सहिष्णुतेची खरी कसोटी

समाजात जर खरोखरी स्वातंत्र्य रूजवायचे असेल तर ती दुहेरी प्रक्रीया असते. एक तर इतरांच्या बाबतीत आपण सहिष्णू असावे लागते. आमच्या सहिष्णुतेच्या मर्यादा आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्याच्या बाबतीत उदासीनता इतक्याच आहेत. सहिष्णुतेची खरी कसोटी आपल्या श्रध्दांच्यावर आघात करणाऱ्या लिखाणांच्या विषयी आपण किती सहिष्णुता दाखवतो या ठिकाणी लागते. कुणी कुणाची मने दुखवायची नाहीत, सर्वांनी एकमेकांच्या अंधश्रध्दा जपायच्या या दिशेने आपल्या सहिष्णुतेचा प्रवास चालू असते मुळात ही दिशाच चूक आहे. सर्वांनीच सर्व बाबींची चिकित्सा करायची आणि या चिकित्सेबाबत श्रध्दा कितीही दुखावली तरीही सहिष्णुतेने वागायचे, या दिशेने आपल्याला प्रवास केला पाहिजे.

पुढे वाचा

स्वातंत्र्य म्हणजे काय?

“स्वातंत्र्य म्हणजे काय? ते इतके मोलाचे का वाटते? स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे? स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय? आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी व्हावा इतक्या त्या जबाबदाऱ्या अवजड असतात काय? स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न टाळण्याकडे बहुसंख्य माणसांचा कल सहज व्हावा, इतके स्वातंत्र्यासाठी झगडणे हे सायासाचे असते काय – अन्न, वस्त्र, निवारा अथवा चैनही, यांचे म्हणजेच चरितार्थाच्या हमीचे जितके महत्व वाटते तितकेच स्वातंत्र्याचे आणि त्याच्या अनुषंगाने लाभणाऱ्या गोष्टींचे महत्त्व वाटते काय ?….

पुढे वाचा

धर्म समाजस्थैर्यासाठीच आहे

”परधर्माच्या लोकांनी आमच्या धर्माच्या लोकांस आपल्या धर्मात घेतले म्हणजे आमच्या धर्मगुरूंची छाती दु:खाने फाटून जाते! लोकांनी धर्मातर करू नये म्हणून ते गीतेतील तत्त्वज्ञान दाखवतील, वेदांतील सुरस काव्य पुढे करतील, उपनिषदांतील गहन विषय सांगतील, पण धर्माच्या नावाखाली धर्माचाच घात करणाऱ्यांची कानउघाडणी त्यांच्या हातून होणार नाही. असे तर हे धर्ममरतड! असे तर हे धर्मगुरू! आणि असे तर हे शंकराचार्य! बसल्या बसल्या नाटकाप्रमाणे वेदांचे भाषांतर केल्याने धर्माची सुधारणा होणार नाही. गावोगाव पालखीत मिरविल्याने धर्माची ग्लानी जाणार नाही. गीतेवर कितीही लंबी प्रवचने झोडल्याने धर्म जागा होणार नाही.

पुढे वाचा

प्रतिकार हे कोतेपणाचे लक्षण नसते!

..आज प्रत्यक्ष हिंदू समाजात सर्वच प्रकारच्या भिन्नत्वाच्या कल्पना प्रभावी आहेत. जातीबद्दलची उच्चनीचत्वाची भावना आहे. पोटजातीबद्दलचा अभिमान आहे व त्याबरोबरच प्रादेशिक व भाषिक भिन्नत्वाच्या कल्पनांचा पूर्ण पगडा आहे.. जोवर प्रत्येक पंथ, जात, गट आपापले वैशिष्टय़ निराळे मानतो व त्याप्रमाणे वागतो तोवर भारतीयतेचा कितीही डांगोरा पिटला, तरी आमचा समाज अनेकविध विभागलेला आणि म्हणून दुर्बळ राहणार. तसेच राष्ट्राभिमानाचा अतिरेक व दुष्परिणाम होतात ते राष्ट्रनिष्ठा या एकाच कल्पनेस फाजील महत्त्व दिल्यामुळे.

व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रदेश, राष्ट्र, खंड, जग ही एक श्रेणी मानता येईल. या श्रेणीतील प्रत्येक घटकाबाबत व्यक्तीचे विशिष्ट कर्तव्य असते.

पुढे वाचा

अराजकतेचे व्याकरण

‘केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गाना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठय़ा प्रमाणात केले जात होते.

पुढे वाचा

साडेसाताळलेले, ‘शन्याळलेले ‘ दिङ्मूढ प्राणी

‘कुंडल्या कागदी असोत, नाही तर तळहाती असोत; त्यात चितारलेल्या प्रारब्ध-मर्यादेबाहेर मनुष्याला केव्हाही जाता येणार नाही. त्यातील भोग भोगल्याशिवाय सुटका नाही’, हा प्रवाद जर खरा मानला, तर मनुष्याच्या पुरुषार्थाला वाव तरी राहिला कोठे? सगळाच जर दैववाद, तर यत्नवाद हा शब्द जन्मला तरी कधी? आणि का? आणि कोणाकोणाच्या पोटी? बरे, प्रत्येकाचे दैव आणि सुखदु:खाचे फेरे हे जर घडय़ाळातल्या यंत्राप्रमाणे ठाकठीक आणि यथाकाळ, यथाक्रम घडणारे, तर त्यासाठी माणसाने आपले हात-पाय तरी का हलवावे? दु:ख येणार तर ते अगत्य येणारच येणार आणि सुखाचा मुसळधार पाऊस अमुक वेळी कोसळणार म्हणजे धो धो कोसणारच.

पुढे वाचा

‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’

सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बौद्धधर्म हिंदुस्थानांतून परांगदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडीवाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठे होते? विद्वान संशोधकांच्या मते, आर्याच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्ष धरली, तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव, देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरडय़ा भाकरीची पंचाईत!

पुढे वाचा

जुन्या चाकोरीत फसलेली मनोवृत्ती

ज्या विज्ञानाने मानवी जीवन आमूलाग्र बदलले, भारत-चीन यांसारख्या प्राचीन व आपल्या चाकोरीत शतकानुशतके चालत असलेल्या संस्कृतींना त्या चाकोरीतून काढून, एका अनोळखी व बिकट मार्गाला लावले, त्या विज्ञानाच्या अभ्यासाला सध्या सर्व शिक्षण-संस्थात अतोनात महत्व आलेले आहे. या शाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मुलांनी (व मुलींनीसुद्धा) विज्ञानशाखेला जावे ही पालकांचीही महत्त्वाकांक्षा असते. विज्ञानाच्या लोकप्रियतेचे कारण मात्र निसर्गनियमांबद्दल मूलभूत जिज्ञासेपेक्षा, या अभ्यासक्रमातून पुढे तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांची दारे उघडतात आणि डॉक्टर व इंजिनियर यांसारख्या पदव्या मिळाल्याने तरुण व तरुणी प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवू शकतात, हे असते.

पुढे वाचा

अपूर्णाकाचा गुणाकार

आपण एका राष्ट्राचे, समाजाचे, एका समूहाचे एक घटक या दृष्टीने स्वत:कडे पाहावे हा संस्कार आमच्या मनावर नाही. या दृष्टीने आम्ही स्वत:कडे पाहात नाही. एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती अशा दृष्टीने आपण स्वत:चा विचार करतो. आपली स्वत:ची उन्नती, परिणती, पूर्णता, मोक्ष ही गोष्ट सर्वस्वी समाजनिरपेक्ष आहे, अशी आमची बाल्यापासून वार्धक्यापर्यंत भावना असते व तद्नुसार आपले वर्तन असते.. आज शेकडो वर्षे आमच्या जीविताचे वळणच असे आहे; त्याची घडणच तशी झालेली आहे. आम्ही स्वकेंद्रित आहो. समाज हा आमच्या अवलोकनाचे केंद्र नाही. त्यामुळे समाज म्हणून जगण्याची विद्या आम्हांला हस्तगत करता येत नाही.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्ष शासन व लोकशाही

धर्मनिरपेक्ष शासन हा लोकशाहीचा पाया आहे. भारतातील आजचे बहुसंख्य पक्षही धर्मनिरपेक्ष शासन व लोकशाही ही मूल्ये मानणारे आहेत. पण आपापसातील तंट्यांमुळे काँग्रेस पक्ष सध्या विघटित झाला आहे. सोवियत युनियनच्या विघटनानंतर मार्क्सवादी पक्ष हतबल झालेल आहेत आणि लोकशाही समाजवादी पक्ष संपुष्टात आले आहेत. त्यामुळे सामाजिक व राजकीय प्रश्नांवर लोकांचे प्रबोधन करणाऱ्या संघटना अभावाने आढळतात. जमातवादाच्या यशाचे हे खरे कारण आहे. हिंदू धर्म हा जातिश्रेष्ठतेच्या कल्पनेवर आधारलेला असल्यामुळे तो लोकशाहीच्या मार्गातील एक मोठा अडसर आहे हे तर खरेच, पण त्याच कारणामुळे हिटलरसाऱखी ठोकशाहीवर आधारलेली संघटना स्थापन करणेही हिंदुत्ववाद्यांना अवघड आहे.

पुढे वाचा