हिरण्यकश्यपूचे मिथक* आणि लाप्लासचे उत्तर  – नास्तिक परिषदेच्या निमित्ताने 

दानव सम्राट हिरण्यकश्यपू याला वरदान प्राप्त झाले होते: तुला मृत्यू दिवसाही नाही; रात्रीही नाही. राजवाड्याच्या आतही नाही; बाहेरही नाही. माणसाकडूनही नाही, मानवेतर प्राण्याकडूनही नाही. हिरण्यकश्यपू विद्वान होता. द्विमूल्य तर्कशास्त्रातील प्राविण्याबद्दल त्याला विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी देऊन शुक्राचार्य विद्यापीठाने त्याचा गौरव केला होता. त्याला वाटले आता आपण अमर झालो. सामर्थ्यवान तर तो होताच. तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला. त्याला राजपुत्र प्रल्हादाच्या परमेश्वराचे अस्तित्व रुचेना. 

प्रल्हाद त्याचा मुलगा. पण बापलेकाचे पटत नव्हते. द्विमूल्य तर्कशास्त्र प्रल्हादाला कळत नव्हते. परमेश्वर नाही हे त्याला मान्य नव्हते. त्याला जे कळायचे नाही ते तो परमेश्वरावर सोपवून मोकळा व्हायचा. परमेश्वर अणुरेणू व्यापून राहिला आहे अशी त्याची धारणा होती. प्रल्हादाने आपल्या कल्पनाविलासातून संस्कृती नावाचा एक भव्य प्रासाद बांधला होता. सहस्रावधि भव्य, नक्षीदार स्तंभानी त्या वास्तूला तोलले होते. त्या प्रत्येक स्तंभात ईश्वराचे वास्तव्य आहे अशी प्रल्हादाची श्रद्धा होती. हिरण्यकश्यपूला प्रल्हादाचे विचार उपमर्दकारक वाटायचे. त्यावरून दोघांची भांडणे व्हायची. एक दिवस हिरण्यकश्यपू क्रुद्ध होऊन प्रल्हादाला म्हणाला, “कुठं आहे तुझा तो परमेश्वर? या खांबात आहे?” प्रल्हाद म्हणाला, “तो सर्वत्र आहे. मग तेथेही तो असणारच.” हिरण्यकश्यपूने गुरु शुक्राचार्यांना स्मरून द्विमूल्य तर्कशास्त्राचे मंत्रोच्चारण केले आणि अवकाशातून हात फिरवला. त्याक्षणी एक दिव्य अजस्र हातोडा त्याच्या हातात आला. या हातोड्याच्या स्पर्शमात्रे कितीही बळकट पाषाणाचे दोन तुकडे व्हायचे. हिरण्यकश्यपूने पहिल्याच घावात खांबाचे तुकडे केले. खांबातून अग्निशलाका उमटल्या, पण परमेश्वर काही दिसेना. मुलाच्या उद्धटपणामुळे रागाने बेभान झालेला हिरण्यकश्यपू आता एका मागून एक खांब भंग करत सुटला. तो भक्कम प्रासादही आता डळमळू लागला. संध्याकाळ होत आली. शेवटी एकच खांब उरला आणि त्याच्या आधाराने उभ्या असलेल्या काही विशाल पाषाणाकृती. “हा शेवटचा खांब! यात तरी तुझा तो देव आहे का?” हिरण्यकश्यपूने विकट हास्य करत प्रल्हादाला विचारले. खांबात देव नाही याची हिरण्यकश्यपूला खात्री होती. प्रल्हाद शांत होता. त्याची श्रद्धा दृढ होती. “तो सर्वत्र आहे. इथं, कदाचित, तो वेगळ्या रूपात प्रकट होईल.” प्रल्हादाचे वाक्य पुरे होण्यापूर्वीच हिरण्यकश्यपूने, आपले सर्व सामर्थ्य एकवटून हातातील त्या अद्भुत शक्तीच्या हातोड्याने शेवटच्या स्तंभावर प्रहार केला. त्या आघाताने निर्माण झालेल्या ऊर्जेतून अग्नीच्या ज्वाला उठल्या. संधिप्रकाशात त्यांनी अक्राळॉविक्राळ रूप धारण केले. एकाद्या विशालकाय सिंहाने सर्व विश्व गिळंकृत करणाऱ्यासाठी आपले मुख पूर्ण उघडावे तशा त्या भासत होत्या. त्याचक्षणी सहस्र सिंहानी एकाच वेळी गर्जना करावी असा ध्वनी झाला आणि तो खांब आणि त्याच्या आधारे कशीबशी उभी असलेली ती उरलेली वास्तू एकदमच हिरण्यकश्यपूच्या अंगावर कोसळली. वास्तू कोसळत असताना त्याने बाहेर पळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत होते. कारण शिळेच्या आघाताने विदीर्ण झालेला त्याच्या शरीराचा कमरेवरचा भाग राजवाड्यात दिसत होता आणि पायाकडचा अर्धा भाग वाड्याबाहेर गेला होता. मृत्यूसमयी हिरण्यकश्यपू ना राजवाड्याच्या आत होता ना बाहेर; ना तो दिवस होता ना रात्र. त्याला ना माणसाने मारले होते ना पशूने. 

प्रल्हाद उदास डोळ्यांनी ती दैवलीला पाहात उभा होता. 

* * * * *

जेव्हा आस्तिक्य आणि नास्तिक्य यावर चर्चा सुरू होते तेव्हा एक अडचण सातत्याने समोर येते : ‘ईश्वर आहे’ किंवा ‘ईश्वर नाही’ यांपैकी कोणतीही गोष्ट वास्तव आहे असे सिद्ध करता येत नाही. देव आहे ही जशी श्रद्धा आहे, तशीच देव नाही हीही श्रद्धाच आहे हे मान्य करावे लागते असे म्हणणे वावगे ठरू नये. या कसोटीवर मग आस्तिक आणि नास्तिक दोघेही श्रद्धाळू ‘धार्मिक’ ठरतात, बुध्दिप्रामाण्यवादी ठरत नाहीत. पण आपणही धार्मिकच आहोत हे मान्य करायला नास्तिकांना अवघड जाते. देवाचे अस्तित्व सिद्ध न होणे म्हणजे देवाची अस्तित्वहीनता सिद्ध होणे नव्हे. पण हे मान्य करायला नास्तिक सहसा तयार नसतात. आस्तिक आणि नास्तिक दोघांच्याही बाबतीत शब्दांव्यतिरिक्त काहीच प्रमाण असत नाही. याचे कारण कोणत्याही ज्ञानाचा शोध गृहीतकांपासून सुरू होतो. ती माणसाच्या ज्ञानाची मर्यादा आहे. असे का होते हे जाणून घेण्यासाठी आपण प्रथम ज्ञान कसे मिळवतो याचा थोडक्यात आढावा घेऊ. 

१. गृहीतकांपासून सुटका नाही
माझ्या मते, ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रियेत तीन घटक काम करत असतात: ज्ञानेन्द्रिये, भाषा आणि तर्कशास्त्र. आपण ज्ञानेंद्रियांद्वारे निरीक्षण करून माहिती गोळा करतो, गोळा केलेल्या माहितीवरून काही नियम मांडतो. हे नियम उद्गामी तर्क (Inductive Logic) वापरून काढलेले असतात. या नियमापासून आपल्या ज्ञानाची सुरुवात होते. कार्यकारणभावाने या नियमापासून काही निष्कर्ष काढून त्या ज्ञानाचा विस्तार केला जातो. हे निष्कर्ष निगामी तर्क (Deductive Logic) वापरून काढलेले असतात. या सर्व कामांत भाषा हे माध्यम असते. यांपैकी प्रत्येक घटकाच्या काही स्वाभाविक मर्यादा आहेत. भाषेत अंगभूत संदिग्धता असते. उद्गामी तर्क पांगळा असतो आणि निगामी तर्क आंधळा असतो. त्यामुळे स्थलकालातीत सत्याच्या ज्ञानाची हमी नेहमी मृगजळ ठरते. 

अनेक निरीक्षणात एखादी गोष्ट आढळून आली म्हणून पुढेही ती तशीच घडणार याची हमी नसते. एक ही संख्या दहा कोटीहून लहान आहे; दोन ही संख्या दहा कोटीहून लहान आहे; तीन ही संख्या दहा कोटीहून लहान आहे;…. अशी कोट्यवधी उदाहरणे आहेत. यावरून सर्व संख्या दहा कोटीहून लहान आहेत असा नियम सिद्ध होता नसतो. उदाहरण म्हणजे प्रमाण नव्हे. त्यामुळे उद्गामी नियमाची विश्वासार्हता नेहमीच संशयाच्या धुक्यात धूसर राहते.

निगामी तर्कशास्त्र विश्वासार्ह निष्कर्ष देते, धूर असेल तिथे अग्नी असतो हा नियम झाला. तो आम्हाला उद्गामी तर्कानेच दिला. वादासाठी तो स्थलकालनिरपेक्ष सत्य आहे असेही मानू या. त्यावरून आपण इथे धूर आहे म्हणून इथे अग्नी आहे असा निष्कर्ष काढतो. पण एवढ्याने आपला प्रश्न सुटत नाही. (इथे) आपण पाहतो तो धूरच आहे याची खात्री कोण देणार? ती पाण्याची वाफ नाही कशावरून? म्हणजे आता अग्नीबद्दल ज्ञान मिळवण्याचा प्रश्न धुरावरून वाफेकडे हस्तांतरित झाला. परिणामी आपण दुसऱ्या नियमाकडे वळतो. ही वाफ नाही धूरच आहे कारण त्यात कार्बनमोनॉक्साईड आहे. पण या ज्ञानाने प्रश्न सुटत नाही, फक्त तो वेगळ्या कोर्टात जातो. कारण हा कार्बनमोनॉक्साईड हे तरी कशावरून? अशाप्रकारे ‘क’ या विधानाच्या सत्यतेसाठी ‘ख’ या विधानाची सत्यता तपासा, ‘ख’ची सत्यता तपासण्यासाठी ‘ग’ या विधानाकडे जा … अशी विधानांची साखळी तयार होते. ही साखळी मर्यादित असेल किंवा अमर्याद असेल. साखळी मर्यादित असेल तर आपण तार्किक दुष्टचक्रात सापडतो, म्हणून ती अनुपयुक्त होते. अमर्याद साखळी आपल्यासारख्या मर्त्य मानवाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. यासाठी ही साखळी कोठेतरी तोडावी लागते. निगामी तर्कातील कार्यकारणांच्या साखळीतील ज्या विधानबाबत सर्वसामान्यपणे फारसा वाद होणार नाही अशा एका विधानापाशी आपण ही साखळी तोडतो आणि ते विधान आपण सत्य म्हणून स्वीकारतो. त्यालाच आपण गृहीतक म्हणतो.

२. गृहीतकाची वस्तुनिष्ठता
गृहीतक सिद्ध करता येत नाही. यासाठी त्याला स्वयंसिद्ध सत्य (self evident truth) म्हणतात. स्वयंसिद्ध हे ‘असिद्ध’ या शब्दाचे सुशोभीकरण (euphemism) आहे. उघड आहे की, गृहीतकाचा आधारही उद्गामी तर्क असल्याने त्याची सत्यता नेहमीच संख्याशास्त्रीय (Stochastic) राहते. ही तडजोड असते. 

ज्या कारणासाठी गृहीतक मानावे लागते त्याच कारणासाठी काही शब्दांना प्राथमिक संज्ञा (primitive terms) मानावे लागते. त्याची नेमकी व्याख्या नसते. उदाहरणार्थ लांबी नसलेली रुंदी अशी रेषेची ‘व्याख्या’ केली तर लांबी म्हणजे काय, रुंदी म्हजे काय असे प्रश्न निर्माण होतात. त्यांची व्याख्या अन्य शब्दात दिली तर ‘ते’ म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि ही प्रश्नमालिका संपतच नाही. त्यासाठी नेमक्या व्याख्येशिवायच एखादी संज्ञा प्राथमिक संज्ञा म्हणून स्वीकारावी लागते. अशाप्रकारे ज्या संज्ञाना नेमकी व्याख्या नाही आणि (म्हणून त्या संज्ञा वापरून तयार केलेल्या) ज्या विधानांना नेमका अर्थ नाही, ज्याच्या अस्तित्वाच्या सत्यासत्यतेबाबत संपूर्ण खात्री देत येत नाही अशा विधानांना सत्य मानून, आपण आपल्या ज्ञानाचा प्रवास सुरू करतो. ही माणसाची सत्य समजून घेण्याची मर्यादा आहे. हे विज्ञान, गणित, धर्म, अध्यात्म, राजकारण, तत्त्वज्ञान किंबहुना ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात घडते. गृहीतक, हायपोथिसिस, Axiom, postulate, श्रद्धा, आतला आवाज, वेदवाक्य, गॉस्पेल, देवाची आज्ञा, दृष्टांत, साक्षात्कार, गुरुची आज्ञा, इत्यादि सर्व गोष्टींचा एकच अर्थ असतो: ही गोष्ट मी सत्य म्हणून स्वीकारली आहे. पण त्याची सिद्धता माझ्याकडे मागू नका. 

त्यामुळे गृहीतक सत्य आहे की नाही हा प्रश्न निरर्थक आहे. कोणते गृहीतक अधिक स्वीकारार्ह आहे यावर वाद होऊ शकतो. पण त्याच्या स्वीकार्हतेच्या कसोट्या व्यक्तिगणिक बदलणे शक्य असते. यातून वैज्ञानिकही सुटत नाहीत. 

सूर्य सकाळी पूर्वेला क्षितीजावर उगवतो, दिवसभर आकाशातून भ्रमण करतो. संध्याकाळी पश्चिमेला क्षितिजाखाली जातो, दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्वेला दिसतो. असे अनेकांचे अनेक वर्षांचे निरीक्षण होते. यावरून तो पृथ्वीभोवती फिरतो असे गृहीतक मांडले गेले. आपण स्थिर असताना जे स्थिर दिसते ते स्थिर आणि चल दिसते ते चल असे मानले तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे सत्य आहे. पण गती (किंवा तिचा अभाव म्हणजे स्थिरता) हे दोन वस्तूमध्ये असलेले नाते आहे हे गृहीत धरले तर सूर्य आणि पृथ्वी एकाच पातळीवर येतात आणि मग कुणाला स्थिर समजायचे हा निवडीचा मुद्दा होतो. आणि निवडीचे निकष व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. कोपर्निकसने सूर्याची निवड केली आणि ते करण्यासाठी त्याने गणिताची सोय एवढेच कारण दिले. पृथ्वी स्थिर आहे असे मानणारा टॉलेमी आणि सूर्य स्थिर आहे असे मानणारा कोपर्निकस यांच्या खगोलशास्त्रीय निरीक्षणात काहीही फरक नव्हता. निरीक्षणासाठी लागणारे तंत्रज्ञान दोघांच्याही काळात सारखेच होते. गॅलिलिओला शुक्राच्या कला दाखवणारी दुर्बीण कोपर्निकसला उपलब्ध नव्हती. गॅलिलिओला दुर्बीण मिळाली हा केवळ अपघात आहे. तो झाला नसता तर आपण सत्य कशाला म्हटले असते? टॉलेमीला की कोपर्निकसला? आणि उद्या तंत्रज्ञानात सुधारणा होऊन काही वेगळेच सत्य(?) हाती लागणार नाही हे तरी कशावरून? याचा अर्थ एवढाच होतो की सत्याला काही स्थलकालनिरपेक्ष अस्तित्व नसते, असलेच तरी ते आपल्याला अवगत होईलच असेही नाही. त्यामुळे आपल्यासाठी सत्य म्हणजे केवळ आपले गृहीतक आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष. 

जेव्हा एकाच गोष्टीच्या ज्ञानासाठी एकाहून जास्त भिन्न गृहीतके उपलब्ध असतात तेव्हा कुणाची निवड करायची हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्याची चर्चा येथे केलेली नाही. 

गृहीतक केवळ वास्तव गोष्टींचे ज्ञान मिळवायसाठी उपयोगात आणले जाते असे नाही. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींच्या ज्ञानालाही ते तितकेच लागू आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे ज्ञान हा काहींना वदतोव्याघात वाटण्याची शक्यता आहे. पण भूमितीतील सर्व ज्ञान हे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे ज्ञान आहे. आणि तरीही ते उपयुक्त आहे, याचे श्रेय मानवी प्रतिभेला द्यावे लगेल. रुंदी नसलेल्या लांबीला रेषा म्हणतात. पण या जगात अशी एकही गोष्ट नाही जिला लांबी आहे, पण, रुंदी नाही. म्हणजे रेषा वास्तवजगतात अस्तित्वात नाही. बिंदू अस्तित्वात नाही. तरीही एकाच प्रतलातील दोन असमांतर सरळ रेषा एकमेकींना एकाच बिंदूत छेदतात असे विधान आपण बेधडकपणे करतो. सर्व भूमितीची निर्मिती अशा अस्तित्वात नसलेल्या गोष्टी गृहीत धरून आपण केली आहे आणि तरीही तिचा उपयोग मोठमोठ्या उत्तुंग इमारती बांधण्यासाठी होतो आहे. 

शाळेत आपल्याला शिकवले जाते की, कागदावर एका रेषा काढली आणि त्या रेषेच्या बाहेर एक बिंदू काढला तर त्यातून एकच समांतर रेषा काढता येते. आता समांतर रेषा म्हणजे काय? तर त्या दोन रेषा कितीही वाढवल्या तरी एकमेकांना छेदत नाहीत. कितीही म्हणजे अमर्यादपणे वाढवल्या तरी. पण ज्याच्या स्वतःच्या आयुष्याचीच रेषा मर्यादित आहे तो अमर्याद लांबीची रेषा कशी काढू शकेल? म्हणजे दोन रेषा समांतर आहेत हे आपण कधी प्रत्यक्षात तपासू शकत नाही. मग एकच समांतर रेषा काढता येते हे आपण कशाच्या आधारावर ठरवतो? समांतर रेषा अस्तित्वात आहेत की नाहीत हे ठाऊक नसतानाही आपण त्यासंबंधी विधान कसे काय करतो? याचे उत्तर ते विधान गृहीतक आहे इतकेच आहे. याच गृहीतकावर युक्लीडची सर्व भूमिती बेतलेली आहे. पण खरी गंमत अजून पुढे आहे. एकच समांतर रेषा काढता येते हे गृहीतकच आहे हे लक्षात आल्यावर रेमान या जर्मन गणितज्ञाने एकही समांतर रेषा काढता येत नाही असे गृहीत धरून एक वेगळी सुसंगत भूमिती मांडली. त्याच भूमितीचा उपयोग करून आइनस्टाईनने “जनरल थीअरी ऑफ रिलेटिव्हिटी“ सिद्ध केली. म्हणजे एकच समांतर रेषा काढता येते हेही ‘खरे’ आणि एकही काढता येत नाही हेही ‘खरे’च. एवढेच नव्हे तर एकाच बिंदूतून अनेक समान्तर रेषा काढता येतात असे मानले तरीही आपल्याला ‘खरी’ भूमिती मिळते. हीही भूमिती प्रत्यक्षात वापरता येते. म्हणजे एका बिंदूतून एकच रेषा काढता येते हेही सत्य; एकही काढता येत नाही हेही सत्य आणि अनेक काढता येतात हेही सत्य. त्यामुळे सत्य एकच असते (आणि ते ‘विप्रा: बहुदा वदन्ति”) या आपल्या गृहीतकालाच आव्हान मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त सुसंगत असणे एवढेच ‘सत्य’ आपल्या हाती शिल्लक राहते. दुसरे नाही.

पण गोंधळ येथेही संपत नाही. १९३१ साली कुर्त गोडेल या अमेरिकन तर्कशास्त्रज्ञाने एक सिद्धांत (Theorem) प्रसिद्ध केला. त्यासाठी त्याला गणितातील नोबेल पारितोषिक समजले जाणारे ‘फिल्ड मेडल’ मिळाले. ह्या सिद्धांताला गोडेलचा अपूर्णतेचा सिद्धांत (incompleteness theorem) असे म्हणतात. तो म्हणतो, “काही किरकोळ अपवाद वगळता मोजक्या (finite) गृहीतकांची कोणतीही संविधा अपूर्ण असते.” (Every finitistic system is incomplete.) अशा संविधेत, अंतर्विरोध दिसला तर आपण तिचा त्याग करू शकतो; शक्य असेल तर गृहीतकात योग्य त्या दुरुस्त्या करून अंतर्विरोध आपण दूर करतो. पण अंतर्विरोध आढळला नाही तर तो अस्तित्वातच नाही हे दिलेल्या गृहीतकावरून सिद्ध करता येत नाही (अगदी असेच सॉफ्टवेअर बग्जसंदर्भात म्हणता येते.) 

म्हणजे १०० गृहीतकांचा संच असेल तर त्यात अंतर्विरोध आहे की नाही हे कळत नाही. ते कळण्यासाठी १०१ वे गृहीतक घ्यावे लागते तेव्हा १०० चा संच अंतर्विरोधरहित आहे की नाही हे कळते. पण येथे या १०१ गृहीतकात अंतर्विरोध नाहीना हे तपासण्यासाठी १०२ वे गृहीत धरावे लागते. मग १०३ वे…. दुसऱ्या भाषेत आपण संपूर्ण सुरक्षित कधीच नसतो. याचा अर्थ सत्य मिळत नाही म्हणून आपण सत्याऐवजी सुसंगती शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हाती लागते ते इतकेच: ‘आमच्या सिद्धांतात अजून तरी विसंगती आढळली नाही’ यासाठी वैज्ञानिक आपल्या गृहीतकाला तात्पुरते (working hypothesis) समजतात. 

३. परमेश्वराचे गृहीतक 
या पार्श्वभूमिवर आपण परमेश्वराचे गृहीतक तपासून पहिले तर काय आढळते? सुमारे चाळीस ते सत्तर हजार वर्षांपूर्वी कधी तरी होमो सेपियन प्रजातीच्या प्राण्याला अमूर्त गोष्टींचा विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली आणि तो अन्य प्राणीजगतापासून वेगळा झाला. त्याला आकलनक्रांती (कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन) म्हणतात. इ.स.१९३९ मध्ये जर्मनीमध्ये स्टॅडेल येथील गुहेत सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीची एक हस्तिदंती मूर्ती सापडली आहे. तिला सिंहाचे मुख आणि मानवाचे शरीर आहे. ती त्या काळातल्या समाजाच्या देवाची मूर्ती असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ती आकलनक्रांतीची (कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशनची) निशाणी होती. या क्रांतीनंतर माणूस प्रत्येक घटनेमागचा कार्यकारणभाव शोधू लागला. परमेश्वराचे गृहीतक त्याची परिणती होती. माणसाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या गृहीतकातून मिळत होती. हे जग का निर्माण झाले, कोणी निर्माण केले, ते केव्हा नष्ट होणार, वादळे का होतात, आजार बरे होण्यासाठी काय केले पाहिजे, दुःख का निर्माण होते, सुखी होण्यासाठी काय केले पाहिजे, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आता माणसाला मिळत होती. मनुष्य नश्वर होता, दुबळा होता, असहाय होता. माणसाच्या आकलनाप्रमाणे परमेश्वर सर्वव्यापी होता, सर्वज्ञ होता, चिरंतन होता, सर्वशक्तिमान होता, सत्य होता. माणसाला एक आधार हवा होता. परमेश्वराच्या गृहीतकाने तो त्याला मिळाला होता. दुबळ्याना संघटना बळ देते. एकाच देवाला मानणाऱ्यांची संघटना बांधता येत होती. दुबळ्यांना देव बलवान करत होता. संघटना बळकट ठेवण्यासाठी काही नीतिनियमांची गरज होती. त्यातून धर्माची निर्मिती झाली. धर्म पाळला जावा म्हणून ते पाळणाऱ्यांना पारितोषिक आणि न पाळणाऱ्यांना शिक्षा मिळणे आवश्यक होते. शासक आणि शासित यांच्या सामर्थ्यात जेव्हा फार फरक नव्हता तेव्हा ही शिक्षा देणे शासकांना शक्य नव्हते. त्यामुळे ती देवाने देणेच क्रमप्राप्त होते. ती या जन्मात आपोआप मिळाली नाही तर मृत्यूनंतर द्यावी लागणार होती. त्यासाठी देवाने स्वर्ग आणि नर्क बनवले. जो धर्माचे रक्षण करतो त्याचे धर्म रक्षण करणार होता. देवा-धर्माचे गृहीतक माणसाचे सर्व प्रश्न सोडवत होते. उपनिषदे काही बाबतीत फार सडेतोड भाषेत बोलतात. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला म्हणतो, “देव देवासाठी प्रिय नसतो. तो आपले काम करतो म्हणून प्रिय असतो.” ईश्वराचे गृहीतक माणसापुढील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे एक साधन होते. साधनात सुधारणा होत जाते, साधनाचे नवे-नवे उपयोग सुचत जातात. एक साधन टाकून त्याऐवजी तेच काम करणारे दुसरे अधिक प्रभावी साधन निवडले जाते. एकच गोष्ट साध्य करण्यासाठी अनेक साधनेही वापरली जातात. ईश्वराच्या संदर्भात तसे झाल्याचे आढळेल. आकलनक्रांती ही काही एकवेळ घडणारी घटना नव्हती. ती एक अखंड चालणारी प्रक्रिया (Process) होती. आकलनक्रांती सर्वंकष, सर्वव्यापी आणि दूरगामी परिणाम करणारी होती. या क्रांतीनंतर माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि त्याच्या व्यवहारात क्रांतिकारक बदल झाल्याचे दिसून येईल. तो आता अन्य पशूंप्रमाणे परिस्थितीला मूकपणे सामोरे जाणार नव्हता. तो परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करणार होता. बदलता येत नसेल तर ती जास्तीत जास्त अनुकूल कशी होईल, निदान ती कमीत कमी प्रतिकूल कशी राहील हे तो पाहणार होता. इतर प्राण्यांप्रमाणे तो परिस्थितीला सहजासहजी शरण जाणार नव्हता. त्यासाठी तो परिस्थितीचे निरीक्षण करणार होता; काही गृहीतके किंवा ठोकताळे बांधणार होता; काही कार्यकारणभाव शोधणार होता. आणि मग योग्य वर्तन करणार होता. हे कार्यकारणभाव चुकीचे आहेत की, बरोबर हे त्याला त्यावेळी कळण्याचा काही मार्ग नव्हता. तो पूर्वानुभवावरून काही गोष्टी गृहीत धरणार होता. ती त्याची मजबूरी होती. ज्ञान मिळवण्याची त्याच्याकडे ही एकच पद्धत उपलब्ध होती. गृहीत धरलेल्या गोष्टी त्याच्यासाठी सत्य होते. इतरांच्या दृष्टीने त्या भाकडकथाही असतील कदाचित. पण त्याने त्याला काही फरक पडत नव्हता. या गृहीतकाला युआल हरारी मिथक (Myth) किंवा आख्यायिका (Story) म्हणतो. अशा गृहीतकाची का आवश्यकता होती हे आपण पाहिले आहे. धर्म त्याच्या आचारविचारांना अर्थ प्रदान करणार होता. त्याची एक सुसंगत मांडणी करणार होता. यासाठी मी धर्माची पुढीलप्रमाणे व्याख्या करतो :

आकलनक्रांतीनंतर माणूस विचार करू लागल्यावर माणसाला जे प्रश्न पडले त्यांची उत्तरे शोधण्यासाठी काही गृहीतकांच्या पायावर उभा केलेली आचारविचारांची संरचना (Construct) म्हणजे धर्म.

ही व्याख्या अनेक कारणांसाठी मला उपयुक्त वाटते. एक, प्रचलित सर्व धर्म या व्याख्येत बसतात. एकाच पुस्तकाला आणि प्रेषिताला प्रमाण मानणारे अब्राहमिक धर्म, कोणताही प्रेषित न मानणारा सनातन धर्म, कोणताही अधिकृत प्रमाण धर्मग्रंथ न मानणारा बौद्ध धर्म, हे सर्व परंपरागत धर्म वरील व्याख्येत बसतात. सर्व परंपरागत धर्मांना अफूची गोळी समजणारा साम्यवाद या व्याख्येप्रमाणे धर्म होतो, जे माझ्या मते तर्कसंगत आहे. निरनिराळे ‘इझम्स’, लोकशाही किंवा अन्य शासनप्रणालीमागचे तत्त्वज्ञान, राष्ट्रवाद, किंबहुना सतराव्या शतकात निर्माण झालेले विज्ञान, ही या व्याख्येला मान्य असलेली धर्माची आणखी काही उदाहरणे म्हणता येतील. यापैकी हिंदुधर्म, बौद्धधर्म आणि विज्ञान हे धर्मग्रंथ नसणारे धर्म आहेत. बाकीचे धर्मग्रंथ असणारे धर्म आहेत. लोकशाही हाही धर्मग्रंथ असणारा धर्मच आहे. तो अन्य धर्मग्रंथ असणाऱ्या धर्मांपेक्षा एका बाबतीत वेगळा आहे. या धर्मात आपल्या धर्मग्रंथात फेरफार करण्याचे विहित मार्ग उपलब्ध आहेत. त्याला संविधान-संशोधन म्हणतात. पण हा फरक सोडला तर धर्मग्रंथांचाच दर्जा राज्यघटनेला असतो. उलट असेही म्हणता येईल की ज्याच्या संविधानात कधीच बदल करता येत नाही अशा (राज्य)घटनेला धर्मग्रंथ म्हणतात आणि ज्या धर्माच्या अनुयायांना बहुमताद्वारे आपल्या धर्मग्रंथात बदल करण्याचे विहित मार्ग उपलब्ध असतात अशा धर्माला लोकशाही म्हणतात. धर्माची वर दिलेली व्याख्या आणखीही एका गोष्टीसाठी महत्त्वाची आहे. विज्ञानाचे अब्राहमिक धर्माशीच वैर का उद्भवले आणि पौर्वात्य धर्माशी वैर का निर्माण झाले नाही याचाही बोध या व्याख्येच्या विश्लेषणानंतर स्पष्ट होतो. 

विज्ञानाला धर्माच्या व्याख्येत आणण्याचा माझा प्रयत्न काहींना सुरुवातीला मान्य करणे अवघड जाईल. पण असे करणे नवे किंवा रस्ता सोडून नाही. प्लेटो, पायथागोरस यांच्यासारख्या ग्रीक तत्त्वज्ञान्यांनी भूमिती आणि संख्या यांच्यात गूढ अर्थ शोधले होते. परमेश्वराने घालून दिलेले नियमच आपण शोधत आहोत, असा न्यूटनचा दावा होता. अलिकडच्या काळात अध्यात्म आणि विज्ञान यातील समानता दाखवणाऱ्या पुस्तकांनी लोकप्रियतेचे उच्चांक मोडले आहेत. किंबहुना अध्यात्म आणि विज्ञान एकच सत्य सांगतात असा काहींचा प्रामाणिक दावा आहे. हा दावा कितपत योग्य आहे हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण परंपरागत धर्म आणि आधुनिक विज्ञान या दोघांचे उद्दिष्ट एकच आहे. त्यांचा प्रवास सुरूही एकाच ठिकाणाहून होतो; कारण ज्ञान मिळवण्याचा तो एकमेव मार्ग आहे, हे आपण पाहिले आहे. तेव्हा विज्ञानाला आणि धर्माला एकाच धाग्यात ओवण्यात काही वावगे होणार नाही. महाभारतात पशू आणि माणूस यातील फरक सांगताना म्हटले आहे. 

आहार निद्रा भयमैथुनं च 
सामान्यमेतद् पशुभिर्नराणाम्।
धर्मस्तु तेषामधिको विशेष:
धर्मेणहीना: पशुभि: समाना: ।। 

आहार, निद्रा, भय, आणि मैथुन या चार गोष्टी होमो सेपियन आणि अन्य प्राणी यात समान आहेत. धर्म ही एकच विशेष गोष्ट होमो सेपियन या प्रजातीत अन्य प्रजातींपेक्षा अधिक आहे. जो कोणताही धर्म मानत नाही तो पशू असतो. हा धर्म मी वर दिलेल्या व्याख्येतील धर्म आहे. ही विशेष गोष्ट आकलनक्रांतीने होमो सेपियनला दिली आणि तिने त्याला जगाचा स्वामी बनवले. 

चर्चेच्या सोयीसाठी मी धर्माची पहिल्या पातळीवर संघटनाप्रधान धर्म आणि सत्यशोधक धर्म अशी विभागणी केली आहे. सर्व अब्राहमिक धर्म, साम्यवादासारख्या राजकीय तत्त्वज्ञानावर आधारलेल्या संघटना, वसाहतवाद इत्यादी संघटनाप्रधान धर्माची उदाहरणे आहेत. तर भारतीय धर्म, विज्ञान, लोकशाही ही सत्यशोधक धर्माची उदाहरणे म्हणता येतील. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशात लोकशाही टिकली नाही. भारतात लोकशाही टिकू शकली याचे एक कारण लोकशाही भारतीय धर्माप्रमाणेच एक सत्यशोधक धर्म आहे हे असण्याची शक्यता आहे. सत्यशोधक धर्माचेही दोन भाग पडतात. तत्त्वचिंतनातून निर्माण झालेले आणि बाह्य जगाच्या निरीक्षणातून आणि प्रयोगातून विकसित पावलेले. पहिल्याला अध्यात्म आणि दुसऱ्याला विज्ञान म्हणतात. यांचे बरेच प्रकार आणि उपप्रकार आहेत. यांच्यात रेखीव सीमारेषा आखलेल्या नाहीत. तसेच एक व्यक्ती एकाच वेळी काही बाबतीत एका धर्माची आणि इतर बाबतीत दुसऱ्या धर्माची अनुयायी असू शकते. संघटनाप्रधानता आणि सत्यशोधकता हे काही परस्परविरोधी शब्द नाहीत. फक्त दोन्हीत निवडायचे असेल तर त्या धर्माचे अनुयायी कोणत्या गोष्टीला सर्वसामान्यपणे प्राधान्य देतात हे ही विशेषणे दर्शवतात. अब्राहमिक धर्मातही अध्यात्मिक विचार आहे आणि बौद्ध धर्मासारख्या सत्यशोधक धर्मानेही संघटना निर्माण केल्या आहेत. लोकशाहीला राज्यघटना हा धर्मग्रंथ आहे म्हणून तिला मर्यादित अर्थाने संघटनाप्रधान धर्म म्हणता येईल. पण राज्यघटनेत लोकांच्या संमतीने सुधारणा करण्याचे सुविहित मार्ग उपलब्ध आहेत म्हणून तिला सत्यशोधक म्हणणे अधिक योग्य होईल. प्रस्तुत लेखाचे एक मर्यादित उद्दिष्ट संघटनाप्रधान धर्म, अध्यात्म आणि विज्ञान याना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना समजून घेणे आहे. यासाठी जेव्हा संदर्भ स्पष्ट असतो आणि अध्याहृत संकल्पनेवर भर देणे अनावश्यक असते तेव्हा संघटनाप्रधान धर्माला केवळ धर्म, तत्त्वचिंतक सत्यशोधक धर्माला अध्यात्म आणि जड जगातील प्रश्नांचा विचार करणाऱ्या सत्यशोधक धर्माला विज्ञान म्हटले तर आपल्या ज्ञानवृक्षाच्या शाखा खालीलप्रमाणे दिसतील:

४. धर्म आणि विज्ञान यांच्या गृहीतकातील फरक
चार-साडेचारशे वर्षांपूर्वी विज्ञान म्हणजे, आपल्या भाषेत सत्यशोधक ऐहिक धर्म निर्माण झाला. त्यावेळी संघटनाप्रधान धर्म प्रस्थापित होते. प्रस्थापितांचे हितसंबंध सांभाळणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. विज्ञान ऐहिक बाबीत दखल देत होते. त्यामुळे विज्ञान आणि (संघटनाप्रधान) धर्म यांच्यामध्ये संघर्ष होणे अपरिहार्य होते. कारण दोन्हीची कार्यक्षेत्रे समान पण आपल्या गृहीतकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन परस्परविरोधी होता. हा हितसंबंधांचा संघर्ष होता. धर्माची गृहीतके त्रिकालाबाधित होती. विज्ञानाची गृहीतके तात्पुरती (Working hypothesis) होती. विज्ञानाने धर्माच्या गृहीतकांना म्हणजे अस्तित्वालाच आव्हान दिले होते. विज्ञानाची गृहीतके अनुभवातून सुधारत जाणारी असल्यामळे ती माणसाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे आणि सुलभतेने सोडवत होती. त्यामुळे विज्ञानाने धर्माचे एक एक कार्यक्षेत्र ताब्यात घ्यायला सुरुवात केली. तेराव्या शतकात युरोपमध्ये प्लेगपासून वाचण्यासाठी लोक चर्चमध्ये गर्दी करत. आज कोविद १९ पासून बचाव करण्यासाठी सर्व धार्मिक स्थळात प्रवेश बंद केला जातो. साप चावला, कॉलरा झाला तर लोक पूर्वी दर्ग्यात किंवा देवालयात जात. आता ते हॉस्पिटलकडे धाव घेतात. लोकांनी नीतिनियम पाळावे म्हणून पूर्वी स्वर्ग-नरकाची निर्मिती केली होती, आता ते काम न्यायपालिका, पोलिसदल आणि प्रशासन करतात. असे मानवी व्यवहारांच्या सर्व क्षेत्रात घडत आहे. ज्या ज्या क्षेत्रात विज्ञानाने माणसाच्या प्रश्नांना अधिक प्रभावी उत्तरे दिली तेथे तेथे देवाधर्माचे प्रभावक्षेत्र कमी झालेले दिसेल. देवाचे गृहीतक स्टीफन हॉकिंगने म्हटल्याप्रमाणे सदोष आहे. पण काही प्रश्नांना विज्ञानाकडे उत्तरे नाहीत. त्या क्षेत्रात देवाच्या गृहीतकाला स्पर्धकच नाही. त्यामुळे तेथे देव टिकून आहे. (संघटनाप्रधान) धर्माशी जसा विज्ञानाचा तीव्र संघर्ष झाला तसा अध्यात्माशी झाल्याचे दिसत नाही. याचेही कारण, दोन्हीही सत्यशोधक धर्म असले त्यांची कार्यक्षेत्रे बऱ्याच अंशी अलग आहेत. त्यामुळे त्यांचा हितसंबंधांचा संघर्ष उद्भवत नाही.

५. देव नसल्याचे गृहीतक
देव अस्तित्वात नाही असे मानणाऱ्यांमध्ये अनेक बुद्धिवादी, विचारवंत आणि प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांचे म्हणणे, कदाचित सत्यही असेलही. पण त्यांना ते सिद्ध करता आलेले नाही. येणारही नाही, कारण ते गृहीतक आहे. गृहीतकाची उपयुक्तता त्याच्या ज्ञान देण्याच्या क्षमतेत असते. ‘देव नाही’ हे गृहीतक माणसापुढील कोणत्या प्रश्नांची उत्तरे देते? याला सकारात्मक उत्तर नाही. त्या गृहीतकाने मानवजातीच्या प्रगतीत महत्त्वाची भर घातल्याचे दिसत नाही. नास्तिकांचे म्हणणे प्रामुख्याने एवढेच राहते की, धर्माच्या नावावर व्यक्तीचे शोषण होते, समाजात अनाचार माजतात, वैचारिक गुलामगिरी निर्माण होते आणि समाजाची प्रगती थांबते. पण थोडासा खोलात जाऊन विचार केला तर दिसून येईल की हे प्रश्न देवाच्या गृहीतकाने निर्माण झाले नाहीत. ते माणसाच्या लोभाने आणि शासनव्यवस्था अकार्यक्षम राहिल्याने निर्माण होतात. ही स्थिती देवाला रिटायर केल्याने बदलत नाही. दुराचार थांबवण्यासाठी समाजाची नीतिमत्ता सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी काही अन्य उपाययोजना करावी लागेल. त्यासाठी शिक्षण, समाजशास्त्र, मानसशास्त्र, न्याय, प्रशासन, इत्यादी अनेक क्षेत्रांतील विचारवंताना एकत्र येऊन मार्ग शोधावा लागेल. सामाजिक नीतिमत्ता हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

दुसरा आरोप आहे, धर्माच्या नावावर जेवढी युद्धे झाली तेवढी दुसऱ्या कोणत्याही कारणाने झाली नाहीत, या म्हणण्यात काही तथ्य निश्चितच आहे. पण बारकाईने पहिले तर देव मानण्या-न-मानण्याशी याचा काही संबंध नाही हे लक्षात येते. ज्या धर्मांत युद्धे झाली ते सर्व संघटनाप्रधान धर्म होते, सत्यशोधक धर्म नव्हते. यात देव मानणारे अब्राहमिक धर्म जसे होते तसेच देव न मानणारे साम्यवाद, आक्रमक राष्ट्रवाद, वसाहतवाद, नात्सीवाद, फॅसिजम इत्यादी धर्मही होते. त्यांनी केलेली युद्धे आणि अत्याचार आपलेच गृहीतक खरे असे समजण्याच्या अट्टाहासातून झाली. त्या गृहीतकाचा प्रसार करणे आणि ते कोणत्याही सूक्तासूक्त मार्गाने दुसऱ्यावर लादणे यालाच आपले पवित्र कर्तव्य समजण्याच्या विचारातून झालेली आहेत. साम्यवादी देव मानत नाहीत. पण त्यांनी आपल्या प्रजेवर देव मानणाऱ्यांपेक्षा कमी अत्याचार केले नाहीत. किंवा कमी युद्धेही लादली नाहीत. प्राचीन भारतात विविध धर्म अस्तित्वात होते. पण ते सत्यशोधक धर्म होते. संघटनाप्रधान नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील मतभेदांनी धर्मयुद्धाचे स्वरूप धारण केल्याचे आढळत नाही. 

भारतात जातीच्या नावावर शोषण आणि अत्याचार झाले, हा ‘देव नाही’ म्हणणाऱ्यांचा तिसरा आरोप आहे. जातिव्यवस्थेला धर्माचा आधार निश्चितच होता. पण त्याचे स्वरूप वेगळे होते. तो आधार मनुस्मृति या ग्रंथातून येत होता. वेदांतून नाही. मनुस्मृति ही एकमेव स्मृती नाही. स्मृतिंना धर्मग्रंथ मानण्यापेक्षा कायद्याचे पुस्तक मानणे अधिक योग्य होईल. मनू धर्मगुरू नव्हता, हे कायदे अन्याय्य होते. पण हे कायदे माणसाने केलेले होते; देवाने नाही. त्यामुळेच हिंदुधर्मातील सुधारणांचा स्वीकार तुलनेने कमी हिंसक राहिला. जातिव्यवस्था शोषणावर आधारलेली आणि अमानवीय होती. पण ती केवळ धर्माच्या आधारावर जिवंत राहिली नाही. दीर्घ काळ हिंदुधर्मीय राज्यकर्ते नसतानाही ती टिकून राहिली. रामानुजाचार्य, भगवान बसवेश्वर, संत रविदास, कबीर, नानक, तुकाराम महाराज इत्यादी अनेक संतांनी जातिव्यस्थेवर प्रहार केले. या सर्वांची देवावर अनन्य श्रद्धा होती. पण त्याने समाजव्यवस्थेत काही मूलभूत सुधारणा होऊ शकली नाही. याचे कारण जातिव्यवस्था केवळ धर्माच्या आधारावर उभी नव्हती. ती एक अर्थव्यवस्था होती. मनू राजा होता. जोपर्यंत पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण होत नव्हती तोपर्यंत तिला नष्ट करणे अवघड होते. पर्यायी अर्थव्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली. त्यानंतरच जातिव्यवस्थेवर केलेले हल्ले अधिक परिणामकारक होऊ शकले. त्यानंतरच समाजसुधारकांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले. आजही शहरांच्यापेक्षा ग्रामीण भागात जातिव्यवस्था बऱ्याच अंशी तग धरून आहे याचे कारण शहराच्या तुलनेत गावामध्ये अर्थव्यवस्था बदलण्याचा वेग कमी आहे हे आहे. अजून समूळ जातिनिर्मूलनाचे उद्दिष्ट दृष्टिपथात नाही. पण आजचे जातिव्यस्थेचे स्वरूप धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहे. त्यामुळे देव नाकारणारेही जातिवादाला आपल्या स्वार्थासाठी खतपाणीच घालत असतात. अश्या परिस्थितीत ‘देव नाही’ या गृहीतकाने नवीन काय साध्य होणार आहे?

* * * * *

लाप्लास हा गणितज्ञ नेपोलियनचा वैज्ञानिक सल्लागार होता. त्याने ग्रहगोलांच्या गतीवर एक पुस्तक लिहिले आणि नेपोलियनला भेट दिले. नेपोलियन पडला श्रद्धाळू. त्याच्या मते ईश्वराने सहा दिवसात हे विश्व निर्माण केले होते. त्याने पुस्तक वाचून झाल्यावर लाप्लासला विचारले, “तुझ्या पुस्तकात परमेश्वराचा उल्लेखही नाही हे कसे काय?” 

सम्राट नेपोलियन राजपुत्र प्रल्हाद नव्हता आणि वैज्ञानिक लाप्लास सम्राट हिरण्यकश्यपू नव्हता. 

लाप्लास नम्रपणे म्हणाला, “महाराज, माझे सिद्धांत मांडताना त्या गृहीतकाची मला गरज पडली नाही.”

मला वाटते ईश्वराच्या असण्या-नसण्याला लाप्लासने दिले त्यापेक्षा अधिक समर्पक विज्ञाननिष्ठ उत्तर अस्तित्वात नाही.

* मूळ कथेत श्री विष्णू नृसिंहाचा अवतार घेऊन स्तंभातून प्रकट होतात आणि उंबरठ्यावर बसून हिरण्यकश्यपूचे पोट फाडतात

४०३, पूर्वरंग अपार्टमेन्ट, राजारामपुरी १३ वी गल्ली, कोल्हापूर , ४१६ ००८ 
दूरध्वनी (0231) 2525006, चलध्वनी 9834336547, e-mail: hvk_maths@yahoo.co.in

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.