विषय «उवाच»

आगरकर म्हणतात –

एकाने दुसर्‍याकरतां सहज मरणें, बुद्ध्या मारून घेणे, किंवा नाहीं नाहीं ते हाल भोगणें हें सर्वथैव इष्ट असेल तर, स्त्री मेल्यावर पुरुषानेही तिच्याबद्दल प्राण सोडणे, प्राणहत्या करणे, किंवा वैधव्यव्रताचे सेवन करणे प्रशस्त होईल, किंवा झाले असते! बायको मेल्याची वार्ता येतांच बेशुद्ध होऊन परलोकवासी झालेल्या भार्यारतांची उदाहरणे कधी तरी आपल्या ऐकण्यांत येतात काय? किंवा स्त्रीबरोबर सहगमन केलेल्या प्रियैकरतांची उदाहरणे कोणत्याही देशाच्या पुराणांत किंवा इतिहासांत कोणीं वाचली आहेत काय ? किंवा बायकोस देवाज्ञा झाल्यामुळे, नित्य भगवी वस्त्रे परिधान करणारे, क्षौराच्या दिवशीं डोक्याच्या किंवा तोंडाच्या कोणत्याही भागावरील केसांची काडीमात्र दयामाया न ठेवणारे, भाजणीच्या थालिपिठाशिवाय दुसन्या कोणत्याही आहारास स्पर्श ने करणारे, अरिष्ट गुदरल्यापासून चारसहा महिने कोणास तोंड न दाखविणारे, पानतंबाखूची किंवा चिलीमविडीची त्या अत्यंत खेदजनक दिवसापासून आमरण समिध शेकणारे, व मंगलकार्यात किंवा कामासाठी घरांतून बाहेर पडणार्‍या इसमापुढे येण्यास भिणारे नवरे कोणी पाहिले आहेत काय?

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

खरे म्हटले तर चंद्रगुप्तापूर्वीच आमचा राष्ट्रचंद्र मावळला होता. असे म्हणण्यास हरकत नाही. दोन किंवा अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारच्या राज्यविचारांनी, धर्मविचारांनी व सामाजिक विचारांनी आम्ही निगडीत झालो होतो, व त्यावेळी ज्या आचारांचे आम्ही गुलाम होतो तेच विचार आणि तेच आचार अद्यापि आम्हास बहुधा आपल्या कह्यात ठेवीत नाही काय? कोणतीही सचेतन वस्तू बहुधा दोन हजार वर्षे टिकत नाही. पण टिकलीच तर तीत जमीनआस्मानाचे अंतर झाल्याखेरीज राहावयाचे नाही. पण आमच्या शोचनीय राष्ट्रस्थितीत गेल्या दोन हजार वर्षांत म्हणण्यासारखा फेरफार झाला आहे, असे बहुधा कोणाही विचारी पुरुपास म्हणता येणार नाही!

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

सोलापूरकर अपरिचिता’चा पहिला प्रश्न असा आहे की ‘समाजात एकंदर सुधारणा हव्यात तरी कोणत्या?’ सुधारकाला असा प्रश्न करणे म्हणजे काय झाले असता तू ‘सुधारक या पदवीचा त्याग करण्यास तयार होशील, असे त्यात विचारण्यासारखेच आहे! यावर त्याचे उत्तर एवढेच आहे की, बालविवाहाचे नाव नाहीसे झाले, प्रत्येक स्त्रीस शिक्षण मिळू लागले, विधवावपन अगदी बंद झाले, स्त्रीपुनर्विवाह सर्वत्र रूढ झाला, व संमतिवयाच्या कायद्यासारखे अनेक कायदे पसार झाले, तरी त्याची तृप्ती होण्याचा संभव नाही! त्याच्या सुधारणावुभुक्षेस मर्यादाच नाही असे म्हटले तरी चालेल! ज्याप्रमाणे समुद्राला नद्यांचा, लोभ्याला द्रव्याचा, कर्णाला दानाचा व धमला शांतीचा कंटाळा कधी येत नाही किंवा आला नाही, त्याप्रमाणे खच्या सुधारकाला सुधारणेचा वीट येण्याचा कधीच संभव नाही….

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

हिंदु धर्मात बरीच व्यंगे आहेत म्हणून यहुदी, महंमदी, ख्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसर्‍या एखाद्या धर्माचा अंगीकार करणार्‍या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेच, आमचे काहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरे नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणे हे केवढे मूर्खपण आहे बरें?

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

‘व्यक्तीच्या शरीरातील अवयवांत आणि समाजाच्या शरीरातील अवयवांत एक मोठा भेद आहे, तो हा की, ज्याप्रमाणे समाजाच्या प्रत्येक अवयवास ज्ञान, संवेदन, इच्छा इत्यादि मनोधर्म पृथक्त्वाने असल्यामुळे सुखदुःखाचा अनुभव प्रत्येकास होत असून ते संपादण्याविषयी अथवा टाळण्याविषयी प्रत्येकाचा प्रयत्न निरंतर चालू असतो, त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती नाही. त्यापैकी प्रत्येकास मन नाही. त्या सर्वांचे व्यापार नीट चालणे ही गोष्ट ज्या एका व्यक्तीचे ते अवयव आहेत त्या व्यक्तीस कल्याणकारक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. समाजाचे कल्याण म्हणजे या काल्पनिक पुरुषाचे कल्याण नव्हे; तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

धर्ममंदिराची रचना श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे, असे हिंदू धार्मिकांचेच म्हणणे आहे असे नाही. पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय त्राता नाही व थारा नाही, या संबंधात बुद्धिवादाचे नाव काढले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो! एखाद्या दिवाळखोर कर्जबाजाऱ्यास ज्याप्रमाणे आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहण्याचे धैर्य होत नाही, किंवा ज्यांची जीविताशा फार प्रबल झाली आहे त्यांना आपल्या रोगाची चिकित्सा सुप्रसिद्ध भिषग्वर्याकडून करवत नाही, त्याप्रमाणे श्रद्धाळू धार्मिकास आपल्या धर्मसमजुती व त्यावर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही.

पुढे वाचा