Author archives

जलक्षेत्रात कायद्याचे राज्य असावे!

महाराष्ट्राने आजवर अंदाजे एक लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक करून विविध सिंचन-प्रकल्पांच्या माध्यमातून साधारण 33000 द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची व्यवस्था केली आहे. त्यातून अंदाजे 58.5 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून पिण्याकरता, घरगुती वापराकरता तसेच औद्योगिक वापराकरता मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले आहे. राज्यातील फार मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा आज मिळत आहे. राज्याच्या या जलक्षेत्राची (water sector) कायदेशीर बाजू मात्र अद्याप लंगडी आहे. त्या संदर्भात काही मुद्द्यांचे संक्षिप्त विवेचन या लेखात केले आहे.
सिंचनविषयक खालील चार कायदे आज महाराष्ट्रात एकाच वेळी लागू आहेत.

पुढे वाचा

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू

1) विषयप्रवेश
पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगरदऱ्यांत… सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते. आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते. म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे व्यवस्थापक, अभियंते, धरणे, कालवे, नळ, जलशुद्धीकरणाच्या सोयी, पंप, डिझेल, वीज या गोष्टी फुकट मिळत नाहीत. हा एक पूर्वनियोजित प्रचंड खटाटोप असतो. म्हणूनही व्यवस्थापन यंत्रणा उभी करावी लागते.
व्यवस्थापन म्हटले की नियम आणि नियमन आले.

पुढे वाचा

चिकोत्रा खोऱ्यातील पाण्याच्या समन्यायी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प

पार्श्वभूमी, रूपरेषा व वाटचाल
1. महाराष्ट्र राज्यातील सुमारे 83 टक्के शेती कोरडवाहू आहे. निसर्गाच्या लहरीवर ती अवलंबून आहे. सिंचनाखाली फक्त 17 टक्के जमीन आहे. पण उपलब्ध पाणी मोजून दिले जात नसल्याने त्याची उधळपट्टी होते, जमिनी बिघडतात आणि नियोजित सर्व क्षेत्रालाही पाणी मिळत नाही. प्रकल्पाच्या पाण्याला, पाणलोट व्यवस्थापनाद्वारे मिळणाऱ्या पाण्याची आणि भूजलाची जोड देऊन ते काटकसरीने वापरल्यास सिंचनक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात करणे शक्य होईल. तसेच ते राबवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना समन्यायाने वाटल्यास त्यांना निसर्गावर मात करता येईल. अशा रीतीने ग्रामीण भागातील दारिद्र्याचे, बेकारीचे आणि शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचे मूळ कारण नष्ट होईल.

पुढे वाचा

पाणीप्रश्नांत स्त्रियांचा सहभाग आणि कुचंबणा

प्रास्ताविक
जगभर पाण्याशी स्त्रियांचा आगळावेगळा नातेसंबंध दिसून येतो. त्याला सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि उपजीविकेसंबंधीची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ग्रामीण भागात आणि आदिवासी भागात तर घडाभर पाण्यासाठी पायपीट करताना स्त्रिया आढळतात. शहरी झोपडपट्टीत सार्वजनिक नळावर बायकांच्या लांबलचक रांगा दिसतात. शहरात काय किंवा ग्रामीण भागात काय 12-15 वर्षांच्या मुलींना पाणी भरण्यासाठी आणि लहान भावंडे सांभाळण्यासाठी शाळेतून काढून घेतले जाते. इतके सर्व करूनही स्त्रियांकडे जमीन-मालकी नसल्यामुळे पाणीवाटप संस्था किंवा अन्य धोरणात्मक कार्यात त्यांचा कुठेच सहभाग शक्य होत नाही – सिंचनव्यवस्था पाणी जमीनमालकांना देते, नगरपरिषद घरमालकांना पाणी देते.

पुढे वाचा

पाण्याच्या लढाया समजून घेऊ या

पाण्यासाठी चाललेली समाजातील खळखळ सहज दिसत नाही, जाणवत नाही; परंतु अनेक पातळ्यांवर ती सतत चालूच असते; देशादेशांत, प्रांताप्रांतांत, विभाग उपविभागांत, जिल्हापातळीवर, राजकीय पक्षांत, जातीजमातींत, अगदी व्यक्तिगत शेतकऱ्यांमध्येदेखील. सुदैवाने प्रसारमाध्यमांनी भाकीत केलेली ‘जलयुद्धे’ मात्र अजून तरी झालेली नाहीत. युद्धे झाली, पण ती तेलावरून. एक मात्र लक्षात घ्यायलाच हवे, की या अस्वस्थतेचे परिणाम आर्थिक विकास, सामाजिक स्थैर्य, सुरक्षा आणि पर्यावरणावर जरूर होतात. आणि नेहमीच वंचित, गरिबांतले गरीब, ह्यांच्यासारखेच नद्यानाले, पाणथळ प्रदेश, भूगर्भीय जलस्रोत हे सारे धोक्याच्या छायेत असतात.
मतभेद, अगदी तीव्र स्वरूपाचे मतभेद, हे वाईट, नकारात्मक असतातच असे नाही.

पुढे वाचा

डाळरोटी

एकूण घरखर्चापैकी किती प्रमाण अन्नावर खर्च होते, या अंगाने काही देशांची आकडेवारी यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरने तपासली. या प्रमाणानुसार चार वर्ग पाडले गेले.
ज्या देशांत अन्नखर्च एकूण घरखर्चाच्या 15% किंवा कमी असतो, ते सुस्थित देश. या वर्गात कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, इंग्लंड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, दक्षिण कोरिया व थायलंड येतात. अमेरिका सर्वांत सुस्थित आहे. तेथील लोकांच्या घरखर्चात केवळ 7% खर्च अन्नावर होतो.
यांच्याखाली घरखर्चाच्या 16% ते 25% भाग अन्नावर खर्च करणारे देश येतात.

पुढे वाचा

गावगाडा : सहकार (भाग-1)

महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली. त्यापूर्वी द्वैभाषिक राज्य होते. 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राचा ‘मंगलकलश’ तेव्हाचे द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. मध्यंतरी एका प्रसिद्ध साहित्यिकाने त्याबाबत एक विधान करून वाद उत्पन्न केला होता. पण पुढे माफी वगैरे मागून त्यांनी वाद वाढू दिला नाही. यशवंतरावांना महाराष्ट्राचे शिल्पकार वगैरे म्हटले जाते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. सर्व प्रकारचे लोक त्यात होते. ते जाणीवपूर्वक सांस्कृतिक क्षेत्रातील विचारवंतांशी संबंध ठेवीत. त्यांना मान देत. लेखक, कवी, विचारवंत, संपादक यांना त्यांच्या बैठकीत मानाचे स्थान असे.

पुढे वाचा

जपानचे धडे

विजय सिंह याने जपानमधील दहा अनुकरणीय गोष्टींची यादी दिली आहे. (तहलका, 26 मार्च 2011). ही यादी नुकत्याच झालेल्या भूकंप-त्सुनामी प्रकारानंतर व त्यामुळे उद्भवलेल्या अणुऊर्जाकेंद्रांतील स्थितीनंतर जपानी जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल आहे.
1) सारे काही शांत होते. उरबडवे दुःखप्रदर्शन कोठेही झाले नाही. दुःख आपोआपच उदात्त झाले.
2) पाणी व वाणसामानासाठी शिस्तशीर रांगा लावून लोक उभे राहत होते. कोठेही शिवीगाळ, हातवारे वगैरे झाले नाही.
3) इमारती हलल्या, डुगडुगल्या, पण पडल्या नाहीत. याचे श्रेय डिझायनर आर्किटेक्ट बिल्डरांना द्यायला हवे.
4) लोकांनी गरजेपुरतीच खरेदी केली, ज्यामुळे सर्वांना पुरेशा वस्तू मिळू शकल्या.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय : लंडननामा शहरे कशी घडतात

अनेक जण असे मानतात, की भारत हा देश खेड्यांमध्येच वसलेला आहे. वास्तव मात्र असे नाही. आज देशातील चाळीसेक टक्के प्रजा नागर आहे. महाराष्ट्रात तर आज नागर प्रजा आणि ग्रामीण प्रजा यांच्या संख्या जवळपास सारख्याच आहेत. हा नुसता आकड्यांचा खेळ नाही. यामागे जीवनदृष्टी, विकासातले अग्रक्रम अशा अनेक मूलभूत बाबी आहेत.
जसे, गांधीवादी-सर्वोदयवादी “खेड्यात जा”, असा संदेश देतात, तर आंबेडकर “शहरांत जा”, असे म्हणतात. गांधीविचारांत पंचायत-राज, विकेंद्रीकरण महत्त्वाचे आहे. आंबेडकर असे मानतात की कृषिप्रधान, जातींच्या उतरंडीने निबद्ध अशा खेड्यांमध्ये संख्येने भरपूर असलेल्या दलितांना न्याय मिळणार नाही; त्यासाठी औद्योगिक, केंद्रीभूत परस्परावलंबनावर बेतलेली शहरेच उपयोगी ठरतील.

पुढे वाचा

स्मिथ, मार्क्स आणि गांधी

अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ याला नुसते अर्थशास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा अर्थतत्त्वज्ञ म्हणणे जास्त उचित ठरेल. राजसत्ता आणि अर्थकारण यांचा अन्योन्यसंबंध तपासण्याची त्याला अठराव्या शतकातच गरज भासली. त्याच्या दूरदर्शीपणाचा हा पुरावा आहे.
अँडम स्मिथ ग्रेट ब्रिटनचा नागरिक होता आणि ‘औद्योगिक क्रांती’चे जन्मस्थान इंग्लंड मानले जाते. याच इंग्लंडात पुढे कार्ल मार्क्स हाही अर्थतत्त्वज्ञ येऊन राहिला होता आणि भांडवलाची चिकित्सा करणारा आपला ग्रंथ त्याने औद्योगिक क्रांतीच्या वाढत्या पडछायेत लिहिला. ज्या लंडन शहरात अॅडम स्मिथ आणि कार्ल मार्क्स यांनी आधुनिक संस्कृती आणि अर्थकारण यांचे परस्परसंबंध मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच लंडन शहरात मोहनदास करमचंद गांधी ह्या – महात्मा म्हणून ओळखल्या गेलेल्या – भारतीयाला पाश्चात्त्य संस्कृतीचे जवळून दर्शन घडले.

पुढे वाचा