मासिक संग्रह: जानेवारी, २००६

पत्रसंवाद

डिसें. २००५ (अंक १६.९) मध्ये प्रा. कुमदिनी दांडेकरांची प्रतिक्रिया महत्त्वाची वाटली. माझ्या लेखनाचा पहिलाच खर्डी मला पाठवावा लागला. इतर सर्व व्याप, जबाबदाऱ्या सांभाळून दिलेल्या वेळात लेख देताना मलाही असमाधान वाटत होते. विशेषतः माझ्या लेखातील स्त्री-अभ्यासाच्या ज्ञानशाखेने स्त्रियांच्या साहित्याकडे कसे पाहिले हे जे लिहिले आहे त्याचे विभावरीच्या लेखनाशी नेमके काय नाते हे स्पष्ट करायला हवे होते. माझी धडपड अशी होती की एकीकडे ‘विभावरी’च्या लेखनाला त्या काळात मिळालेले महत्त्व समजावून घ्यावे आणि दुसरीकडे एकूणच महाराष्ट्रातील मराठी समाजाने १९५० नंतर ज्या प्रकारे एकूणच साहित्याचे क्षेत्र, विषय मर्यादित केले त्याकडे लक्ष वेधून स्त्रियांच्या लेखनाचाही कोंडवाडा का झाला ह्या प्रश्नाला तोंड फोडावे.

पुढे वाचा

सर्वंकष सेक्युलॅरिझम आणि भारतातील स्थिती

सेक्युलॅरिझमसाठी दिल्या गेलेल्या लढ्यात फ्रान्समध्ये १९०५ साली पारित झालेला चर्च व शासन यांच्या विभक्तीकरणाचा कायदा ही एक महत्त्वाची घटना होती. जुलै २००५ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या जागतिक मानवतावादी संमेलनात (१६ वे संमेलन) या कायद्याच्या शताब्दीनिमित्त धर्म व शासन यांचे विभक्तीकरण हे मुख्य सूत्र मानले गेले. मला संमेलनभर विभक्तीवर फारच भर दिला गेला असे वाटले. गेल्या शतकांतील घडामोडी पाहत विभक्तीच्या संकल्पनेची पुनर्तपासणी व्हायला हवी असे वाटले. अनेक सेक्युलरिस्ट धर्म आणि राज्यशासन यांच्यामध्ये अभेद्य भिंत उभारण्याची भाषा करतात. अशा भिंतीने धर्माची राज्यव्यवहारातली ढवळाढवळ थांबेल, आणि हे इष्टच आहे, पण भिंतीने राज्य शासनालाही धर्मात हस्तक्षेप करता येणार नाही.

पुढे वाचा

रोटी-बेटी व्यवहार सामाजिक समतेस पोषक

भारतात व बाहेरही हिंदूंची लग्ने मुख्यतः त्यांच्याच जातींमध्ये होतात. एखाददुसरे लग्न विजातीय झाले तरी त्यात अस्पृश्याचा समावेश क्वचितच असतो. अशा बेटी-व्यवहारामुळे जातिसंस्था व अस्पृश्यता जिवन्त आहे. असे विवाह सामाजिक समतेस पोषक नाहीत. भारतीय संविधानाने सामाजिक समतेचा पुरस्कार केला व अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली, त्यामुळे पूर्वी मोगलाईत, पेशवाईत व नंतर इंग्रजी राजवटीत स्पृश्य हिंदूना जे अस्पृश्य फुकट गुलाम म्हणून मिळत होते ते मिळण्याचे थांबले व जन्मानेच ब्राह्मण, क्षत्रियांना मिळालेला उच्च जातीचा मान व सामाजिक प्रतिष्ठा यांना धक्का बसला. हा तोटा भरून काढण्याकरिता देशाची राज्यघटनाच बदलवून चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्था व मुख्यतः अस्पृश्यता परत कायद्याने आणण्याची हुक्की वरिष्ठ वर्गाच्या काही थोड्या लोकांना येते.

पुढे वाचा

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (२)

ह्यापूर्वी उल्लेखिलेल्या सर्व बाबींमुळे आता कंपन्या आंतरराष्ट्रीय न राहता ट्रान्सनॅशनल (राष्ट्रातीत) झाल्या. ह्या कंपन्याची राष्ट्रीय निष्ठा ही भावनिक असत नाही. ती फक्त कायदेशीर असते. कॉम्प्युटरच्या एका बटनवर लंडन, टोकियो किंवा न्यूयॉर्कशी नुसते संबंधच प्रस्थापित होतात असे नव्हे तर क्षणार्धात चलन, स्टॉक्स, शेअर्स आणि वायदेबाजार ह्यांच्यात देवाणघेवाण शक्य झाली आहे. मोठ्या कंपन्याची भांडवलशक्ती, तिच्या मागे असलेली त्यांच्या राष्ट्राची राजकीयशक्ती, ही कित्येक लहानमोठ्या अप्रगत देशांपेक्षा अधिक असते. त्यामुळे त्या कंपन्यांना अप्रगत राष्ट्रांत आपल्या फायद्याकरता मनमानी करता येते. लहान आणि गरीब राष्ट्रांचे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येते.

पुढे वाचा

नैतिकतेचा अवयव

इतरांची वागणूक समजावी आणि तिचे मूल्यमापन करता यावे यासाठी आपल्या मेंदूंमध्ये बरीच तरल यंत्रे उत्क्रांत झाली आहेत. इतरांसोबत राहण्यासाठी हे आवश्यकच होते. आपल्या एकूण मनोधारणांच्या घडणीमागे जगण्याची आणि वंशजांच्या रूपात तगण्याची जुनीच गरज होती, हेही आपण वारंवार पाहिले. पण आपल्यांत, माणसांत, अन्न, निवारा, कामव्यवहार या साध्या गरजांच्या पलिकडे जाण्याची क्षमताही असते. आजचे आपले इतर प्राण्यांबद्दलचे ज्ञान असे की ते तात्कालिक गरजा आणि परिस्थितिजन्य दबावांनाच प्रतिसाद देतात. आपले तसे नाही. आत्मभान, भाषा, यांसारख्या क्षमतांमुळे आपण क्षणिक ऊर्मीपलिकडे जाऊन कल्पनांचा सुटा, ‘केवल’ (abstract) विचार करू शकतो, योजना आखू शकतो, आपले जीवन सुधारायचा प्रयत्न करू शकतो, कलाविष्कार करू शकतो, नवे विचार घडवू शकतो, इत्यादी.

पुढे वाचा

नैतिक समजुती

गर्भपात, भ्रूणपेशी-संशोधन, लिंगनिदान, शाकाहार-मांसाहार, फुटन (क्लोनिंग) इत्यादींविषयी अनेक ‘समजुती’ पक्क्या समजुती आपणास आजूबाजूस दिसतात. आधुनिक जैववैद्यकातील फुटन आणि भ्रूणपेशी संशोधन (Stem Cell Research) हे सध्याचे दोन विषय जैववैद्यक आणि नैतिकता या विषयांचे कीस काढणारे ठरले आहेत. यांविषयी अनेक समजुतींची सरमिसळ समाजात आढळते.
या समजुतींना विज्ञान जसजसे आव्हान देत आहे तसतशा त्या काही ठिकाणी आणखीच घट्ट होताहेत. उदा. धार्मिक समजुती. आपण अनेक समजुती बाळगतो. ‘समजुती बाळगतो’ याचा अर्थ असा की धर्म मानणारा धर्माचे नियम, रूढी, आचार, विधी यांविषयींच्या समजुतींचा संच बाळगत असतो; वैज्ञानिक विज्ञानाचे नियम आणि वैज्ञानिक तत्त्वे ह्यांबाबत समजुतींचा संच बाळगतात; उपयुक्ततावादी सामाजिक निर्णयांच्या आणि निष्कर्षांच्या समजुतींचे संच बाळगतात.

पुढे वाचा

कापूस ‘कोंडी’

आफ्रिकेत कापूस पिकवणे सोपे नाही. पश्चिम आफ्रिकेतल्या माली या देशता दहा हेक्टरांपेक्षा कमी जमिनीवर शेती करणाऱ्या बाफिंग डायराला विचारा. सरकारी कंपनीने दिलेले बियाणे फारसे उत्पादन देत नाही. या वर्षीची बोंड-अळी पाचदा फवारणी करूनही हटली नाही. हवा बरी नव्हती. हाताने कापूस वेचावा लागला, भर उन्हाळ्यात. माकडांनी बोंडांमधल्या पाण्यासाठी बोंडे खाल्ली. पण डायरापुढची सगळ्यात मोठी समस्या आफ्रिकेत नाही ती आहे ५,००० मैल दूर.. अमेरिका (USA) आपल्या २५,००० कापूस पिकवणाऱ्यांना वर्षाला तीन अब्ज डॉलर्स सब्सिडी देते [रुपयांत, सरासरी शेतकऱ्याला चौपन्न लक्ष ! ] अमेरिकेत कापसाचा हमीभाव आहे, पाऊंडाला बहात्तर सेंट्स [ सुमारे रु.

पुढे वाचा

“सीडी”

आजचा सुधारक चा जाने.-फेब्रु. ०४ (अंक १४.१०) हा आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरचा विशेषांक होता. अभ्यागत संपादक होता चिंतामणी देशमुख, उर्फ ‘सीडी’. अंक वाचकांपर्यंत पोचताच मौज प्रकाशनगृहाचे श्री. पु. भागवत यांचा दूरध्वनी आला अंकाचे पुस्तक काढावे, आणि यात मौज मदत करेल! पुस्तक निघायच्या बेतात असताना सीडीचे २ डिसें. ०५ ला निधन झाले.
भागवतांचा निरोप सीडीला कळवल्यावरची त्याची प्रतिक्रिया मजेदार होती’चांगलं झालं असं समजायचं ना?” सीडी ‘डावा’, मार्क्सवादी, पण कर्मठही नव्हे आणि सहज ढळणारा लेचापेचाही नव्हे. त्याच्या विचारांचा पाया होता तो विज्ञानात. विज्ञानाची मूळ प्रेरणा माणसाच्या ऐहिक सुखाच्या ओढीतून येते, हे पूर्णपणे आत्मसात करून, त्याला सामाजिक भानाची जोड देऊन सीडी वाट चालत असे.

पुढे वाचा

उपयोगितावाद (१): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण १: सामान्य आलोचने
मानवी ज्ञानाची वर्तमान अवस्था अपेक्षेहून इतकी भिन्न असावी किंवा अतिमहत्त्वाच्या विषयांतील विचार इतका रेंगाळावा यांतील सर्वांत सूचक गोष्ट म्हणजे युक्त आणि अयुक्त यांच्या निकषासंबंधीच्या वादाचा निर्णय करण्याच्या बाबतीत झालेली अत्यल्प प्रगती ही होय. जीवनाचे सर्वोच्च साध्य कोणते, किंवा नीतीचे मूलाधार काय आहेत हा प्रश्न तत्त्वज्ञानाच्या उत्पत्तीपासून तात्त्विक विचारांतील प्रमुख प्रश्न मानला गेला असून त्याला उत्तर देण्यात अतिशय बुद्धिमान लोक गढून गेले आहेत; एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्यात अनेक तट पडले असून त्यांचा परस्परांशी तीव्र संघर्ष चालू आहे.

पुढे वाचा

रोगराईचा दहशतवाद

अगदी ११ सप्टेंबर २००१ लाही त्या दिवशीच्या अमानुष दहशतवादाने जेवढी माणसे मेली त्यापेक्षा जास्त एड्सने मेली. इतर सामान्य दिवशी तर एड्स आणि तसल्या रोगांनी मरणारे संख्येने बरेच जास्त असतात. ह्या रोगांना अवरोध करता येतो, रोग्यांना दुरुस्त करता येते आणि रोगांचे व्यवस्थापन करता येते. या तथ्यांमुळे दहशतवादाच्या विकारीपणाचे, विखारीपणाचे अवमूल्यन होत नाही, किंवा दहशतवादाला थोपवायची गरजही कमी होत नाही. पण ही तथ्ये हे अधोरेखित करतात की थांबवता येणारी पण थांबवली जात नसलेली रोगराई जास्त महत्त्वाची आहे.
[टाईम साप्ताहिकाने प्रिन्सिपल व्हॉईसेस नावाचा जगापुढील आह्वानांवर चर्चा घडवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला आहे.

पुढे वाचा