८ ऑगस्ट १९९३ च्या लोकसत्ताच्या अंकामध्ये प्रदीप कर्णिक आणि विजय तापस ह्यांचा एक लेख आला आहे. विषय आहे – महाविद्यालयीन प्रवेशाचे राजकारण’. तो वाचून मला ही महाविद्यालये कशाला हवी आणि एकूणच शिक्षण खरोखरच कशासाठी हवे असा प्रश्न पडला.
१० वी च्या परीक्षा झाल्या आणि निकाल प्रसिद्ध झाले की महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी पास झालेली मुले आणि त्यांचे आईबाप ह्यांच्या चकरा सुरू होतात. हर प्रयत्नाने प्रवेश मिळविला जातो. वशिला, चिठ्ठी, फोन, ओळख ह्या सामनीतीने काम भागले नाही तर दामनीतीचा अवलंब करण्यात येतो. तेवढ्यानेही भागले नाही तर राजकीय पक्षांचे दबाव, स्थानिक नेतृत्वाचा हस्तक्षेप, मंत्रालयातून आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून फोन, एवढेच नव्हे तर दादागिरी म्हणजे दमदाटी किंवा प्रत्यक्ष मारहाणीपर्यन्तसुद्धा मजल जाते.