कुंभोजकरांच्या लेखातील काही विसंगती

कुंभोजकरांचा गणिताचा अभ्यास असल्यामुळे त्यांना हे तर माहितीच असेल की एकदा १=२ सिद्ध केले की सिद्धतेच्या इतर पायर्‍यांमध्ये काहीही चूक न करताही कोणताही चुकीचा निष्कर्ष मांडता येतो. त्याच धर्तीवर, त्यांच्या लेखात काही पायर्‍यांमध्ये चुका आहेत, बाकीच्या फाफटपसार्‍याची दखल न घेता चुकीचे दावे पाहू. हे दावे अडवून धरले की बाकीचा साराच डोलारा कोसळतो.

“तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला.”

स्वतःला परमेश्वर समजणार्‍या व्यक्तीला नास्तिक म्हणू नये.

“त्या प्रत्येक स्तंभात ईश्वराचे वास्तव्य आहे अशी प्रल्हादाची श्रद्धा होती.”

त्यांच्याच लेखात पुढे उल्लेख आहे की “हिरण्यकश्यपूने पहिल्याच घावात खांबाचे तुकडे केले. खांबातून अग्निशलाका उमटल्या, पण परमेश्वर काही दिसेना.” जर प्रत्येक स्तंभात ईश्वर असण्याचा दावा प्रल्हादाने केला होता तर बाकीच्या खांबांचे तुकडे करण्याची गरज नव्हती. पहिल्या खांबात देव नाही हे पाहूनच “प्रत्येक खांबात देव आहे” हे वाक्य खोटे ठरले होते. स्वतःचाच प्रासाद तोडणारा हिरण्यकश्यपू मूर्खच होता, नास्तिकांनी स्वतःच्या खर्चाने देवाचे पुरावे शोधू नयेत.

“‘ईश्वर आहे’ किंवा ‘ईश्वर नाही’ यापैकी कोणतीही गोष्ट वास्तव आहे असे सिद्ध करता येत नाही. देव आहे ही जशी श्रद्धा आहे, तशीच देव नाही हीही श्रद्धाच आहे हे मान्य करावे लागते.”

हे मुळीच सत्य नाही. ईश्वर आहे या अभ्युपगमाशी (हायपोथेसिस) सुसंगत एकही पुरावा/निरीक्षण नाही. ईश्वर नाही या हायपोथेसिसशी सुसंगत खांबांनी सारे विश्वच भरलेले आहे. त्यामुळे, ‘ईश्वर नाही’ हा ‘अजून खोटा न ठरलेला’ असा एक निष्कर्ष आहे.

“ही वाफ नाही धूरच आहे कारण त्यात कार्बनमोनॉक्साईड आहे.”

कार्बनमोनॉऑक्साईडला रंग नसतो. दृष्य धूर हे कार्बनचे कण असतात, थोडी वाफही असते.

“कोणते गृहीतक अधिक स्वीकारार्ह आहे यावर वाद होऊ शकतो. पण त्याच्या स्वीकारार्हतेच्या कसोट्या व्यक्तीगणिक बदलणे शक्य असते.”

विज्ञान तसे चालत नाही. किमान आणि सर्वात सोप्या गृहीतकांच्या आधारे सर्व निरीक्षणांचे स्पष्टीकरण शोधतात. याला ऑकॅमचा वस्तरा म्हणतात. लाप्लासने तोच वापरला होता. देवाने ‘क’ वस्तू बनवली, देवाने ‘ख’ वस्तू बनवली, देवाने ‘ग’ वस्तू बनवली, अशाप्रकारे गृहीतकांची जंत्री लावणे हा सर्वात खर्चिक सिद्धांत आहे. त्यापेक्षा, गृहीतकांची अशी सर्वात छोटी यादी शोधली जाते जिच्यावरून बाकीच्या सर्व जगाची उपपत्ती “ह्यात काय मोठेसे! हे तर स्वाभाविकच आहे.” अशा बोळावणीने करता येते.

“जेव्हा एकाच गोष्टीच्या ज्ञानासाठी एकाहून जास्त भिन्न गृहीतके उपलब्ध असतात तेव्हा कुणाची निवड करायची हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.”

हाच कळीचा मुद्दा आहे. हा विषय स्वतंत्र नाही. गृहीतकांचे काही संच इतर काही संचांपेक्षा श्रेष्ठ असतात. जो संच सर्वात सोपा असतो तोच सत्य मानावा लागतो.

“भूमितीतील सर्व ज्ञान हे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे ज्ञान आहे. आणि तरीही ते उपयुक्त आहे, याचे श्रेय मानवी प्रतिभेला द्यावे लगेल.”

भौतिक विश्वाचे प्रारूप (मॉडेल) मानवी मेंदूत सामावणे शक्यच नाही. तरीही त्याचे आकलन करण्यासाठी काही सुलभीकरणे करावी लागतात. विविध दोर्‍यांचा समाईक विचार करण्यासाठी रेषा ही एक अमूर्त संकल्पना मानली आहे. भूमिती (किंवा इतर कोणत्याही अमूर्त कल्पना) या विश्वाचे मॉडेल म्हणून मानवी मनातच अस्तित्वात असते.

“याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला म्हणतो, “देव देवासाठी प्रिय नसतो. तो आपले काम करतो म्हणून प्रिय असतो.””

देवाने कामे केली असती तर हरकतच नव्हती. देव नवसाला तर पावतच नाही, पण मानसिक धीर मिळवण्यासाठीही ‘देव’ या कल्पनेचा उपयोग होत नाही.

“ईश्वराचे गृहीतक माणसापुढील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे एक साधन होते.” आणि “काही प्रश्नांना विज्ञानाकडे उत्तरे नाहीत. त्या क्षेत्रात देवाच्या गृहीतकाला स्पर्धकच नाही. त्यामुळे तेथे देव टिकून आहे.”

ईश्वर हे कोणत्याही प्रश्नाचे ‘उत्तर’ नाही. एखाद्या निरीक्षणाला केवळ काहीतरी नाव दिल्याने त्या निरीक्षणाचा अर्थ लागतो असे नव्हे. नवे गृहीतक करून स्पष्टीकरण मिळतच नाही, निरीक्षणाला ज्ञात गृहीतकांमध्येच स्पष्ट करावे लागते.

“अशी एक संख्या शोधा जिचा वर्ग हा तिच्या सहापटीपेक्षा नऊने लहान आहे” असा प्रश्न असेल तर 6x – x²= 9 असे समीकरण लिहिता येते. परंतु त्या संख्येला ‘x’ हे नाव देणे हे ‘उत्तर देणे’ नसते. त्या समीकरणाची उकल करून x = 3 असे सिद्ध केले की 3 हे उत्तर असते.

काहीतरी मार्गाने क्रूक्स ट्यूब्जजवळच्या फोटोग्राफी प्लेट्सवर डाग पडत होते. त्याचे स्पष्टीकरण देता आले नाही म्हणून राँटजेनने क्ष-किरणांची कल्पना केली. परंतु त्या विकिरणाला ‘क्ष’ असे नाव देऊन प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही.

क्ष-किरण हे अतिसूक्ष्म तरंगलांबीचे विद्युतचुंबकीय तरंग-कणच आहेत हे समजते तेव्हा क्ष-किरणांचा अज्ञातपणा नष्ट झाला, ते ज्ञात पॅराडाईममध्ये बसू लागले. क्वचितप्रसंगी पॅराडाईमचा विस्तार करावा लागतो परंतु विज्ञानाच्या पॅराडाईममध्ये ईश्वर हे नवे गृहीतक आणावे लागेल असे कोणतेच अबोध्य निरीक्षण सापडलेले नाही.

“हिंदुधर्म, बौद्धधर्म आणि विज्ञान हे धर्मग्रंथ नसणारे धर्म आहेत.”

हिंदू (आणि काही प्रमाणात बौद्ध) हा एकसंध धर्म कुठे आहे? प्रत्येक धर्मग्रंथाने एक वेगळा हिंदू (किंवा बौद्ध) धर्म सांगितला आहे. त्या सर्व ग्रंथांच्या समुच्चयाने हिंदू (किंवा बौद्ध) हे एकच नाव वापरल्यामुळे लोकांचा गोंधळ होतो. भारतात अहिंसा सांगणारा बौद्धधर्म चीन-जपानमध्ये मांसाहाराला विरोध करत नाही.

“विज्ञानाचे अब्राहमिक धर्माशीच वैर का उद्भवले आणि पौर्वात्य धर्माशी वैर का निर्माण झाले नाही याचाही बोध या व्याख्येच्या विश्लेषणानंतर स्पष्ट होतो.”

पौर्वात्य धर्मांमध्ये कन्या’दान’, केशवपन, सतीप्रथा, बालविवाह, जातिभेद, पशुबळी, आणि नरबळीही होते. त्यांच्याशी वैर घेऊनच आधुनिकतेने त्यांना नियंत्रित केले आहे. पाश्चिमात्य धर्मांप्रमाणेच, पौर्वात्य धर्मसुद्धा पारलौकिकाचे अस्तित्व मानून त्याच्या उपासनेकरिता संसाधने खर्च करतातच, तेही अवैज्ञानिक आहे. आयुर्वेद, निरयण फलज्योतिष्य, वास्तु’शास्त्र’, फुंग श्वे (Feng Shui), अ‍ॅक्युपंक्चर, अ‍ॅक्युप्रेशर ही सारी पौर्वात्य धर्मांचीच अपत्ये किंवा भावंडे आहेत. संक्रांत दर ७२ वर्षांनी एक दिवस उशीराने येते आहे. २२ डिसेंबरला सुरू झालेली संक्रांत आता १४-१५ जानेवारीला येते, काही शतकांनी ती उन्हाळ्यात येईल, पण हे लोक उन्हाळ्यातही तिळगुळाचे गोडवे गात बसतील.

“अध्यात्म आणि विज्ञान एकच सत्य सांगतात असा काहींचा प्रामाणिक दावा आहे. हा दावा कितपत योग्य आहे हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.”

हा विषय स्वतंत्र चर्चेचा असूच शकत नाही, तो प्रस्तुत विषयापासून अविभाज्य आहे. अध्यात्म हे विज्ञानाशी विसंगत दावे करते.

“भारतीय धर्म, विज्ञान, लोकशाही ही सत्यशोधक धर्माची उदाहरणे म्हणता येतील.”

भारतीय धर्मांनी कोणते सत्य शोधले आहे? धर्मांमध्ये ज्या सुधारणा होतात त्या धार्मिक पुढाकाराने होत नसून, पुरोगाम्यांच्या रेट्यापुढे धर्म हतबल होतात तेव्हा धर्ममार्तंडांच्या नाइलाजामुळे होतात. याला god of the gaps म्हणतात. जसेजसे विज्ञान पुढे सरकते तशी अज्ञानाची व्याप्ती आक्रसते.

“भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशात लोकशाही टिकली नाही. भारतात लोकशाही टिकू शकली याचे एक कारण लोकशाही भारतीय धर्माप्रमाणेच एक सत्यशोधक धर्म आहे हे असण्याची शक्यता आहे.”

बहुतेक सर्व ख्रिश्चनबहुल देशांतही लोकशाही आहे. ब्रिटनचा तर अधिकृत धर्मही ख्रिश्चन आहे आणि तरीही तेथे लोकशाही आहे.

“राज्यघटनेत लोकांच्या संमतीने सुधारणा करण्याचे सुविहित मार्ग उपलब्ध आहेत म्हणून तिला सत्यशोधक म्हणणे अधिक योग्य होईल.”

या निकषावर पाहिले तर प्रश्न उद्भवतो की लेखक लेखात इतरत्र हिंदू धर्माला सत्यशोधक का म्हणतात? हिंदू धर्मात सुधारणा करण्याचे सुविहित मार्ग कुठे आहेत?

“तत्त्वचिंतक सत्यशोधक धर्माला अध्यात्म आणि जड जगातील प्रश्नांचा विचार करणाऱ्या सत्यशोधक धर्माला विज्ञान म्हटले”

जगत् केवळ जडच आहे त्यामुळे तत्त्वचिंतन हाही विज्ञानाचाच एक भाग असतो. 

“धर्माशी जसा विज्ञानाचा तीव्र संघर्ष झाला तसा अध्यात्माशी झाल्याचे दिसत नाही. याचेही कारण, दोन्हीही सत्यशोधक धर्म असले त्यांची कार्यक्षेत्रे बऱ्याच अंशी अलग आहेत.”

हे खरे नाही. अध्यात्माचा संबंध पारलौकिकाशी आहे आणि विज्ञान पारलौकिकाला नाकारते.

“‘देव नाही’ हे गृहीतक माणसापुढील कोणत्या प्रश्नांची उत्तरे देते? याला सकारात्मक उत्तर नाही. त्या गृहीतकाने मानवजातीच्या प्रगतीत महत्त्वाची भर घातल्याचे दिसत नाही.”

देव नाही हे विधान गृहीतक नाही. तो उपलब्ध निरीक्षणांचा निष्कर्ष आहे. त्या निष्कर्षामुळे गृहीतकांच्या यादीतून देव हे गृहीतक इतर सर्व गृहीतकांशी विसंगत म्हणून नाकारले जाते. त्यामुळे गृहीतकांची यादी लहान होते हा फायदा आहे. पारलौकिकासाठी नास्तिक व्यक्ती संसाधने खर्च करत नाही हा फायदा आहे.

अभिप्राय 3

 • मूळ लेखात हे वाक्य आहे: “ज्याच्या स्वतःच्या आयुष्याचीच रेषा मर्यादित आहे तो अमर्याद लांबीची रेषा कशी काढू शकेल?” या वाक्याचा आणि भूमितीच्या प्रमेयाचा काहीही संबंध नाही!

 • “अशी एक संख्या , जिचा वर्ग हा तिच्या सहापटीपेक्षा नऊने लहान आहे”
  हे वर्णन ‘3’ या संख्येचे वर्णन आहे,हे निःसंशय. पण येथे असे विचारता येईल की,हे वर्णन करणे आपल्याला कसे शक्य झाले? याचे उत्तर असे की, आधी ‘ 3’ ही संख्या एक संख्या म्हणून आपल्याला माहीत होती. आता तिचे काहीश्या वेगळ्या प्रकारे वर्णन करायचे आपण ठरवले आणि ‘ अशी संख्या ,जिचा वर्ग ( 3×3 =9) हा तिच्या सहापटीपेक्षा ( 3×6=18) नऊने लहान (18-9= 9) आहे. ) असे तिचे काहीशे विवक्षित वर्णन आपण केले.
  तेव्हा, समीकरणाची उकल करून आपल्याला ‘उत्तर’ मिळते असे निदान गणिताबाबत तरी म्हणता येत नाही. समीकरणांची उकल त्यांच्यातच दडलेली असते.तेव्हा, गणितातून काहीही ‘ नवीन’ निष्पन्न होत नाही. येथे असेही विचारता येईल की, “अशी एक संख्या , जिचा वर्ग हा तिच्या सहापटीपेक्षा नऊने लहान आहे” हे वर्णन आपल्याला कसे प्राप्त झाले? तर ‘3’ या संख्येवर विविध प्रयोग ( गणिती क्रिया ) करूनच. तेव्हा,हे प्रयोग गृहितकांपेक्षा निरिक्षणावर किंबहुना संख्यातील संबंधांच्या ( Number Relation) निरिक्षणावर आधारलेले असतात. पण हे निरिक्षण गणितज्ञ कसे करतो? असेही विचारता येतेच. ते गणिती प्रतिभान ( इंट्युइशन) असू शकेल? पण अशा प्रतिभानांतून मानवी प्रज्ञेला गणिती संबंधांचे आकलन कसे होते? यातील कित्येक संबंध ‘स्वयंसिध्द’ म्हणून स्विकारली जातात.उदा; सर्व धन संख्यांची बेरीज ही धन असते. किंवा सर्व त्रिकोणांना तीन कोण असतात. ‘सर्व’ धन संख्या एकूण किती आहेत? किंवा ‘सर्व’ त्रिकोण म्हणजे एकूण किती? हे आपणास निश्चित सांगता येत नाही, तरीही ही विधाने सत्य असलीच पाहिजे असे आपल्याला वाटते. आता,या विधानांना ‘गृहितक’ म्हणूया.तेव्हा प्रश्र्न असा की ही किंवा अशी गृहितके सिध्द करण्याचा कोणता मार्ग मानवाजवळ असतो? यासंदर्भात, नेमकं ‘सिध्द करणे’ कशाला म्हणता येईल?

 • देवाच्या अस्तित्वाविषयी सुरू झालेल्या चर्चेतील लेख वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
  मूळ लेख
  https://www.sudharak.in/2023/01/10135/

  इतर लेख
  https://www.sudharak.in/2023/01/10140/
  https://www.sudharak.in/2023/01/10227/
  https://www.sudharak.in/2023/01/10224/
  https://www.sudharak.in/2023/01/10304/

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.