प्रा. नोम चोम्स्की (जन्म १९२८) हे अमेरिकन भाषावैज्ञानिक दोन कारणांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भाषाविषयक त्यांच्या संशोधनाने या क्षेत्रात क्रांतिकारक पॅरॅडाइम बदल घडवून आणला, तसेच १९६०-७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धकाळात अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सरकारच्या विरोधात जो उठाव केला त्याला मार्गदर्शन करण्यासाठीही ते उभे राहिले. तेव्हापासून सातत्याने त्यांनी उदारमतवादी, लोकशाहीवादी भूमिकेतून डाव्या चळवळीचे वैचारिक प्रवक्ते म्हणून कामगिरी बजावली आहे. आदर्श अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाहीवर आधारित समाजवादी समाजरचना उभारण्याचे ध्येय ते वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावरही बाळगून आहेत, आणि तशी मांडणी करत आहेत.
जानेवारी १९७१ मध्ये चोम्स्कींना ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, इंग्लड येथे ‘बर्हाड रसेल स्मृती व्याख्यानां’साठी आमंत्रित केले गेले.