‘बिटर चॉकलेट’ या बाल-लैंगिक अत्याचारावरील आपल्या पुस्तकात लेखिका पिंकी विराणी विशेषतः आकडेवारीविषयी जे म्हणतात तो विचार मांडल्याशिवाय मला पुढे जाववत नाही. त्या म्हणतात, ‘नेमकी किती मोठी संख्या आपल्याला बालकांवर होणाऱ्या लैंगिक वास्तवाचे भान आणू शकेल? आपल्या समजुतीतील घर ही बालकासाठीची सगळ्यात सुरक्षित जागा, हीच त्यांच्या लैंगिक शोषणाचे स्थान असू शकते व त्यांच्या घरातील, नात्यातील, ओळखीतील प्रौढ हेच अत्याचारी असू शकतात, हे ह्या आकडेवारीतून दिसते आहे. ते आपल्याला कधी समजणार आहे?’
जगभरातील चित्र (UNICEF) युनिसेफच्या आकडेवारीनुसार २००२ साली जगभरातील १५० लाखांपेक्षा अधिक मुली व ७० लाखांपेक्षा अधिक मुलग्यांना जबरदस्तीचा संभोग वा इतर अत्याचारांना बळी पडावे लागले.