या लेखात भारत आणि दोन प्रगत देशांतील धर्मग्रंथ-दहन आंदोलने आणि संबंधित कायद्यांचा संक्षिप्त आढावा घेऊन वस्तुस्थितीचे विश्लेषण केले आहे.
यावर्षी डेन्मार्क आणि स्वीडनमधील कुराण जाळण्याच्या, आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अश्या घटना समोर आल्या आहेत. वकील आणि उजव्या विचारसरणीचे डॅनिश राजकारणी रासमस पैलुडन यांनी २१ जानेवारी रोजी स्टॉकहोम येथील तुर्कस्तानच्या दूतावासासमोर इस्लाम आणि मुस्लिम स्थलांतराच्या विरोधात तासभर भाषण केले आणि त्यानंतर कुराणची प्रत जाहीरपणे जाळली. स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या सलवान मोमिका नावाच्या आणखी एका इसमाने २८ जून रोजी इस्लामी ईद-उल-अजहा सणादरम्यान स्टॉकहोमच्या सर्वांत मोठ्या मशिदीसमोर कुराणची पाने फाडून जाहीरपणे जाळली.