मासिक संग्रह: ऑगस्ट, २००४

आठवणीची आठवण 

जगात गरीब असतात, हे आपल्याला माहीत असतं. भारतासारख्या गरीब, शेतीप्रधान देशातले गरीब म्हणजे फारच गरीब असतील; आपल्याला कळतही असतं. पण त्यांच्या जगण्याकडे आपण कधी निरखून पाहात नाही. पर्यटनाच्या वा इतर निमित्ताने हिंडताना कधी असे गरीब लोक दिसले, तर आपण त्या दर्शनाचा क्षणभर चटका लावून घेतो आणि आपल्या मार्गाला लागतो. तळागाळातल्या लोकांची जाणीव आपल्यासाठी एक ‘घटना’ असते. त्या घटनेवर हळूहळू इतर घटनांचे ठसे उमटत जातात आणि गरिबीच्या दर्शनाचा ठसा पुसट होत जातो. त्याची आठवण तेवढी उरते. त्या आठवणीला जर आपण स्वतःला संवेदनाशील म्हणवून घेत असलो, तर आपण मनाच्या कोपऱ्यात नीट जपतो.

पुढे वाचा

विवेकवाद – भाग 1 

(प्रथम प्रकाशन एप्रिल 1990 अंक 1.1, लेखक – दि. य. देशपांडे) 

विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी तूर्त ज्ञानक्षेत्र आणि कार्यक्षेत्र या दोघांचाच उल्लेख केल्यास पुरे होईल. सत्य म्हणजे काय ? आणि सत्य ओळखायचे कसे ?

पुढे वाचा

नद्या आणि माणसे 

‘आजचा सुधारक च्या एप्रिल-04 च्या अंकातील ‘माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ लेखावर प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर त्यात काही भर घालण्याच्या उद्देशाने हे लिहीत आहे. नद्या जोडणी महाप्रकल्पाविषयी जी काही माहिती सरकारने उपलब्ध करून दिली आहे, आणि एकंदरीतच भारतासह जगभरातील जल प्रकल्पांच्या इतिहासातून जी माहिती मिळते, ती एकत्रितपणे पाहिली तरी या महाप्रकल्पाला कडाडून विरोध करावा, किती केला तरीही थोडाच, असेच कुणाही सुबुद्ध नागरिकाला वाटेल. त्या दृष्टीने काही माहिती पुढे देत आहे; प्रमुख आधार मेधा पाटकरांनी संपादित केलेले “River linking: A Millennium Folly ?”

पुढे वाचा

शुद्धलेखनांतील अराजक परिणाम आणि उपाय (पूर्वार्ध) 

(१) मुद्रित मराठी भाषेमध्ये एकसारखेपणा राहिलेला नाहीं. संगणकाच्या साहाय्यानें मुद्रण पूर्वीपेक्षां सोपें झालें असलें तरी त्याच्या उपलब्धतेमुळे जे नवीन लोक मुद्रणक्षेत्रांत उतरले त्यांस लेखनाचे कांहीं नियम असतात, आणि ते नियम लिहितांना, किंवा मुद्रण करण्यासाठी संगणकावर अक्षरें जुळवितांना पाळावयाचे असतात हे माहीत नाहीं. परिणाम असा झाला आहे की वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतूनच नाही तर पुस्तकांमधूनसुद्धां एकसारखें मराठी वाचायला मिळत नाहीं. 

(२) साक्षरतेचें प्रमाण अगदी कमी होतें तेव्हा होणारे लेखनहि साहजिकच मोजकें होतें. विचारांचा किंवा माहितीचा हा ठेवा आपण पुढच्या पिढ्यांच्या स्वाधीन करीत आहोंत अश्या भावनेनें प्रारंभी लिहिलें जात असलें पाहिजे.

पुढे वाचा

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग ५) 

गणित एक भाषाह्याविषयी थोडेसे 

गणिताने विकसित केलेल्या संबोधांचा सर्व विज्ञानात पदोपदी उपयोग होतो म्हणून गणित ही सर्व विज्ञानाची भाषा आहे असे म्हणतात. बोल भाषेतील विचारांना चिन्हांचा उपयोग करून जेव्हा लेखी स्वरूपात मांडले जाते तेव्हा त्याला गणिती भाषांचे स्वरूप प्राप्त होते. म्हणून ही गणिती भाषा वाचता येणे आणि समजणे ह्या क्षमतांना प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक आहे असे वाटते. त्याचप्रमाणे चिन्हांचा उपयोग करून गणिती विचार लिहिता येणे यालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. गणिती उदाहरणे सोडवता येण्यासाठी ह्या क्षमतांवर सातत्याने लक्ष दिले पाहिजे.

पुढे वाचा

केशकर्तन, रंगमंच आणि पावित्र्य 

महाराष्ट्र नाभिक महामंडळाने नाभिक समाजातील तरुण व्यावसायिकांना प्रशिक्षण मिळावे व रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने सलून आणि ब्युटी पार्लरबाबत एक आधुनिक प्रशिक्षण शिबिर, पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अलीकडेच आयोजित केले होते. त्या शिबिराच्या वेळी रंगमंचावर केस कापण्याचे प्रात्यक्षिक, अर्थातच, दाखविले गेले. त्यामुळे रंगदेवतेच्या पावित्र्याचा भंग झाल्याची तक्रार मराठी नाट्य व्यवस्थापक संघाने केली असून, यानंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना रंगमंदिर उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणीही केली आहे. 

सर्वप्रथम हे मान्य केले पाहिजे, की नाट्य व्यवस्थापक संघाचा, रंगदेवतेच्या पावित्र्याचा मुद्दा संपूर्णतः गैरलागू आहे.

पुढे वाचा

जालियांवाला बाग/अबु घरीब 

13 एप्रिल 1919 ला घडलेल्या एका घटनेने भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याचे भवितव्य ठरले. त्या घटनेमुळे स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व गांधींकडे गेले. नेहरू पितापुत्रांनी याच घटनेमुळे इतर विचार सोडून देऊन संपूर्ण स्वराज्याचे उद्दिष्ट स्वीकारले. 

दिवस बैसाखीचा, वसंतोत्सवाचा. अमृतसर शहरातील भिंतींनी वेढलेले, एकाच अरुंद बोळातून जा-ये करता येईलसे एक मैदान, नाव जालियांवाला बाग. ब्रिटिश साम्राज्याचा निषेध करणारी एक शांततामय सभा भरलेली. ब्रिगेडियर जनरल आर.ई.एच. डायरला ही सभा भरवणे हा ब्रिटिश साम्राज्याचा उपमर्द वाटला. त्याने आपल्या हाताखालच्या सैनिकांना सभेवर गोळीबार करायचे आदेश दिले.. 

सभा प्रक्षोभक नव्हती. ती बेकायदेशीर असल्याची घोषणा केली गेली नाही.

पुढे वाचा

आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (१)

1996 साली ब्रिटनमधील विश्व हिंदू परिषदेने एक सचित्र व गुळगुळीत पुस्तक प्रकाशित केले. हिंदू धर्माचि स्पष्टीकरण शिक्षकांसाठी मार्गदर्शिका’ या नावाच्या या पुस्तकात ‘वर्गात हिंदू कल्पना व विषय शिकवण्याबाबतच्या सूचना’ आहेत. ब्रिटिश शालापद्धतीतील माध्यमिक व उच्च वर्गामध्ये वापरासाठी हे पुस्तक आहे. आज पुस्तक दुसऱ्या आवृत्तीत उपलब्ध आहे. 

पुस्तक ब्रिटिश शिक्षकांना सांगते की हिंदू धर्म हे चिरंतन निसर्गनियमांचेच दुसरे नाव आहे.’ वैदिक ऋषींनी शोधून काढलेले आणि नंतर आधुनिक भौतिकशास्त्रज्ञांनी व जीवशास्त्र्यांनी पुष्टी दिलेले हे नियम आहेत, असा दावा आहे. यानंतर गणित, भौतिकी, खगोलशास्त्र, वैद्यक आणि उत्क्रांतीचे शास्त्र यांच्या वेदांमधील उल्लेखांचे ठार चुकीचे व आत्मतुष्ट ‘स्पष्टीकरण’ आहे.

पुढे वाचा

कृषि व ग्रामीण विकास (भाग-१) 

दक्षिण आशियातील मानवविकास – २०००

प्रस्तावना : 

केंब्रिजमध्ये प्रा. अमर्त्य सेन ह्यांच्याबरोबर अर्थशास्त्र शिकलेले पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ महबूब -उल-हक नंतर जागतिक बँकेत अर्थशास्त्रज्ञ म्हणून गेले. त्यांनी तेथे केवळ वस्तू आणि सेवांच्या मूल्याच्या बेरजेने व्यक्त केली जाणारी ‘स्थूल राष्ट्रीय उत्पाद’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) ही संकल्पना अपूर्ण आहे असे हिरिरीने मांडून आर्थिक उत्पादन व शासकीय धोरणे ह्यांच्याद्वारे विविध देशांमधील मानवविकास किती साधला जातो अशी संकल्पना रुजू करून तिला जगातील सर्व अर्थशास्त्रज्ञांची व राजकारण्यांची मान्यता मिळवून दिली. त्यांच्या मृत्यूनंतर इस्लामाबाद मध्ये ‘महबूब-उल-हक ह्यूमन डेव्हलपमेंट सेंटर’ स्थापन करण्यात आले.

पुढे वाचा

नॅशनॅलिझमबाबत टिपणे (भाग २) 

नॅशनॅलिझम्सचे समान गुणधर्म पाहिल्यावर त्यांची (इंग्लंडपुरती तरी) वर्गवारी करायला हवी. नॅशनॅलिझम्सचा प्रसार प्रचंड आहे आणि वर्गवारी सोपी नाही. त्यात भ्रम आणि द्वेषाचे असंख्य प्रकार आहेत, आणि त्यांचे परस्परसंबंध अत्यंत क्लिष्ट आहेत. जगातील काही टोकाचे दुष्टावे तर युरोपीय जातिवाद्यांपर्यंत पोचलेलेच नाहीत. पण मुख्यतः विचारवंत आणि दुय्यम विचारवंत म्हणून सामान्यांच्या नॅशनॅलिझम्स पाहू. 

सरकारी नॅशनॅलिझम

1) नव-टोरीवाद: (पारंपरिक टोरीवाद दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश बल आणि प्रभाव घटला आहे, हे कबूल करतो) नवे टोरीवाद…हे कबूल करत नाही. नव-टोरी नेहमी रशियाविरोधी असतात, पण कधीमधी अमेरिकाविरोधी सूरही लावतात.

पुढे वाचा