वजाबाकीची आणखी एक रीत हातच्याची वजाबाकी शिकवताना आकड्यांची खोडाखोड करून आकड्यांची नव्याने मांडणी करावी लागते. ह्या सवयीचे दुष्परिणाम भागाकाराची क्रिया करताना अनुभवास येतात. म्हणून मनातल्या मनात क्रिया करता येण्याची क्षमता विद्यार्थ्यांत रुजवणे, हा अध्यापनाचा एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे. विद्यार्थ्यांना कोणत्या सवयी आत्मसात करणे फायद्याचे ठरेल ह्याचा निर्णय शिक्षकाने घ्यायचा असतो.
वजाबाकीच्या आणखी एका रीतीचा विचार करू : प्रत्येक रीतीसंबंधी विद्यार्थ्यांना नुसते नियम सांगायचे की हे नियम का लागू पडतात ह्याची समज देण्याचा प्रयत्न करायचा. शिक्षणशास्त्र असे सांगतो की नियमांची समज पटली नसल्यास नियमाचे पालन करताना विद्यार्थी चुका करतात म्हणून नियम सांगण्याआधी हा नियम का लागू पडतो हे विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.