सगळ्या महाग वस्तू फुकट!
मागच्या लेखांकामध्ये संघटित उद्योग जेव्हा उत्पादन खपवितात तेव्हा ते आपला माल ग्राहकांवर लादत असतात असे एक विधान आहे आणि त्या पाठोपाठ हा लादलेला माल ग्राहकाला फुकट पडतो असे दुसरे विधान आहे. ह्या विधानांचे विवेचन ह्या नंतर करावयाचे आहे.
माणसांच्या मनाची ओढ सुधारलेल्या जीवनमानाकडे आहे हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. पशृंमध्ये आणि माणसामध्ये जो फरक आहे तो हाच आहे. माणूस आपले हातपाय आणि त्यांसोबत आपली बुद्धी वापरून पूर्वी नसलेल्या वस्तू बनवू शकतो. गारगोटीची हत्यारे जेव्हापासून माणूस बनवू लागला, गुहा खोदू लागला, अग्नि सिद्ध करू लागला तेव्हापासूनच त्याचा ओढा सुधारलेला जीवनमानाकडे आहे असे मानावयास हरकत नाही.