मासिक संग्रह: जून, १९९१

पत्रव्यवहार

संपादक
मार्च १९९१ च्या अंकात डॉ. साळुखे यांनी लिहिलेल्या ‘चार्वाक दर्शन ‘ या पुस्तकाचे परीक्षण वाचले. योगायोगाने पाठोपाठ ते पुस्तक वाचण्याची संधी मिळाली, वाचनानंतर माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या. त्यांचे निरसन झाल्यास मी आपला आभारी होईन. अर्थात् परीक्षणकत्यनिच निरसन करावे अशी अपेक्षा नाही.
माझ्या शंका पुढील तीन मुद्याबाबत आहेत. (१) पूर्वपक्ष शब्दाचा अर्थ, (२) चार्वाक हे आस्तिक मत आहे का 7(३) चार्वाकाचे ग्रंथ जाळले व त्यामुळे ते नष्ट झाले का?
पूर्वपक्ष :- डॉ. साळुखे यांच्या मते चार्वाकाचे मत सर्वत्र पूर्वपक्ष म्हणूनच मांडण्यात आले आहे हे त्या मतावर अन्याय करणारे किंवा त्याविषयी गैरसमज पसरविणारे आहे.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

स्त्री उवाच : वार्षिक १९९१ मूल्य रु. पंचवीस,
संयुक्त राष्ट्रसभेने १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले आणि स्त्रियांना आणि पुरुषांनाही, स्त्रियांच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. स्त्रियांना आपला चेहरा गवसू लागला आणि माणूस म्हणून स्वतःची ओळख पटू लागली. आजतागायत त्यांच्यावर लादलेले वस्तुत्व’ नाकारून त्या व्यक्तित्व जोपासू लागल्या. समाजाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होताना स्त्रीमुक्तीची चळवळ आकार घेऊ लागली, स्त्रीला अभिव्यक्तीची जी गरज भासली त्यातून स्त्री उवाच गटाची स्थापना झाली, हा गट गेल्या ५ वर्षांपासून स्त्री उवाच’ याच नावाने चळवळीचे वार्षिक मुखपत्र काढीत आहे.

पुढे वाचा

धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न

मागच्या लेखात धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यांविषयी हिन्दुनेतृत्व काय म्हणते आणि त्यांनी केलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमुळे हिन्दुनेतृत्वाच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये कशी विसंगती निर्माण होते ते आपण पाहिले. हा लेखामध्ये त्यांच्या व्याख्येमध्ये मला बुचकळ्यात पाडणारे आणखी अनेक शब्द आहेत त्यांचा विचार करावयाचा आहे, तसेच पूर्वीच्या लेखात ज्यांचा परामर्श घेता आला नाही असे मुद्दे विचारार्थ घ्यावयाचे आहेत, व थोडे मागच्या लेखातील मुद्यांचे स्पष्टीकरणही करावयाचे आहे.

मला वाटते, हिन्दुनेतृत्वाच्या हिन्दूंच्या व्याख्येमुळे हिन्दू कोण आहेते पुष्कळसे स्पष्ट होते, पण हिन्दू कोण नाही हा प्रश्न थोडा संदिग्ध राहतो.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १३)

कुटुंब आणि वैयक्तिक मानसशास्त्र
या प्रकरणात मी व्यक्तीच्या शीलावर (character) कौटुंबिक संबंधांचा काय परिणाम होतो याचा विचार करणार आहे. या विषयाचे तीन स्वाभाविक भाग पडतातः मुलांवर होणारे परिणाम, मातेवर होणारे परिणाम, आणि पित्यावर होणारे परिणाम. हे तीन परिणाम वेगळे करणे अर्थातच कठीण आहे, कारण कुटुंब हे एक सुसंहत एकक (closely – knit unit) असते, आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा परिणाम माता-पित्यावर होईल, त्याचा मुलावरही परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु तरीही मी ही चर्चा तीन भागात विभागणार आहे. चर्चेचा आरंभ मुलापासून करणे स्वाभाविक होईल, कारण कोणीही माता किंवा पिता बनण्यापूर्वी आधी मूल असतो.

पुढे वाचा

विवेकवाद – १३

उपयोगितावाद -२
गेल्या तीन-चार लेखांकांत जे नीतीचे विवेकवादी विवेचन केले गेले आहे त्यामुळे अनेक वाचक बुचकळ्यात पडले आहेत. त्यांची अशी समजूत आहे की विवेकवादी नीतीच असू शकत नाही. ‘Rationaltion’ या शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरलेला ‘विवेकवाद’ हा शब्द ते वापरत नाही. या क्षेत्रात रूढ असलेला दुसरा एक शब्द, म्हणजे ‘बुद्धिवाद ‘ किंवा ‘बुद्धिप्रामाण्यवाद, हा शब्द ते वापरतात. आणि तसे केल्यावर त्यांच्यापुढे बुद्धीचा नीतीशी काय संबंध आहे? हा प्रश्न उपस्थित होतो असे त्यांचे म्हणणे. ते म्हणतात की बुद्धी ज्ञानांत यथार्थ आणि अयथार्थ, किंवा अनुमानांत वैध (निर्दोष) आणि अवैध (सदोप) असा भेद करते; पण बुद्धीला कर्मात नीति आणि अनीती असा विवेक कसा करता येईल?

पुढे वाचा

आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील?

अलीकडल्या इंग्रज लोकांनी किंवा युरोपातील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरविली तरी ज्या आम्ही इतक्या पुरातन काळी येवढी मोठी सुधारणा करून बसलो त्या आमच्यापुढे त्यांची मात्रा बिलकुल चालावयाची नाही! …. पण या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असे विचारतो की, बाबांनो, तुम्ही अशा प्रकारे गतवैभवाचे गाणे गाऊ लागला म्हणजे तुमच्या पक्षाचे मंडन न होता उलट मुंडण होते! इंग्रज लोक रानटी होते त्या वेळेस जर तुम्ही इतके सुधारलेले होता, तर आताही त्यांच्यापेक्षा अधिक सुधारलेले असायला पाहिजे होता. पण तसे तर तुम्ही खचित नाही! तेव्हा हे सिद्ध आहे की केव्हातरी तुमच्या सुधारणेस खळ पडला असावा; किंबहुना ती मागेच हटू लागली असावी; कारण सुधारणा ही स्थिर वस्तू नाही; ती पुढे चालेल किंवा मागे सरेल, आमची सुधारणा क्षणैक निश्चल होऊन मग तिची पिछेहाट होऊ लागली असावी असे मानल्याखेरीज ज्यांस आम्ही रानटी म्हणत होतो ती राष्ट्रे दोन हजार वर्षांच्या अवकाशात आम्हापुढे इतकी कशी गेली याचा उलगडा होत नाही.

पुढे वाचा