विषय «उवाच»

कृत्रिम बंधनांच्या प्रतिकारासाठी शिकस्त करा

……गृहस्थाश्रम हीच स्वाभाविक स्थिति होय. प्राचीनकाळी बहुधा सर्व मनुष्यांना या स्थितीचा अनुभव घ्यावयाला मिळे. पण अर्वाचीन काळी भिन्न परिस्थितीमुळे पुष्कळ स्त्रीपुरुषांना अविवाहित स्थितीत आयुष्य कंठणे भाग पडत आहे व यापुढे ही संख्या झपाट्याने वाढत जाणार आहे. ही स्थिति नाहींशी करण्यासाठी निदान तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय शोधून काढणे हा फार गहन प्रश्न आहे व त्याशी झगडण्याला तेजस्वी पुरुष पाहिजेत. पण मनुष्याला त्याच्या स्वाभाविक स्थितीचा उपयोग घेऊ न देणारी कृत्रिम बंधनें जर समाजांत उत्पन्न झाली असतील, तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपली शिकस्त करणे हे सामान्य मनुष्याचे देखील कर्तव्य आहे.

पुढे वाचा

इंग्रजी माध्यमाचा हव्यास

आपल्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र परिवर्तन आवश्यक असल्याची भाषा गेले एक शतक आपण केलेली आहे. या पद्धतीत स्वतंत्र भारतात… नजरेत भरणारा एक बदल पालकांनी घडवून आणला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या व त्यांच्याकडे ‘देणग्या’ देऊनही प्रवेश मिळविण्यासाठी वाहणारा पालकांचा लोंढा. तथापि धनिक व वरिष्ठ वर्गाची मुले तेथे मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने आणि या विद्यार्थ्यांच्या हातातच पुढे समाजातील सर्व क्षेत्रांमधली सत्ताकेंद्रे जात असल्याने त्या शाळांना एक आगळी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्यांच्या नावाला दिपून आता औद्योगिक मजूरही आपली मुले त्या महागड्या शाळांत पाठवताना दिसू लागले आहेत.

पुढे वाचा

धारणात् ‘धर्मः’?

आपल्या देशामध्ये धर्माची व्याख्या धारणात् धर्मः।’ अशी केलेली असून त्याबद्दल कोणतीही शंका उरू नये म्हणून लगेच धर्मो धारयते प्रजाः । असेही विधान केलेले आहे. अथातो ब्रह्मजिज्ञासा असा संकल्प उच्चारण्यापूर्वी हजारो वर्षापूर्वी प्रजांना म्हणा किंवा प्राणिमात्राला धारण करणारा धर्म अस्तित्वात होता आणि तो केवळ माणसांमध्येच नसून कृमिकीटकांपासून तो पशुपक्ष्यांतही होता. मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची मोहळे, दिगंत संचार करणारे पाखरांचे थवे, लांडगे, हरणे, वानरे ह्यांचे कळप ह्यांच्या जीवनासंबंधी ज्यांना थोडेसेतरी ज्ञान आहे त्यांना त्यांची समाजव्यवस्था कशी बांधीव असते ते सांगण्याची गरज नाही. ह्या मनुष्येतर योनी सोडून मानवाच्या आदिमतम समूहाकडे पाहिले तरी काही ना काही समाजव्यवस्था तेथे आढळतेच.

पुढे वाचा

आपण काय करावे?

आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि जगाकडे ताठ मानेने पाहिले पाहिजे. जगातील चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, त्यातील सौंदर्य आणि कुरूपता- या सर्व जशा आहेत तशा निर्भयपणे आपण स्वीकारल्या पाहिजेत. जग बुद्धीने जिंकायचे आहे, त्यातील भयप्रद गोष्टींनी गुलामांप्रमाणे पराभूत होऊन नव्हे. परमेश्वराची सबंध कल्पना पूर्वेकडील सर्वशक्तिमान हुकूमशहांच्या अनुभवातून निर्माण झालेली असून ती स्वतंत्र मनुष्याला मुळीच शोभणारी नाही. जेव्हा माणसे चर्चमध्ये स्वतःला दीन पापी म्हणून लोळण घेतात, तेव्हा ते तिरस्करणीय, स्वाभिमानी मनुष्याला न शोभणारे असते. आपण ताठ उभे राहून जगाकडे निर्भयपणे पाहू या, जगाचा पुरेपूर उपयोग करू या; आणि ते जर आपल्याला कुठे उणे वाटले तर ती उणीव दूर करू या.

पुढे वाचा

ऐहिक सुख

आपण ज्या जगात जन्मलो, त्याची स्थिती सर्वांना शक्य तितकी सुखदायक व्हावी, अशीच खटपट सर्वांनी केली पाहिजे, व त्यांत ऐहिक सुखाचा विचार झाला पाहिजे, ही बुद्धिवाद्यांची भूमिका आहे. आज हिंदुस्थानाला आध्यात्मिक आढ्यतेने ग्रासले आहे. आम्ही सर्व जगाला धडे देऊ ही भूमिका केवळ घमेंडीची आहे, तींत बिलकुल तथ्य नाही. जेथे आम्हांलाच काही येत नाही, तेथे आम्ही लोकांना काय शिकवणार?शास्त्रीय ज्ञानांत आघाडी मारली तरच लोकांना काही शिकवता येईल, एरवी नाही. अध्यात्म हा कल्पनेचा खेळ आहे, त्याचा व्यावहारिक उपयोग बिलकुल नाही. प्रजोत्पत्तीच्या बाबतीत सर्व जगाने संयुक्त धोरण आंखणे जरूर आहे, त्यात आपल्यापुरताच विचार कोणीही करता नये.

पुढे वाचा

कामवासना आणि नीती

जेथे जेथे दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परसंबंध येतो तेथेच नीतीचे प्रश्न उपस्थित होतात, व कामवासना नैसर्गिक रीतीने तृप्त करण्यास प्रत्येकास अन्यलिंगी व्यक्तीची जरूर असते, यामुळे याबाबतीत नीतीचे प्रश्न नेहमीच येतात. अर्थात एवढ्याच दृष्टीने पाहिल्यास असे म्हणता येईल की दोन व्यक्तींची जर संमती असेल, व एकापासून दुसर्‍यास कोणत्याही रोगाचा नकळत संसर्ग होण्याचा संभव नसेल, तर त्यांच्या समागमास हरकत नाही. नकळत म्हणण्याचे कारण कित्येक वेळा दुसर्‍यापासून संसर्गाचा संभव आहे हे माहीत असताही लोक समागमास उद्युक्त होतात, परंतु ते आपले स्वतःचे नुकसान करून घेतात व यात कोणावरही अनीतीचा आरोप करता येणार नाही.

पुढे वाचा

सत्यप्राप्तीचे उपाय

आपल्या मतांपैकी एकही पूर्णपणे सत्य नसते. प्रत्येकाभोवती संदिग्धता आणि भ्रांती यांचे वलय असते. आपल्या मतांतील सत्याची मात्रा वाढविण्याचे उपाय सुविदित आहेत. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या पूर्वग्रहांविरुद्ध पूर्वग्रह असलेल्या लोकांशी चर्चा करणे, आणि जो उपन्यास (hypothesis) अपर्याप्त सिद्ध होईल त्याचा त्याग करण्याची तयारी ठेवण्याची मनोवृत्ती अंगी बाणवणे – हे ते उपाय होत. या उपायांचा अवलंब विज्ञानात करतात, आणि त्यांच्याच साहाय्याने वैज्ञानिक ज्ञानाची भव्य इमारत उभारली गेली आहे. खरी वैज्ञानिक वृत्ती असलेला प्रत्येक वैज्ञानिक हे कबूल करायला तयार असतो की जे वर्तमान क्षणी विज्ञान म्हणून आपण स्वीकारतो त्यात अधिक शोध लागल्यावर बदल करावा लागणार आहे.

पुढे वाचा

खरी वैज्ञानिक वृत्ती

वैज्ञानिक वृत्तीचे अलीकडच्या काळातील एक अतिशय लक्षणीय उदाहरण म्हणजे सापेक्षतेच्या उपपत्तीचा सबंध जगाकडून झालेला स्वीकार, आइन्स्टाइन नावाच्या एका जर्मन-स्विस्-ज्यू शांततावाद्याची जर्मन शासनाने संशोधक प्राध्यापक म्हणून पहिल्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात नेमणूक केली होती. त्याने वर्तविलेलेली भविष्ये युद्धविरामानंतर १९१९ साली झालेल्या ग्रहणाच्या इंग्लिश अभियानाने केलेल्या निरीक्षणांनी खरी ठरली. त्याच्या उपपत्तीने सबंध प्रस्थापित भौतिकीची उलथापालट झाली. डार्विनने बायबलला दिलेल्या धक्क्यासारखा धक्का आइन्स्टाइनने तत्कालीन भौतिकीला दिला होता, असे असूनही पुरावा त्याला अनुकूल आहे हे जेव्हा दिसून आले तेव्हा सर्व जगातील भौतिकशास्त्रज्ञांनी त्याची उपपत्ती बिनतकार स्वीकारली.

पुढे वाचा

सहजप्रवृत्तीला पटेल तेच करावे

मी जे काही थोडे कार्य केले ते हौशीने, मनाच्या उत्साहाने. त्याग, तपश्चर्या, सेवा, दया हे शब्द उगाच माझ्यासाठी खर्च करू नका. त्यांचा मला नाद नाही. मी कुणासाठी म्हणून काही केले नाही. माझ्या स्वतःच्या आनंदाचा मोठा भाग त्यात होता. तशी मी बुद्धिप्रधान आहे. नेम वगैरे मी मानत नाही. शरीराला ज्याची जेवढी गरज आहे तेवढे मी पुरवते. अट्टाहासाने काही सोडत नाही. मनावर लादून काही करत नाही, लौकिकद्रष्ट्या करायची ती व्रतवैकल्ये मला हास्यास्पद वाटतात. परंतु शास्त्रीजींनी सुचवलेल्या सोमवाराचा उपास मी श्रद्धेने करते.

मनातल्या संयमाचे महत्त्व मला फार वाटते.

पुढे वाचा

मुस्लिम जातीयवादाचे आव्हान हे आहे

हिंदू-मुस्लिम संघर्ष खरा दोन मनांमधील प्रवृत्तींचा आहे….

मुस्लिम मन हे स्वभावतः विस्तारवादी आहे, कारण ते धर्मविस्तारवादी आहे. हिंदू हा बंधनवादी आहे. सीमा ओलांडावयाच्या नाहीत हा त्याने स्वतःवर घालून घेतलेला नियम….. तेव्हा हिंदू पुरेसा चैतन्यशील होण्यावर हिंदू-मुस्लिम संबंधाचे स्वरूप अवलंबून आहे….
ही चैतन्यशीलता येणे आणि मनाचा समतोलपणा साध्य होणे हे मुस्लिम राजकारणाचे आव्हान स्वीकारण्याचे खरे दोन उपाय आहेत. हिंदू सनातनीपणा कमी कमी होत जाणे, जाती नष्ट होणे, सामाजिक समतेच्या आणि मानवतेच्या मूलभूत कसोटीवर आधारलेल्या समाजाकडे चालू असलेली हिंदूंची वाटचाल अधिक जोराची होणे, हिंदू खऱ्या आधुनिकतेचा स्वीकार करीत असलेला दिसणे हे उपाय आहेत.

पुढे वाचा