Author archives

इकोटोपिया पर्यावरणीय जीवनशैलीचे कल्पनाचित्र

कादंबरी हा साहित्यप्रकार किती सर्जनशीलपणे हाताळता येऊ शकतो याचा अद्भुत प्रत्यय अर्नेस्ट कॅलनबाख यांची इकोटोपिया ही कादंबरी वाचताना येतो. मानवी संबंधातील गुंतागुंत, ताणतणाव, सर्जनशील पैलू, विश्वाचे आकलन, मनुष्य आणि विश्व यांच्यातील सहसंबंध हे असे कादंबरीचे विविधांगी विषय असतात हे आपण नेहमीच अनुभवतो. लेखकाची कल्पनारम्यता, चिंतनशीलता, भाषेच्या माध्यमातून एखाद्या कथेच्या अनुषंगाने कादंबरीत व्यक्त होते. याशिवाय ही कादंबरी वाचकाला खूप काही देऊ शकते हे इकोटोपिया वाचताना लक्षात येते. विश्वातील मनुष्यप्राणी व निसर्ग यांच्यातील सहसंबंध कसे आहेत हे प्रभावीपणे सांगणे पुरेसे न मानता, हे सहसंबंध कसे असावेत, हे कसे घडवले पाहिजेत, काय केले म्हणजे ते संबंध अधिक न्याय्य, आनंददायी होतील, याची एक ब्लू प्रिंट देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.

पुढे वाचा

शैक्षणिक आरोग्य : दखलपात्र गुन्हा

शैक्षणिक धोरण हे सर्वंकष अर्थनीतीचा एक घटक असते. आर्थिक धोरणाच्या अनुषंगाने शासनाची शिक्षणविषयक भूमिका ठरते. देशाचे आर्थिक धोरण मध्यमवर्गाय जीवनशैलीला डोळ्यासमोर ठेवून ठरविले गेल्यामुळे माध्यमिक, प्राथमिक व पूर्व-प्राथमिक शिक्षणापेक्षा इंजिनीअरिंग व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रश्न मूलभूत वाटणे स्वाभाविक आहे. हे मूलभूत ‘शैक्षणिक आरोग्य’ म्हणजेच पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षण. मोफत, सक्तीचे व चांगले शिक्षण दिले जाणे, ही शासनावर केवळ घटनात्मक जबाबदारी नाही तर त्याचे ते सामाजिक-सांस्कृतिक कर्तव्य आहे. आजवर देशातील सर्व राज्य व केंद्र सरकारांनी (ज्यांमध्ये आता सर्व राजकीय पक्ष सामील आहेत) मुलांच्या या मूलभूत शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी मी काहीही लिहिण्याचे टाळतो कारण ते प्रश्न नाजुक तर आहेतच पण त्यातले काही अपरिवर्तनीय वास्तव पुढे मांडणे हे पुरुषी अहंकाराचे लक्षण मानले जाते.
(एखाद्या स्थितीला, ती) “आज आणि इथे आहे या कारणासाठीच मान्यता देणे मला शक्य नाही’ असे तुम्ही म्हणता. परिस्थिती बदलायची धडपड जो कोणी करतो तो असेच म्हणतो. पण वास्तव किती बदलता येईल हा प्रश्न पडतोच. स्त्री ही शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे. ती कामसुखाकरता पुरुषाच्या इच्छेतर अवलंबून आहे (पुरुष मात्र तसा नाही) व बाळंतपण, बाळांना स्तनपान देणे या नैसर्गिक प्रक्रियांमुळे तिच्यावर बंधने येतात, ती परावलंबी होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

“ ‘मित्र’च्या निमित्ताने’ या सुनीती देव यांच्या लेखासंबंधी (आ.सु. ऑक्टोबर, २००३) माझी प्रतिक्रिया : सुनीतीबाईंशी बऱ्याच बाबतीत माझे मतैक्य आहे. त्या म्हणतात तसे दादासाहेबांचा दलितांविषयीचा ग्रह न समजण्यासारखा आहे. बऱ्यापैकी बुद्धिवादी वाटणारा माणूस स्वतःस येणाऱ्या एका अनुभवामुळे सबंध जमातीविषयी एवढा आकस धरू शकेल असे वाटत नाही. त्याचे अधिक खोल जाणारे कारण दिले असते तर त्या पात्राला पोषक ठरले असते. तसेच आपल्या आग्रहीपणाने ते मुलांवर त्यांना वृद्धा-श्रमात पाठविण्याचा निर्णय घेणे भाग पाडत आहेत, हे त्यांना कळण्यासारखे आहे. पण या बाबतीत निदान असे म्हणता येईल की कळूनही त्यांचे खचणे व तो निर्णय न पटवून घेणे समजण्यासारखे आहे.

पुढे वाचा

‘उंबरठा’ने मनात निर्माण केलेले प्रश्न

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर ‘उंबरठा’ हा सिनेमा पुन्हा पाहिला. २०/२५ वर्षांपूर्वी तो जेव्हा प्रथम प्रदर्शित झाला तेव्हाही पाहिला होता आणि त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चर्चेचा कार्यक्रमही आयोजित केला होता. आजही तो चित्रपट माझ्या मनात तीच अस्वस्थता, तेवढ्याच तीव्रतेने निर्माण करून गेला. या अस्वस्थतेत वाचकांनाही सहभागी करून घ्यावे असे वाटले म्हणून ही प्रश्नावली.

१. महाजन कुटुंबाच्या घरातील एकंदर वातावरणात समाजकार्य करणाऱ्या सासूची एकाधिकारशाही दिसते. ती मोठी सून स्वीकारते परंतु धाकट्या सुनेला – सुलभाला, जिला स्वकर्तृत्त्वाचे भान आहे, स्वीकारणे जड जाते. त्यात तिचे काय चुकले?

पुढे वाचा

पगडी सम्हाल जठ्ठा

अनेक कारणांनी शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्याचा प्रश्न आज पूर्णपणे धोक्यात आला आहे. विशेषतः अन्नधान्ये, फळभाज्या व फळफळावळे या क्षेत्रामध्ये आज जागतिकीकरणाचा फायदा घेऊन परदेशी कंपन्यांनी भारतीय बियाणे उत्पादन व्यवसाय आपल्या कब्ज्यात घेण्याचे हरत-हेचे बरेवाईट प्रयत्न चालविले आहेत. परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या देशातील सॉफ्ट ड्रिंक्स तयार करणाऱ्या सर्व कंपन्या भरमसाठ किंमती देऊनच विकत घेतल्या व सॉफ्ट ड्रिंक्सच्या धंद्यातून हिंदुस्थानला हद्दपार केले आहे. आपण यापासून कोणताही धडा घेतलेला नाही. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये बीजोत्पादन करणाऱ्या भारतीय कंपन्या होत्या. परंतु या सर्व कंपन्या आज परदेशी कंपन्यांनी विकत घेतल्या आहेत.

पुढे वाचा

उपकार, औदार्य आणि त्याग . . . एक पाठ (पूर्वार्ध)

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यूयॉर्क येथील अधिवेशनात ख्यातनाम साहित्यिक-नाटककार विजय तेंडुलकर यांनी अध्यक्षपदावरून एक भाषण केले. त्यावर महाराष्ट्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी दैनिकांमधून अमेरिकेतील भाषणाचे जे त्रोटक वार्तांकन झाले त्यावर विसंबून आपल्याकडे टीकाटिप्पणी होत आहे. त्यामुळे तेंडुलकर ज्या मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छित आहेत त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष होताना दिसत आहे. कान बंद ठेवून ऐकण्या-वाचण्याचे हे भाषण नव्हे. म्हणूनच संपूर्ण भाषण आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. ते वाचावे आणि मग ठरवावे की या भाषणाचे काय करावे!
उपकार आणि औदार्य या विषयावर तुमचा पाठ या व्यासपीठावरून आज मी घेणार म्हणतो.

पुढे वाचा

नागरी चटई क्षेत्र: वापर आणि गैरवापर

आजकाल महाराष्ट्रात शहरे वेगाने वाढत आहेत. त्यांना काही शिस्त नाही, शहरांचे नियोजन नीट होत नाही. हे आपल्या सर्वांचे अनुभव आहेत. शहरात बेदरकार-पणे आणि बेकायदेशीरपणे इमारतींची उभारणी केली जात आहे. नागरी ध्येयधोरणे, कायदे आणि नियोजनाचे आराखडे हे सरकारी दप्तरांतील कागदांपुरतेच मर्यादित आहेत आणि वास्तवात मन मानेल तशी बांधकामे झपाट्याने उभारली जात आहेत. या पार्श्वभूमी-वर नागरी नियोजनाच्या संदर्भात चटईक्षेत्र आणि चटईक्षेत्राची चोरी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
औद्योगिक क्रांती युरोपमध्ये सुरू झाली आणि 2-3 शतकांत वसाहतींच्या देशांतसुद्धा पसरली. या क्रांतिकारी बदलांची प्रक्रिया आणि परिणाम सर्वसाधारणपणे सारखेच होत होते तरी त्या परिणामांची तीव्रता आणि वेग मात्र असमान राहिले.

पुढे वाचा

स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (3)

वैज्ञानिक नीती
गेल्या वर्षात उत्तरांचल विश्वविद्यालयाचे कुलगुरू राजपूत यांचे नाव चर्चेत होते. पदार्थविज्ञान या विषयातील त्यांचे संशोधन वादग्रस्त ठरले होते. दुसऱ्याचे संशोधन स्वतःच्या नावावर त्यांनी खपवले होते. हे त्यांनी एकदा नाही तर अनेकदा केले होते. त्यांचे एकंदर संशोधन याच प्रकारचे होते असेही मत यावेळी आले होते. हे गृहस्थ स्वतःस उच्च कोटीचे वैज्ञानिक मानत व आपल्या नावावर तीनशे संशोधन-लेख आहेत असे अभिमानाने सांगत असत. भारताचे शिक्षणमंत्री मुरली मनोहर जोशी यांचे संशोधन-लेख अजूनही (त्यांचा वैज्ञानिक जीवनाशी आता संबंध उरलेला नसताना) प्रकाशित होतात. अशा प्रकारचे लेख दुय्यम दर्जाच्या वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात.

पुढे वाचा

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (३)

१०. (क) मोहनी : उपयोग्य वस्तूंची विपुलता निर्माण करूनसुद्धा समता आणणे शक्य आहे.
(ख) पंडित: अमेरिकेमध्ये सुद्धा हे शक्य झालेले नाही. तेव्हा किती विपुलता आणखी आणावयाची? मुळात समानता आणणे हेच चुकीचे ध्येय असू शकेल.
(ग) मोहनी: उपभोग्य वस्तूंची जोपर्यंत वाण असते तोपर्यंत स्पर्धा आणि तिच्या निमित्ताने होणारी हाणामारी कायम राहणार. म्हणून गरजेच्या वस्तूंचे पुरेसे (adequate-optimum) उत्पादन करणे आवश्यकच आहे. जोपर्यंत एकाला जेवावयाला मिळते आणि दुसऱ्याला काबाडकष्ट करूनही ते मिळत नाही. तोपर्यंत समतेच्या गोष्टी बोलणे फोल आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अन्नधान्याचा उत्पादनाचे हुकमी तंत्र मानवाला उपलब्ध झालेले नव्हते.

पुढे वाचा