(१) मुद्रित मराठी भाषेमध्ये एकसारखेपणा राहिलेला नाहीं. संगणकाच्या साहाय्यानें मुद्रण पूर्वीपेक्षां सोपें झालें असलें तरी त्याच्या उपलब्धतेमुळे जे नवीन लोक मुद्रणक्षेत्रांत उतरले त्यांस लेखनाचे कांहीं नियम असतात, आणि ते नियम लिहितांना, किंवा मुद्रण करण्यासाठी संगणकावर अक्षरें जुळवितांना पाळावयाचे असतात हे माहीत नाहीं. परिणाम असा झाला आहे की वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतूनच नाही तर पुस्तकांमधूनसुद्धां एकसारखें मराठी वाचायला मिळत नाहीं.
(२) साक्षरतेचें प्रमाण अगदी कमी होतें तेव्हा होणारे लेखनहि साहजिकच मोजकें होतें. विचारांचा किंवा माहितीचा हा ठेवा आपण पुढच्या पिढ्यांच्या स्वाधीन करीत आहोंत अश्या भावनेनें प्रारंभी लिहिलें जात असलें पाहिजे.