बाबा लगीन आणि नास्तिक्य – हरिहर कुंभोजकर ह्यांच्या लेखावरील प्रतिक्रिया

भारतात लग्न करण्यासाठी पुरुषांनी (अपवाद वगळता) किमान २१ वर्षांचे असणे गरजेचे आहे. २१ व्या वाढदिवशी मध्यरात्रीची घंटा वाजते आणि पुरुषांना लग्न करण्याचा अधिकार मिळतो. अर्थातच, २० वर्षे ३६४ दिवस एवढे वय असताना ते जेवढे ‘सज्ञान’ किंवा ‘प्रौढ’ असतात त्यापेक्षा २१ वर्षे वय झाल्यावर फार काही जास्त सज्ञान किंवा प्रौढ होतात असे काहीही नाही. तरीही कायदेशीर उपबंधाने असे ठरवून दिल्यामुळे आपल्याला ते मान्य करावे लागते. सज्ञानता किंवा प्रौढत्व हे कायद्याने ठरवण्याचे मुद्दे आहेत असे मला वाटत नाही. त्या संकल्पनांचा विचार केला असता पुढील काही बाबी महत्त्वाच्या ठरतात. अपवाद वगळता एखादे २ वर्षांचे बाळ हे नक्कीच प्रौढ नसते, तर एखादी ६० वर्षांची व्यक्ती नक्कीच प्रौढ असते हे आपण बिनदिक्कत म्हणू शकतो. पण, मिसरूड फुटलेले १६ वर्षीय तरुण ते पोक्तपणा झळकून यायला नुकतीच सुरुवात झालेले २५ वर्षीय पुरुष ह्या वयोगटातील मुलांच्या सज्ञान/प्रौढ असण्याबद्दल मात्र साशंकता असू शकते. अनेकवेळा ह्या वयोगटातील ‘क्ष’ ही व्यक्ती खरंच प्रौढ आहे का, असा रास्त प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्याचे कारण असे आहे की ‘सज्ञान/प्रौढ’ ही मराठी भाषेतली विधेये संकल्पनेच्या पातळीवर अस्पष्ट (vague) आहेत. अस्पष्टता (vagueness) हा तत्त्वज्ञानातील/तर्कशास्त्रातील महत्त्वाचा प्रश्न आहे[१]. नैसर्गिक भाषांमध्ये अस्पष्टता सर्वदूर पसरलेली आहे. दिवस-रात्र ही विधेय जोडी अशाच अस्पष्टतेचे द्योतक आहे. कुंभोजकर जी कथा कल्पितात त्यात हिरण्यकश्यपूने द्विमूल्य तर्कात विद्यावाचस्पती संपादन केलेली असते, पण तो फार चांगला तत्त्वज्ञ/तर्कशास्त्री नसावा, किंवा त्याने भाषिक/संकल्पनात्मक अस्पष्टतेवर फार काम केले नसावे असे वाटते. कुंभोजकारांना अस्पष्टतेसंबंधी द्विमूल्य तर्कावर टीका करायची असेल तर हिरण्यकश्यपू हे फार सोपे ध्येय आहे, त्यांनी रॉय सोरेंसन[२] किंवा टिमोथी विल्यम्सन[३] सारख्या लोकांना डोळ्यासमोर ठेवावे. हिरण्यकश्यपूवर हल्ला चढवणे म्हणजे एखाद्या २२-२३ वर्षांच्या ‘प्रौढ’ हौशी मुलाने “बाबा लगीन, बाबा लगीन” असे ओरडण्यासारखे आहे.

तसे पाहता द्विमूल्य तर्काचा आणि आस्तिक्य-नास्तिक्य ह्या चर्चेचा फारसा संबंध नाही. ‘टेलिपथी’ हे गृहीतक मला मान्य नसल्याने कुंभोजकारांनी तो संबंध का लावला हे मी अधिकारवाणीने सांगू शकत नाही. माझ्यामते त्यांनी तो लावण्याची दोन उद्दिष्टे असू शकतात: (१) आस्तिक-नास्तिक ह्या दोनच शक्यता नसून त्यापलिकडेही काही शक्यता आहेत असे त्यांना दाखवायचे असेल, किंवा (२) आस्तिक-नास्तिक ह्या दोन्ही गटातले लोक/विचार हे एकजात सारखेच असतात असे काही दाखवून द्यायचे असेल. पूर्ण लेख वाचला असता त्यांचे म्हणणे (२) हे असेल असे वाटते. (२) का चूक आहे हे सांगण्यासाठी हा प्रतिपक्ष प्रपंच.

कुंभोजकर असे म्हणतात की ईश्वर आहे की नाही यापैकी कोणती गोष्ट वास्तव आहे ते सिद्ध करता येत नाही. ते का सिद्ध करता येत नाही, ह्याबद्दल ते कोणताही युक्तिवाद देत नाहीत. “कुंभोजकर बाबा वाक्यम् प्रमाणं” असे मान्य केले तर युक्तिवादांची गरज उरत नाही. “ह्या टेबलाखाली घोडा नाही” हे सिद्ध करण्याजोगे विधान आहे. टेबल असो किंवा घोडा, त्या वस्तू नक्की काय आणि कशा आहेत, हे आपल्याला माहीत आहे. आपण टेबल उचलून त्याखाली घोडा आहे की नाही हे तपासून पाहू शकतो. मी “टेबलाखाली युनिकॉर्न आहे” असे विधान केले असता युनिकॉर्नची संकल्पना आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे, टेबलाखाली युनिकॉर्न आहे की नाही हेही आपण तपासून पाहू शकतो. ह्याउलट, ईश्वराची एक (एकसंध) अशी काही संकल्पना नाही. माया, वुडू, माओरी व्हाया वेदांती लोक्सची ईश्वराची संकल्पना वेगवेगळी आहे. “ईश्वर आहे” असे विधान करताना नक्की ईश्वर म्हणजे काय हे सांगितले जात नाही. प्रत्येकाचे ईश्वर वेगळे आहेत म्हणून “ईश्वर-१, ईश्वर-२, ईश्वर-३, .., ईश्वर-१२३४५६७८९, …. आहे” असे विधान केले असता त्या सर्व ईश्वरांबद्दल संकल्पनात्मक स्पष्टता आल्याशिवाय ते आहेत की नाहीत हे ठरवता येणे शक्य नाही. ते घोड्यासदृश आहेत की युनिकॉर्नसदृश, ह्यावरून ते अस्तित्वात आहेत की नाहीत हे ठरवण्याच्या सिद्धताकसोट्या बदलतील. त्या कसोट्यांवर प्रस्तुत विधाने तपासून पाहिल्यावरच “क्ष आहे की नाही” ह्याचा निर्वाळा देता येईल. “माझे आई-वडील हेच माझे ईश्वर” असे म्हटले असता आई-वडील जिवंत असतील तर ईश्वर आहे असेच म्हणावे लागेल.

कुंभोजकरांचे मुद्दे क्रमांक १ व २ ह्यात फारसे आक्षेपार्ह काही दिसत नाही असे मी येथे नमूद करू इच्छितो. त्यातले सर्व मान्य असेल असे नाही, पण सकृतदर्शनी फार काही अमान्य असेल असे वाटत नाही. त्यात चर्चिलेले मुद्दे आस्तिक्य-नास्तिक्य ह्या चर्चेला समांतर आहेत. एक महत्त्वाचे टिपण मात्र देतो: तत्त्वज्ञानातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोघम असे युक्तिवाद करून प्रश्न निकाली निघणार नाहीत. उदा. कुंभोजकर बेधडकपणे असे प्रतिपादन करतात की भूमितीतील सर्व ज्ञान हे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे ज्ञान आहे. ते ज्या प्लेटोचा पुढे दाखला देतात त्या प्लेटोनुसार तर भूमिती (आणि पर्यायाने गणित) हे अस्तित्वात असलेल्या गोष्टींचे ज्ञान आहे[४]. त्या गोष्टी अस्तित्वात आहेत की नाहीत हा गणितातल्या तत्त्वज्ञानात एक जिवंत (न उत्तरिलेला) प्रश्न आहे. लिनबो[५], रोजन[६] किंवा इतरांनी तो प्रश्न निकाली निघू न देण्यात मोठे योगदान दिले आहे. यापुढे, पेआनो-फ्रेग-रसलच्या स्वर्गाला ग्यडलने लावलेला सुरुंग हा मुद्दा माझ्यामते अप्रस्तुत आहे, कारण त्याचे ज्ञानशास्त्रात काय पडसाद उमटले हे तत्त्वज्ञानातील जगाला माहीत आहेत. अशा प्रश्नांसंबंधी एक बाजूने निकाल देणे हे कुंभोजकरांचे महत्त्वाचे गृहीतक आहे. असो.

कुंभोजकर हे मान्य करतात की देवाचे गृहीतक हे ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले गृहीतक आहे. ते गृहीतक म्हणजे आकलनक्रांतीनंतर कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेची परिणती होती, असे ते म्हणतात. मात्र, ह्या घटनेसंबंधी ज्ञानग्रहणाची प्रक्रिया नक्की कशी पार पडली हे आपल्याला ठाऊक नाही. ज्या ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती त्या सगळ्यांसाठी आळशी माणसाने हात वर करून “काहीतरी पारलौकिक शक्ती” असे उत्तर शोधले हा पहिला पर्याय आहे. ह्यात पारलौकिक गोष्टी आहेत की नाहीत हे अभ्युपगम तपासण्याऐवजी तसे काहीतरी असल्यास जीवन सुसह्य होणार आहे, अशी जाणीव मनुष्याला होती हे नाकारता येत नाही. आकलनक्रांतीमुळे अचानक नव्याने अंगावर येऊन पडणाऱ्या प्रश्नांसाठी हे सोपे उत्तर असू शकते. दुसरा पर्याय आहे तो अभ्युपगम तपासून निष्कर्ष काढणे ह्या मार्गाचा. पारलौकिक अमूर्त शक्तींचा किंवा त्यांच्या मूर्त रुपांचा वेगवेगळ्या पद्धतीने धावा केल्यास त्या पावतात व तसे न केल्यास त्या कोपतात हे अभ्युपगम प्रत्यक्ष धावा करून तपासून पाहिले असता, त्यात मनुष्याला काही तथ्य आढळून आले. आणि त्यातून देवाचे गृहीतक हे निष्कर्ष ठरायला लागले. ह्या परिच्छेदात महत्त्वाचा मुद्दा असा की पारलौकिकाची आराधना ही मनुष्याच्या आकलनाच्या भुकेतून निर्माण झाली की ती एक मानसशास्त्रीय गरज होती म्हणून फारसे ठोस उत्तर मिळाले नसतानाही ते गृहीतक मान्य केले गेले, हे आपल्याला ज्ञात नाही.

कुंभोजकर पुढे धर्माची नवीन व्याख्या देतात: आकलनक्रांतीनंतर माणूस विचार करू लागल्यावर माणसाला जे प्रश्न पडले त्यांची उत्तरे शोधण्यासाठी काही गृहीतकांच्या पायावर उभी केलेली आचार-विचारांची संरचना म्हणजे धर्म. कुठल्याही व्याख्येचे प्रमुख काम म्हणजे ज्या उदाहरणांना समोर ठेऊन ती व्याख्या केली जाते आहे ती सगळी उदाहरणे त्या व्याख्येने दिलेल्या संचाचे घटक असली पाहिजेत. पण, कुठल्याही व्याख्येचे आणखी एक काम असते. ते म्हणजे जी उदाहरणे त्या व्याख्येत बसू नाहीत असे ध्येय असेल ती उदाहरणे संचाबाहेर राहावी. वरील व्याख्या विज्ञान आणि राजकीय विचारसरणींना धर्माच्या रांगेत आणून बसवते. बहुधा व्याख्याकर्त्याला तसेच करण्याची इच्छा असावी. पण, त्या व्याख्येत नक्की कोणत्या गोष्टी/संकल्पना ह्या व्याख्याकर्त्याच्या मताप्रमाणे व्याख्येबाहेर राहाव्या हे मात्र स्पष्ट नाही. उदा. (एक) आकलनक्रांतीआधी मनुष्याला लठ्ठपणा सतावत असेल असे वाटत नाही. पण आज मात्र तो आपल्यातल्या अनेकांना सतावतो. “लठ्ठपणा कसा कमी करावा?” असा प्रश्न मला पडला असता मी माझा आहार नेमून घेतो. हा नेमलेला आहार काहीएक गृहीतकांवर आधारित असतो, आणि त्यात आचार-विचार असे दोन्ही पैलू समाविष्ट असतात. प्रस्तुत व्याख्येप्रमाणे माझा नेमलेला आहार एक धर्म ठरतो. (दोन) आकलनक्रांतीआधी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याशी किंवा प्राण्यांशी कसे वागावे ह्याबद्दल फार काही विचार केला असेल असे वाटत नाही. त्यासंबंधी पडलेल्या प्रश्नांना बेंथमचा उपयुक्ततावाद ही काही गृहीतकांवर आधारित एक आचार-विचारांची संरचना आहे. उपयुक्ततावाद हा एक धर्म ठरतो. (तीन) आकलनक्रांतीपश्चात् मनुष्याला अमूर्त (abstract) वस्तूंसंबंधी कुतूहल वाटू लागले. गणितीय वस्तू (अंक, आकृती, इत्यादी) ह्या त्याचाच एक भाग. Fictionalism in philosophy of mathematics[७] ह्या उपपत्तीप्रमाणे गणितीय वस्तू अस्तित्वात नसतात, पण त्या एखाद्या उपयुक्त कल्पित गोष्टीप्रमाणे असतात. मला दोन आंबे खाण्याची भूक असेल तर मी एक अधिक एक आंबा खाऊन ती भागवू शकतो. म्हणजे ही फक्त विचारांची संरचना नसून आचाराचीही आहे. अश्याच पद्धतीने पेआनोचे अंकगणित[८] किंवा अलेक्सिअस माईनॉंगचे Meinongianism[९] हेही धर्म ठरतात.

प्लेटोने मनुष्याची “पंखविरहित द्विपद” अशी व्याख्या केल्यावर डायॉजिनिजने एक पंख छाटलेला कोंबडा बैठकीत सोडला, आणि उद्गारला, “हा घ्या प्लेटोचा माणूस.” मी कुंभोजकरांसोबत तसे कदापि करू इच्छित नाही. व्याख्येला अपवाद देऊन व्याख्या चूक ठरवण्याचा माझा मानस नाही. मात्र, मी वरील उदाहरणांमध्ये दिलेल्या सगळ्या संकल्पना धर्म नाहीत ह्यासाठी वेगळा युक्तिवाद देण्याची मला गरज वाटत नाही. सध्यातरी ते एक स्वयंसिद्ध सत्य आहे असे मला वाटते.

कुंभोजकरांच्या व्याख्येनुसार जे धर्म ठरतात त्यांचे त्यांनी केलेले वर्गीकरण हे सैद्धांतिक नसून इतर कुठल्या प्रेरणेतून केलेले आहे असे वाटते. हे वर्गीकरण का करावे ह्यासाठी ते कोणताही युक्तिवाद देत नाहीत. ते तसे वर्गीकरण केल्याने धर्म ह्या संकल्पनेबद्दल काही नवीन सत्य उमगणार आहे का? ही विभागणी स्वेच्छानुसारी (arbitrary) वाटते. येथे त्या मुद्द्याला मी न्याय नाही देऊ शकत. त्यासंबंधी एक वेगळा लेख लिहिणे गरजेचे आहे असे मी समजतो.

आता आपण कुंभोजकरांच्या युक्तिवादाच्या गाभ्याचा विचार करूया. ते त्यांच्या युक्तिवादात खालील आधार विधानांचा उपयोग करतात.
क. ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेत गृहीतके अपरिहार्य आहेत.
ख. गृहीतकांची सत्यासत्यता तपासता येत नाही, कारण ‘गृहीतका’च्या व्याख्येनेच ते सत्य ठरतात.
ग. गृहीतकांची स्वीकारार्हता व्यक्तिनिष्ठ असते.
घ. सुसंगततेच्या पलीकडे सत्य असे काही नाही.
च. परमेश्वर/ईश्वर/देव हे गृहीतक आकलनक्रांत्योत्तर ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेतून तयार झालेले गृहीतक आहे.
छ. धर्माप्रमाणे विज्ञानही काही गृहीतकांवर आधारित असते.
ज. विज्ञानाने आणि धर्माने मनुष्याच्या आयुष्यात वेगवेगळे अवकाश व्यापलेले आहेत. 
झ. धर्माने व्यापलेल्या अवकाशाला विज्ञान हात लावू शकत नाही.

येथे क, ख, घ, च, आणि छ ह्या विधानांना मी विरोध करू इच्छित नाही. बाकीच्यांसंबंधी भूमिका पुढे मांडतो. ब्राइट्स सोसायटीचे निखिल जोशी असे म्हणतात की समजुतींचे प्रकार किंवा टप्पे असतात[१०]. त्यातले दोन, विश्वास (belief) आणि श्रद्धा (faith), हे सध्या चर्चेसाठी घेऊ. त्या दोन्हींत एक फरक आहे. श्रद्धा हे असे दृढ झालेले विश्वास असतात की अनेक वेळा त्यांच्याशी विसंगत अनुभव आल्यानंतरही मनुष्याची आपल्या श्रद्धेत बदल करण्याची तयारी नसते. ह्याउलट, साधारण विश्वास हे किमानपक्षी नवी माहिती मिळाल्यावर/महती पटल्यावर बदलू शकतात. बुद्धिप्रामाण्यवादी असणे म्हणजे आपल्या समजुतींच्या टोपलीत प्रामुख्याने विश्वासांना स्थान देणे आणि फक्त अपवादाने श्रद्धांना. विश्वासांना श्रद्धेच्या स्थानी नेऊन बसवणे म्हणजे त्यांचे गृहीतकांमध्ये रूपांतर करणे. तसे केल्याने आपल्या गृहीतकांचा आकडा वाढत जातो. कुंभोजकरांनी सांगितलेली ज्ञानग्रहणाची प्रक्रिया ही खरेतर बुद्धिप्रामाण्यवादी असण्यासाठी पोषक अशी प्रक्रिया आहे. तर्काच्या आधारे आयुष्याचा डोलारा हाकला तर कमीतकमी गृहीतकांमध्ये भागू शकते. म्हणजेच, गृहीतके कमी करणे हे आपले ध्येय हवे.

आता धर्म आणि विज्ञान ह्यांच्या गृहीतकांच्या तुलनेकडे वळूया. ग ह्या विधानाचा असाही अर्थ होऊ शकतो की कुंभोजकरांच्या वेगवेगळ्या धर्मांची गृहीतके ही समान पातळीवरची आहेत. हे अमान्य असायला हवे. विज्ञानाची रीत ही मूलतः उद्गामी आहे. अनेक वेळा कुंभोजकर स्वतः “विज्ञानात working hypotheses असतात” असे लिहितात. ह्यातून असेही ध्वनित होते की अंतिम सत्य असे काही नसते. आकलनक्रांत्योत्तर काळात पडलेल्या प्रश्नांना देव/ईश्वर/परमेश्वर हे गृहीतक उत्तर म्हणून मान्य झाले असेल. पण कुंभोजकर म्हणतात त्याप्रमाणे विज्ञानाच्या गृहीतकांमध्ये सुधार करणे शक्य असल्याने त्याद्वारे मनुष्याच्या प्रश्नांची अधिक प्रभावी उत्तरे मिळाली. ह्यातून हेच दिसते की विज्ञानाची गृहीतके धर्मापेक्षा चांगली आहेत. ती मुळातच ज्ञानाच्या प्रक्रियेशी सुसंगत आहे.

आता झ ह्या विधानाचा ऊहापोह करूया. कुंभोजकर असे म्हणतात की “गृहीतकाची उपयुक्तता त्याच्या ज्ञान देण्याच्या क्षमतेत असते. ‘देव नाही’ हे गृहीतक माणसापुढील कोणत्या प्रश्नांची उत्तरे देते? याला सकारात्मक उत्तर नाही. त्या गृहीतकाने मानवजातीच्या प्रगतीत भर घातल्याचे दिसत नाही.” कुंभोजकरांनी वरच हे मान्य केले आहे की विज्ञानाची गृहीतके धर्माच्या गृहीतकांच्या तुलनेत मनुष्याच्या प्रश्नांना प्रभावी उत्तरे देतात. त्यामुळे त्या गृहीतकांची ज्ञान देण्याची क्षमता अधिक असावी हा निष्कर्ष मला वादातीत वाटतो. ‘देव नाही’ ह्या गृहीतकाचा खरा अर्थ असा आहे की पारलौकिक असे काहीही नाही. त्या गृहीतकाशिवाय विज्ञान पहिली पायरीही चढू शकत नाही. उदा. जर देव आहे हे गृहीत धरले तर “झाडावरचे सफरचंद खाली कसे पडते?” ह्याला “देव पाडतो” असे उत्तर शक्य आहे. त्यापुढे काही शोधण्याची गरज पडत नाही. जर “देव नाही” हे गृहीतक मान्य केले नाही तर मनुष्याचे शरीर कसे काम करते हे शोधून आजारांवर उपाय शोधणे निरर्थक ठरते. विज्ञानाची पद्धती अवलंबून नवे ज्ञान होणे ही मानवजातीची प्रगतीच आहे. आणि ती “देव नाही” ह्या गृहीतकावर नक्कीच आधारित आहे.

शेवटी, आपण विधान ज, म्हणजेच कुंभोजकरांचे पुढील प्रतिपादन पाहूया: “आयुष्याची अशी काही क्षेत्रे आहेत जिथे देवाच्या गृहीतकाला स्पर्धकच नाहीत.” येथे माझ्यामते कुंभोजकरांना दोन प्रमुख क्षेत्रांबद्दल भाष्य करायचे असेल. पहिले, विश्वोत्पत्ती, विश्वनियमन, आणि विश्वविनाश ह्यासंबंधीचे प्रश्न; आणि दुसरे, मनःशांती, मानसशास्त्रीय स्थैर्य, नैतिकता ह्यासंबंधीचे प्रश्न. पहिल्या प्रकारचे प्रश्न हे खरेतर विज्ञानातून उत्तरे सापडतील असे प्रश्न आहेत. कोण्या दोन-पाच हजार वर्षे पूर्वीच्या “शहाणपणा”ला सर्वमान्यता देऊन ती ह्या प्रश्नांची उत्तरे आहेत असे मान्य करणे हे न पटण्यासारखे आहे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत असतात. कुंभोजकर स्वतः म्हणतात की विज्ञान हे धर्मापेक्षा इहलोकातले नियम समजून घ्यायला सरस आहे. ह्या क्षेत्रातले प्रश्न अवघड असले तरी उत्तरे मात्र विज्ञानच देऊ शकते, हे नक्की. आणि, ह्या प्रश्नांचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर फारसा परिणाम होत नसतो. हे प्रश्न कुतूहलरूपाने अवतरतात, त्यांच्यामुळे पोटात ना खळगी निर्माण होते ना ती भरून निघते. अश्यावेळी धर्माने दिलेली खोटी उत्तरे खरी मानून जगण्याऐवजी कुतूहल जोपासत ती उत्तरे शोधण्यात मनुष्याला जास्त आनंद मिळेल असे मला वाटते. दुसऱ्या क्षेत्रातले प्रश्न हे अतिमहत्त्वाचे आहेत, पण थोडक्यात त्यांच्यावर भाष्य करतो[११].

दिवसेंदिवस जर धर्म आपल्या समाजातून हद्दपार होत असेल, तर सामाजिक वीण जपून ठेवण्याचे कार्य संस्कृती करू शकते. ह्यात गायन-वादन, नाटक, चित्रपट, साहित्य, fun-fairs ह्यापासून Alcoholics Anonymous सारखे विविध उपक्रम हातभार लावू शकतात. मनुष्याच्या आयुष्याला धर्मच काय तो अर्थ प्रदान करू शकतो, हे पटत नाही. आणि जो काही अर्थ धर्म प्रदान करू शकतो, तो इतरही सांस्कृतिक उपक्रम प्रदान करू शकतात. जी काही पोकळी धर्माच्या नसण्याने निर्माण होणार आहे, ती माझ्यामते दुसऱ्या आकलनक्रांतीशिवायही आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मार्गांनी भरून निघू शकते. नैतिकता/नीतिशास्त्र हे क्षेत्र तर धर्माची मक्तेदारी कधीही नव्हते हे सॉक्रेटिस-युथीफ्रो संवाद विशद करतो. प्रस्थापित नैतिकतेला पारलौकिक अधिष्ठान पुरवून धर्म आपले नीतिशास्त्र पुढे ढकलत आले आहेत. नीतिशास्त्राचे धर्मविरहित नियम आपण आज बनवू शकतो, त्यामुळे तिथलीही धर्माची गरज बऱ्यापैकी संपुष्टात आली आहे असेच म्हणावे लागेल.

आपले नास्तिक्य जर बुद्धिप्रामाण्यवाद ह्या स्तंभावर आधारित असेल तर नास्तिक्य आणि धर्म हे एक स्तरावरचे विचार असणे अशक्य आहे. अशावेळी धर्माच्या गृहीतकांना “स्वाहा” करणेच ‘श्रेयस्कर’ ठरेल.

[१] https://plato.stanford.edu/entries/vagueness/
[२] https://ndpr.nd.edu/reviews/vagueness-and-contradiction/
[३] https://www.routledge.com/Vagueness/Williamson/p/book/9780415139809
[४] https://plato.stanford.edu/entries/platonism-mathematics/
[५] https://www.oysteinlinnebo.org/
[६] https://grosen.scholar.princeton.edu/
[७] https://plato.stanford.edu/entries/fictionalism-mathematics/
[८] https://plato.stanford.edu/entries/frege-theorem/
[९] https://plato.stanford.edu/entries/meinong/
[१०] असेच काहीसे मत फ्रॅंक रॅम्झी ह्या तत्त्वज्ञाचे होते; https://plato.stanford.edu/entries/ramsey/#PartBeliSubjProb
[११] येथे शक्य असे एक उत्तर लिहीत आहे. “हेच उत्तर आहे” असे माझे मुळीच म्हणणे नाही. आपण इतरही शक्यतांचा विचार करू शकतो.

कार्यकारिणी सदस्य, ब्राइट्स सोसायटी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.