डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनाला ९८ वर्षे, आणि भारतीय संविधानाच्या घोषणेला ७६ वर्षे झालीत, त्यानिमित्ताने.
मनुस्मृती हे हिंदू धर्मशास्त्र आहे असे म्हटले जाते. “श्रुतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रं तु वै स्मृतिः”––श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. वेदांमध्ये मनूचे नाव येत असले तरी वेदांनंतर खूप कालावधी गेल्यानंतर स्मृतिग्रंथांची निर्मिती झाली. मनुस्मृती ही इ. स. पू. २०० ते इ. स. २०० या कालखंडात लिहिली गेली असे मानले जाते. स्मृतिग्रंथ आणि स्मृतिकार अनेक झाले, पण मनुस्मृतीला सर्वाधिक महत्त्व आहे. विष्णू, पराशर, दक्ष, संवर्त, व्यास, हारीत, शातातप, वसिष्ठ, आपस्तंभ, गौतम, देवल, शंख, लिखित, भारद्वाज, उशना, शौनक, याज्ञवल्क्य इत्यादी प्रसिद्ध स्मृतिकारांची नावे व वचने ‘मन्वर्थमुक्तावली’ या टीकाग्रंथात मिळतात.