मासिक संग्रह: जुलै, २०२०

मनोगत

आजचे वर्तमान उद्याचा इतिहास असतो असे जेव्हा जेव्हा म्हटले जाते तेव्हा इतिहासाचे सामान्यीकरण होते असे नाही. तसेही इतिहास हा कधीच खूप भव्य-दिव्य किंवा काळवंडलेला नसतो. तथ्यांचे तपशील, (मग ती तथ्ये कधी उजळवून टाकणारी, आशादायी किंवा कधी उदासीन करणारी, हिंसक अशी असू शकतात) त्यांचे दस्तावेजीकरण हे इतिहासाचे महत्त्वाचे अंग आहे.

कोरोनाची नोंद उद्याच्या इतिहासात होईल. आजवर असे अनेक साथीचे रोग इतिहासजमा झाले आहेत. त्या त्या वेळी ह्या रोगांनी केवळ शरीरालाच नव्हे तर समाजमनांनाही पोखरले. तसेच त्या आपत्तीने अनेक संधीही दिल्या. आरोग्यशास्त्रात नवनवीन शोध लागले.

पुढे वाचा

उत्क्रांती

‘आपण पृथ्वीवरचे सर्वात प्रगत आणि यशस्वी प्राणी आहोत’ असा माणसाचा समज असतो. निसर्गतः ज्या क्षमता माणसात नाहीत, त्या त्याने यंत्रे बनवून मिळवलेल्या आहेत. माणूस विमान बनवून उडू शकतो किंवा दुर्बिणीतून दूरवरचे बघू शकतो. त्यामुळे माणूस प्रगत आहे असे म्हणता येईल. पण प्रगत असला म्हणून माणूस पृथ्वीवरील सर्वात यशस्वी प्राणी ठरतो का? उत्क्रांतीमध्ये (evolution) जो जीव जास्तीत जास्त वर्षे टिकून राहतो, तो यशस्वी समजला जातो. या व्याख्येनुसार माणूस यशस्वी ठरेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर काय असेल याचा विचार करण्याआधी उत्क्रांती म्हणजे काय, ती कशी घडते आणि माणसाची उत्क्रांती कशी झाली हे समजून घेतले पाहिजे.

पुढे वाचा

पुन्हा-पुन्हा घडणारे अघटित

२५ मे २०२०. घटना तशी नेहमीची होती. मिनियापोलीस शहरात एका श्वेतवर्णी पोलिसाद्वारे एका कृष्णवर्णीयाची हत्या झाली. जॉर्ज फ्लॉईड असहाय्यपणे ‘मी श्वास घेऊ शकत नाही’ असे सांगत असताना इतर ३ अकृष्ण पोलीस नुसते पाहत असतात पण डेरेक चौहीनला जॉर्जच्या मानेवर गुडघा रोवून खून करताना थांबवत नाहीत. हा प्रकार केवळ दहा पंधरा सेकंद चालला नाही तर जवळजवळ नऊ मिनिटे चालला. पाचशे सेकंदांपेक्षाही अधिक. प्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीपर्यंत यायला जितका वेळ लागतो त्याहीपेक्षा जास्त वेळ.

खरेतर हा नेहमीचाच प्रकार आहे. अशा प्रकारे पोलीसांद्वारे थोड्याफार फरकाने अनेक हत्या याआधीही झाल्या आहेत.

पुढे वाचा

जागतिक साथींचा इतिहास – कॉलरा

कॅरेबीअन समुद्रातील एक लहानसा गरीब देश म्हणजे हैती. या देशात डिसेंबर २०१०मध्ये अचानक जीवघेण्या अतिसाराची साथ पसरली. काही दिवसांतच हजारो लोक आजारी, तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले. ती साथ कॉलऱ्याची होती. त्यापूर्वीच्या १०० वर्षांत हैतीमध्ये कॉलऱ्याचा एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे तिथले नागरिक या आजाराबद्दल अनभिज्ञच होते.

जानेवारी २०१०मधील विनाशकारी भूकंपानंतर जगभरातून हैतीला मदतीचा ओघ सुरू झाला. त्यापैकी एक म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेची नेपाळी स्वयंसेवकांची तुकडी. त्यांच्या कॅम्पमधून जमा होणारा मैला जवळच्याच आर्टीबोनाइट नदीत सोडला जाई. नेपाळमध्ये कॉलरा एंडेमिक म्हणजेच त्या भागात वर्षानुवर्षे टिकून राहिलेला आजार आहे.

पुढे वाचा

करोनाचा सामना करताना

करोनाचा सामना करताना आपल्या अर्थव्यवस्थेमधील उणिवा, त्रुटी सर्वांच्या लक्षात आल्या. नवीन आर्थिक धोरणाचे समर्थक सातत्याने होणऱ्या जीडीपीवाढी संदर्भात आकडेवारी देत, गरिबी कशी झपाट्याने कमी होत आहे याचे दाखले देत होते. 

तर दुसरीकडे, या धोरणाचे टीकाकार वाढती विषमता, वाढती बेरोजगारी, पर्यावरणाचे संकट व सर्व पातळीवर म्हणजे व्यक्ती, कंपन्या, देश यांचे वाढणारे कर्ज याचे दाखले देऊन वाढ म्हणजे सूज आहे, यात मानवी विकासाला स्थान नाही हे सांगत होते. 

नव्या अर्थव्यवस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवाक्षेत्राची वाढ व त्याचा उत्पनातील वाटा मोठा केला, असंघटित क्षेत्र, ज्यात स्वयंरोजगाराचे मोठे स्थान आहे, ते वाढविले व प्रत्यक्षात संघटित क्षेत्रात “विना रोजगार” दिसत आहेत.

पुढे वाचा

राज्यसत्तेला कर्तव्याचा विसर

मूळ लेखक : क्रिस्टोफर जैफरलोट आणि उत्सव शाह.

भारतामध्ये सद्यःस्थितीत सुरू असणाऱ्या लॉकडाऊनची तुलना २०१६च्या नोटबंदीच्या घटनेशी केली जाते. त्याची काही कारणे आहेत. पंतप्रधानांनी अचानकपणे लॉकडाऊन जाहीर करून सबंध देश बंद करण्याची घोषणा केली. समाजातील सर्वच घटकांवर, विशेषतः कष्टकरी गोरगरिबांवर त्याचे फार मोठे परिणाम झाले. राजकीय कामकाज करण्याची प्रधानमंत्र्यांची ही शैली जीएसटी लागू करण्याच्यावेळीही दिसली होती. यावरून शासनाचे निर्णय आणि अधिकारकेंद्र उच्चपदस्थांकडे असल्याचे दिसून येते. ही परिस्थिती इंदिरा गांधीच्या कालखंडाची आठवण करून देते. फरक एवढाच दिसून येतो की सत्तरच्या दशकात सरकारच्या काम करण्याची पद्धतीच्या तुलनेत सध्याच्या सरकारांमध्ये राज्यांबद्दलची भूमिका संकुचित होताना दिसून येते.

पुढे वाचा

बालमजुरी निर्मूलन सहज शक्य आहे

बालकांना आहे भान, समाजाला केव्हा?

“बालमजूर म्हणजे काय आहे हे लोकांना कळतच नाही म्हणून ते आपल्या लहान-लहान मुला-मुलींना आपल्याबरोबर कामाला नेतात. कां नेतात याचे कारण काय आहे हे तरी कुणाला कळतेय का?

यंदा आठव्या वर्गात जाणारी १३ वर्षे वयाची पिपरी (पुनर्वसन) गावाची सुश्री अमिता महाजन त्वेषाने प्रश्न विचारते आणि समाजाला याचे उत्तर देता येणार नाही हे कदाचित माहीत असल्याने स्वतःच उत्तर देते –

“मोठ्या साहेबांच्या ऑफिसमधील सावलीत काम करणाऱ्या शिपायाला दिवसाचे ६०० रुपये रोज मिळतात; त्यात त्याचे घर आरामात चालते आणि त्याच्या मुलांना कधीच मजुरी करावी लागत नाही; … आणि जे मजूर दिवसभर उन्हांत मेहनत करतात, त्यांना फक्त १५० किंवा १०० रुपये रोज मिळतात.

पुढे वाचा

क – कवितेचा – ‘महाकवी’

शेतकरी 
पेरतो जमीन
चाड्यातून रुजवतो :
काळ्या भिन्न मातीवर पिकांची बीजं 

जसं शिकणार पोरगं लिहितं
काळ्या भिन्न पाटीवर अबकडई….

अन् मग
उगवून येते
मातीतून हिरव्यागार कणसांची कविता…. 

शेतकरी.. शेतकरी महाकवीच तर आहे!

डिस्‌इन्फेक्टन्ट

कुठे मिळेल एखादा
महारेरा रजिस्टर्ड
मनाचा शांत कोपरा,
आठवणींची पथारी पसरायला?

अस्वस्थतेच्या काहिलीला
कुठे बसवून मिळेल
फाईव्ह स्टार इन्व्हर्टर एसी?
तितकाच गारवा वर्तमानाचा…!

कुठल्या वॉर्डमध्ये होतील
भीतीचे भुंगे सॅनिटाईज?
कुठल्या औषधात ही
गढूळ संध्याकाळ घालून प्यायली
की गोड लागेल?

विवंचना, काळजी इत्यादींचे
मास्क कोणत्या
मेडिकलमध्ये मिळतील?

सकारात्मकतेचे सर्जिकल ग्लोव्ह्स
घालून झोपले तर
नाकातोंडात जाणारी रात्र
जरा कमी होईल का माझी?

…माझं हे हल्ली असंच होतंय
कळत नाही नक्की

काय डिसीनफेक्टन्ट करायचंय ….शहर, संध्याकाळ की कवितेची वही …..

दूध आणि वातावरणबदल

वातावरणबदलामुळे मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे याची आता सर्वांना कल्पना आली आहे. त्यामुळे हवेतील कार्बन-डायऑक्साइड आणि मिथेन कमी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सरकारने यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत हे खरे आहे. पण व्यक्तिशः आपणही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण काय केले असता वातावरणातील ग्लोबल वॉर्मिंग गॅसेसचे प्रमाण व उत्सर्जन कमी होईल याचा विचार करू. 

गाई व म्हशी हे रवंथ करणारे प्राणी आहेत. त्यांना चार जठरे असतात. त्यांपैकी दोन जठरांमध्ये त्यांनी खाल्लेल्या गवताचे व इतर पालापाचोळ्याचे जंतूंच्या साह्याने पचन केले जाते.

पुढे वाचा