प्रा. स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष
पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे प्रा.स.ह. देशपांडे यांच्या ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व’ (आवृत्ती पहिली, १ जुलै २००२) या ग्रंथात त्यांनी विवेचिलेले त्यांचे राष्ट्रवादविषयक विचार आपण समजावून घेत आहोत.
राष्ट्रवादाची गरज व त्याचे स्वरूप
स.ह. म्हणतात, “राष्ट्रवादाचे मूळ गृहीतक असे की जग स्पर्धाशील आहे. टोळ्या म्हणून,जमाती म्हणून, वंश म्हणून किंवा वेगवेगळे धार्मिक समूह म्हणून मानवजात गटागटांत विभागली गेली आहे आणि हे गट कधी या रूपाने तर कधी त्या रूपाने एकमेकांशी स्पर्धा करीत आलेले आहेत. गेली काही शतके ‘राष्ट्र’ हा मानवगट या स्पर्धेतला एक महत्त्वाचा एकक (यूनिट) झालेला आहे.