(७) विवेकनिष्ठेचा सांभाळ
पण हा विषय एवढ्यावरच सोडून द्यावा असे मला वाटत नाही. विवेकनिष्ठा मला प्रिय आहे आणि राष्ट्रवादही. म्हणून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एक उपाय सुचतो तो सांगतो.
विवेकनिष्ठा आदर्श समाजाचा आधार म्हणून इष्ट तर आहेच, पण एकूण विचार करता राष्ट्रवादालाही पोषक आहे. कारण राष्ट्रवादाला संघटनेच्या आड येणारे समाजाचे दोषही दूर करायचे असतात. हे दोष परंपरेतून, इतिहासातून निर्माण झालेले असतात. त्यांची नीट चिकित्सा झाली पाहिजे; कारण चिकित्सा झाल्याशिवाय त्यांच्यावर उपाययोजना करता येत नाही. पण आवाहनात्मक, स्फूर्तिकारक मांडणी करताना गटाच्या दौर्बल्यांचे विश्लेषण करणे टाळले जाते आणि त्याची उभारणी निरोगी पायावर होत नाही.