[इंग्रजी शब्दांचे हिंदी-मराठी अर्थ तपासत असताना, त्या शब्दांच्या व्युत्पत्तीच्या अनुषंगाने कोशकाराला कित्येक रंजक गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यांविषयी हा लेख आहे. सामंतबाईंच्या निधनाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमिताने त्यांची आठवण करण्यासाठी हा लेख प्रकाशित करीत आहोत. कार्यकारी संपादक]
कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकात शकुंतलेची सासरी पाठवणी करण्याचा एक प्रसंग आहे. निसर्गसुंदर आश्रमात वाढलेल्या आपल्यासारख्या निरागस युवतीचा राजधानीसारख्या गजबजलेल्या शहरात आधुनिक सभ्यतेत मुरलेल्या राजवाड्यात कसा निभाव लागणार अशी चिंता करणारी शकुंतला म्हणते – कथमिदानीं मलयतटोन्मूलिता चंदनलतेव देशांतरे जीवितं धारयिष्ये? पण माहेराहून सासरी जाण्याच्या कल्पनेने व्याकुळ होणाऱ्या मुली ज्याप्रमाणें थोड्याच दिवसांत सासरीं रमतात आणि तिथल्याच होऊन जातात त्याप्रमाणें कित्येक वनस्पतीदेखील एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाल्या तरी अनेकदा त्या देशांतरींच्या वातावरणाशीं एकरूप होऊन जातात.