मासिक संग्रह: जुलै, 2002

प्रज्ञांचे सप्तक

[शिक्षणाचा एक हेतू क्षमता-विकसन हा असावा हे अनेकांनी मांडलेले आहे. क्षमता असते आणि ती विकसित होते, होऊ शकते यावर विश्वास ठेवणे फारसे अवघड नाही. अजूनही काहींची ‘मूल म्हणजे मातीचा गोळा किंवा संगणक’ आणि ‘आकार देऊ तसे किंवा डाटा भरू त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व तयार होते’—-अशी कल्पना आहे. तर काहींचा संपूर्ण विश्वास ‘मूल आपल्यासोबत खास काही घेऊन येते, तेच व्यक्त होते’ असा आहे.
बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त बाब असून त्यात जीवनभरात फरक पडत नाही असे म्हटले जात होते. मूळ क्षमतेत फरक पडतो की नाही ही गोष्ट वेगळी पण बुद्धिमापनासाठी जी चाचणी वापरली जाते त्या पद्धतीची परीक्षा एकदा देऊन, पुन्हा दिली तर त्या ओळख झालेल्या परीक्षेत माणूस अधिक गुण मिळवू शकतो हे मात्र सिद्ध झालेले आहे.

पुढे वाचा

शिक्षणाचा हेतू : आनंद-निर्मिती

[“त्युन्साबरो माकीगुची’ या जपानी शिक्षणतज्ज्ञाची ओळख त्यांच्या ‘एज्युकेशन फॉर क्रिएटीव लिव्हिंग’ या पुस्तकातून होते. शिक्षणशास्त्राच्या अभ्यासकांपैकी काहींनी कदाचित माकीगुचींचे नाव ऐकले असेल. १९४४ साली म्हणजे जपानमधील अणुसंहारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. माकीगुचीना कधीही फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेशी, आणि धर्मव्यवस्थेशी त्यांनी जन्मभर लढा दिला. एज्युकेशन फॉर क्रिएटीव लिव्हिंग वाचताना त्यांच्या संवेदनशील, बालककेंद्री शिक्षणविचारांची ओळख होते, तेव्हा त्यांच्या सखोल विचारांची प्रदीर्घ अनुभवांची आणि विलक्षण प्रेमळ, प्रसन्न स्वभावाची जाणीव होते. शिक्षण आनंदासाठी हवे, असे म्हणणाऱ्या माकीगुचींच्या व्यक्तिगत जीवनात मात्र आनंद अभावानेच आढळतो. तीन वर्षांच्या या मुलाला पोटाशी बांधून आईने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

पुढे वाचा

शिक्षण नकोच —- प्रत्यक्ष करणे आवश्यक

मी शिक्षणाला विरोध करतो. कृतिशील आयुष्यापासून वेगळे काढलेले शिक्षण आणि धमक्या, भीती, लोभ, लाच यांच्या दबावाखाली घडवून आणलेले शिक्षण यापेक्षा प्रत्यक्ष (काम) करणे उपयुक्त. स्वतः दिशा ठरवलेले, हेतुपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी केलेले काम.
आज जगभर शिक्षणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे—-काही लोकांनी स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्यांना वळण लावणे, त्यांना आकार देणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकायला लावणे—-असा. मी त्याचा विरोधक आहे. हे शिक्षण प्रभावी, कार्यक्षम, मानवी कसे करता येईल यावर वेळ घालवण्यात अर्थच नाही. ते आता नव्याने मानवी करता येणार नाही कारण त्याचा हेतू मानवी नाही.

पुढे वाचा

रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार

“आज शाळेत जायचं म्हणून रडतो आहेस, उद्या शाळेत जाणार नाही म्हणून यापेक्षा जास्त रडशील.”
रवींद्रनाथांच्या लहानपणी त्यांच्या घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना एक थप्पड मारून ही जी भविष्यवाणी उच्चारली तीच त्यांच्या शिक्षणविषयक अनुभवांतील पहिली पायरी म्हणायला काहीच हरकत नाही. रवींद्रनाथांचा भाऊ सोमेंद्रनाथ आणि भाचा सत्यप्रसाद हे त्यांच्यापेक्षा केवळ दोनच वर्षांनी मोठे. त्यामुळे ही तीनही मुले तशी एकत्रच वाढली. दोन वर्षांच्या वडिलकी-मुळे हे दोघे शाळेत जायला लागले. पण छोटा रवी मात्र अजून शाळेत जायच्या वयाचा झालेला नाही असे घरच्यांनी ठरवून टाकले होते.

पुढे वाचा

व्यक्ती विरुद्ध नागरिक

आधुनिक काळात जगातील सर्व सुसंस्कृत समाजांनी शिक्षणाची आवश्यकता स्वीकारलेली आहे. अनेक मान्यवर विद्वानांना हे म्हणणे मान्य नाही. त्यांच्या मते जे उद्देश्य गाठण्याचा दावा शिक्षण करते ते गाठण्यास ते असमर्थ ठरलेले आहे. ह्या मताचा खरेखोटेपणा तपासण्याआधी शिक्षणामुळे काय साध्य व्हावे असे आपल्याला वाटते ह्याचा विचार करायला हवा. शिक्षणाच्या हेतूबद्दल एकवाक्यता नसणे स्वाभाविक आहे पण एका मुद्द्यावर मात्र विरोधकांमध्ये दोन कट्टर गट पडल्यासारखे दिसतात — शिक्षणाचा विचार व्यक्तीच्या संदर्भात करणारे आणि शिक्षणाचा विचार समाजाच्या संदर्भात करणारे.
शिक्षणामध्ये व्यक्तीला घडवण्याची क्षमता असते असे जर मानले तर असा प्र न उद्भवतो की शिक्षणाने माणसाला चांगली व्यक्ती म्हणून घडवावे की चांगला नागरिक म्हणून?

पुढे वाचा

शिक्षणामागचे मूलभत हेतू . . . एक प्रश्न

शिकणे ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. माणसाच्या प्रत्येक पिढीने आपली वाटचाल आधीच्या पिढीने सुपूर्द केलेली ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन केलेली आहे. या शिदोरीतील ज्ञानाचे संचित पुढील पिढीकडे सोपवणे हा औपचारिक, अनौपचारिक, किंवा सहज शिक्षणामागचा मूळ हेतू आहे. यामुळे नव्या पिढीचे पाऊल मागच्याहून पुढे पडावे अशीही त्यामागे अपेक्षा आहे. ज्ञानाची उपलब्ध शिदोरी खूप मोठी असते. साहजिकच प्रत्येक व्यक्तीकडे ती संपूर्ण पोचवणे अशक्य आहे. दिलेल्या वेळात, त्यातले नेमके काय पोचवावेच, काय आवश्यक आहे, तर काय हवे तर बाजूला ठेवावे —- हा विचार करताना आधाराला शिक्षणामागचे मूलभूत हेतू घ्यावे लागतात.

पुढे वाचा

अभ्यागत संपादकाचे मनोगत

“शिक्षण कशासाठी असते, त्यामागे कोणते हेतू असतात?’ असा प्रश्न जर मी आपल्याला विचारला, तर उत्तर देण्याआधी आपण प्रश्न विचाराल, “कोणते शिक्षण?’

लहान मूल बोलायला शिकते, शाळा-महाविद्यालयात विशिष्ट अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतात, माणूस अनुभवातून शिकतो, मोटर चालवायला शिकतो, नवी भाषा शिकतो, कला महाविद्यालयात रंगमाध्यमाची काही कौशल्ये हस्तगत करतो, उत्तम कथा-कादंबऱ्यांच्या आकलनातून जीवनाचा अर्थ समजून घेऊ पाहतो, स्वतःला वा जवळच्या व्यक्तीला झालेल्या आजाराची माहिती पुस्तकांमधून जाणून तो, संगणकाकडून हवे ते काम करवून घ्यायला शिकतो, इ. इ. ही सर्व शिक्षणाचीच उदाहरणे आहेत, परंतु हेतूंचा विचार करता प्रत्येक ठिकाणी वेगळे उत्तर येऊ शकते.

पुढे वाचा

संपादकीय

समाजात सतत बदल होत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्यापरीने असे बदल निरखत-नोंदत असतो, त्यांचे बरे वाईट असे मूल्यमापन करत असतो आणि हे सारे इतरांच्या निरीक्षण-मूल्यमापनाशी ताडून पाहत असतो. बहुतेक माणसांना ‘माझेच खरे’ असा गर्व नसतो. आपले विचार मांडणे, इतरांचे विचार समजून घेणे, नव्या भूमिका घडवणे, असे सारे व्यवहार आपण सतत करत असतो. ‘आता मी काय करू?’ ह्या प्र नाचे उत्तर आपण अशा विचारांच्या देवाणघेवाणीच्या पायावर उभे राहूनच देऊ शकतो. हे सारे करणाऱ्यांच्या विचारांत आणि कृतीमध्ये फार अंतर पडत नाही. पण ‘माझेच’ खरे ही वृत्ती बळावली तर त्यातून ‘अंतस्थ हेतू’, ‘हिडन अजेंडे’, असे सारे घडून कथणी आणि करणीतले अंतर वाढत जाते.

पुढे वाचा

विशेषांक: शिक्षणामागील हेतू

जुलै-ऑगस्ट २००२
विशेषांक: शिक्षणामागील हेतू
कुणी ठेविले भरून
कुणी ठेविले भरून
शब्दाशब्दांचे रांजणः छंद लागला बाळाला घेतो एकेक त्यांतून ।।१।।
काही सुबक रंगीत, काही पेलती मुळी न, काही जोडतो तोडतो, पाहतोही वाकवून ।।२।।
शब्द होतात खेळणीः खेळवितो ओठांवर, ध्यानी मनी जे जे त्याला देऊ पाहतो आकार ।।३।।
कधी वाटते उणीव शब्द येईना मनास, घाली पालथे रांजणः शब्दशोधाचा हव्यास ।।४।।
आणि अवचित त्याच्या ओठावरी शब्द येतोः शब्द त्याचीच घडणः बाळ आनंदे नाहतो ।।५।।
अशा त्याच्या शब्दासाठी माझी उघडी ओंजळः शब्द शब्द साठविते जसे मेघांना आभाळ ।।६।।
—- इंदिरा