मासिक संग्रह: ऑक्टोबर , २०२१

कविता – कालची व आजची

कविता आजची असो अथवा कालची, तिच्या निर्मितीमागील प्रेरणा मानव्य असते. तिला स्थलकालाचे बंधन नसते. साहित्य निर्मितीमागील प्रेरणा ही सर्वसामान्यपणे प्रत्येक देशात व भाषेत सारखीच असते. साहित्याची निर्मिती होण्यासाठी एक फार मोठी शक्ती आवश्यक असते. ती म्हणजे “प्रतिभा”! वामनाने यालाच ‘कवित्वाचे बीज’ असे म्हटले आहे. त्यासोबतच स्फूर्ती व कल्पनाशक्तीही महत्त्वाची असते. प्लेटो व अरिस्टॉटलने कलात्मक अनुकरणाचा (Artistic Imitation) सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मतानुसार अनुकरणाच्या माध्यमातून काव्याची निर्मिती होत असते. विल्यम वर्डस्वर्थने काव्य-स्फूर्तीची व्याख्या ”उत्कट भावनांचा सहज उत्स्फूर्त उद्रेक” अशी केलेली आहे. Prescott च्या मतानुसार प्रतिभा घडविणारी शक्ती म्हणजे ”कल्पनाशक्ती”.

पुढे वाचा

सूर्याने उजाडलंच पाहिजे…!

विधवा असणं….
खडक फोडून पाणी काढल्यासारखं
पाण्याचा मागमूस नाही
उभं पीक डोळ्यांदेखत जळावं
नुसतं जळत जावं
सदाहरित वृक्ष दुष्काळात करपणं
करपल्यालं खोडंही ओरबाडून टाकणं

विधवा असणं….
म्हणजे आतल्या आत सोलत जाणं
कुठेच थांबा नाही
शेवटचं ठिकाणही नाही
मनसोक्त आनंद लुटावा असा कॅनव्हासही नाही
कोरड्या बारवमध्ये पोहत सुटायचं
पाण्याचा गंधही नाही…

विधवा म्हणजे….
असतो एकटीचा प्रवास
माघार नाहीच नाही
पुढेही अंधार पाचविला पुजलेला
भयाण स्वप्नांचं घर असते विधवा…
तिला दार नाही
खिडक्या तर मुळीच नाहीत
गावातील शेवटचं घर हाच कायमचा पत्ता
ओंजळीत मावेल एवढं हसू नाही
रुजावं कुठे तर सुपीक माती नाही
चालतात आतल्या आत कित्येक महायुद्ध
ज्याला अंत नाही…

विधवा असणं नेमकं काय?

पुढे वाचा

पटरी

मुंबई.

घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारं, ऐन रात्रीतही टक्क जागं राहत कधीच न झोपणारं शहर. स्वत:चं हे वेगळेपण जपण्यासाठीच का माहीत नाही, नेहमीप्रमाणं आजही ते झोपलं नव्हतं. याच जागरणं करणाऱ्या मुंबईतला सेंट्रल गव्हर्नमेंट हाऊसिंग कॉलनीमुळे सुप्रसिद्ध असलेला अँटॉप हिल विभाग. त्यालाच खेटून असलेली बांडगुळासारखी वाढत गेलेली कुप्रसिद्ध समजली जाणारी अँटॉप हिल झोपडपट्टी. रात्रीच्या म्हणा किंवा मग पहाटेच्या म्हणा तीनच्या ठोक्याला तिथल्या दोन खोल्यांतून अनुक्रमे मंदा केडगे आणि नाझिया खान या दोघी बाहेर पडल्या. मंदाच्या एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात पाण्यानं भरलेलं टमरेल.

पुढे वाचा

समकालीन घटना आणि स्त्रीवादी दृष्टिकोण

सोशल मीडियावर काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही आणि जर ती गोष्ट स्त्री सुधारणेच्या विरोधात असेल तर मग काही सांगायलाच नको. पुरुषप्रधान मूल्ये कवटाळणारे लोक त्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायरल करतील की संपूर्ण स्त्री सुधारणा चळवळींनाच अगदी कवडीमोल ठरवतील. गेल्या २-३ महिन्यांमध्ये अशाच दोन घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि विस्तव विझावा तशा काही दिवसातच सगळ्यांच्या स्मरणातूनही गेल्या.

पहिली घटना म्हणजे, लखनऊ, उत्तरप्रदेश येथील एक विडीओ व त्या ठिकाणचे सिसिटीव्ही फुटेज ज्यात एक मुलगी तिची चूक असूनही एका टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करते आणि तो इसम मात्र पलटवार न करता मदतीसाठी याचना करताना दिसतो.

पुढे वाचा

स्टोन्स इन्टू स्कूल्स

नुकतंच ‘स्टोन्स इन्टू स्कूल्स’ (लेखक ग्रेग मॉर्टेन्सन, अनुवाद – सुनीति काणे) हे पुस्तक वाचून झालं.

ग्रेग हा अमेरिकन गिर्यारोहक. तो काराकोरम पर्वतराजीतल्या K2 या जगातील दुसऱ्या सर्वोच्च (एव्हरेस्ट नंतर) शिखराच्या मोहिमेवर एकटाच गेलेला असतो. वातावरण खूप खराब झाल्यामुळे परतताना White-out झाल्याने तो वाट हरवून बसतो व काही दिवसांनी कोर्फे या पाकिस्तानातील एका भलत्याच गावात पोहोचतो. येथील गावकरी त्याला आसरा देतात. मदत करतात.

काही दिवसांनी तो परत जायला निघतो तेव्हा, त्याला त्या छोट्या गावातील लोक निरोप द्यायला जमतात. त्यातील एका चिमुरडीला ग्रेग विचारतो की मी तुला काय देऊ?

पुढे वाचा

खाद्यतेलाच्या संदर्भात स्वयंपूर्ण होण्यासाठी

हरितक्रांतीमुळे भारत तृणधान्यांच्या संदर्भात बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झाला आहे, एवढेच नव्हे तर गेली काही वर्षे तो प्रामुख्याने तांदुळाची निर्यात करीत आहे. तृणधान्यांच्या संदर्भात असे स्वयंपूर्ण होण्याची किंमत म्हणून आपल्याला तेलबिया आणि कडधान्ये यांच्या संदर्भात परावलंबी व्हावे लागले आहे. हरितक्रांतीचा पाया म्हणजे तांदूळ व गहू या पिकांच्या दर हेक्टरी उत्पादनात लक्षणीय प्रमाणात वाढ हा होय. या तृणधान्यांच्या उत्पादकतेत वाढ झाल्यामुळे शेतकरी या पिकांकडे आकृष्ट झाले. त्यांनी कसदार व सिंचनाची सुविधा असणाऱ्या जमिनीवर तांदूळ व गहू पिकवायला सुरुवात केली. परिणामी निकृष्ट प्रतवारीच्या जमिनीवर आणि कोरडवाहू पट्ट्यांवर तेलबिया व कडधान्ये ही पिके घेतली जाऊ लागली.

पुढे वाचा

मन मेलं आहे… आणि हातावरच्या रेषा

मन मेलं आहे…

आता दुःख करणंही सोडलं आहे,
सुन्न होणं दूरच
आता 
हळहळ करणंही सोडून दिलं आहे.

निर्भया बलात्कारानंतर वाटलेला
क्रोआक्रोश आटला आहे.
कशासाठी कोणासाठी मेणबत्त्या लावायच्या?
अन्याय होतो, पण न्यायासाठी व्यक्ती मात्र या जगातही नाही.

दगडाला सुद्धा जिथे पाझर फुटतो असं म्हणतात,
तिथे आता हृदयाला पाझर फुटणं कठीण झालं आहे.
मुद्दामच, कळूनही, माणसाने स्वत:तील माणुसकी
कुठे तरी संपवून टाकली आहे
.
जिथे असे नरभक्षक, वासनांध जन्माला येतात, निर्माण होतात,
ज्यांना कोणाचं भान रहात नाही,
तिथे आता स्व
तःची कीव करावीशी वाटते.

पुढे वाचा