वा.म. जोशी ‘सत्यं, शिवं, सुंदरम’ या तत्त्वत्रयीचे निष्ठावंत उपासक आहेत. सत्यनिष्ठेने जीवनाला भरभक्कम आधार मिळतो. नीतिमत्तेने जीवनाला स्वास्थ्य लाभते, आणि सौंदर्याने जीवनात आनंद निर्माण होतो. मानवतेच्या सर्वांगीण हिताकरिता उपकारक अशी ही तत्त्वे आहेत.
वाड्मयकलाविषयक माझी दृष्टी या लेखात वामनराव जीवनवादी दृष्टीने कलेची मीमांसा करतात. ‘कला हे जीवनाचे एक अंग आहे, पण ते जीवनसर्वस्व नाही’ असे म्हणून नंतर ते सांगतात,’जीवनात कला नसेल तर ते बेचव, नीरस, कळाहीन होईल हे खरे, पण सत्य नसेल तर ते लुळे, आंधळे, पांगळे होईल आणि नीती नसेल तर ते रोगट, कुजके, नासके होईल.