श्री. जोशींना दिसलेल्या विसंगतींचे पोस्ट-मॉर्टम

निखिल जोशी ह्यांनी माझ्या लेखाची इतकी सविस्तर दखल घेतली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांचे उत्तर माझ्या लेखाबरोबरच प्रसिद्ध झाले याचा अर्थ माझा लेख प्रसिद्धीपूर्वीच त्यांना उपलब्ध झाला होता हे उघड आहे. लेखाच्या शेवटी माझा फोन नंबर आणि ई-मेल ID असल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असता तर अधिक सविस्तर चर्चा होऊ शकली असती. त्यांच्या लेखाचे स्वरूपही काहीसे वेगळे झाले असते. कदाचित, त्यानंतर त्यांना आपले उत्तर लिहिण्याची आवश्यकताही भासली नसती. माझेही काही श्रम वाचले असते. पण झाले ते एका अर्थाने फार चांगले झाले. त्यामुळे अन्य वाचकही यावर आणखी साधकबाधक चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित होण्याची शक्यता वाढली. मलाही माझे काही विचार अधिक नेमकेपणाने मांडण्याची संधी मिळाली. या सर्व गोष्टींबद्दल मी जोशींचा आभारी आहे. 

मूळ मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो, ज्यामुळे माझ्या प्रतिपादनाचा योग्य परिप्रेक्षात विचार करणे सुकर होईल. “देव आहे” अथवा “देव नाही” या वादाकडे तीन दृष्टिकोनातून पाहता येते: धार्मिक, सामाजिक आणि तात्त्विक. यांपैकी पाहिल्याशी माझ्या लेखाचा काहीही संबंध नाही. दुसऱ्याबाबत मी एवढेच म्हणेन की, सामाजिक ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता टाळून देवासंबंधी कुणीही काहीही भूमिका घ्यावी. तो त्या व्यक्तीचा संवैधानिक अधिकार आहे. तो तिने संविधानाच्या चौकटीत वापरावा. आपली भूमिका दुसऱ्यांनी स्वीकारलीच पाहिजे असा अट्टाहास अतिरेकी विचारसरणीला जन्म देतो असे इतिहास सांगतो आणि वर्तमानही सांगते. त्यामुळे अशी भूमिका कुणालाही घेता येणार नाही. उरला मुद्दा तात्त्विक प्रश्नांचा. अशी चर्चा करताना, सर्वसामान्यपणे, कोण गुरु कसा लबाड आहे आणि कोण शास्त्रज्ञ कशी बनवाबनवी करतो याचाच ऊहापोह करून विरोधकाला नामोहरम केले जाते आणि चर्चा संपुष्टात येते. टगे सर्वच क्षेत्रात असतात. विकृती कोणत्याही तत्त्वज्ञानात शिरते. हितसंबंध कशातही गुंतू शकतात. त्यावरील चर्चा मला अभिप्रेत नाही. त्यातून निर्माण होणारे प्रश्न कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करूनच हाताळावे लागतील, तात्त्विक चर्चेने नाही. पण यापलीकडे जाऊन दोघांच्याही विचारसरणीना समजून घेता येणे शक्य आहे काय, दोन्ही भूमिकांत काही मूलभूत तात्त्विक फरक असू शकतो काय, या आणि अशा प्रश्नांना समजून घेण्याचा या आणि पूर्वीच्या लेखात प्रयत्न केला आहे. मुख्य चर्चा त्यासंबंधात आहे. बाकी गोष्टी आनुषंगिक आहेत. 

जोशींनी उपस्थित केलेल्या सर्व मूलभूत महत्त्वाच्या प्रश्नांना माझ्या लेखात अगोदरच उत्तरे दिली आहेत. पण मतभेदाची दरी जेव्हा फार मोठी असते आणि विचारपद्धतीत मूलभूत फरक असतो तेव्हा संवादात खंड पडतो, किंवा विसंवाद निर्माण होतो. शब्दांचे अर्थ बदलतात आणि समजुतीची दरी सहजासहजी दूर होत नाही. असेच काहीसे येथे झाले असण्याची शक्यता आहे. यासाठी मी माझ्या प्रतिपादनाचा मुख्य मुद्दा पुन्हा एकदा स्पष्ट करतो. अधिक स्पष्टीकरण देणे जेथे शक्य असेल तेथे देण्याचा प्रयत्न करतो. एवढे करूनही काही मुद्दे उरले असे जोशींना वाटत असेल तर त्यांच्याशी संवाद साधण्यात मला आनंदच होईल. 

मूळ लेखाचे मी जाणीवपूर्वक तीन भाग केले होते. वैचारिकदृष्ट्या ते संलग्न आहेत, पण तार्किकदृष्ट्या ते एकमेकांवर अवलंबून नाहीत. पहिल्या भागात एक मिथक आहे. शेवटच्या भागात एक किस्सा आहे. मिथकातील विसंगतींच्यावर मला काहीही मतप्रदर्शन करायचे नाही. त्या नेहमीच दाखवता येतात. मिथकाची भाषा तर्काच्या तराजूत तोलायची नसते. जोशींना अभिप्रेत असलेली तर्ककर्कशता तेथे नसते. उदाहरणार्थ “मीच परमेश्वर आहे” हे वाक्य “परमेश्वर नाही” या म्हणण्याशी विसंगत आहे हा जोशींचा मुद्दा तार्किकदृष्ट्या योग्यच आहे. पण मिथक ध्वन्यार्थाने घ्यावे अशी अपेक्षा असते. वाच्यार्थाने नाही. पंचतंत्रातील गोष्टीतील “सिंह बोलला,” किंवा “कोल्हा हसला” यांसारखी वाक्ये शब्दश: घ्यायची नसतात हे त्यांना ठाऊक नाही असे नाही. “मीच परमेश्वर आहे” हे वेगळ्या प्रकारे “मी परमेश्वर मानत नाही” असे सांगण्यासारखे आहे, असे मला वाटते. “हिरण्यकश्यपू मूर्ख होता” या जोशी यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. पण जोशींची काही नजरचूक होते आहे. त्यांना वाटते त्याप्रमाणे माझ्या गोष्टीतील हिरण्यकश्यपू स्वतःचा प्रासाद नष्ट करायला निघाला नव्हता. त्याला प्रल्हादाचाच ‘संस्कृती’ नावाचा प्रासाद नष्ट करायचा होता. पण प्रासाद नष्ट करण्याच्या प्रयत्नात तो स्वतःला नष्ट करत आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. तो द्विमूल्य तर्कशास्त्रात पारंगत होता. त्यामुळेच त्याला “आपण अमर आहोत” असे वाटले. हिरण्यकश्यपूची कथा द्विमूल्य तर्काच्या दृष्टिकोनातून अभ्यासण्यासारखी आहे. आपण आणि प्रल्हाद या दोहोंपैकी एकच बरोबर असू शकतो याची त्याला खात्री होती. आणि आपणच बरोबर अशी त्याची श्रद्धा होती. हा त्याचा बौद्धिक अहंकार होता. आपल्या गृहीतकावर अतिरेकी विश्वास असला आणि आपले म्हणणे इतरांनी ऐकलेच पाहिजे असा दुराग्रह असला की, असे होणे स्वाभाविक असते. पण हिरण्यकश्यपूचे मिथक, अशा प्रकारे, कितीही अर्थगर्भ असले तरी माझ्या प्रतिपादनाचा ते अविभाज्य भाग नाही. त्या भागातील सुसंगतीचा अथवा विसंगतीचा माझ्या मूळ प्रतिपादनावर काहीही परिणाम होणार नाही. तेव्हा अशा प्रकारच्या विसंगतींची (?) चर्चा करण्यापेक्षा लेखाचा पहिला भाग न वाचता जोशी पुढे जाऊ शकतात. 

आता शेवटच्या भागातील किस्सा. “परमेश्वराच्या अस्तित्वाचे गृहीतक माझ्या पुस्तकातील वर्ण्यविषयासाठी आवश्यक नाही”, एवढाच लाप्लासचा दावा आहे. पूर्णपणे वैज्ञानिक भूमिका एवढीच होऊ शकते. या भूमिकेवर मी या क्षणी तरी ठाम आहे. उद्याचे ठाऊक नाही. कोणतीही वैचारिक भूमिका कायमची असत नाही. असू नये. नवीन माहिती वा विचार उपलब्ध झाल्यावर ती शक्य तितक्या त्रयस्थपणे तपासून, जरूर तर, आपल्या विचारात सुधारणा करण्याची अथवा त्याचा त्याग करण्याची माझी नेहमीच तयारी असते. आपली वैचारिक भूमिका आपण कधीही बदलणार नाही अशी शपथ केवळ धार्मिक मनुष्यच घेऊ शकतो. मी त्या दृष्टीने धार्मिक नाही. 

आता लेखाच्या मधल्या आणि, माझ्या दृष्टीने, महत्त्वाच्या भागाकडे वळू. देवाच्या संदर्भात तीन भूमिका घेतल्या जातात: १. देव आहे (आस्तिक), २. देव नाही (नास्तिक), ३. देव आहे की नाही ठाऊक नाही (अज्ञेयवादी). वरील तिन्ही भूमिका ‘देव’ हा शब्द वगळून मांडता येत नाहीत. लाप्लासची (आणि माझीही) भूमिका या तीन भूमिकांहून भिन्न आहे. तो, एक प्रकारे, म्हणतो, “तुम्ही कशाबद्दल बोलताय? माझे पुस्तक लिहिताना मला तरी असल्या कशाची गरज भासली नाही!” लाप्लासच्या विचारकक्षेत देव येतच नाही. “जी गोष्ट माझ्या विचारविश्वाचा भाग नाही तिच्यासंबंधी मी कसे बोलू?” असा त्याचा सवाल आहे. लाप्लास, जोशींनी उल्लेख केलेले, Occam’s razor वापरतो (आणि ते तो योग्य पद्धतीने वापरतो.): ज्या गृहीतकाचा तो उपयोग करत नाही त्या गृहीतकाचा तो उल्लेख करत नाही. लाप्लाससाठी “देव आहे’ “ देव नाही”, “देव आहे की, नाही ठाऊक नाही” ही सर्व वाक्ये असंबद्ध आहेत, निरर्थक आहेत एवढेच तो म्हणतो. माझी भूमिका तीच आहे. जगात अनेक व्यक्ती अनेक प्रकारची विधाने सतत करत असतील, ज्यांचा माझ्या प्रतिपाद्य विषयाशी काहीही संबंध नसतो. त्या सर्व विधानांची सत्यता तपासून त्या नाकारत/स्वीकारत बसणे असंबद्धच नव्हे तर हास्यास्पद आहे. लाप्लासची ही भूमिका देवासंबंधी घेतलेल्या वरील तीन भूमिकांहून वेगळी आहे. दुसऱ्या भाषेत ‘देवा’ची केस लाप्लासच्या कोर्टात ‘ॲडमिट’च होत नाही. त्यावर निकाल देणे दूरच. ही भूमिका स्पष्ट करणे हा माझ्या लेखाचा एक प्रमुख उद्देश आहे. माझ्या लेखातील अंतिम वाक्यही त्यासंबंधीच आहे. 

दुसरी गोष्ट जी मला त्या लेखात मुख्यत्वे मांडायची आहे ती अशी: त्रिकालाबाधित सत्य नावाची कोणतीही गोष्ट आहे असे दिसत नाही. आणि असली तरी ती आपल्याला कळण्याची शक्यता नाही. माणूस सत्याप्रत जरी आला तरीही ते सत्यच आहे हे कळण्याचा कोणताही मार्ग त्याला उपलब्ध आहे असे अजूनपर्यंत तरी आढळले नाही. कळणे ही फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे, जुन्या हिंदी सिनेमातील प्रेमगीतात असते त्याप्रमाणे ‘मंझिलसे भी आगे निकल गये’ असे होणे शक्य आहे. (जाता, जाता, एक प्रश्न: जोशींनी ‘जी.एं.’ची ‘प्रवासी’ ही दीर्घकथा वाचली आहे काय?) ज्याला आम्ही अंतिम सत्य समजतो ते प्रत्यक्षात एक गृहीतक असते. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ यात सत्य शब्द असला तरी तत्त्वत: ते गृहीतकच आहे. (यासाठी मूळ लेख पहा) एक सरळ रेषा आणि एक बिंदू दिलेला असता त्यांच्या प्रतलात त्या बिंदूतून त्या रेषेला एकच समांतर रेषा काढता येते हेही सत्य; एकही काढता येत नाही हेही सत्य आणि अनेक काढता येतात हेही सत्य, ही परिस्थिती समाजात प्रचलित असलेल्या सत्याच्या कल्पनेला छेद देते. दोन रेषा समांतर आहेत की नाहीत याची प्रचिती (ईश्वराप्रमाणेच?) “योगिभि: ध्यानगम्य” आहे. गणितात त्या तीन गोष्टी तीन वेगवेगळ्या भूमितीतील गृहीतके आहेत असे सांगून यातून सुटका करून घेता येते. असे का होते याची चर्चा जोशी ज्याचा फाफटपसारा म्हणून उल्लेख करून बाजूला सारतात त्या भागात सापडेल. त्यामुळे आपल्याकडे सत्य नसते, केवळ गृहीतक असते. (“What is truth?” said Pilate, and would not stay for an answer. हे त्यामुळे.) एखादे गृहीतक मानायचे की नाही हे त्याचा वापर करणाऱ्याने ठरवायचे असते. सामाजिक क्षेत्रात हे विशेषत्वाने खरे आहे. दुसऱ्याने कोणते गृहीतक मानावे हे ठरवण्याचे अधिकार केवळ धार्मिक अतिरेकीच स्वतःकडे घेतात. गृहीतक वापरणारा ते खरे आहे असे समजूनच त्याचा वापर करत असतो. त्यामुळे ते त्याच्यापुरते (आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्या वेळेपुरते ) खरे असते. 

आता जोशींच्या एका एका आक्षेपाचा परामर्श घेऊया. 

जोशींचा मुख्य आक्षेप माझ्या पुढील विधानाला आहे, आणि तो आक्षेप त्यांनी निरनिराळ्या संदर्भात पुनःपुन्हा व्यक्त केला आहे. यासाठी त्याची चर्चा प्रथम करूया. ते म्हणतात:
“‘ईश्वर आहे’ किंवा ‘ईश्वर नाही’ यापैकी कोणतीही गोष्ट वास्तव आहे असे सिद्ध करता येत नाही. ‘देव आहे’ ही जशी श्रद्धा आहे, तशीच ‘देव नाही’ हीदेखील श्रद्धाच आहे हे मान्य करावे लागते.” हे (कुंभोजकरांचे म्हणणे) मुळीच सत्य नाही. ‘ईश्वर आहे’ या अभ्युपगमाशी (हायपोथेसिस) सुसंगत एकही पुरावा/निरीक्षण नाही. ‘ईश्वर नाही’ या हायपोथेसिसशी सुसंगत खांबांनी सारे विश्वच भरलेले आहे.

गमतीचा भाग म्हणजे जोशी आपल्या या विधानाने माझ्या मूळ लेखातील पुढील विधानांना दुजोरा देतात: “… आपणही धार्मिकच आहोत हे मान्य करायला नास्तिकांना अवघड जाते. (धर्माची व्याख्या मी माझ्या मूळ लेखात दिली आहे.) देवाचे अस्तित्व सिद्ध न होणे म्हणजे देवाची अस्तित्वहीनता सिद्ध होणे नव्हे. पण हे मान्य करायला नास्तिक सहसा तयार नसतात.” असो.

‘देव आहे’ हे एकतर गृहीतक तरी मानावे लागेल, नाहीतर वस्तुस्थितीसंबंधीचे विधान (statement of fact) मानावे लागेल. पण ईश्वरनिष्ठांनी जोशींची पंचाईत केली आहे. ईश्वरनिष्ठ दोन्ही बाबतीत असा काही युक्तिवाद करतात ज्याचा प्रतिवाद जोशींच्याकडे नाही. पण पुढे जाण्यापूर्वी जोशींचा एक छोटासा गैरसमज दूर करूया. जोशी म्हणतात: “‘ईश्वर नाही’ या हायपोथेसिसशी सुसंगत खांबांनी सारे विश्वच भरलेले आहे.” जोशी हिरण्यकश्यपूचीच चूक पुन्हा करत आहेत. उदाहरणांनी प्रमेय सिद्ध होत नाही हे जोशी विसरतात. फोडलेल्या खांबांनी ईश्वर नसण्याची शक्यता वाढते. पण तो नसल्याचे सिद्ध होत नाही. याबद्दल सविस्तर चर्चा माझ्या मूळ लेखात केली आहे. असो. 

‘देव आहे’ हे गृहीतक आहे असे मानले तर त्याचे सत्यत्व सिद्ध करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. कारण गृहीतक ‘स्वसंवेद्य’(self evident) असते. गृहीतक असत्य आहे याचा व्यावहारिक अर्थ एवढाच होतो की, त्यातून मिळणारे निष्कर्ष वस्तुस्थितीच्या विरोधात जातात. पण श्रद्धावानांसाठी ही स्थिती कधी येतच नाही. श्रद्धावंताला इच्छित फळ मिळत नसेल तर तो आपली श्रद्धा कमी पडली असे मानून अधिक श्रद्धाळू बनतो. त्याची श्रद्धा अढळ असते. (मूळ लेख पहा.) नास्तिकांनी “या पामरांना काही कळत नाही. ती अज्ञानांधकारात चाचपडत आहेत” असे म्हणून श्रद्धावानांची कीव जरूर करावी. पण त्यापेक्षा अधिक काही करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःकडे घेऊ नये. ‘देव आहे’ हे गृहीतक श्रद्धावानांसाठी कधीच असत्य नसते. नास्तिकासाठी ते असत्य असेल. पण त्यांचा संबंध कुठे येतो? ते तर हे गृहीतक मानतच नाहीत. त्यामुळे ‘देव’ नावाची वस्तू या विश्वात नाही हे सिद्ध करणे एवढाच पर्याय नास्तिकांपुढे उरतो. 

पण गमतीची गोष्ट म्हणजे, ‘देव’ नावाची वस्तू या विश्वात नाही हे म्हणणेही नास्तिकांना खोडून काढता येत नाही. याचे कारण श्रद्धावंतांचा देव नास्तिकांच्या द्विमूल्य तर्कशास्त्राच्या अभ्यासकक्षेच्या बाहेर आहे. नास्तिक म्हणतात “दाखव तुझा देव!” त्याला आस्तिकांच्याकडे बिनतोड जबाब आहे. “जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो, तितक्या स्पष्टपणे मी ईश्वराला पाहतो आहे” असे रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाना म्हणतात. रामकृष्ण असत्य बोलतात असे नास्तिकांना सिद्ध करता येईल काय? संत ज्ञानेश्वरांना येणारा “पाया पडू पहाता चरणची न दिसे, उभाचि स्वयंभू असे” हा ‘अमृतानुभव’ नास्तिक कशाच्या आधारावर नाकारणार? द्विमूल्य तर्कशास्त्रात अशा गोष्टी सिद्ध अथवा असिद्ध करता येत नाही. मग नास्तिकांच्याकडे पुरावा काय? रामकृष्ण परमहंस, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, कबीर, इत्यादी संत, निरनिराळ्या धर्माचे संस्थापक आणि साधुसंत (ही यादी फार मोठी आहे.) यांनी देव प्रत्यक्ष पाहिला आहे, असा त्यांचा दावा आहे. हे लोक नास्तिकांकडून मान्यता मागत नाहीत. ते नास्तिकांच्या कोर्टात येतच नाहीत. नास्तिक त्यांच्याकडे जातात “देव दाखवा” म्हणून आणि जाळ्यात सापडतात. ईश्वरनिष्ठांच्या ईश्वराच्या स्वरूपाविषयी काही ठाम कल्पना आहेत. तो वेगवेगळ्या रूपात भक्तांना(च) दर्शन देत असतो. अपात्र लोकांना तो दर्शन देत नाही. त्यांच्यासमोर तो उभा राहिला तरी तो त्यांना कळत नाही. जोशींना प्रथम पात्रता मिळवावी लागेल, तेव्हाच त्यांना परमेश्वराचे दर्शन होण्याची शक्यता आहे. शिवाय, काहींचा देव निर्गुण, निराकार आहे. काहींचा सगुण, साकार आहे. काहींचा निर्गुण, निराकार असला तरी भक्तासाठी सगुण, साकार होतो. काहींचा निराकार असला तरी निर्गुण नाही. काहींचा सातव्या स्वर्गात राहतो, मृत्यूनंतर श्रद्धावंतांनाच तो प्राप्त होतो. काहींचा देव ‘ध्यानगम्य’ आहे. तो योग्यांनाच दिसतो. त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. मग तो दिसतो. वेदांनी त्याला ‘नेति नेति’ म्हटलेले आहे. त्याचे कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच असते. तो अणूहून लहान आणि ब्रह्माण्डाहून विशाल आहे. आता असा देव आहे की नाही हे तपासण्यासाठी स्वर्गाला जाण्याची माझी तरी तयारी नाही. जोशींचीही नसावी असे वाटते. बारा वर्षे त्याचे ध्यान केल्यावर तो दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (“जप होता तेरा कोटी, मग साक्षात् पावेल जगजेठी”). अशी तपश्चर्या अनेकांनी केली आहे. त्यांना देवाचे दर्शन झाले आहे असा त्यांचा दावा आहे. तो खोटा आहे हे नास्तिकांना त्यांच्या तर्कशास्त्रीय मर्यादेमुळे सिद्ध करता येत नाही. देव कोणत्या मार्गाने गेले असता दिसतो तो मार्ग (आस्तिकांच्या दृष्टीने) ठरलेला आहे. त्या मार्गाने जाऊन नास्तिकांनी खातरजमा केली आणि मग तेथे देव नाही असे ते सिद्ध करू शकले, तर त्यांना ‘देव नाही’ असे म्हणायचा थोडातरी अधिकार प्राप्त होतो. तसे नसेल तर मग ते घरात बसून ‘आरोपी सापडत नाही’ असा अहवाल देणाऱ्या कामचुकार पोलिसासारखे वागत आहेत, असे म्हणावे लागेल. देव असण्याचा पुरावा नसणे हाच देव नसण्याचा पुरावा आहे हा दावा न्यायालयात टिकणारा नाही. पुराव्याचा अभाव हा अभावाचा पुरावा नसतो. मग नास्तिकांच्याजवळ उरले ते केवळ गृहीतक. सिद्ध केल्याशिवाय एखादी गोष्ट सत्य म्हणून स्वीकरण्याला श्रद्धा म्हणतात. नास्तिक ‘देव नाही’ असे सिद्ध करत नाहीत. तरीही ते देव नाही असा आग्रह धरतात. त्यामुळे नास्तिकांच्यासाठी “देव नाही” हे स्वयंसिद्ध सत्य होते. गृहीतक होते. श्रद्धा होते. जाता जाता एका गोष्टीकडे मी त्यांचे लक्ष वेधतो. ‘आजचा सुधारक’च्या जानेवारी*च्याच अंकात श्री प्रभाकर नानावटी यांनीही ‘ईश्वर आहे किंवा नाही ही टोकाची गृहिते’ असे शब्दप्रयोग केले आहेत.
(* https://www.sudharak.in/2023/01/9977/ )

माझ्या प्रतिपादनातील मुख्यभाग येथे संपतो. जोशींनी उपस्थित केलेल्या उर्वरित तथाकथिक विसंगतींची दखल घेण्याची माझ्या मुख्य प्रतिपदानाच्या दृष्टीने गरज नाही. तरीही काही अन्य दृष्टींनी महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या बाबींची चर्चा वाचकांना उपयुक्त ठरेल, यासाठी त्यावर चर्चा करूया. 

जोशींचा माझ्या पुढील विधानावर आक्षेप आहे.
“कोणते गृहीतक अधिक स्वीकारार्ह आहे यावर वाद होऊ शकतो. पण त्याच्या स्वीकारार्हतेच्या कसोट्या व्यक्तिगणिक बदलणे शक्य असते.”

ते म्हणतात :
विज्ञान तसे चालत नाही. किमान आणि सर्वात सोप्या गृहीतकांच्या आधारे सर्व निरीक्षणांचे स्पष्टीकरण शोधतात. याला ऑकॅमचा वस्तरा म्हणतात. लाप्लासने तोच वापरला होता. देवाने ‘क’ वस्तू बनवली, देवाने ‘ख’ वस्तू बनवली, देवाने ‘ग’ वस्तू बनवली, अशाप्रकारे गृहीतकांची जंत्री लावणे हा सर्वात खर्चिक सिद्धांत आहे. त्यापेक्षा, गृहीतकांची अशी सर्वात छोटी यादी शोधली जाते जिच्यावरून बाकीच्या सर्व जगाची उपपत्ती “ह्यात काय मोठेसे! हे तर स्वाभाविकच आहे.” अशा बोळवणीने करता येते.

ऑकॅमचा वस्तरा लाप्लासने योग्य रीतीने वापरला आहे. पण जोशींचा त्यासंबंधी काहीतरी गोंधळ होतोय हे त्यांच्या वरील विधानातून व्यक्त होते. ‘क्ष’ हे गृहीतक ‘न’ विधानांचे आहे आणि ‘य’ हे गृहीतक ‘न-१’ विधानांचे आहे तर ‘य’ वापरा असा त्याचा अर्थ नाही. बायबलचे विश्वोत्पत्तीचे गृहीतक त्यात जास्त विधाने होती म्हणून नाकारलेले नाही. ज्या गृहीतकाची आवश्यकता नसते ते न वापरणे किंवा एखाद्या गृहीतकात ‘न’ विधाने असतील आणि त्यांपैकी (उदाहरणार्थ) १ कमी केल्याने काम भागत असेल तर जास्त असलेले विधान काढून टाकणे म्हणजे ऑकॅमचा वस्तरा चालवणे. नको असलेले केस काढून टाकण्यासाठी वस्तरा वापरला जातो. केसाळ व्यक्तीऐवजी टक्कल असलेली व्यक्ती निवडण्यासाठी वस्तरा वापरण्याची जरुरी नसते. शिवाय हा वस्तरा वापरून केस कमी करायचे की केस वाढू द्यायचे हा बऱ्याचदा सौंदर्यदृष्टीचा किंवा सोयी-गैरसोयीचा प्रश्न असतो. न-विधानांची आणि न-१ विधानांची, दोनही, गृहीतके तार्किक दृष्टीने (equivalent) सममूल्य असावी लागतात. न-१ ऐवजी न विधाने गृहीतकात ठेवल्याने काही काम वाढेल एवढेच. विधानांच्या संख्येवर गृहीतकाचे सोपे अथवा अवघड असणे ठरत नाही. काही प्रसंगी न-१ विधानांचे गृहीतक न विधानांच्या गृहीतकापेक्षा वापरायला गैरसोयीचे असते. विज्ञानाची वाटचाल न कडून न-१ कडे असते त्यात वैज्ञानिक-व्यवहार सोपे व्हावेत हा प्रमुख उद्देश नसतो. कमी विधाने ठेवणे विसंगतीची संभाव्यता कमी करण्यासाठी आणि गोडेलनी निर्माण केलेली भीती टाळण्यासाठी उपयुक्त असते. सूर्यकेंद्री विश्व आणि पृथ्वीकेंद्री विश्व (equivalet) सममूल्य नाहीत. सूर्यकेंद्री विश्व सोपे आहे, म्हणून स्वीकारले गेले नाही. वस्तऱ्याने केस काढायलाच पाहिजेत असे नाही. वाढलेल्या केसांची तुम्ही नीट निगा ठेवा म्हणजे झाले. तेव्हा ऑकॅमच्या वस्तऱ्याचा आपल्या चर्चेत फार बाऊ करण्याची जरुरी नाही. माझ्या प्रतिपादनात त्याला काहीही महत्त्व नाही. 

आता विज्ञानात काय चालते आणि काय चालत नाही याचा विचार करू. 

प्रसिद्ध अणुवैज्ञानिक नील बोर एक गोष्ट सांगायचे. नील बोर एका मित्राची प्रयोगशाळा पाहायला गेले होते. ते प्रयोगशाळेत प्रवेश करणार इतक्यात त्यांचे लक्ष प्रयोगशाळेच्या दालनाच्या दाराच्या चौकटीकडे गेले आणि ते चकित होऊन थबकले. चौकटीवर घोड्याची नाल ठोकली होती. घोड्याची नाल बाळगणाऱ्याला त्याच्या कामात यश मिळते अशी पाश्चात्य जगात एक समजूत प्रचलित आहे. त्यांनी थबकून आपल्या शास्त्रज्ञ मित्राला, काहीशा थट्टेच्या स्वरात विचारले, “Professor, do you believe it?” बोरच्या मित्राचे उत्तर मासलेवाईक होते. “I don’t. But I am told, it works even if I don’t believe it.” स्वतः नील बोर यांनी आपल्या कोटावर ‘ऑर्डर ऑफ एलिफन्ट’ या किताबासाठी यिन यांग या चिनी अध्यात्मिक चिन्हाची निवड केली होती. 

वैज्ञानिक म्हणून आयझॅक न्यूटनची श्रेष्ठता वादातीत आहे. काही अभ्यासक त्याला आइनस्टाइनपेक्षाही मोठा वैज्ञानिक मानतात. पण न्यूटन गूढविद्येचाही अभ्यासक होता. त्याने प्रकाशाच्या विकिरणात सात रंग मानण्यामागे त्याचा गूढविद्येवरील विश्वास कारणीभूत होता. त्याने प्रथम तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, आणि जांभळा हे सहाच रंग मानले होते. पारवा रंग त्यात नंतर वाढवला. पारवा रंग वेगळा मानण्याची काही वैज्ञानिक गरजही नव्हती. पण न्यूटनने तो मानला. तसे केल्याने वर्णपटातील रंगांची संख्या सहाची सात होत होती. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ पायथागोरस याच्या काळापासून पाश्चात्य संस्कृतीत सात या अंकाला गूढशक्ती प्रदान केल्या जात होत्या. शिवाय ६६६ हा सैतानाचा अंक समजला जायचा. तेव्हा न्यूटनने वर्णपटलात सात रंग मानण्याचा सुरक्षित मार्ग चोखाळला. 

गतीचे नियम अपरिवर्तनीय आहेत, हे न्यूटनला ठाऊक होते. पण देवाने ही सृष्टी निर्माण केली यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे त्याने अशी भूमिका मांडली की, देवाने हे एकदा नियम तयार करून दिले आणि त्याप्रमाणे विश्वाने वागावे अशी आज्ञा केली. एकदा हे नियम घालून दिल्यावर आता त्यात परमेश्वर हस्तक्षेप करत नाही, ही भूमिका कोणत्याही गोष्टीत केव्हाही हस्तक्षेप करण्याचे सामर्थ्य असलेल्या परमेश्वराच्या भूमिकेशी तडजोड होती. पण नियम केल्यावर ढवळाढवळ न करण्याचा निर्णय परमेश्वराने स्वतःच घेतला असल्याने त्याच्या सर्वशक्तिमान असण्याला त्याने बाधा येत नव्हती. पण गुरुत्वाकर्षणाचा नियम नवे प्रश्नही निर्माण करत होता. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे ग्रह एकमेकांकडे आणि सूर्याचे वस्तुमान सर्वांत जास्त असल्याने सूर्याकडे ओढले जायला हवे होते. आणि तसे झाल्यावर ते सर्व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने सूर्यात विलीन व्हायला हवे होते. त्यामुळे सर्व सूर्यग्रहमाला नष्ट होऊन केवळ सूर्यच शिल्लक राहायला हवा होता. तसे का होत नाही याचे समाधानकारक उत्तर वैज्ञानिकांना त्यावेळी ठाऊक नव्हते. तेव्हा परमेश्वर योग्य वेळी हस्तक्षेप करून आकाशस्थ ग्रह-गोलांना आपल्या कक्षा बदलू देत नाही, असे न्यूटनला वाटत होते. ही भूमिका देवाच्या सर्वज्ञतेला छेद देते. अशाच प्रकारच्या भूमिका बहुतेक शास्त्रज्ञांनी वेळोवेळी घेतल्याचे विज्ञानाच्या इतिहासात दिसते. आज वैज्ञानिक जे आपल्याला कळत नाही ते कळत नाही हे मान्य करतात. पूर्वी ते काम देव करायचा. विज्ञानाचा इतिहास आपल्याला फारसा शिकवला जात नाही. आपल्यापुढे बहुतेक वेळा विज्ञान ‘फिनिश्ड प्रॉडक्ट’ म्हणून येते त्यामुळे या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत. पण ज्ञानाचा प्रवास नेहमी अडखळतच झाला आहे. 

चंद्रयान सोडण्यापूर्वी त्यावेळच्या चांद्रमोहिमेशी संबंधित शास्त्रज्ञांनी तिरुपतीचे आशीर्वाद घेतले होते. काही रॅशनॅलिस्टनी या शास्त्रज्ञांना त्यांच्या या विज्ञानविरोधी कृत्याबद्दल इस्रोमधून काढून टाकावे अशीही मागणी केली होती. सुदैवाने तसे काही झाले नाही, आणि चांद्रमोहीम सुरळीत पार पडली. या टीमच्या प्रमुख शास्त्रज्ञाला जेव्हा तिरुपतीच्या आशीर्वादाबद्दल एका वार्ताहराने छेडले तेव्हा तो एवढेच म्हणाला, “चंद्रयानाच्या प्रक्षेपणाचा मुहूर्त आम्ही पंचांग पाहून किंवा भटजीला विचारून काढला नाही.” इस्रोचा अन्य एक शास्त्रज्ञ अशाच प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला होता, “I don’t leave any effort from my side.” त्याच्या या प्रयत्नात दैवी कृपेचाही समावेश होता. अपोलो १३ संकटग्रस्त झाल्यावर चर्चमधून प्रार्थनाही झाल्या होत्या. इति बुद्धिप्रामाण्यम्।

आता उर्वरित भागासंबंधी : येथे मी वर दोन विधाने केली आहेत. एक: कोणते गृहीतक अधिक स्वीकारार्ह आहे यावर वाद होऊ शकतो. दोन: स्वीकारार्हतेच्या कसोट्या व्यक्तिगणिक बदलणे शक्य असते.

भिन्न व्यक्ती भिन्न गृहीतके घेऊन पुढे जात असतात. (विज्ञानात) कालांतराने त्यापैकी एक सर्वमान्य होते. आज विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी अनेक गृहीतके आहेत. विज्ञानाच्या कक्षेबाहेर आणि आतही. 

कित्येक वर्षे स्टेडी-स्टेट-थेअरी आणि बिगबँग यांच्यात चढाओढ होती. (डॉ. नारळीकर यांचे गुरु फ्रॉईड हॉईल हे पहिलीचे समर्थक होते.) 

टॉलेमीची पृथ्वीकेंद्री विश्वरचना सर्वमान्य असताना कोपर्निकसने सूर्यकेंद्री रचना मांडली. त्याचे कारण त्याने सांगितल्याप्रमाणे ‘आकडेमोडीची सुलभता’ एवढेच होते. दोन्ही गृहीतकांतून ‘योग्य’ निष्कर्ष निघत होते. कोपर्निकसने पृथ्वीकेंद्री विश्वरचना नाकारली नव्हती. कारण ती ‘चक्षुर्वै सत्यम्’ आहे. टॉलेमीही आपल्या काळातला प्रसिद्ध शास्त्रज्ञच होता. कुडमुड्या ज्योतिषी नव्हता. दुर्बिणीचा शोध लागल्यावर परिस्थिती बदलली. पण ती नंतरची गोष्ट आहे. 

‘गॉड डझ नॉट प्ले डाइज‘ हे आइनस्टाइनचे म्हणणे नंतर चुकीचे ठरले. इतकेच नव्हे तर, स्टीफन हॉकिंगच्या शब्दात, “तो पक्का जुगारी आहे” हे सिद्ध झाले आहे. यासाठी नील बोरने “स्टॉप टेलिंग गॉड व्हॉट टू डू” अशी आइनस्टाइनला ताकीद दिली होती. एका वेळी अनेक गृहीतके एकमेकांशी चढाओढ करत असणे ही विज्ञानात आम बात आहे. मॅक्स प्लांक चे प्रसिद्ध वाक्य आहे: ‘नवे सिद्धांत तेव्हाच पूर्णपणे प्रस्थापित होतात जेव्हा शास्त्रज्ञांची जुनी पिढी काळाच्या पडद्याआड जाते.’ 

मला इथे एवढेच सुचवायचे आहे की, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा विज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेवर (Objectivity) जेवढा विश्वास असतो तेवढा विज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या वैज्ञानिकांचा नसतो. ज्याला आपण वस्तुनिष्ठता म्हणतो ती प्रत्यक्षात बहुमताची व्यक्तिनिष्ठता असते. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादी ज्या ‘धर्मपरायणते’ने बुद्धिप्रामाण्यावर श्रद्धा ठेवतात तेवढी वैज्ञानिक क्वचितच ठेवतात. प्रत्यक्षप्रमाणाच्या वस्तुनिष्ठतेवरही त्यांना जेथे नाइलाजास्तव विश्वास ठेवावा लागतो तिथे बुद्धिप्रामाण्यावर आंधळा विश्वास ठेवण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. बुद्धिप्रामाण्य सुसंगती सांगते. सत्य नाही. सत्य सुसंगत असते. पण असत्यही सुसंगत असू शकते. सुसंगती शोधणे एवढेच काम आपण करू शकतो. ती आपल्या ज्ञानाची मर्यादा आहे. यावर केलेली सविस्तर चर्चा जोशींनी फाफटपसारा समजून दूर सारली आहे 

माझ्या “‘देव नाही’ हे गृहीतक माणसापुढील कोणत्या प्रश्नांची उत्तरे देते? याला सकारात्मक उत्तर नाही. त्या गृहीतकाने मानवजातीच्या प्रगतीत महत्त्वाची भर घातल्याचे दिसत नाही.” या विधानावर जोशी म्हणतात, 
(१) ‘देव नाही’ हे विधान गृहीतक नाही. (२) तो उपलब्ध निरीक्षणांचा निष्कर्ष आहे. (३) त्या निष्कर्षामुळे गृहीतकांच्या यादीतून देव हे गृहीतक इतर सर्व गृहीतकांशी विसंगत म्हणून नाकारले जाते. त्यामुळे गृहीतकांची यादी लहान होते हा फायदा आहे. पारलौकिकासाठी नास्तिक व्यक्ती संसाधने खर्च करत नाही हा फायदा आहे.


जोशींच्या वरील विधानातील १,२,३ हे अंक सोयीसाठी मी टाकले आहे. 
(१) “यांपैकी ‘देव नाही’ हे विधान गृहीतक नाही.” यावर पूर्वीच सविस्तर चर्चा झाली आहे. 
(२) निरीक्षणातून निष्कर्ष निघत नसतो. निरीक्षण केवळ माहिती संकलित करते. निरीक्षण आणि निष्कर्ष यामध्ये एक पायरी आहे. निरीक्षणातून Inductive logic वापरून नियम तयार केला जातो. Inductive logic च्या अंगभूत मर्यादेमुळे तो नियम त्रिकालाबाधित सत्य नसतो. त्या नियमाला हायपोथेसिसपेक्षा वरचा दर्जा देता येत नाही. (याची सोदाहरण सविस्तर चर्चा माझ्या मूळ लेखात आहे.)
(३) आता “देव (आहे) हे गृहीतक इतर सर्व गृहीतकांशी विसंगत म्हणून नाकारले जाते.” या म्हणण्याचा विचार करू. ‘देव आहे’ हे आस्तिकांचे गृहीतक आहे. ते गृहीतक नास्तिक त्यांच्या इतर गृहीतकाशी विसंगत आहे म्हणून नाकारतात. तो अधिकार नास्तिकांना आहे. पण तो अधिकार त्यांना त्यांच्या गृहीतकापुरताच आहे! कारण इतर गृहीतके कोणती ते त्यांनीच ठरवले. नास्तिकांच्या सोयीसाठी आस्तिकांनी आपले गृहीतक नाकारले पाहिजे अशी मागणी करण्याचा अधिकार नास्तिकांना नाही. केवळ धार्मिक कट्टरतावादीच दुसऱ्याने कोणते गृहीतक मानावे याचा अधिकार स्वतःकडे घेऊ शकतात. दुसऱ्यानी कोणती गृहीतके स्वीकारावीत हे ठरवण्याचा अधिकार नास्तिकांना नाही. नास्तिकांची गृहीतके आस्तिक मानत नाहीत. “माझ्या गृहीतकाशी विसंगत मला काही आढळले तर त्याचे काय करायचे हा माझा प्रश्न आहे. जोपर्यंत ती समाजविरोधी नाहीत तोपर्यंत नास्तिकांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.” ही आस्तिकांची भूमिका माझ्यामते योग्य आहे. आपली गृहीतके दुसऱ्यावर जबरदस्तीने लादण्याच्या प्रवृत्तीतून धार्मिक आतंकवाद निर्माण होतो. हे मी जॊशींना सांगायला हवे असे नाही. 

उरलेल्या विधानाची दखल घेण्याचे कारण नाही. 

पुढील सर्व विधाने एकदम घेतो. बोल्ड विधाने माझी इटॅलिक्स जोशींची. 

“याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला म्हणतो, “देव देवासाठी प्रिय नसतो. तो आपले काम करतो म्हणून प्रिय असतो.”
देवाने कामे केली असती तर हरकतच नव्हती. देव नवसाला तर पावतच नाही, पण मानसिक धीर मिळवण्यासाठीही ‘देव’ या कल्पनेचा उपयोग होत नाही.

“ईश्वराचे गृहीतक माणसापुढील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे एक साधन होते.” आणि “काही प्रश्नांना विज्ञानाकडे उत्तरे नाहीत. त्या क्षेत्रात देवाच्या गृहीतकाला स्पर्धकच नाही. त्यामुळे तेथे देव टिकून आहे.”
ईश्वर हे कोणत्याही प्रश्नाचे ‘उत्तर’ नाही. एखाद्या निरीक्षणाला केवळ काहीतरी नाव दिल्याने त्या निरीक्षणाचा अर्थ लागतो असे नव्हे. नवे गृहीतक करून स्पष्टीकरण मिळतच नाही, निरीक्षणाला ज्ञात गृहीतकांमध्येच स्पष्ट करावे लागते.

यांपैकी बहुतेक गोष्टींची चर्चा झाली आहे. या जगात माणसाकडून कोणतीही गोष्ट विनाकारण निर्माण झालेली दिसत नाही आणि चुकून झालीच तरी ती फार काळ टिकलेली नाही. गेली किमान चाळीसहजारवर्षे ईश्वर अस्तित्वात आहे. माणसाला ईश्वराची गरज होती म्हणून तो निर्माण झाला आणि इतके प्रहार होऊनही तो टिकला. ज्या क्षेत्रात त्याची गरज संपली त्या क्षेत्रातून तो गेलाही. यासंबंधीची चर्चा माझ्या मूळ लेखात आली आहे. जोशी विचारतात “देवाने माणसाच्या कोणत्या प्रश्नांना उत्तरे दिली?” मी म्हणतो सर्व प्रश्नांना. तुम्ही श्रद्धावानाला भेटा. तो त्याची उत्तरे सांगेल. देवाच्या इच्छेशिवाय इकडची काडी तिकडे हलत नाही. जेथे विज्ञानाची उत्तरे अधिक समर्पक होती तेथून देव गायब झाले याची बरीच उदाहरणे माझ्या मूळ लेखात आहेत. साप चावल्यावर पूर्वी देवळात नेल्याने बरेच लोक बरे होत. जे बरे होत नसत त्याचीही कारणे श्रद्धावानांना ठाऊक होती. आज डॉक्टरकडे नेल्याने ९९% लोक बरे होतात. (१% बरे का झाले नाहीत हे डॉक्टरांना कळतेच असे नाही.) ‘यशाचे प्रमाण’ वाढल्यावर देवळाऐवजी लोक दवाखान्यात जाऊ लागले. आज मनःशांतीसाठी माणसाला देवाची गरज आहे म्हणून माणूस देवळात जातो. एखाद्या व्यक्तीला नाईटक्लबमध्ये गेल्याने मन:शांती मिळत असेल, देवळात गेल्याने मनःशांती मिळत नसेल तर त्या व्यक्तीने क्लबमध्ये जावे; देवळात जाऊ नये. कदाचित त्या व्यक्तीला औषधाची गरज नसेल. कदाचित ती दुसरे औषध घेत असेल. एकच औषध सर्वाना लागू पडत नाही. जोशींना लागू न पडणारे औषध इतरांना लागू पडत असतानाही त्यांनी ते घेऊ नये असा आग्रह जोशींना धरता येणार नाही. उद्या साईड इफेक्ट नसणाऱ्या “सुखशांती गोळ्या” मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील तर देव उरल्यासुरल्या क्षेत्रातूनही अंतर्धान पावेल. शेवटी साधूंच्या परित्राणासाठी आणि दुष्कृतांच्या विनाशासाठी त्याला पुनःपुन्हा खाली यावे लागते. समाजव्यवस्था सुधारली, प्रशासन साधूंचे परित्राण आणि दुष्कृतांचा विनाश करण्यास पूर्ण सक्षम झाले तर देवाला अवतार घ्यायचे कारण उरणार नाही. मग त्याला ‘रिटायर करा’ अशी हाकाटी करण्याचे कारणच उरणार नाही. देवच ‘व्हॉलंटरी रिटायरमेंट’ घेईल. ही सारी चर्चा माझ्या लेखात अगोदरच आहे.

जोशींनी उपस्थित केलेल्या अन्य आक्षेपांची चर्चा विस्तारभयास्तव टाळतो. तार्किकदृष्ट्या ते महत्त्वाचे नाही असे मला वाटते पण ते आक्षेपही मला मान्य नाहीत हे मी येथे नमूद करतो. कुणाला त्यावरही चर्चा हवी असेल तर भविष्यात ती करता येईल.

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.