नैनान् विसंगतयः छिन्दति कुंभोजकर

पुणे येथे १८ डिसेंबर २०२२ ला ‘ब्राईट्स सोसायटी’तर्फे आयोजित नास्तिक परिषदेच्या निमित्ताने हरिहर कुंभोजकर यांनी लिहिलेल्या लेखावर मी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया म्हणून लेख लिहिल्याबद्दल कुंभोजकरांचे आभार. मी कुंभोजकरांचे किंवा कुंभोजकर माझे मतपरिवर्तन करू शकतील अशी फारशी आशा माझ्या मनात नाही. त्यामुळे, ‘आजचा सुधारक’च्या वाचकांचे मतपरिवर्तन करणे (किंवा, जे आधीच आपल्या विचारांशी अनुकूल आहेत त्यांचे मत प्रतिपक्षाकडे वळण्यापासून वाचवणे) हाच आम्हा दोघांच्या प्रयासांचा मुख्य उद्देश असू शकतो, तो खासगी चर्चेने साध्य होणारा नाही.

प्रसिद्धीसाठी आलेल्या लेखांवर प्रकाशनपूर्व प्रतिक्रिया मिळवून ती लेखासोबतच छापणे हे ‘आजचा सुधारक’मध्ये नवे नाही. ‘आजचा सुधारक’च्या सप्टेंबर २००६ च्या आरोग्य-विशेषांकात मी या बाबतीत receiving end ला होतो, माझ्या लेखावर प्रकाशनपूर्व प्रतिक्रिया मागवून अतिथी संपादकांनी ती माझ्या लेखासोबतच छापली होती आणि नंतर मी व्यक्त केलेल्या नाराजीलाही मुख्य संपादकांनी प्रसिद्ध केले होते. हे चालायचेच.

तरीही, याबाबतीत एक फरक असा करता येईल की, ‘आजचा सुधारक’ची स्थापना बुद्धिप्रामाण्यवादासाठी झालेली आहे. संस्थापक संपादक दि य देशपांडे नास्तिक होते. त्यामुळे, नास्तिक्यासाठी ‘आजचा सुधारक’ पक्षपाती असणेच स्वाभाविक आहे, नास्तिक्याविषयी प्रतिकूल लेखही ‘आजचा सुधारक’ छापते हेच मुळी मला औदार्य वाटते. “मी तुझ्याशी असहमत आहे परंतु तुझ्या अभिव्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी मी प्राणपणाने झटेन” हे वाक्य वॉल्टेअर कधी म्हणालाच नव्हता.

आता कुंभोजकरांचे मुद्दे पाहू.

“मिथकाची भाषा तर्काच्या तराजूत तोलायची नसते.” आणि “मिथक ध्वन्यार्थाने घ्यावे अशी अपेक्षा असते.”

मिथक ध्वन्यार्थाने घ्यावे ही अपेक्षा मला मान्यच आहे, परंतु, कुंभोजकरांनी नास्तिकांच्या भूमिकेला न्याय देण्याऐवजी हिरण्यकश्यपूच्या मिथकातून एक विपर्यस्त, straw man उभा केला आहे. त्यामुळे, त्या मिथकातून कुंभोजकर दाखवू पहात असलेला दृष्टान्त नास्तिक्याविषयी गैरलागू आहे. वास्तवातील नास्तिकांची भूमिका किंवा वागणूक त्या मिथकातील हिरण्यकश्यपूसारखी नसतेच. नास्तिक्य ही श्रद्धा नाही कारण नास्तिक्याचा अर्थ “देव नाही” असा नसतो. “देव आहे असे नाही” इतकाच नास्तिक्याचा अर्थ असतो. “देव आहे” आणि “देव आहे असे नाही” यांपैकी एक आणि एकच विधान सत्य असते. नास्तिक जेव्हा “देव नाही” असा दावा करतात तेव्हा ते केवळ, “देव आहे असे नाही” या तात्त्विक पातळीवरील विधानाचे व्यावहारिक सुलभीकरण असते.

“हिरण्यकश्यपूला प्रल्हादाचाच ‘संस्कृती’ नावाचा प्रासाद नष्ट करायचा होता.”

आत्मघात करण्या/न करण्यावरून नास्तिक्याच्या वैधतेची पारख होतच नाही. इतरांच्या संस्कृतीला काबीज करण्याची किंमत म्हणून आत्मघात करावा की नाही त्याचा निर्णय प्रत्येकाच्या वैयक्तिक अखत्यारीत आहे. नास्तिक असलेल्या बर्ट्रांड रसेल यांचे “I would never die for my beliefs because I might be wrong.” हे मत मला पटते. परंतु, नास्तिक असलेल्या भगतसिंग यांनी ब्रिटिश राजवटीला नष्ट करण्यासाठी आत्मघात करून घेतलाच. जगातील सर्व लोक नास्तिक होणार असतील तर त्याबदल्यात आत्मघात ही किंमत रास्त मानणारे कोणीतरी नास्तिक अस्तित्वात असू शकतील असा माझा अंदाज आहे.

““परमेश्वराच्या अस्तित्वाचे गृहीतक माझ्या पुस्तकातील वर्ण्यविषयासाठी आवश्यक नाही””

नास्तिकांची भूमिकाही लाप्लासच्या भूमिकेसारखीच असते, परंतु, तिला निव्वळ खगोलशास्त्रापुरती मर्यादित न ठेवता ते ती भूमिका सर्वच विषयांमध्ये घेतात. कोणत्याच विषयासाठी देव हे गृहीतक आवश्यक किंवा उपयुक्त नसते. कुंभोजकर यांच्या मूळ लेखात वाक्य आहे की, “धर्माशी जसा विज्ञानाचा तीव्र संघर्ष झाला तसा अध्यात्माशी झाल्याचे दिसत नाही. याचेही कारण, दोन्हीही सत्यशोधक धर्म असले त्यांची कार्यक्षेत्रे बऱ्याच अंशी अलग आहेत.” परंतु, विज्ञान हे सुटे, हवेत निर्माण होत नाही. त्याच्यामागे स्वतःचे असे (आणि अध्यात्माशी विसंगत असे) तत्त्वज्ञान असते. संक्षेपणवाद (reductionism), संदेहवाद (skepticism), बुद्धिप्रामाण्य (reason), नियतवाद (determinism), वस्तुनिष्ठता (objectivity), शून्यवाद (nihilism) यांच्या पायावरच विज्ञान सर्वंकष बनू शकते. हा पाया नसेल तर विज्ञान हा केवळ देवाचे मन जोखण्याचा एक क्षुल्लक तंत्रखेळ उरतो.

“देवाच्या संदर्भात तीन भूमिका घेतल्या जातात: १. देव आहे (आस्तिक), २. देव नाही (नास्तिक), ३. देव आहे की नाही ठाऊक नाही (अज्ञेयवादी). वरील तिन्ही भूमिका ‘देव’ हा शब्द वगळून मांडता येत नाहीत. लाप्लासची (आणि माझीही) भूमिका या तीन भूमिकांहून भिन्न आहे. तो, एक प्रकारे, म्हणतो, “तुम्ही कशाबद्दल बोलताय? माझे पुस्तक लिहिताना मला तरी असल्या कशाची गरज भासली नाही!” लाप्लासच्या विचारकक्षेत देव येतच नाही.”

आस्तिक ‘देव आहे’ असे मानतात, तो विचार नास्तिकांच्या डोक्यात नसतो इतक्याच प्रकारे नास्तिक हे आस्तिकांपेक्षा वेगळे असतात. ‘देव नाही’ हा विचार डोक्यात बाळगून नास्तिक फिरतच नाहीत, ते केवळ, ‘देव आहे’ हा विचार डोक्यात न ठेवता जगतात. व्यावहारिक पातळीवर नास्तिक जेव्हा ‘देव नाही’ ही भूमिका मांडतात तेव्हा तिचा नेमका अर्थ इतकाच असतो की “इतर अनेक लोक ‘देव आहे’ हा विचार डोक्यात बाळगून फिरत आहेत, त्याचा सर्वच समाजाला – नास्तिकांना आणि आस्तिकांनाही – त्रास होतो.”

“त्रिकालाबाधित सत्य नावाची कोणतीही गोष्ट आहे असे दिसत नाही. … सामाजिक क्षेत्रात हे विशेषत्वाने खरे आहे. दुसऱ्याने कोणते गृहीतक मानावे हे ठरवण्याचे अधिकार केवळ धार्मिक अतिरेकीच स्वतःकडे घेतात.” आणि “बुद्धिप्रामाण्य सुसंगती सांगते. सत्य नाही. सत्य सुसंगत असते. पण असत्यही सुसंगत असू शकते.”

‘गृहीतकविहीन सत्य’ ही कुंभोजकरांची सत्याप्रतीची अपेक्षा अवास्तव आहे. गृहीतके नाकारली तर मंचौसन/अग्रिपा (Münchhausen/Agrippa) यांच्यासारखी त्रिधा (trilemma) उडते.

सत्य हे कायमच गृहीतक-सापेक्ष असते. गृहीतके ही स्वयंसत्य असतात. शिवाय, वस्तुनिष्ठ निरीक्षणे आणि तर्क हेसुद्धा पुन्हा कोणत्यातरी गृहीतकांशी सापेक्षच असल्यामुळे, निरीक्षणांवर आणि तर्कावर आधारित निष्कर्ष-सत्येही गृहीतक-सापेक्षच असतात. बाह्य परिस्थिती आणि अंतर्गत गृहीतके यांच्याशी सुसंगत निष्कर्ष म्हणजे सत्य. “सत्य म्हणजेच सुसंगती आणि सुसंगती म्हणजेच सत्य” हे बहुतेक मानवांचे गृहीतक आहे असे मला वाटते. सर्व मानवांची काही सामायिक गृहीतके आहेत. उत्क्रांतीने ती आपल्या (आणि इतर प्रगत प्रजातींच्या) मेंदूंत, शरीरांत हार्ड वायर केलेली आहेत. त्यामुळे, ती अव्यक्त आहेत, ती गृहीतके आहेत हे जाणवणेही अनेकदा अवघड ठरते. त्यामुळेच, त्यांच्यासाठी कुंभोजकर प्रचिती हा शब्द वापरत असतील. मनातील गृहीतकांचा संच सुसंगत नसेल तर काही परस्परविरोधी निष्कर्ष निघू शकतात. मनातील गृहीतक-संच एकमेकांशी सुसंगत नसेल किंवा बाह्य परिस्थितीशी सुसंगत नसेल तर टिकून राहता येण्याची शक्यता घटते. त्यामुळे, सुसंगतीची आस हे एक मूलभूत गृहीतक उत्क्रांतीदरम्यान आपल्या मनात निर्माण झाले. ज्यांच्या मनांतील मूलभूत गृहीतक-संच समान नसतो त्यांच्यात फारसा संवादही शक्य नसतो. नास्तिक्य हे स्वतः गृहीतक नाही, संक्षेपणवाद, संदेहवाद, इ. गृहीतकांवर आधारित तर्काचा एक निष्कर्ष नास्तिक्य आहे. देवाव्यतिरिक्त इतर बहुतेक विषयांत लोकांच्या बहुतेक भूमिका संक्षेपणवाद, संदेहवाद, इत्यादी गृहीतकांशी सुसंगतच असतात. त्यामुळे, संक्षेपण, संदेह, इ. तत्त्वांशी आस्तिक्य विसंगत असल्याचे दाखवता येऊ शकते. “माझ्या मनातील गृहीतक-संच स्वयंसुसंगत आहे आणि बाह्य निरीक्षणांशीसुद्धा सुसंगत आहे” असे प्रमाणपत्र अनेकांना पाहिजे असते. तसे प्रमाणपत्र ज्या आस्तिकांना पाहिजे असेल तेवढ्याच आस्तिकांशी नास्तिक संवाद साधू शकतात. विसंगत गृहीतक-संच बाळगण्यात कोणाला वैषम्य वाटत असेल तर त्यांना विसंगती दाखवून हिणवता येते आणि त्यामुळे ते गृहीतक-संच बदलण्यास प्रवृत्त होऊ शकतात. अन्यथा, आस्तिक आणि नास्तिक हे आपापल्या गृहीतकांच्या ट्रेंचमध्ये दडून बसतील हे अगदीच शक्य आहे.

समता, स्वातंत्र्य, इ. ‘लोकशाही’ मूल्येही त्रिकालाबाधित नाहीत. राजेशाही किंवा धर्मसत्तेला विरोध करण्यासाठी ही मूल्ये सोयीची असतात म्हणून ती मूल्ये ‘आधुनिक’ समाजात प्रचलित आहेत. लोकांना वाटेल ती गृहीतके मानण्याचे स्वातंत्र्य आपण मान्य करतो, अगदी, एखादा स्व-विसंगत गृहीतक-संच किंवा बाह्य परिस्थितीशी विसंगत गृहीतक-संच बाळगण्याचे स्वातंत्र्यही आपण मान्य करतो. परंतु, त्याच प्रकारे, इतरांचे मूल्यमापन करण्याचे स्वातंत्र्यही प्रत्येकाला मिळते. त्यामुळे, ज्यांची गृहीतके भिन्न असतील त्यांना तुच्छ मानण्याचे गृहीतकही बाळगता येऊ शकते. सध्याच्या समाजात थेट नास्तिक्याला प्रतिष्ठा नसली तरी, नास्तिक्याला पोषक विचारव्यूहच (paradigm) प्रतिष्ठित आहे. विज्ञान नास्तिक्याशीच सुसंगत असल्याचे मत प्रतिष्ठित वैज्ञानिकांत प्रचलित आहे. पूर्वीचे वैज्ञानिक कसे आस्तिक किंवा निर्मिकवादी (deist) होते हे दाखवूनही आता आस्तिक्याला विज्ञानात आणि विज्ञानशाहीत मानाची जागा मिळणार नाही. पूर्वीच्या काळी धर्मद्रोह किंवा नास्तिक्य दंडार्ह मानत, परंतु, गॅलिलिओ किंवा जिऑर्डॅनो ब्रूनोंसारखी परिस्थिती आता नाही. त्यामुळे, आस्तिकांनी (आणि कुंभोजकरांनी) नास्तिकांना मूर्ख समजत रहावे आणि नास्तिकांनी आस्तिकांना (आणि कुंभोजकरांना) मूर्ख समजत रहावे, ही व्यवस्था नास्तिकांना गैरसोयीची नाही. नास्तिकांनी आस्तिकांचे (किंवा कुंभोजकरांचे) मतपरिवर्तन करावे याची आता आवश्यकता उरलेली नाही. कुंभोजकरांचे “ज्याला आपण वस्तुनिष्ठता म्हणतो ती प्रत्यक्षात बहुमताची व्यक्तिनिष्ठता असते.” हे वाक्य मला मान्यच आहे आणि सध्या विज्ञानात नास्तिक्याची चलती असल्यामुळे, आस्तिकांचे किंवा कुंभोजकरांचे मतपरिवर्तन करण्याचे फारसे प्रयत्न नास्तिकांनी करावे असे मला वाटत नाही.

“देवाचे अस्तित्व सिद्ध न होणे म्हणजे देवाची अस्तित्वहीनता सिद्ध होणे नव्हे.” आणि
“उदाहरणांनी प्रमेय सिद्ध होत नाही हे जोशी विसरतात. फोडलेल्या खांबांनी ईश्वर नसण्याची शक्यता वाढते. पण तो नसल्याचे सिद्ध होत नाही.” आणि 
“‘देव’ नावाची वस्तू या विश्वात नाही हे म्हणणेही नास्तिकांना खोडून काढता येत नाही.” आणि 
“ते घरात बसून ‘आरोपी सापडत नाही’ असा अहवाल देणाऱ्या कामचुकार पोलिसासारखे वागत आहेत, असे म्हणावे लागेल. देव असण्याचा पुरावा नसणे हाच देव नसण्याचा पुरावा आहे हा दावा न्यायालयात टिकणारा नाही. पुराव्याचा अभाव हा अभावाचा पुरावा नसतो.”

विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने कोणताही वैज्ञानिक सिद्धांत कधी ‘सिद्ध’ होतच नसतो. सिद्धांताला खोटा ठरविण्याचे जितके प्रयत्न असफल होत जातात तितकी त्या सिद्धांताची असत्य असण्याची शक्यता घटत जाते, आणि अशा सिद्धांतालाच व्यावहारिक पातळीवर ‘सिद्ध झाला’ असे मानले जाते. सिद्धांताला खोटा ठरविण्यासाठी एक उदाहरणही पुरते. उदाहरणार्थ, उत्क्रांतीशास्त्रज्ञ जे बी एस हाल्डेन यांनी असे सांगितले होते की जर साठ कोटी वर्षे जुनी सशाची हाडे सापडली तर उत्क्रांती सिद्धांत खोटा ठरेल. त्याच प्रकारे, ‘देव आहे’ या सिद्धांतात जर भक्त प्रल्हादाला असे अपेक्षित असेल की “परमेश्वर सर्वत्र आहे. मग तो प्रत्येक खांबात असणारच.“, तर, केवळ “एका खांबात देव नाही” हे एक निरीक्षणसुद्धा ‘देव आहे’ या अभ्युपगमाला खोटा ठरवण्यासाठी पुरते, आणि त्याने “देव आहे असे नाही” या प्रतिस्पर्धी विधानाची (null hypothesis) पुष्टी होते, त्याची शक्यता वाढते.

साठ कोटी वर्षे जुन्या हाडांच्या पुराव्याचा अभाव हाच साठ कोटी वर्षे जुन्या हाडांच्या अभावाचा पुरावा मानावा लागतो. साठ कोटी वर्षे जुनी सशाची हाडे अजून सापडली नाहीत याचा अर्थ ती भविष्यातही सापडणार नाहीत असा नसतो. त्यामुळे, उत्क्रांती सिद्धांत निर्विवादपणे सिद्ध किंवा सत्य झाला असे कधीच मानता येत नाही. तरीही, “सशाची हाडे शोधण्याचा प्रयत्न अजून असफलच आहे म्हणजे उत्क्रांती सिद्धांत खोटा ठरलेला नाही” याचे लघुरूप म्हणून “उत्क्रांती सिद्धांत खरा ठरला आहे” असे मानले जाते. हे रसेलच्या किटलीपेक्षा वेगळे नाही. रसेलची किटली सापडत नाही तोवर व्यावहारिक अर्थापुरते “रसेलची किटली अस्तित्वात नाही” असेच मानावे लागते. त्याच धर्तीवर, देवाचे अस्तित्त्व शोधण्याचे प्रयत्न फसतात तोवर “देव आहे असे नाही” हा नल-हायपोथेसिस खोटा ठरत नाही आणि “देव नाही” असे मानावे लागते.

‘विगमनजन्य (inductive) शक्यतेलाच सत्य मानणे’ हे केवळ विज्ञानाच्याच बाबतीतच लागू असते असे नाही, तर ते गणिताच्या बाबतीतही लागू असते. नकाशा रंगवण्यासाठी चारच रंग पुरतील हे विधान सिद्ध झाले असे १९ व्या शतकात अकरा वर्षांसाठी खरे मानले गेले होते. परंतु, पुढे ती सिद्धता चुकीची असल्याचे सिद्ध झाले. त्या विधानाच्या सत्यतेची निर्दोष सिद्धता १९७६ साली सापडल्याचे सध्या मानले जाते. फर्माच्या शेवटच्या प्रमेयाची एक सिद्धता अँड्र्यू वाइल्स यांनी १९९३ साली दिली होती परंतु केवळ दोन महिन्यांतच ती सिद्धता सदोष असल्याचे आढळून आले. त्यांनी १९९५ साली दिलेली सिद्धता आजतागायत निर्दोष मानली जाते. परंतु, जशी त्यांनी दिलेली पहिली सिद्धता सदोष असल्याचे सापडले होते तशीच त्यांची नवी सिद्धताही १००% विश्वासार्ह मानता येत नाही. मानव प्रमादशील असतात, त्यामुळे, कोणत्याच मानवाने (किंवा मानवरचित यंत्राने) दिलेली सिद्धता १००% विश्वासार्ह असू शकत नाही. रसेल आणि व्हाइटहेड यांनी लिहिलेली १+१=२ या विधानाची सिद्धता निर्दोष असेल याचीही १००% खात्री देता येतच नाही. तरीही, उत्क्रांती, फोर कलर प्रॉब्लेम, फर्माचे शेवटचे प्रमेय, १+१=२ हे विधान, किंवा “देव आहे असे नाही” हे विधान, ही सर्व विधाने व्यावहारिक पातळीवर सत्यवतच आहेत.

शंकाळूपणा किंवा संदेहवाद (skepticism) या तत्त्वामागची भूमिका आळसाचीच आहे. कोणी विक्रेता यांत्रिक झाडू विकायला आपल्या घरी येतो तेव्हा त्याच्या झाडूच्या गुणवत्तेबाबत आपली खात्री पटवण्याचे कष्ट तो विक्रेता स्वत:च घेतो. “माझा झाडू चांगला नाही हे सिद्ध करा नाहीतर माझा झाडू विकत घ्या” असा हट्ट तो धरत नाही. (जसे प्रदूषणाच्या विषयात polluter pays तत्त्व असते तसे) येथे आपण salesman pays या तत्त्वाची अपेक्षा धरतो. नाहीतर, प्रत्येक विक्रेत्याच्या वस्तूंची तपासणी करण्याचे लचांड आपल्या गळ्यात पडेल. तो विक्रेता आपल्या शेजार्‍याच्या गळ्यात एखादा नादुरुस्त झाडू मारत असेल तर आपण विक्रेत्याचे हात किंवा तोंड धरत नाही हे खरेच, परंतु, दुसर्‍या बाजूला, झाडूची कार्यक्षमता समजून घेण्यासाठी काहीही कष्ट आपण घेतले नसतील तरीही, झाडूच्या कार्यक्षमतेवर संशय घेण्याचे आणि “याने माझ्या शंकेखोरपणाचे समाधान केले नाही” असे ढुमढुमढुमाक करण्याचे आपले स्वातंत्र्यही अबाधित राहतेच. कुंभोजकर नास्तिकांना कामचुकार म्हणतात ती कौतुकाची पावतीच आहे. आज विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात नास्तिक्य असे विराजमान (ensconced) आहे की आस्तिक्याची काहीही चिकित्सा करण्याचे कष्ट घेणे नास्तिकांना आवश्यक नाही.

“न-१ ऐवजी न विधाने गृहीतकात ठेवल्याने काही काम वाढेल एवढेच.” आणि
“ऑकॅमच्या वस्तऱ्याचा आपल्या चर्चेत फार बाऊ करण्याची जरुरी नाही. माझ्या प्रतिपादनात त्याला काहीही महत्त्व नाही.”

पर्यायी अभ्युपगमांपैकी एकाची निवड करण्यासाठी विज्ञानात ऑकॅमचा वस्तरा अपरिहार्य असतो. काम वाढवणे मान्य असेल तर सर्व उपलब्ध निरीक्षणांना ‘जगाचे मूलभूत नियम’ म्हणून मान्य करून टाकता येईल. उदाहरणार्थ, जगातील प्रत्येक रसायनाचे गुणधर्म जसे आहेत तसेच ते असतात याची डॉग्मा-यादी करता येईल. परंतु, काम कमी करणे विज्ञानात अत्यावश्यक (essential) असते. रसायनांचे गुणधर्म हे त्या रसायनांतील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांवरून सिद्ध करणे हे ‘काम कमी करणे’ असते. त्याहीपुढे जाऊन, ब्याण्णव मूलद्रव्यांचे गुणधर्म इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इ. मूलकणांच्या गुणधर्मांवरून सिद्ध करणे हे अधिकच आरामदायक असते. कारण, एकदा थोड्याश्या मूलकणांचे गुणधर्म समजून घेतले की मूलद्रव्यांचे आणि रसायनांचे गुणधर्म ‘आपोआप’ सिद्ध होतात आणि मग रसायनांच्या गुणधर्माची मोठी यादी पाठ करण्याचे कष्ट वाचतात. हा संक्षेपणवाद ऑकॅमच्या वस्तर्‍यातूनच शक्य असतो. जितकी शक्य होतील तितक्या निरीक्षणांची कोणत्यातरी किमान गृहीतक-संचात सोय लावली की जगातील विस्मय कमी होतो. मोठी यादी म्हणजे मोठा विस्मय. यादी छोटी करता आली की अधिकाधिक निरीक्षणांच्या बाबतीत “हात्तेच्या, हे तर अमुकतमुकवरून सहजसिद्ध होते” असे म्हणून त्या निरीक्षणाला गौण लेखता येते. जगाची डिग्री ऑफ फ्रीडम कमी करता येते.

ऑकॅमचा वस्तरा नसेल तर मात्र, “हे जग केवळ एका सेकंदापूर्वीच निर्माण झाले आहे आणि आपल्या सर्वांची निर्मिती मात्र बालपणापासूनच्या स्मृती भरलेल्या मेंदूसकट झालेली आहे” या शक्यतेलाही उडवून लावताच येणार नाही. उपलब्ध जगाचे सर्व नियम या शक्यतेत तंतोतंत सत्य असतील, केवळ एक अतिरिक्त नियम या जगात मानावा लागतो की “हे जग १३ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाले हे खरे नाही, जग केवळ एका सेकंदापूर्वीच निर्माण झाले आहे”. तर या अतिरिक्तच्या नियमामुळे ऑकॅमच्या वस्तर्‍याचे उल्लंघन होते इतक्याच कारणामुळे ही शक्यता उडवून लावता येते.

“नास्तिक म्हणतात “दाखव तुझा देव!” त्याला आस्तिकांच्याकडे बिनतोड जबाब आहे.” आणि “नास्तिक त्यांच्याकडे जातात “देव दाखवा” म्हणून आणि जाळ्यात सापडतात.”

चमत्कारांचे दावे सिद्ध करण्याला जेम्स रँडी किंवा अंनिससारख्या संस्थांनी लाखो-करोडो रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. तसे काही बक्षीस देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याविषयी असल्याचे माझ्या ऐकिवात नाही, तरीही, आव्हानकर्त्याकडे आव्हान-स्वीकर्ता जाणे अपेक्षित असते. बागेश्वरपीठाच्या महाराजाला श्याम मानव यांनी स्वतःकडे बोलावले आहे, स्वतः मध्यप्रदेशात गेले नाहीत. आस्तिक-नास्तिक यांच्यातील बहुतेक वाद हे व्याख्यांविषयीच्या सहमतीची पायरीही ओलांडू शकत नाहीत. जर काही वाद व्याख्यांविषयी सहमती मिळवू शकलेच तरी पुढे फारतर आपापल्या समर्थक प्रेक्षकांना सुखावेल अशा नूरा-कुस्ती भाषेत “तुम्ही मूर्ख आहात – तुम्ही मूर्ख आहात” इ. अर्थाचे युक्तिवाद घडण्यापलिकडे ते वाद अनिर्णितच राहतात असे माझे निरीक्षण आहे. “तुमचा देव दाखवा” इ. आव्हाने नास्तिकांनी गांभीर्याने करूच नयेत असे मला वाटते.

कुंभोजकरांचा “अपात्र लोकांना तो दर्शन देत नाही.” हा दावा नॉन फॉल्सिफाएबल आहे, त्यामुळे, अशा आस्तिक्याच्या समर्थकांशी त्याविषयी चर्चाच करू नये. त्याच्या तुलनेत, त्यांनी दिलेला बोरच्या मित्राचा ““I don’t. But I am told, it works even if I don’t believe it.”” हा दावा तपासनीयतरी आहे. 

“चांद्रमोहीम सुरळीत पार पडली.” आणि 
““I don’t leave any effort from my side.”” आणि 
“अपोलो १३ संकटग्रस्त झाल्यावर चर्चमधून प्रार्थनाही झाल्या होत्या.”

“मी कोणताच धोका पत्करू शकत नाही” हे विधान इस्रोचे अध्यक्ष के राधाकृष्णन यांनी मंगळयानासाठी तिरूपतीला जाण्याबद्दल केले होते. परंतु, GSLV-F06 साठीही के राधाकृष्णन देवळात गेले होते आणि तरीही GSLV-F06 अयशस्वी झाले. त्याच प्रकारे, चांद्रमोहीम-2 च्या वेळचे अध्यक्ष के सिवन हेही देवळात गेले होते आणि तरीही चांद्रयान-2 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पडलेच. ते चंद्रावर सुरळीत पडले की इतर कुठे पडले ते माहिती नाही. कदाचित, ‘बोकडबळी न देण्याचा नास्तिक उन्मत्तपणा करण्याचा धोका’ त्यांनी पत्करल्यामुळे देव कोपला असेल. काही हजार रुपयांचा बोकड कापून काही अब्ज रुपयांचे अंतराळयान वाचविणे हे पास्कलच्या जुगाराशी (Pascal’s wager) सुसंगतच आहे.

“विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा विज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेवर (Objectivity) जेवढा विश्वास असतो तेवढा विज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या वैज्ञानिकांचा नसतो.” असे कुंभोजकर यांचे मत बनण्याचे कारण असे असू शकेल की, विज्ञानाच्या क्षेत्रात ‘प्रत्यक्ष’ काम करणारे अनेक ‘वैज्ञानिक’ हे वस्तुतः केवळ पेपरपुशर तंत्रहमाल असतात. इस्रोत पगारही फार नसतो, त्यामुळे, तिथे हुशार लोक जाणेही अवघड आहे.

मी २०१६ साली लिहिले होते: “गेल्या ४४ वर्षांमध्ये वैज्ञानिक आणि आर्थिक उन्नती होऊनसुद्धा कोणताच देश चंद्रावर फिरकला नाही. रशियासोबतच्या शीतयुद्धातील एक महत्त्वाचा विजय म्हणून लोक चंद्रावर गेले. त्यांना राजकीय विचारधारेने चंद्रावर नेले, विज्ञानाने नव्हे. अन्यथा, अपोलो-8 मोहिमेतील अंतराळवीरांनी बायबलचे पठण केले नसते. इस्रोवाले तिरुपतीला जातात म्हणून आपण थयथयाट करतो. यान चंद्रावर उतरले तेव्हा ऑल्ड्रिनने ‘प्रसाद (युकॅरिस्ट) सेवन’ केले नसते तर काय साधूवाण्याच्या जावयाप्रमाणे त्याचे विमान हरविणार होते काय? उलट, ‘युरी गागारिनला अंतराळात देव सापडला नाही’ असे ख्रुश्चेव म्हणाले आणि राकेश शर्मांनी गांधींना ‘सारे जहां से अच्छा’ सांगितले. हायड्रोजन-ऑक्सिजनच्या टाक्यांपेक्षा अधिक मूलभूत प्रेरकशक्ती विचारसरणीची असते.”

अगदी खरे वैज्ञानिकही जर कधी अंधश्रद्ध असतील तरी त्याचा “विज्ञानात काय चालते” याच्याशी संबंध जोडणे चूक आहे. केकुलेला बेंझीनच्या रेणूंचा आकार ‘कसा’ सुचला ते विज्ञानात गौण असते, न्यूटन किंवा नील्स बोर यांच्या अंधश्रद्धाही विज्ञानाचा भाग नसतात.

“सूर्यकेंद्री विश्व सोपे आहे, म्हणून स्वीकारले गेले नाही.” आणि
“टॉलेमीची पृथ्वीकेंद्री विश्वरचना सर्वमान्य असताना कोपर्निकसने सूर्यकेंद्री रचना मांडली. त्याचे कारण त्याने सांगितल्याप्रमाणे ‘आकडेमोडीची सुलभता’ एवढेच होते. दोन्ही गृहीतकांतून ‘योग्य’ निष्कर्ष निघत होते. कोपर्निकसने पृथ्वीकेंद्री विश्वरचना नाकारली नव्हती. कारण ती ‘चक्षुर्वै सत्यम्’ आहे.”

कुंभोजकरांची तपशीलात गल्लत होते आहे. शुक्र ग्रहाच्या कला गॅलिलिओला दिसल्या तेव्हा टॉलेमीचा सिद्धांत त्या निरीक्षणांशी विसंगत ठरला. म्हणजे, टॉलेमीच्या सिद्धांतातून सर्व निष्कर्ष योग्यच निघत होते असे नव्हे. शुक्राच्या कला कोपर्निकसच्या सिद्धांताशी सुसंगत होत्या. शिवाय, टॉलेमीच्या पद्धतीने ग्रहांच्या स्थानांची आकडेमोड करणे अधिक वेळखाऊही होते. “‘आकडेमोडीची सुलभता’ एवढेच होते.” हे वाक्य “सोपे आहे, म्हणून स्वीकारले गेले नाही.” या वाक्याला छेद देते. 

एखाद्या हरिणाची शिकार करण्याचा चित्त्याचा प्रयत्न असो की आर्म्स रेससाठी रॉकेट्स बनविणारे देश असोत, जो अधिक वेगाने, स्वस्तात, आणि अचूक आकडेमोड करेल तोच स्पर्धेत टिकेल. त्यामुळे, ‘अचूक, स्वस्तात, आणि जलद निष्कर्ष काढणारा सिद्धांत’ हेच सत्य असते. गृहीतक वाढले की सॉफ्टवेअरला अधिक जागा लागते किंवा त्याची आकडेमोड मंदावते.

‘डोळ्यांना दिसते ते सत्य’ हीसुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. वयाच्या लहानपणापासूनच, रोज डोळ्यावर अतिनील किरण पडल्यामुळे डोळ्याचे भिंग पिवळे पडत जाते आणि निळा प्रकाश अडतो. ज्यांच्यावर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया होते त्यांना जग पुन्हा लहान बाळांच्या दृष्टीसारखे स्वच्छ पण अधिकच निळसर भासते. लहान बाळाला दिसते ते सत्य की प्रौढांना की मोतिबिंदू काढलेल्यांना? ही प्रक्रिया एकाच व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांवर समानच प्रमाणात होईल असे नव्हे. कामाचे ठिकाण घराच्या उत्तरेला असेल तर सकाळी आणि संध्याकाळी केलेल्या प्रवासात त्या व्यक्तीच्या उजव्याच डोळ्यावर अधिक ऊन पडेल आणि डावा डोळा कमी बाधित होईल. त्यामुळे, एकाच मानवाच्या दोन डोळ्यांनाही वेगळे रंग दिसू शकतात. मग, डाव्या डोळ्याला दिसते ते सत्य की उजव्या? दृष्टीपटलावर पडणार्‍या प्रकाशाचे विजेत रूपांतर होऊन मेंदूला विद्युतरासायनिक संदेश मिळतात. त्यामुळे, ‘बघणे’ हेसुद्धा शुद्ध अनुभव/निरीक्षण नसते, त्यात निष्कर्षणही असतेच. दृष्यावर अनेक प्रक्रिया (processing) होऊन नंतरच ते चित्र मेंदूला मिळालेले असते. मेंदूच्या जाणिवेपर्यंत ते दृष्य पोहोचेपर्यंत अजूनच निष्कर्ष निघालेले असतात, म्हणूनच तर शेकडो मनोरंजक दृष्टिभ्रम शक्य असतात. त्यामुळे, बहुतेक लोकांच्या बहुतेक डोळ्यांना बर्‍यापैकी समानच ‘दिसत’ असले तरी, ‘चक्षुर्वै सत्यम्’ हा दावा तात्त्विक पातळीवर असत्य आहे.

“या जगात माणसाकडून कोणतीही गोष्ट विनाकारण निर्माण झालेली दिसत नाही आणि चुकून झालीच तरी ती फार काळ टिकलेली नाही.”

येथे कुंभोजकर नैतिकतेचा तर्कदोष (moralistic fallacy) करत आहेत. जे दीर्घकाल टिकते ते उपयुक्त किंवा वांछनीयच असते असे मानणे निराधार आहे. ‘कारण’ हे स्पष्टीकरण (explanation) असते, पण समर्थन (justification) असतेच असे नाही. जातिभेद, गुलामगिरी, वेठबिगारी, इ. अनेक प्रथा शेकडो वर्षे चालल्या. स्त्रियांना हीन लेखणेसुद्धा हजारो वर्षे सुरू आहे.

“विज्ञानाची उत्तरे अधिक समर्पक होती तेथून देव गायब झाले याची बरीच उदाहरणे माझ्या मूळ लेखात आहेत. … साईड इफेक्ट नसणाऱ्या “सुखशांती गोळ्या” मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील तर देव उरल्यासुरल्या क्षेत्रातूनही अंतर्धान पावेल.”

एकीकडे कुंभोजकर असे सूचित करतात की अनेक वैज्ञानिकांच्या लेखी विज्ञान हे केवळ देवाचे मन जोखण्याचे साधन होते. त्यासाठी ते, “आईनस्टाईन ह्यांव म्हणाला”, “प्लांक त्यांव म्हणाला”, “न्यूटनची अमुक अंधश्रद्धा होती”, पायथॅगोरसची तमुक अंधश्रद्धा होती”, अशी मोठी बोर जंत्री देतात. कुंभोजकरांनी स्वतःच असा दावा केला आहे की अध्यात्म आणि विज्ञान यांची कार्यक्षेत्रे वेगळी आहेत. डावे शास्त्रज्ञ स्टीवन जे गुल्ड यांनीही तसा दावा non-overlapping magisteria या शब्दांत केला आहे. कार्यक्षेत्रे वेगळी असतील तर “जशी विज्ञानाची प्रगती होते तशी देवाची पीछेहाट होते” असा दावा निराधार ठरेल. आयुष्याच्या बहुतेक क्षेत्रांत, व्यवहारांत आणि नोकरीच्या ठिकाणी चौकसपणा बाळगायचा, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा, पण देवाचा विषय आला की मात्र श्रद्धा बाळगायची, अशी झापडबंद (compartmentalized) मनोवृत्ती अनेक लोकांच्या, वैज्ञानिकांच्याही ठायी असते. त्यामुळे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे ऐहिक लाभ उपभोगूनही ते श्रद्धा धरून ठेवतातच.

कोणत्याही वैज्ञानिक उपचाराची उपयुक्तता आणि दुष्परिणाम यांची तुलना इतर प्रस्थापित उपचारांशी वारंवार केली जाते. जर उपयुक्तता अधिक असेल किंवा दुष्परिणाम कमी असतील, तरच तो विचाराधीन उपचार स्वीकारला जातो. त्यामुळे, मनःशांती देऊ पाहणारा एखादा आधुनिक उपचार जर पारंपरिक उपचारांपेक्षा आणि, अधिक नेमकेपणे, देवावरील श्रद्धेपेक्षा, सरस नसता तर त्याला स्वीकृतीच मिळाली नसती. ज्याअर्थी वैज्ञानिकांनी आधुनिक उपचार स्वीकारले आहेत त्याअर्थी ते उपचार श्रद्धेपेक्षा अधिक प्रभावी आहेत. रुग्णांचे आणि डॉक्टरांचे पूर्वग्रह वगळण्यासाठी डबल ब्लाइंड चाचणी घेतली जाते, कोणत्या उपचाराची उपयुक्तता आणि दुष्परिणाम किती ते तटस्थ निरीक्षकच ठरवतात. त्यामुळे, ‘ढमुक उपचार सरस आहे’ असे भले रुग्णांना कितीही प्रकर्षाने वाटले तरी ते ठरविण्याची त्यांची अर्हताच नसते.

कोणत्याही अपूर्ण आकांक्षांच्या अवास्तव पूर्तीच्या आशेने लोक देव, मसीहा, किंवा नेत्याच्या भजनी लागतात. परंतु, इच्छा अनंत असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी तृष्णातृप्ती होईलच असे नाही. त्यामुळे, विज्ञानाविषयी लोक असमाधानी असण्याचे खापर विज्ञानावर फोडणे चूक आहे. सरकारने आणि समाजधुरीणांनी लोकांच्या अवास्तव अपेक्षांना टाचणी लावावी. संत तुकाराम सांगतात की, “ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान”. म्हणजे, श्रद्धेतूनही समर्पक उत्तरे मिळत नाहीतच. हेच देवाशिवाय, शून्यवादातूनही (nihilism) शक्य असते. देवावरील श्रद्धेतून समर्पक उत्तरे मिळेल, मनःशांती मिळेल, असे अनेक लोकांना वाटते हे नक्कीच खरे आहे. पण, ज्यांना उत्तरे, मनःशांती खरोखरीच मिळतील ते सर्वसंगपरित्याग करून ऐहिक जीवनातून निवृत्तच होतील. असे लोक एकूण आस्तिकांमध्ये फारच कमी असतात याचा अर्थ असा की, बहुतेक लोकांना देवावरील श्रद्धेतूनही समर्पक उत्तरे किंवा मनःशांती मिळतच नाहीत.

कार्यकारिणी सदस्य, ब्राइट्स सोसायटी

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.