न्यायालयाने सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात दोषी ठरवून पाच वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनविली आहे.(या शिक्षेला उच्च न्यायालयात त्वरित स्थगितीही मिळाली, त्यामुळे सलमानची तुरूंगवारी सध्यातरी टळली आहे). पण सलमानला शिक्षा सुनावताच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींचे कंठ दु:खाने दाटून आले होते. परंतु सलमानच्या गाडीखाली जो माणूस झोपेतच चिरडून मारला गेला आणि आणखी काही लोक जखमी होऊन कायमचे अपंग झाले, त्यांच्याबद्दल या वर्गाने कधी कळवळा व्यक्त केल्याचे आठवत नाही.
उलट अभिजित भट्टाचार्य नामक गायकाने प्रतिक्रिया देताना गरिबांविरोधात जी मुक्ताफळे उधळली आहेत ती या अभिजन वर्गाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानली पाहिजे.