मानवजातीच्या हातून ज्या कृती व विचार घडून आलेले आहेत त्या सर्वांचा संबंध सदोदित खोलवर जाणवणाऱ्या मानवी गरजांचे समाधान करणे व वेदनांचे शमन करणे यांच्याशी निगडित राहिलेला आहे. पारमार्थिक चळवळी व त्यांची वाढ समजून घ्यायची असेल तर ही गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे. मानवाचे सर्व कष्ट व सर्जनशीलता यांच्यामागील मूलस्रोत हा मानवी भावना व इच्छा-आकांक्षामध्ये आहे, भले मग कितीही तरल व उच्च स्वरूपात ती सर्जनशीलता आपल्यापुढे प्रकट होवो.
व्यापक अर्थाने धार्मिक विचार व श्रद्धा यांच्याकडे माणसाला नेणाऱ्या या भावना व गरजा कोणत्या आहेत ?