मासिक संग्रह: एप्रिल, २०१४

सरड्यांमधील लिंग गुणोत्तर – जादा नरसंख्येचा परिणाम

बहुसंख्य भारतीयांना अपत्य म्हणून मुलगे हवे असतात, आणि मुली नको असतात. पूर्वी मुलगी जन्मल्यास तिला मारून टाकायचे प्रयत्न केले जात असत. हेळसांड, अन्न तुटवड्याच्या काळांत उपासमार, हेही नित्याचे होते. आज गर्भजलपरीक्षा, अल्ट्रासाऊंड वगैरे तंत्रे वापरून मुलींना भ्रूणावस्थेतच ‘हेरून’ मारून टाकले जाते. या सर्व वृत्तींवर, त्या अनिष्ट असण्यावर मेगाटनांनी कागद आणि किलोलीटरांनी शाई खर्च झाले आहेत (तोंडच्या वाफेची तर गणतीच नाही.).
एकेकाळी असे मानले जात असे, की या ‘मुलगाच हवा’ वृत्तीमुळे मुलींचा तुटवडा उत्पन्न होईल. वंशवृद्धीसाठी आवश्यक अशा मुली दुर्मिळ होतील. यामुळे त्या ‘मूल्यवान’ ठरून त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मानसन्मानाने वागवले जाईल.

पुढे वाचा

नैसर्गिक संसाधने : वास्तव आह्वाने व उपाय

[ ‘धरामित्र’ ह्या शाश्वत शेती व पर्यावरणाचे काम करणाऱ्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवप्रसंगी दि.2.2.2014 रोजी सेवाग्राम आश्रमात शीर्षकांकित विषयावर दिनानाथ मनोहर ह्यांनी केलेले बीजभाषण. कार्य. संपा. ]
आज सेवाग्रामच्या परिसरात आपल्यासमोर बोलताना, मला कित्येक वर्षांपूर्वी ह्याच परिसरातील पवनारमध्ये घडलेली घटना आठवते आहे. बाहेर श्री जयप्रकाशजीचे आंदोलन सुरू होते, श्रीमती इंदिराजींनी आणिबाणी घोषित केली होती, भारतीय नागरिकांच्या नागरी अधिकारांना मर्यादित करणाऱ्या सरकारचा, जनता आंदोलनांच्या मार्गाने निषेध करत होती. आणि ह्याच काळात विनोबाजींच्या मौन व्रताचा काळ संपत होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्या दिवसाच्या काही दिवस आधीच पंतप्रधान इंदिरा गांधी पवनार आश्रमाला भेट देऊन गेल्या होत्या.

पुढे वाचा

रावणातोंडी रामायण

[ पाण्याचा पुरवठा व त्याचे वितरण ही आजच्या काळातील अतिशय गहन समस्या आहे. व ती अधिकाधिक तशी बनतेही आहे. आधुनिक विज्ञान, त्याचे उपयोजन करणारी अनेकविध तंत्रे, तज्ज्ञ शासकीय अधिकारी व त्यांनी पाण्याच्या समान वाटपासाठी तयार केलेल्या योजना इतक्या साऱ्या गोष्टी आपल्या हाताशी आहेत, परंतु ह्यामधून निष्पन्न काय होते आहे, तर एकीकडे दिवसेंदिवस कोरडे पडत जाणारे जलस्रोत, तर दुसरीकडे पाण्यावरून होणारी भांडणे. आणि वाढत जाणारी पाणीटंचाई.
सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचे व्याख्यान ऐकण्याची मला गेल्या महिन्यात संधी मिळाली. राजस्थानच्या मरुभूमीतील जलस्रोतांचे जतन हा प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे.

पुढे वाचा

जातिभेद आणि निवडणूक

आपल्या देशातील सार्वत्रिक निवडणुका अगदी तोंडाशी आल्या आहेत. त्या निमित्ताने प्रचार- अपप्रचार मतमतांतरे, बदनामीची चिखलफेक व त्यावरील प्रत्युत्तरे ह्या साऱ्याला ऊत आला आहे. पैशाची उधळमाधळ किती होते ह्याची तर गणतीच नाही. अमर्याद सत्ताकांक्षा व आपपरभाव ह्यांनी तर स्वच्छ व मोकळ्या वातावरणातील निवडणुका हे ध्येय असंभव करून टाकले आहे. राष्ट्र ही कृत्रिम संकल्पना आहे खरी, परंतु प्रशासनाच्या दृष्टीने जेवढी काही एकजूट आवश्यक आहे, तेवढीही आम्ही भारतीय दाखवू शकत नाही. भारतीय संविधानाची उद्देशिका (preamble) फक्त कागदावरच राहिली आहे. ती आमच्या मनात उतरली नाही.

पुढे वाचा

दहशतवादी राजवटीचे निकष

सिग्मंड फ्रॉइड हे एक थोर मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी केलेल्या मनोविश्लेषण नावाच्या मांडणीला ह्या शास्त्रात विशेष महत्त्व आहे. परंतु त्यांनी केलेल्या राज्यशास्त्रावरील लिखाणाहीकडेही आता भारतातच नव्हे तर जगभरात गांभीर्याने पाहिले जात आहे. राजकीय प्रक्रिया ह्या विषयांवरील त्यांचे निबंध आता फ्रॉइड आणि मूलतत्त्ववाद ह्या नावाने पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. आपला काळ अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी ती चांगली सुरुवात आहे. हे पुस्तक सर्व प्रकारच्या सनातनी रीतीभातींना हात घालते – मग त्या धार्मिक असोत की निधर्मीवादी. त्यामध्ये मनोविश्लेषणातील मूलतत्त्ववादी घटक प्रश्नांकित केले आहेत एवढेच नव्हे तर मनोविश्लेषणात्मक विचार किंवा कृती हीदेखील मूलतत्त्ववादी प्रवृत्ती उलगडून दाखविणारे ज्ञानाचे रूप म्हणून मांडले आहे.

पुढे वाचा

विकासाने केला घात (एका खेड्याची विनाशाकडे वाटचाल अ विलेज अवेट्स् अ डूम्स डे ह्या जयदीप हर्डीकर लिखित पुस्तकाचा परिचय )

नर्मदाखोऱ्यातील लोकांच्या नर्मदा सरोवर प्रकल्पाविरोधातील लढ्यातील शक्तिशाली एक अर्थपूर्ण घोषणा आहे, ‘विकास चाहिये, विनाश नहीं’. मोठी धरणे म्हणजे विकास असे मानणाऱ्या अनेक शहरी भारतीयांना ही घोषणा चुकीची वाटेल. पण ‘सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा तुकडा किंवा जगण्याचे साधन गमावलेल्या आदिवासीचे किंवा शेतकऱ्याचे दुःख, हे शब्द नीटच मांडतात.
मोठी धरणे, वेगवान आंतर-राज्य रस्ते, अभयारण्ये, विशेष आर्थिक क्षेत्रे अशा मोठ्या विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या मानवी समुदायांची वंचितता आणि पर्यावरणाचा विनाश यांची कथा आपल्याला परिचित अशीच आहे. तरीही ती संवेदनशीलतेने अन् सहानुभूतिपूर्वक पुनः पुन्हा सांगावी लागते म्हणजे तरी अशा विकासाची किंमत काय असते आणि ती कोण मोजते याचे भान आपल्याला येईल.

पुढे वाचा

ओळख अर्थशास्त्रज्ञांची (१) – अॅडम स्मिथ

मनुष्यप्राणी जंगलातील झाडावरून खाली उतरला तेव्हापासून त्याला प्रत्येक पावलागणिक जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या सर्व अडचणींवर मात करीत करीत तो आजच्या स्थितीपर्यंत पोहोचला. हे साध्य करण्यासाठी त्याला बऱ्याच उपाययोजना कराव्या लागल्या. परंतु आजही जगातल्या सर्वांत श्रीमंत राष्ट्रात पसरलेल्या गरिबी, भेदाभेद, उच्चनीचता यावरून असे अनुमान काढावे लागते की हे उपाय अनेकदा तोकडे पडले.
अनेक संकटातून माणूस सुखरूप बाहेर पडू शकला कारण तो कायम समूहामध्ये सुरक्षित राहिला. परंतु इतर प्राणी उदा. मुंगी, मधमाशी यांसारखा तो समूहातील अनेकविध कामांपैकी विशिष्ट काम करण्याची नैसर्गिक प्रेरणा घेऊन काही जन्माला नव्हता आला.

पुढे वाचा

भान

निदान लोकशाही- अंतर्गत चालणाऱ्या राजकारणाला तरी आपल्या मर्यादांचे भान असणे व त्याने त्यांचे उल्लंघन न करणे आवश्यक आहे. नाहीतर जेथे अप्रमाणिकपणा, भ्रष्टाचार, सामान्यांची फसवणूक, व्यक्तिगत सत्ता व लाभ ह्यांसाठी चालणारा नागडा संघर्ष आहे, तेथे काहीच शक्य नाही ना समाजवाद, ना बहुजनहितवाद, ना सरकार, ना सार्वजनिक व्यवस्था, ना न्याय, ना स्वातंत्र्य, ना राष्ट्रीय एकता.
थोडक्यात म्हणजे अशा परिस्थितीत देशच अस्तित्वात राहू शकत नाही.
जयप्रकाश नारायण
( एव्हरीमॅन नियतकालिकातील लेखामधून)