२० डिसेंबर २०२५ ला लल्लनटॉपवर देवाच्या अस्तित्वावर एक सार्वजनिक वादविवाद झाला. जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यातील दोन तास चाललेला हा संवाद बऱ्यापैकी संयत आणि आजच्या काळात दुर्मीळ असा होता. विशेषतः भारतात अशा विषयांवरील चर्चा बहुतेकवेळा गोंगाटात संपतात. इथे मात्र दोन्ही बाजूंनी दिलेल्या वेळांत मुद्दे मांडले, आणि शेवटच्या भागात प्रेक्षकांनी शांतपणे प्रश्न विचारले.
तरीही हा वाद ऐकताना सतत वाटत होते की दोघेही वक्ते प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या स्तरांवर बोलत होते. मुफ्ती शमैल नदवी देवाच्या अस्तित्वाकडे ‘कारण’ (reason), ‘अनिवार्यता’, ‘कार्यकारणभाव’ (causation) अशा संकल्पनांच्या आधारे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहत होते.