रहालयांची, मत्सालयांची निर्मिती सुरू झाली होती. राष्ट्रीय उद्याने, विविध प्रदेशांमधील जंगलांचे संरक्षण करण्यासाठी वेगळ्या प्रकारची प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली होती. मात्र ते करताना ब्रिटिश शासनाने आदिवासी समूहांना अनेक ठिकणांहून हुसकावले. त्यांना देशोधडीला लावले. भारतामधील जातीमध्ये विभागलेल्या कर्मठ समाजात आणि संस्कृतीमध्ये त्यांना सामावून घेता आले नाही. काही प्रमाणात ख्रिश्चन मिशनरी लोकांनी त्याचा फायदा घेत धर्मप्रसार केला. त्याचे विपरीत परिणाम आदिवासी समाजांवर आणि त्यांच्या पारंपरिक अधिवासांवर झाले. स्वातंत्र्य मिळाल्यावरही ही प्रथा चालूच राहिली. मात्र नैसर्गिक जंगलसंपत्तीचे रक्षण करणे शासनाला आणि नोकरशाहीला अवघड झाले. व्यापारी व्यवस्थेचा दबाव येऊन लूट होऊ लागली. रेल्वेच्या बांधकामासाठी तर अनेक जंगले, डोंगरांवरील वृक्षराजी वेगाने उध्वस्त करण्यात आली. जमिनीची धूप वाढली. एकीकडे प्रदेश उजाड झाले, दुसरीकडे पुराचे प्रमाण वाढले. सामाजिक, आर्थिक विषमता तसेच शहरे आणि पर्यावणातील अंतर्विरोध वेगाने वाढायला लागले.
औद्योगिक शहरांचा उदयास्त
औद्योगिक क्रांतीने नवीन यंत्रयुग जन्माला घातले. यंत्रयुगाने मानवाच्या शारीरिक उर्जेचा, साध्या-सुध्या यंत्र-तंत्रांचा, हस्तकौशल्यांवर आधारित उत्पादनांच्या युगाचा अंत केला. व्यापारी शेती आणि कारखानदारी विस्तारली. वाढीव उत्पादनांचे व्यापाराद्वारे वितरण सुरू झाले. हे बदल आधी युरोप आणि अमेरिकेत आणि विसाव्या शतकात, वसाहतींच्या जोखडामधून स्वतंत्र राष्ट्रे मुक्त झाल्यावर तेथेही यांत्रिक, रासायनिक शेती आणि उत्पादनांच्या वाढीला वेग आला. पाठोपाठ नागरीकरणाचा वेगही वाढला.
पाश्चिमात्य देशांमध्ये औद्योगिक क्रांती आली आणि पाठोपाठ पर्यावरणाच्या संकटांची तीव्रता जाणवू लागली. त्यावेळी त्या कारखानदारीने नवस्वतंत्र देशांमध्ये विस्तार सुरू केला. पाश्चिमात्य देशातल्या आर्थिक समस्या आशिया, आफ्रिका, चीन, दक्षिण अमेरिकेतील गरीब देशांमध्ये निर्यात होऊ लागल्या. त्याबरोबरच जागतिक पर्यावरणाच्या समस्यांचाही विस्तार झाला. जग आणि प्रत्येक देश गरीब आणि श्रीमंत वर्गांत विभागले जाऊन सामाजिक, आर्थिक विषमताही वाढीला लागली. अस्वस्थता आणि अशांतता जगभर जाणवायला लागली.
जगातील सर्वच देशांमध्ये कोळसा, तेल, वायू, वीज अशा ऊर्जासाधनांचा वापर वाढला. व्यापार वाढला, आणि ग्रामीण भागातून लोकांचे लोंढे शहरांत येऊ लागले. स्थलांतर, नागरीकरण ह्यामुळे निसर्गाचे आणि मानवी समाज-संस्कृतींचे स्वरूप मुळापासून बदलायला सुरुवात झाली. खनिज तेलाच्या शोधानंतर अरबस्तानासारख्या वाळवंटाच्या प्रदेशांमध्ये मानवी वस्त्या वाढू लागल्या. यंत्र, तंत्र आणि अनेक प्रकारच्या धातूंची जंगले, डोंगर-दऱ्या उद्ध्वस्त होऊ लागल्या. शहरातली बकाली, अनारोग्य वाढले. ते बदलण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन सुरू झाले.
इंग्लंडमधील शहरांमध्ये पाणी, सांडपाणी, आरोग्यसेवा घडवल्या गेल्या. नद्या-नाले स्वच्छ झाले. शहरे सुधारायला लागली. बकाल वस्त्यांच्या जागी नवीन घरे बांधली गेली. विशेषतः शहरांमध्ये उद्याने निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न होऊ लागले. परिणामी, एका शतकात लोकांचे आयुष्यमान वाढले. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये गार्डनसिटीची कल्पना मांडली गेली. त्या संकल्पनेतून इंग्लंड-अमेरिकेत शहरे घडायला सुरुवात झाली. युरोपमधील उद्यानांपासून स्फूर्ती घेऊन न्यूयॉर्कमध्ये सेंट्रल पार्क उभारायला सुरुवात झाली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवाच्या नवनवीन कल्पनांच्या यशामुळे निसर्गावर अधिराज्य गाजवता येईल अशी मनोवृत्ती पाश्चिमात्य समाजांमध्ये काही काळ निर्माण झाली. परंतु राजकीय स्पर्धा वाढली. दोन महायुद्धांनी मानवसंहार बघितला. युरोपमधील शहरे बेचिराख झाली. जपानवरच्या अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर एका क्षणात शहरे आणि निसर्गही नष्ट करण्याची ताकद कमावली असल्याचे लक्षात येऊन मानवजातच भयभीत झाली. शांततेचे पर्व सात दशके टिकले. पर्यावरणाची संकटे दार ठोठावत, शाश्वत विकासाचा विचार होत असतानाच एकविसाव्या शतकात नव्या स्वरूपात लढाया सुरू झाल्या आहेत. सर्वप्रथम ते थांबविण्याचे सामूहिक आव्हान आज संपूर्ण मानवजातीपुढे आहे. त्यानंतरच शाश्वत विकासाचे मार्ग खुले होऊ शकतील.
निसर्ग आणि शहरांपुढील आव्हाने
स्वांतत्र्यानंतरच्या काळातही ब्रिटिशकाळातील शहरांच्या व्यवस्था सांभाळण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये शहरविरोधी मानसिकता हा मोठा अडथळा ठरला. गेल्या काही दशकांमध्ये भारतामधील नागरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढत असताना शहरांच्या, शहरात येणाऱ्या स्थलांतरित समाजांच्या वास्तवातल्या समस्या आणि त्यासाठी उपाययोजना म्हणून परिसराचे अनुकूल नियोजन करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. त्यामुळे शहरातील नद्या, नाले, समुद्रकिनाऱ्यावरील पारंपरिक कोळी वस्त्या, खेडी, कारखाने ह्यांच्याभोवती स्थलांतरितांच्या अनधिकृत वस्त्या वाढल्या. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नागरीकरणाच्या आणि शहरनियोजनाच्या संबंधात आपल्या राज्यकर्त्या वर्गाने केलेला अपुरा विचार. नागरीकरण प्रक्रियेकडे केलेले दुर्लक्ष. शहरांच्या गतिमान अर्थव्यवस्थांचे सतत बदलते स्वरूप. बदलत्या समाजाचे अपुरे आकलन आणि शहरांच्या संबंधातील बहुआयामी अभ्यासाकडे, संशोधनाकडे आणि नियोजनाच्या शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष. शहरनियोजनाचे कायदे करताना प्रत्येक शहराच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांचा पुरेसा विचार करण्यापेक्षा सरधोपट पद्धतीने नियोजन करण्याचे झालेले प्रयत्न. हेदेखील शहरांच्या बकालीला कारणीभूत ठरले. विसाव्या शहतकात पाश्चिमात्य देशातील वास्तुरचनाकार आणि नगररचनाकार ह्यांनी मांडलेले नगररचना सिद्धान्त हेदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. वास्तवात पाश्चिमात्य देशांमध्ये १९६० च्या दशकानंतर अशा सरधोपट नागरी नियोजनाला आव्हाने दिली गेली होती. त्यानंतर नगररचनेचे मूलभूत सिद्धांतही बदलले. दुर्देवाने भारताने त्याकडे लक्ष दिले नाही. आपल्या शहरांचा, समस्यांचा अभ्यासही केला नाही. यांत्रिक आणि तांत्रिक पद्धतीने कायद्याचे बंधन म्हणून केलेले नियोजनाचे आराखडे कागदांवर आणि अहवालात बंदिस्त राहिले. त्याचे एक साधे उदाहरण म्हणजे जमिनींच्या चढउतारांचे नकाशे (topography) केलेच नाहीत. नद्यांचा समावेश असला तरी पाण्याचे पावसाळी नाले, प्रवाह, त्यावर आधारीत पारंपरिक विहिरी, तलाव ह्यांचे जतन करण्याचा विचारही झाला नाही.
गेली तीस वर्षे नागरी उद्योग आणि घरांसाठी वाढलेली जमिनीची मागणी ह्यासाठी शहरातली तलाव बुजवले. नाल्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले. रस्तेबांधणी करताना पाण्याच्या निचऱ्याचा विचार झाला नाही. सार्वजनिक वाहतुकीकडे पूर्ण दुर्लक्ष करून खाजगी वाहनांना प्रोत्साहन दिले. त्यासाठी मोठेमोठे उड्डाणपूल, प्रकल्प राबवून, काँक्रिटच्या बांधकामांसाठी खडीसाठी डोंगर तोडून आणि वाळूसाठी नद्या उपसून शहरांच्या बाहेरील निसर्गावरही आक्रमण केले. निसर्गसृष्टी आणि शहरांची अर्थसृष्टी ह्यांचे परस्परावलंब असते ह्याचे भान आपल्या शहरांना आजही आलेले नाही. त्या नात्याचा सखोल, वैज्ञानिक दृष्टीने विचार आणि अभ्यास झाला नाही. शहरे वेडीवाकडी वाढून शहरांची बकाली वाढली. दुसरीकडे आजूबाजूचे ग्रामीण भाग आणि नैसर्गिक परिसरही बांधकामांसाठी उद्ध्वस्त झाले.
चिरंतन विकासाची त्रिसूत्री – भारतासाठी
एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा युद्धांच्या जोडीला जागतिक हवामानबदलाचे संकटही गहिरे झाले आहे. मानवी हस्तक्षेप फारसा नसूनही पृथ्वीचे आर्क्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुवीय प्रदेश त्यातून सुटलेले नाहीत. वाढत्या तापमानाने तेथील बर्फ वितळून समुद्रपातळीत वाढ सुरू झाली आहे. समुद्रकिनारी वसलेल्या अनेक महानगरांना (जागतिक लोकसंख्येच्या १५ टक्के) पाऊस, पूर, वादळे आणि समुद्रपातळीतील वाढीने धोके निर्माण झाले आहेत. ४० टक्के लोकसंख्या समुद्रकिनाऱ्यापासून केवळ १०० कि.मी. अंतरात वास्तव्य करीत आहे. इतर अनेक ठिकाणी दुष्काळाचे संकट वाढले आहे. शेती आणि उद्योगही सर्वच ठिकाणी बाधित होत आहेत, फेऱ्यात आहेत. अशा ह्या काळात पुन्हा एकदा निसर्ग आणि मानवी नात्याचा नव्याने शोध घेणे अपरिहार्य झाले आहे. चिरस्थायी, शाश्वत मानवी विकासाच्या जोडीनेच निसर्गसंवर्धनाचा, निसर्गावरील आक्रमण रोखण्याचा आणि निसर्गाची मानवाने केलेली हानी भरून काढण्यासाठी विकासकल्पनांचा वेगळ्या दृष्टीने विचार करणे अपरिहार्य झाले आहे. ते करण्यासाठी शेती, उद्योग, शहरे अशा सर्व ठिकाणी आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक व्यवहार निसर्गपूरक करणे ह्याला पर्याय नाही. हे करण्यासाठी आज काही ठोस सिद्धान्त, मार्ग आणि साधने उपलब्ध नाहीत. काही दिशा मात्र दाखवता येतील.
गौतम बुद्धांना ज्याप्रमाणे त्यांच्या विचारमंथनातून गुंतागुंतीच्या आणि अस्वस्थकाळात दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते. त्यानंतर काही शतके जगातील समाजांमध्ये त्याचा विस्तार होऊन अहिंसा, सामाजिक सलोखा आणि अपरिग्रहाचे, ज्ञानाचे शांतीपर्व सुरू झाले होते. त्याच्याच आधारे आज आणि भविष्यामध्ये जगभर विखुरलेल्या समाजांना निसर्गाबरोबर आणि एकमेकांबरोबर सलोख्याचे नाते घडवावे लागेल.
निसर्ग हा काही सर्वठिकाणी एकसारखा नाही. त्यामुळे मानवी समाजही एकसारखे नाहीत. तरीही जागतिक भान ठेऊन स्थानिक निसर्ग आणि समाज ह्यांची सांगड घालता येईल. सर्वप्रथम मानवापासून आणि मानवाच्या सर्वप्रकारच्या अतिरेकांपासून वाचविण्याचे हे आव्हान आहे. अवास्तव उपभोग कमी करण्यासाठी ऊर्जा, खनिजे, आणि नैसर्गिक साधनांचा वापर, उपसा कमी करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी केवळ आर्थिक विकासाच्या मागे धावण्याचा वेग मर्यादित करावा लागेल. त्यासाठी मानवाची तर्कबुद्धी (चांगले-वाईट हे समजण्याची बुद्धी), विज्ञान, मानवतावाद ही त्रिसूत्री आहे. मानवी समाजातील सर्व लोकांचे विशेषतः गरिबांचे जीवनमान उंचावणे, विकसित-अविकसित समजांमधील वाढती दरी कमी करणे, आणि सर्वांच्या सहभागाने निसर्गाचे रक्षण करणे ह्यात अभिप्रेत आहे. आज साध्य केलेले मानवी ज्ञानाचे आणि निसर्गाच्या भानाचे संचित राखतानाच भविष्यासाठी ते वाढवावे लागेल. अशी मानवी उत्थापनेची (renaissance) चळवळ आज सुरू झालेली आहे, तिचा वेगाने विस्तार करण्यासाठी आजची वेगवान माहिती, संपर्क आणि संवादमाध्यमे वापरायला हवीत. निसर्ग हा आपला पायाभूत आधार आहे हे जाणून तो जपायला हवा.
संदर्भ:
- Cities that shaped the Ancient World. Ed. John Julius Norwich, 2014, Thames and Husdon
- History of Urban Form of India. From the beginning till 1900’s. Pratyush Shankar, 2024, Oxford University Press.
- Nature of Economies: Jane Jacobs 2000, (अर्थसृष्टी, भाव आणि स्वभाव. अनु. सुलक्षणा महाजन, ग्रंथाली)
- Death and Life of great American Cities, Jan Jacobs, 1961
- Urban Dynamics: J.W Forester 1969
- Enlightenment Now, Steven Pinker, 2018,
- सिंगापूरनामा: २०२3, सुलक्षणा महाजन, सुनिधी प्रकाशन पुणे
Email: sulakhana.mahajan@gmail.com