खूप संख्येने माणसांना हल्ली असुरक्षिततेच्या, भयाच्या, अनिश्चित भविष्य- कालाच्या कल्पनेने ग्रासलेले असते. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे अनेकांनी मनःशांती गमावलेली असते व ती मिळविण्यासाठी गुरु गाठणे, नाम घेणे, देवभक्ती करणे व त्यासाठी तीर्थयात्रा करणे, योगासने, सिद्धसमाधियोग, गुरूंच्या लिखाणाचे वाचन करणे, कॅसेटस् ऐकणे, मौनशिबिरात दाखल होणे वगैरे नाना प्रयत्न अनेकजण करत असतात.
खरे पाहता आजचे जीवन पूर्वीच्या कोणत्याही युगाशी तुलना करता अधिक सुरक्षित आहे. पंचमहाभूतांशी व वन्यप्राण्यांशी झगडा क्वचित् कोणाला करावा लागतो. समाजाच्या व विज्ञानाच्या प्रगतीमुळे बरेचसे रोग नष्टप्राय झाले आहेत. शिल्लक रोगांवरही बऱ्यापैकी उपाय आहेत.