खांडववन
भारतातील सर्वांत जुने मानवसदृश प्राण्यांचे जीवाश्म (fossils) आहेत १.३ कोटी वर्षांपूर्वीचे. सत्तरेक लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत भारतात हे प्राणी वावरत. मग मात्र त्यांचे अवशेष सापडत नाहीत. ज्यांना मानव म्हणता येईल अशा प्राण्यांचा भारतातला इतिहास सुमारे सात लाख वर्षांपूर्वी सुरू होतो. तेव्हापासून ते दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळात भारतभर छोटे छोटे संकलक गट पसरले. या गटांच्या संसाधन-वापराबद्दल आपण अंदाजच बांधू शकतो.
काही विशिष्ट भूप्रदेश व्यापणाऱ्या, शेजाऱ्यांशी या प्रदेशांवरून भांडणाऱ्या, आपसातच लग्नसंबंध करणाऱ्या टोळ्या, असे या गटांचे रूप असणार. निसर्गावर या गटांचा परिणाम क्षीण असणार, आणि त्या मानाने हवामान बदलाचे परिणाम तीव्र असणार.