आपल्याच पिल्लांना आपण विटाळावे, त्यांचे बाल्य कुस्करावे असे कुणी माणूस वागते का, असे खरोखर घडते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. वय, लिंग, नाते, या सर्वांपलीकडे जाऊन सर्वत्र दिसणारी अधम प्रवृत्ती बघितली की माणूस हा विचार करू शकणारा प्राणी आहे या मूळ गृहीतकालाच छेद जातो.
हे जग किती सुंदर आहे, प्रेक्षणीय आहे, सुखदायक आहे, याचे अनेक दाखले तुच्या आमच्याकडे असतील, पण त्या सुंदरतेचे एक मोठे कारण असलेल्या लहान मुलांवरच जिथे लैंगिक अत्याचार होतात, तसे करणारे नराधम जिथे असतात, इतकेच नाही तर हे माहीत असूनही मुकाट राहणारे लोकही जिथे मान वर करून जगतात ते हे जग खचितच असह्य भयंकर आहे.