मासिक संग्रह: एप्रिल, १९९२

संपादकीय

आजचा सुधारकाचा हा तिसर्‍या वर्षाचा पहिला अंक. म्हणजे आजचा सुधारक आता दोन वर्षाचा झाला. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तो जन्मला तेव्हा तो किती काळ तग धरू शकेल अशी शंका आम्हाला होती. याचे कारण त्याला वाचकांचा प्रतिसाद कितपत मिळेल याविषयीची साशंकता हे जसे होते, तसेच वाचकांचे विचारप्रवर्तन करील आणि तरी त्यांनी स्वीकार्य वाटेल असे साहित्य आपण किती काळपर्यंत देऊ शकू याविषयीची अनिश्चितता हेही होते. त्या दोन्ही शंका बहुतांशी निराधार होत्या याचा पुरावा गेल्या दोन वर्षांत बर्‍याच मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. वर्गणीदारांची संख्या हळूहळू का होईना सतत वाढते आहे, आणि विचारप्रवर्तक साहित्य पुरविणारे लेखकही आम्हाला साह्य देत आहेत.

पुढे वाचा

विनोबांची ‘गीता प्रवचने’ व ‘स्थितप्रज्ञदर्शन’

‘गीता प्रवचने’ यातील ‘अध्याय पहिला’ या प्रवचनात विनोबा म्हणतात, “तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांनीच गीतेच्या गगनात मी यथाशक्ति भराऱ्या मारीत असतो.” (गीता प्रवचने, आ. १३, पान १) तर्काला छाटल्यामुळे सत्यशोधन टाळता येते. तर्काला फाटा दिल्यामुळे गीतेतील सर्व प्रतिपादन खरे म्हणून स्वीकारावे लागते, आणि विनोबांनी ते तसे स्वीकारले आहे.

गीता प्रवचनांतील अध्याय २ वरील प्रवचनात विनोबा म्हणतात, “पूर्ण स्थितप्रज्ञ या जगात कोण होऊन गेला ते हरीलाच माहीत”. (गीता प्रवचने, आवृत्ती १३, पान २४) परंतु स्थितप्रज्ञदर्शनामध्ये विनोबा म्हणतात, “बुद्धी कोणाच्या ठिकाणी कमी असो, कोणाच्या ठिकाणी अधिक असो, त्याचे महत्त्व नाही.

पुढे वाचा

श्री. अनंतराव भालेराव

दि. २६ ऑक्टोबर १९९१ रोजी श्री. अनंतराव भालेराव यांचे निधन झाले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक धगधगते यज्ञकुंड शांत झाले. अनंतरावांचा जन्म खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे १४ नोव्हेंबर १९९१ या दिवशी झाला. त्यांचे वडील काशीनाथबुवा वारकरी होते. शिवूरच्या शंकरस्वामी मठातील फडाचे ते प्रमुख होते. वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद येथे शिकून १९३६मध्ये अनंतराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले. या परीक्षेत त्यांना संस्कृत या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्यामुळे शिष्यवृत्ती मिळाली. पुढील शिक्षणाची सोय झाली. याच काळात श्री. गोविंदभाई श्राफ औरंगाबादच्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १८)

मानवी मूल्यांत कामप्रेरणेचे स्थान
कामप्रेरणेविषयी लिहिणार्‍या लेखकांवर, या विषयाची वाच्यता करू नये असे मानणार्‍या लोकांकडून, त्याला ह्या विषयाचा ध्यास लागलेला आहे असा आरोप होण्याची भीती नेहमीच असते. या विषयात त्याला वाटणारा रस त्याच्या महत्त्वाच्या तुलनेत प्रमाणाबाहेर असल्यावाचून फाजील सोवळया लोकांकडून होणारी टीका तो आपल्यावर ओढवून घेणार नाही असे मानले जाते. परंतु ही भूमिका रूढ नीतीत बदल केले जावेत असे म्हणणाऱ्या लोकांच्या बाबतीतच घेतली जाते. जे वेश्यांच्या छळाला उत्तेजन देतात, आणि जे नावाला गोऱ्या गुलामांच्या व्यापाराविरुद्ध असलेले, पण वस्तुतः ऐच्छिक आणि स्वच्छ विवाहबाह्य संबंधांविरुद्ध असलेले, कायदे घडवून आणतात; जे आखूड झगे घालणार्‍या आणि लिपस्टिक लावणार्‍या स्त्रियांचा निषेध करतात, आणि जे अपुर्‍या वस्त्रांत पोहणार्‍या स्त्रियांचा शोध घेत समुद्रकिनारे धुंडाळत असतात, त्यांना मात्र लैंगिक ध्यास आहे असे कोणी म्हणत नाही.

पुढे वाचा

विवेकवाद – २०

नीतीचा आणखी थोडा विचार
या लेखमालेत नीतीचा विचार अनेक लेखांकांत आला आहे. विवेकवाद – ९, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (जाने. ९१), विवेकवाद -१२ व १३, ‘उपयोगितावाद, १ व २’ (मे, जून १९९१), विवेकवाद – १८, नैतिक मूल्यांविषयी
आणखी थोडेसे (डिसेंबर ९१)- हे ते लेखांक.
या लेखांकांत जे विवेचन आले आहे त्याच्याविषयी अनेक वाचकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे नीतीच्या काही कल्पनांचे थोडे विस्ताराने विवेचन झाल्यास बरे होईल असे वाटते.
विवेकवादाचे विवेचन करताना विवेकाचे कार्य ज्ञान आणि कर्म या दोन क्षेत्रांत काय आहे याचा विचार आपल्याला करावा लागला.

पुढे वाचा

सत्यप्राप्तीचे उपाय

आपल्या मतांपैकी एकही पूर्णपणे सत्य नसते. प्रत्येकाभोवती संदिग्धता आणि भ्रांती यांचे वलय असते. आपल्या मतांतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय सुविदित आहेत. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या पूर्वग्रहांविरुद्ध पूर्वग्रह असलेल्या लोकांशी चर्चा करणे, आणि जो उपन्यास (hypothesis) अपर्याप्त सिद्ध होईल त्याचा त्याग करण्याची तयारी ठेवण्याची मनोवृत्ती अंगी बाणवणे – हे ते उपाय होत. या उपायांचा अवलंब विज्ञानात करतात, आणि त्यांच्याच साहाय्याने वैज्ञानिक ज्ञानाची भव्य इमारत उभारली गेली आहे. खरी वैज्ञानिक वृत्ती असलेला प्रत्येक वैज्ञानिक हे कबूल करायला तयार असतो की जे वर्तमान क्षणी विज्ञान म्हणून आपण स्वीकारतो त्यात अधिक शोध लागल्यावर बदल करावा लागणार आहे.

पुढे वाचा

प्रा. स. रा. गाडगीळांना उत्तर

श्री. स. रा. गाडगीळ यांनी ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. “लौकिक-ऐहिक व्यवहाराचे नियंत्रण करणारी शासनसंस्था (स्टेट) आणि पारलौकिक संकल्पनेच्या नावे लौकिक व्यवहाराचे नियमन करू पाहणारी धर्मसत्ता यांची पूर्ण फारकत म्हणजे सेक्युलॅरिझम”. त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे युरोपात दीर्घकाळ संघर्ष चालला तो धर्मपीठ (चर्च) व राजसत्ता यांच्यात. कशावरून? तर अंतिम सार्वभौम सत्ता कोणाच्या हाती असावी, आणि नियंत्रण-नियमनाच्या क्षेत्रांची विभागणी कशी असावी हे मुख्य दोन मुद्दे. सेक्युलर राज्यातही धर्मपीठाचे अस्तित्व राहिले, एवढेच नव्हे तर लौकिक व्यवहारातही धर्मपीठाच्या आदेशांचे स्थान व महत्त्व राहिले. उदा.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रिय श्री. वि. रा. लिमये यांस
स.न.वि.वि.
आपण पाठविलेले कार्ड व पत्र मिळाले. आभारी आहे. ‘आजचा सुधारक’चा फेब्रुवारी १९९२ चा अंक मिळाला. संपूर्ण अंक वाचला.
मी लेखकाच्या मताशी सहमत नाही, कारण लेखक हा पुरुष असल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून तो विचार करतो. कोणतीही स्त्री लेखकाचे मत मान्य करणार नाही. संकोचामुळे तसे ती कदाचित व्यक्त करणार नाही. स्त्री-पुरुषांत शारीरिक, मानसिक, भावनिक कोणते फरक असतात हे किन्से रिपोर्टचा अभ्यास केल्यावर मला थोडेफार कळले, व मी या निर्णयाप्रत आलो आहे की निसर्गाचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यास आवश्यक असलेली भिन्न मानसिकता स्त्री व पुरुष यांना बहाल केलेली आहे.

पुढे वाचा